चला, लग्नाला थोडे स्वातंत्र्य देऊया!

file photo
file photo

आजच्या बदलत्या संस्कृतीचे परिणाम बऱ्याच गोष्टींवर होताना बघायला मिळतात. मग यात नैतिक मूल्ये, मानसिकता, अभिरुची आणि अर्थातच परस्पर संबंध यांचा समावेश आहे. प्रत्येक पिढीबरोबर पुढे जात असताना काही नात्यांची संकल्पना काही बदलांतून नक्कीच जाते. आज वडील आणि आई हे आता त्यांच्या मुलांचे मित्र झालेले आहेत, स्त्री आणि पुरुष यांच्यामधील मैत्री आता नवीन राहिलेली नाही. एवढेच नव्हे तर पॉप संस्कृतीचे प्रतिनिधित्व असलेल्या प्लेटोनेटिक संबंधांनासुद्धा एक स्वीकारार्हता मिळाली आहे, परंतु लग्नाचे काय?
काही लोक कदाचित माझ्याशी सहमत नसतील, परंतु हे माझे हे वैयक्तिक मत आहे की सर्व नात्यांमध्ये बदल झाले मात्र विवाह या नात्यात बदल होण्याचा वेग सर्वाधिक मंद राहिलेला आहे. विवाह या नात्याला आपल्या संकल्पनेत आणि मूल्यांत 21 व्या शतकातील इतर नात्यांच्या बरोबरीने बदल घडवून आणायचे असतील तर माझ्या मते याच्या रचनेतच बदल घडवून आणावे लागतील.
लग्न संस्थेबद्दल मी इतका विचार का म्हणून करीत असेल? तर एक लहान मूल म्हणून आपल्याकडे लग्न संस्थेचा परिचय नेमका कसा होतो ते पाहा - लग्न म्हणजे अगदी महत्त्वाचे, निर्णायक असे पाऊल, केवळ आपल्या कौटुंबिक स्थिरतेसाठीच नव्हे तर अगदी संपूर्ण समाज व्यवस्थेचा आधार म्हणून आपल्याला लग्नाबद्दल सांगितले जाते. आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या माध्यमांमधील विवाहाच्या प्रतिमा आणि वर्णने अशी असतात की आपल्याला लग्न करायचे तर एका परिपूर्ण व्यक्तीशी, जी एकमेव असेल आणि आपल्याला पूर्ण करणारी असेल, फक्त आपल्यासाठी बनली असेल, आपली सोलमेट असेल हे आणि असलं बरंच काही आपल्या मनात विविध माध्यमातून भरवल्या जातं. जर आपण या वर्णनांनुसार लग्नाची कल्पना घेऊन आपण वाढत जातो आणि आपल्याला वाटू लागते की जणू लग्न हीच जीवनातील सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे.
आणि जेव्हा आपण एखाद्या नातेसंबंधास आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठी उपलब्धी मानतो तेव्हा काय होते? (वैयक्तिक उपलब्धी- येथे करिअर आणि पैशाबद्दल बोलत नाही) तर असे केल्यानंतर त्या नात्याकडून आपल्याला खूप अपेक्षा निर्माण होतात. खरे म्हणजे आपण अपेक्षांपासून एक पाऊल मागे टाकले पाहिजे. ते नेमके का? हे समजून घेण्यासाठी आधी रोमॅंटिझमच्या संस्कृतीकडे पाहूया. 20 व्या शतकाच्या सुरुवातीस, प्रेम कविता, चित्रकला आणि कथांच्या माध्यमातून लग्न म्हणजे आयुष्यभराचे प्रेम प्रकरण आणि आयुष्यभर सारख्या भावनेने चालणारे प्रेम अशी भावना आपल्या मनात तयार करण्यात आली. या रोमॅंटिझममध्ये असे भासविले गेले की लग्न म्हणजे "त्या एक' व्यक्तीचा शोध घेणे जो आपल्या सर्व समस्यांचे उत्तर होईल, आपल्याला कधीच एकटेपणा भासू देणार नाही आणि जोडीदार म्हणून आयुष्यभर आपली सोबत करेल! हे रोमॅंटिझमच आपल्याला इतर बाजूंचा विचार कमी करून केवळ भावनांच्या भरवशावर आपला जोडीदार निवडण्यासदेखील प्रवृत्त करते; मात्र आपण लक्षात घेतले पाहिजे की खरे प्रेम म्हणजे जोडीदाराबद्दल सर्व काही स्वीकारणे होय. कल्पनारम्य फ्लाइट म्हणून चित्रपटांमध्ये बघणे, कवितेत वाचणे आणि आनंद घेणे हे सर्व फार चांगले आहे; परंतु दुर्दैवाने खऱ्या आयुष्यात याला काही अर्थ नाही.

