नात्यांची रेशीमवीण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chaitali Ghatol write about relationship

नात्यांची रेशीमवीण...

संत गजानन महाराज यांचं पावन तीर्थक्षेत्र म्हणून जगभरात नावारूपास आलेलं, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव हे माझं माहेर. माझे वडील पाच भावंडांपैकी एक. माझे आजोबा (कै.) विश्वनाथ आसोलकार हे किराणा दुकानदार व शेतकरी होते. तेव्हा शेतकऱ्याची परिस्थिती आजच्या तुलनेनं चांगलीच होती. महादेव मंदिराजवळ असलेल्या वाड्यात आमचं जुनं घर होतं. दहा जण त्या घरात राहायचो, घरही तसं मोठंच होतं. तेव्हा शेतीचा सगळा माल हा घरातच भरला जायचा. कित्येकदा आमच्या घराच्या आतल्या खोलीत मूग पसरलेला राहे. शेतातून कापसाचे गाडे आले, की दाबून दाबून कापूस भरायचो आम्ही. मी लहान असतानाची गोष्ट आजही आठवते. कापूस विकला, की माल नेण्यासाठी व्यापाऱ्यांचा ट्रक नेहमी रात्री ११-१२ नंतर यायचा आणि किती क्विंटल भरून झाला हे लक्षात राहण्यासाठी तो व्यापारी दुसरं कापसाचं गाठोडं येईपर्यंत मोजून झालेल्या वजनाचा सतत जप करत राहायचा. घड्याळ वाचण्यासारख्या बऱ्याच लहानसहान गोष्टी मी माझ्या आजोबांकडून शिकले, मी चौथीत असताना ते गेले; पण त्यांचं पांढऱ्या शुभ्र शर्ट पायजम्यामधलं रूप मनात कायम आहे.

आम्ही २००८मध्ये नवीन घरी स्थायिक झालो. काकाचं आणि आमचं घर हे एक भिंत कॉमन असलेलं व समान बांधलेलं. घराला मागून एक दरवाजा असल्यामुळे दोन घरं वेगळी असली, तरीही सतत येणंजाणं सुरूच. जेवणही नेहमी कुण्या एका घरात सगळे एकत्रच करतात अजूनही. नावडती भाजी असेल, तर दुसरा पर्याय कायम असतोच. घराच्या बाजूला बरीच मोकळी जागा व छान अंगण असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी जावा एकत्र बसून आपापली कामं करतात. सर्वांनी मिळून एकत्र कामं केली, की त्या कामाचं ओझं न वाटता सर्व काही सोपं होतं, आणि हाच एकत्र कुटुंबपद्धतीचा आधार आहे. या सगळ्या कामात माझी आजीही मदत करू लागायची.

शेगाव माहेर लाभल्याचा अजून एक आनंद म्हणजे मंदिर. बरेचदा संध्याकाळी मंदिरात जायचे, खूप शांतता व प्रसन्नता मिळते तिथं. प्रकटदिन, ऋषिपंचमी व आषाढी एकादशीला महाराजांची पालखी गावातून परिक्रमा करते. घरापासून अगदी २-३ मिनिटांच्या अंतरावर रस्त्यावरून पालखी जायची. ती बघण्यासाठी सर्व लोक रस्त्याच्या कडेला उभे राहत. पालखीतील हत्ती, घोडा, नाना प्रकारच्या फुलांनी सजवलेला महाराजांचा रथ, ‘गण गण गणात बोते’चा गजर करणारे वारकरी हे अतिशय सुंदर दृश्य मनात कोरलं गेलंय. दरवर्षी रामनवमीला गावात यात्रा भरते, रस्ताभर लागलेली खेळण्याची दुकानं, जुन्या प्रकारची स्टील लोखंडाची भांडी, गुळाची रेवळी, मोठा आकाशपाळणा, ‘मौत का कुआं’ ही यात्रेची वैशिष्ट्यं, मात्र काळानुसार आता हे सगळं कमी कमी होत चाललंय.

माहेराविषयी बोलताना तिथल्या खास खाद्यपदार्थाची आठवण नाही झाली, तरच नवल! शेगाव रेल्वेस्टेशनजवळील कचोरी खूप प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात सगळीकडे मिळणारी शेगाव कचोरी आता परदेशातही मिळू लागलीय. याशिवाय गावाकडे मिळणाऱ्या ताज्या भाज्या खूप छान लागतात. भंडाऱ्यात केल्या जाणाऱ्या वांग्याच्या भाजीची तर चवच निराळी आहे. गाव असो, खेडं असो, किंवा मेट्रो सिटी- प्रत्येक स्त्रीसाठी माहेर खास असतं आणि माहेरच्या आठवणीही नेहमी मनाला आनंद देऊन जातात.

- चैताली घाटोळ, इंद्रायणीनगर, भोसरी, जि. पुणे

Web Title: Chaitali Ghatol Write About Relationship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Relationssaptarang
go to top