नाशिकमधील 'हे' गड म्हणजे मॉन्सुन ट्रेकर्सला आव्हान

संजय अमृतकर
Sunday, 28 July 2019

नाशिक आणि लगतचा नगर जिल्ह्याचा परिसर पावसाळी ट्रेकिंग करणाऱ्यांना जसा आव्हान देतो, तसाच तो स्वर्गीय सुखाची अनुभूती देतो. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण अनुभवता येते...

नाशिक आणि लगतचा नगर जिल्ह्याचा परिसर पावसाळी ट्रेकिंग करणाऱ्यांना जसा आव्हान देतो, तसाच तो स्वर्गीय सुखाची अनुभूती देतो. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण अनुभवता येते...

कसदार- भरदार ट्रेकिंग करायचं असेल, तर ते फक्त पावसाळ्यातच. पाऊस जेव्हा भरभरून कोसळतो, तेव्हा चैतन्याचे दरवाजे दशदिशांनी सताड उघडतात अन्‌ चराचरांत आनंदोत्सवाला भरते येते. सह्याद्रीच्या काळ्याकभिन्न तटांना करडे ढग बिलगू लागले, की मन आनंदाने मोहरून जातं. मग एक-एक नक्षत्राच्या पाऊसधारा सह्याद्रीवर अभिषेक करतात अन्‌ सुरू होतो मेघमल्हाराचा उत्सव... या चिंब पर्वाचं माहेरघर म्हणजे नगर (उत्तर), नाशिक परिसर; पण हल्ली गर्दीचं वादळवारं हरिश्‍चंद्रगड, हरिहर किल्ल्यावर स्थिरावल्यामुळे शिस्तीला गालबोट लागतंय की काय अशी स्थिती आहे.

पाबरगड
सह्याद्रीच्या कातळकड्यांनी चौफेर वेढलेला, अपार सौंदर्याने नटलेला आणि प्रत्येक ट्रेकरचा विकपॉइंट म्हणजे भंडारदरा परिसर. रतनगड, अलंग, मदन, कुलंग हे गडकोट तर घनचक्कर; गवळदेव, कात्राबाई, आजोबा, शिपनूर आणि सर्वोच्च कळसूबाई अशी मांदियाळी या भूमीत खड्या पहाऱ्यासारखी उभी आहे. मध्यभागी अथांग विल्सन डॅम.

संगमनेरकडून आलात, की रंधा धबधबा स्वागत करतो. रंधाच्या वेशीवर डावीकडे आकाशात झेपावतो पाबरगड. पायथ्याचं टुमदार गुहिरे कुणालाही प्रेमात पाडणारं असचं. गाडी लावायला आणि जेवणाची व्यवस्था सहज होते. पाबरची चढाई उत्तरोत्तर कसदार होत जाणारी. धुक्‍याचा भुलभुलैया आणि अभिषेकी धारा नि कधी बेलगाम वारा तारांबळ उडवतो. कारवीने रान माजवलेलं. कधी ती आधार म्हणूनही उभी राहते. तीन तासांची चढाई घाम काढते.  

पट्टा किल्ला (विश्रामगड)
पावसाळ्यात या ट्रेकची मिजास कुछ और हैं. पश्‍चिमेचा भन्नाट वारा, धुक्‍याचा अभूतपूर्व लपंडाव, रिमझिम पावसाची आगळीक आणि चौफेर हिरवाकंच नजराणा... एखाद्या जातिवंत ट्रेकरला यापेक्षा अजून काय हवं! साक्षात शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झालेला हा किल्ला. गेल्या काही वर्षांत येथे बऱ्याच सुधारणा झाल्यात. या भागात औंढा किल्ला, म्हसोबा- चेन्नागिरी डोंगर, बित्तनगड, आडकिल्ला, पांढरा डोंगर असे भन्नाट ट्रेक करता येतील. घोटी- सिन्नर रोडवर सर्वतीर्थ टाकेदकडे जाणारा आडमार्ग आहे. तेथून म्हैसवळण घाटाने पट्टा, औंढा, बित्तनगडाकडे जाता येतं.