हीच गोष्ट आपल्याला पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे परत आणते की लग्न या नात्यावर अपेक्षांचे इतके ओझे का÷म्हणून असते? आपल्या आजूबाजूच्या रोमॅंटिक प्रेमाच्या संस्कृतीनुसार कल्पना केल्यास एखाद्याचा पती किंवा पत्नी म्हणजे त्याचा सर्वश्रेष्ठ÷मित्र असतो, एकटेपणाचा उपचार असणारा सखासोबती असतो, आपल्या सगळ्या भावनांना शब्दाशिवाय समजू शकणारी एकमेव व्यक्ती असतो, आयुष्यातील सर्व क्रियाकलापांमध्ये साथ निभावणारा साथीदार असतो आणि बरेच काही असतो! आता विचार करा की या सर्व भूमिका निभावणे एका व्यक्तीसाठी व्यावहारिकदृष्ट्या शक्‍य आहे काय? नक्कीच नाही!
मात्र आपल्या समाजात लग्न म्हणजे पूर्ण आनंद मिळवून देणारे नाते म्हणूनच त्याची व्याख्या केली जाते. खरे म्हणजे जोडीदाराची निवड रोमॅंटिक तत्त्वांनुसार केल्यावर कोणतीही परिस्थिती आपल्या हातात राहत नाही.
उलटपक्षी, माझा असा युक्तिवाद आहे की आपल्या समाजात सर्व प्रकारच्या सोबती रोमॅंटिक, नॉन-रोमॅंटिक, विवाह, आणि मैत्री या सर्वांनाच प्रोत्साहित केले पाहिजे आणि सर्वच नाती साजरी केली पाहिजेत. लग्नाच्या नात्यात गुंतवण्याची घाई करण्याऐवजी समाजाने तरुणांना एकमेकांच्या व्यक्तिमत्त्व, आवडी-निवडी, वागणूक या गोष्टींचा शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. लग्न करण्याच्या प्रारंभीच्या रोमॅंटिकवादाच्या पुढे जाण्यात आणि विवाहाबद्दल अधिक सखोल, बुद्धिमान निर्णय घेण्यास मदत होऊ शकेल अशा प्रत्येक गोष्टीस समाजाने त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे.
लग्नाला स्वातंत्र्य दिले पाहिजे. वैवाहिक जीवनात स्त्री आणि पुरुष यांनी काय भूमिका निभवायची या भूमिकेबद्दलच्या पुरुषप्रधान कल्पनेपासून लग्नसंस्थेला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, ज्यामुळे केवळ वाईट गोष्टी घडतात अशा चिरंतन प्रेमाच्या चुकीच्या कल्पनांपासून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, विवाहसंस्थेला पारंपरिक सामाजिक बंधनांपासून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. केवळ या स्वातंत्र्यामुळेच आपल्याला माणूस म्हणून खरे स्वातंत्र्य मिळू शकेल आणि प्रेम, आदर तसेच परस्परांबद्दलच्या काळजीच्या भावनेने सुशोभित केलेली एक आदर्श जीवनशैली आणि श्रेष्ठ भागीदारी म्हणून लग्न संस्था यशस्वी होऊ शकेल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com