esakal | सेलेब्रिटी वीकएण्ड :  कुटुंबाबरोबर वेळ घालवते...! 
sakal

बोलून बातमी शोधा

Ketaki-Narayan

मला जेवण बनवायला खूप आवडतं. मी वेळ मिळेल तेव्हा मला आवडणारे पदार्थ बनवत असते. या सगळ्या मला आवडणाऱ्या गोष्टी करून, जवळच्या व्यक्तींसोबत छान वेळ घालवून मी माझा वीकएण्ड आनंदात घालवते. 

सेलेब्रिटी वीकएण्ड :  कुटुंबाबरोबर वेळ घालवते...! 

sakal_logo
By
केतकी नारायण, अभिनेत्री, मॉडेल

अभिनेत्री आणि मॉडेल केतकी नारायण ही मल्याळी आणि मराठी सिनेमातून प्रेक्षकांसमोर आली. तिनं ‘युथ’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनेक मल्याळी आणि मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. वीकएण्ड कसा घालवते हे सांगताना ती म्हणाली, ‘शूटिंगमुळे मी बाहेर गावी असले किंवा घरी यायला उशीर होत असला, की मला घरच्यांना द्यायला फार कमी वेळ मिळतो. त्यामुळे मी वीकएण्डला घरी असते, तेव्हा जास्तीत जास्त वेळ माझ्या घरच्यांना देते. आम्ही खूप गप्पा मारतो. शूटिंग दरम्यान झालेल्या घडामोडी मी त्यांना सांगते. कुटुंबासोबत एकत्र जेवण, एकत्र चहा पिणं, भरपूर गप्पा मारणं यासारखं दुसरं सुख नाही. तसंच, वीकएण्डला मी घरी एकटीच असल्यास माझ्या बहिणीकडं जाते.

माझ्या छोट्या भाच्या आहेत त्यांच्याशी मी खेळते, माझ्या मित्र-मैत्रिणींना भेटते. मग तिथं आमचे न संपणाऱ्या गप्पांचे फड रंगतात. खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं या सगळ्यांना भेटून. आधीचे बरेच दिवस न सुट्टी घेता मी काम केलं असेन, तर घरी असल्यावर उशिरा उठणं, आरामात आवरणं असा माझा निवांत दिनक्रम असतो. नेहमी मला असं उशिरा उठणं वगैरे आवडत नाही. तेव्हा मी लवकर उठून योगासनं करते, पटापट आवरते. शूटिंगच्या बिझी वेळापत्रकामुळं बऱ्याच गोष्टी करणं शक्य नसतं, मग त्या गोष्टी वीकएण्डला घरी असताना करते. मला वाचन करायला आवडत असल्यानं मी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं वाचते. मी मल्याळी चित्रपटांत काम करते आणि माझ्या भूमिकेचं डबिंग मी स्वत- करत असल्यामुळं मला मल्याळी बोललेलं समजतं आणि बोलताही येतं. मात्र, ते आणखीन जास्त चांगलं येण्यासाठी मी मल्याळी शब्दांचे अर्थ कळण्यासाठी मी त्या भाषेतले चित्रपट बघते, गाणी ऐकते, मग शब्द आणि त्यांचे अर्थ लिहून ठेवते. असा माझा भाषेचा अभ्यास सुरू असतो. लॉकडाउनमध्ये मी परत पेंटिंग करू लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

रंगांचं आणि चित्रपटातल्या कलाकाराचं एक खूप खोल नातं असतं, प्रत्येक चित्रपटाची एक कलर पॅलेट असते. म्हणजे समजा एखादी व्यक्ती दु-खी असेल तर ती डार्क रंगाचे कपडे घालेल, याउलट ती आनंदी, प्रसन्न, पॉझिटिव्ह असल्यास ती पेस्टल कलर्सचे कपडे घालेल. मी हे सगळं तंत्र समजून घेण्याचा प्रयत्न करते, वेगवेगळे रंग वापरून आपण कसे वेगवेगळे भाव दाखवू शकतो हे मी शिकत्येय. त्याशिवाय मला लिहायला खूप आवडतं. त्यामुळे घरी असल्यावर मी माझ्या ब्लॉग्स आणि ब्लॉग्सवर काम करते. त्याचप्रमाणे सध्या माझं माझ्या एका स्क्रिप्टवर पण काम सुरू आहे. मला जेवण बनवायला खूप आवडतं. मी वेळ मिळेल तेव्हा मला आवडणारे पदार्थ बनवत असते. या सगळ्या मला आवडणाऱ्या गोष्टी करून, जवळच्या व्यक्तींसोबत छान वेळ घालवून मी माझा वीकएण्ड आनंदात घालवते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image
go to top