किल्ला त्रिंगलवाडी 
घोटी- इगतपुरी परिसर फॉग झोन म्हणून ओळखला जातो. सर्वांत जास्त पाऊस येथेच कोसळतो. किल्ले मोरधन, कावनाई किल्ला, बळवंत गड अर्थात सोबत भैरोबाचा माळ, त्रिंगलवाडी किल्ला, बुध्या व म्हाळुंगा डोंगर ही पावसाळ्यात ट्रेकसाठी आनंददायी ठिकाणं. मात्र धुकं, पाऊस, झोंबणारा वारा आणि आनंदी आनंद अनुभवायचा असेल, तर त्रिंगलवाडी किल्ला सर्वोत्तम. पूर्व पायथ्याशी अप्रतिम जैन लेणी आहेत. त्रिंगलवाडीला जायचं तर घोटीजवळील टाकेघोटी गावातून रस्ता आहे. वाटेत बलायदुरी हे टुमदार गाव लागतं. दुतर्फा निसर्गाची उधळण. किल्ल्यावर जाण्यासाठी त्रिंगलवाडीतून आणि पत्र्याच्या वाडीतून असे दोन मार्ग आहेत. किल्ल्यावर पूर्वेकडील मुख्य दरवाजाने न जाता दक्षिणकडून वळसा मारून पश्‍चिमेने कातळपायऱ्यांनी माथा गाठावा. हेच किल्ल्याचं वैशिष्ट्य आणि थरारसुद्धा. 

भास्करगड- उतवड
काही वर्षांत तमाम भटक्‍यांची पंढरी म्हणून त्र्यंबकेश्वर परिसर नावारूपाला आलाय. भास्करगड, हरिहर किल्ल्याचं पायथ्याचं गाव निरगुडपाडा हेच या ट्रेकचं बेस व्हिलेज. भास्करगड फेरी करून पायऱ्या उतरल्यानंतर पूर्वेला परतीला न जाता पश्‍चिमेला पायवाट दिसते. तिथून उजवीकडे उतरल्यावर उतवड चढाई सुरू होते. अन्यथा, सरळ गेलात तर डावीकडे आपण भास्करगडाला वळसा मारून डहाळेवाडीकडे उतरतो. मग निरगुडपाड्याकडे जाऊ शकतो. उतवडची चढाई दमछाक करणारी आहे. सृष्टीसौंदर्य मनोहारी आहे. उतवडच्या पोटावरचा हिरवाकंच नजराणा हृदयाची धडधड काबूत आणतो. या काळातली रानफुलं मोहक आहेत. 

या ऋतूत हरिश्‍चंद्रगडापासून ते उत्तरेला साल्हेर सालोटापर्यंत अजून अनेक अप्रतिम जागा ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहेत. जशा- कात्राबाई डोंगर, पांढरा डोंगर, पट्टा किल्ला, धोडप, इंद्राई, राजदेहेर किल्ला, चौल्हेर किल्ला, पिंपळागड, पिसोळगड, डेरमाळ किल्ला ही गर्दी नसणारी, ट्रेकिंग समृद्ध करणारी ठिकाणं आहेत.

काळजी घ्या...
   - वीकएण्ड सोडून ट्रेकिंगला जा, माहीतगार वाटाड्या सोबत न्या.
   - सोबत बॅटरी, दोर, खाण्यासाठी राखीव वस्तू, फुलचार्ज अतिरिक्त मोबाईल ठेवा.
    - जीपीएसचे ज्ञान हवे, चाणाक्षपणाने वागा. 
    - ट्रेकर्सचा ग्रुपही मर्यादित हवा.
    - धबधब्याच्या ठिकाणी सावधानता बाळगा.
   -  सेल्फी काढताना सुरक्षित ठिकाणी उभे राहा, आगळीक टाळा.
    - पाण्याचा प्रवाह ओलांडताना अनुभवी व्यक्ती, तांत्रिक साधन सोबत ठेवा.
    - जिथे दाट जंगल किंवा दगडांचं प्रमाण जास्त आहे, तिथे पावसाळ्यात जाणं टाळा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: challenging Fort for monsoon trek in Nashik