मी कमावली माणसं! (अभिनेत्री मुक्ता बर्वे)

काजल डांगे
सोमवार, 15 एप्रिल 2019

सेलिब्रिटी व्ह्यू : मुक्ता बर्वे
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टिने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

या इंडस्ट्रीमध्ये मला अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. हा संपूर्ण प्रवास थोडक्‍यात सांगणं कठीण आहे. पण, माझ्या करिअरच्या या अठरा वर्षांमध्ये मी काय कमावलं असेल, तर ती माणसं. माझ्या करिअरच्या, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला अनेक चांगल्या माणसांची साथ मिळाली. उत्तम दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांच्याशी माझ्या भेटीगाठी झाल्या.

विशेष म्हणजे, खूप काही शिकायला मिळालं आणि अजूनही मी शिकतेय. मी स्वतःला नशीबवान समजते, कारण माझ्या वाट्याला नेहमी चांगल्या भूमिका आल्या. अप्रूप या गोष्टीचं वाटतं की, मला इंडस्ट्रीमध्ये अठरा वर्षे पूर्ण होऊनही माझ्याकडं उत्तम भूमिका आणि चित्रपटांच्या दमदार कथा येत आहेत. मला चांगले चित्रपट ऑफर येत आहेत, याचाच अर्थ प्रेक्षकांनाही मला अधिक काळ काम करताना पाहायचं आहे. मी सुरवातीपासूनच ज्या उत्साहानं काम करत आले आहे, त्याच उत्साहानं मी आताही काम करते. बरेच चढ-उतार, यश-अपयश पाहिलं; पण न डगमगता प्रामाणिकपणे माझं काम मी सुरूच ठेवलं. 

एखाद्या चित्रपटाची कथा मला मनापासून आवडल्यावर मी चित्रपट करायला होकार देते. इतक्‍या वर्षांच्या करिअरमध्ये मी बऱ्याच चित्रपटांमध्ये खूप छोट्या भूमिकादेखील केल्या आहेत. ‘सुंबरान’सारखा अत्यंत उत्तम चित्रपट होता. त्यामध्येही माझी छोटीच भूमिका होती; पण मला त्या चित्रपटाची कथा भावली आणि मी चित्रपट करायला होकार कळवला. मालिका, चित्रपट असो वा नाटक, मी किती वेळ दिसणार किंवा मला किती सीन्स आहेत, याला मी महत्त्व देत नाही. भूमिका छोटीशी असली तरी, ती प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणारी असावी असं मला वाटतं. ‘आम्ही दोघी’ चित्रपटातही माझा लीड रोल नव्हता. यामध्ये अभिनेत्री प्रिया बापटबरोबर काम केलं. हा चित्रपटही विशेष गाजला. 

मी बऱ्याचदा एकाच वेळी नाटक, मालिका, चित्रपट केले आहेत. माझ्याबरोबरचे नेहमी मला म्हणतात, ‘‘एकाच वेळी तू नाटक, मालिका, चित्रपट कसं काय करते?’’ पण माझे ते पॅशन आहे. यामध्ये मी थकून जात नाही किंवा मला हे काम कंटाळवाणं कधीच वाटत नाही. त्याच जोमानं, उत्साहानं मी नव्या दिवसाची सुरवात करते. कथा चांगली असेल तिथं मी आपसूकच रमून जाते. 

माझे रसिका प्रॉडक्‍शन हाऊसही आहे. सध्या माझ्या प्रॉडक्‍शन हाऊसअंतर्गत नवा प्रोजेक्‍ट सुरू नाही; पण दीड ते दोन वर्षांपूर्वी मी पाच ते सहा नाटकांची निर्मिती केली. मला प्रॉडक्‍शन टीमही चांगली मिळाली. माझे पार्टनर दिनेश पेडणेकर यांच्यामुळे माझा भार हलका झाला. अभिनय करणं वेगळं आणि निर्मिती करणं वेगळं. या दोन्ही कामांमध्ये समतोल राखणं फारच कठीण असतं; पण माझ्या टीमच्या मदतीने मी हेही काम यशस्वीरीत्या पार पाडलं. अभिनयाची आवड मला पहिल्यापासूनच होती आणि सुदैवानं यामध्येच मला करिअर करायला मिळालं, याचा मला सगळ्यात जास्त आनंद होतो. 
‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ चित्रपटानंतर 2019 मध्ये माझा ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. माझा मित्र गायक-संगीतकार सलिल कुलकर्णी या चित्रपटाचं दिग्दर्शन करतोय. निखळ विनोद आणि एका हटके ‘वेडिंगची’ गोष्ट त्यानं उत्तमरीत्या जमवून आणली आहे. चित्रपट दिग्दर्शनाचं वेड असणाऱ्या एका मुलीच्या हातात प्री-वेडिंग शूटचा प्रोजेक्‍ट येतो आणि तिला या प्रोजेक्‍टसाठी होकार द्यावा लागतो. चित्रपट बनवण्याचे वेड असलेली मुलगी प्री-वेडिंग शूट करायला जाते तेव्हा नेमकं काय घडतं, हे या चित्रपटात दाखवलं आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity View with Mukta Barve in Maitrin Supplement sakal pune today