
पारंपरिक चित्रणाला छेद
- चंद्रकांत कांबळे, saptrang@esakal.com
भारतीय चित्रपटसृष्टीच्या आणि दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांच्या इतिहासामध्ये ‘दहाड’ वेबसीरीज महत्त्वाचं स्थान निर्माण करणारी आहे. एका शतकाहून अधिक काळ ओलांडला तरी भारतीय मुख्य धारेतील हिंदी चित्रपट अथवा प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांनी दलितांना हिरो म्हणून कधीच प्रतिनिधित्व दिलेलं नव्हतं (अपवाद वगळता).
‘दहाड’ ही वेबमालिका दलित स्त्री, जी पोलिस ऑफिसर आहे, तिच्याकडून केल्या जाणाऱ्या एका तपासाची थरारकथा आहे. ती एका खुनाच्या केसवर काम करत असते. सकारात्मक दृष्टिकोनातून दलित स्त्री हिरो म्हणून पडद्यावर यायला एकशेदहा वर्षं लागली. दलित स्त्रीकेंद्रित सिनेमांमध्ये दलित स्त्रीला पीडित, दुबळी आणि बलात्काराची बळी, एका विशिष्ट दृष्टिकोनातून आणि विशिष्ट पद्धतीनेच चित्रित केलं गेलं आहे.
हिंदी चित्रपटांच्या मुख्य प्रवाहधारेत १९३७ चा ‘अछूत कन्या’, तसंच दलित स्त्री-अर्भक ब्राह्मण कुटुंबाने सांभाळायची गोष्ट बिमल रॉय दिग्दर्शित ‘सुजाता’पासून ते बलात्कारपीडितांवर आधारित काही चित्रपट, जसं की, फुलनदेवीचा चरित्रपट ‘बँडिट क्वीन’, भंवरीदेवीचा ‘भवंडर’, काही काल्पनिक चित्रपट ‘अंकुर’, ‘चौरंगा’ यासोबतच सत्यजित राय यांच्या ‘सद्गती’मधील दुखियापासून ते ‘लगान’चा कचरा...
या सिनेमांमध्ये एका विशिष्ट प्रकारे दलितांना चित्रित करण्याच्या अथवा कथा सांगण्याच्या शैलीत साधर्म्य आहे आणि हे हिंदी चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळापासून आजतागायत टिकून आहे. याची कारणंही अनेक आहेत. त्यातील अत्यंत महत्त्वाचं म्हणजे, या कथा सादर करण्याचा दृष्टिकोन... दलितांच्या कथा, त्यांचं जीवन, अनुभव, संस्कृती पडद्यावर कोण आणि कसं सांगत आहेत....

sonakshi sinha
इतिहासातली अधिकतम दलित पात्रं सवर्णांच्या दृष्टिकोनातून चित्रित केली गेली आहेत. म्हणून त्यांत एक विशिष्ट प्रकारची छाप आपणास दिसून येते. दलित सिनेमाच्या अभ्यासात आढळून आलेली काही निरीक्षणं इथं नोंदविली आहेत. दलितकेंद्रित चित्रपटांची संख्या खूपच कमी असून, त्यातही अधिकांश चित्रपट सामाजिक, जातिगत अत्याचारग्रस्त, बलात्कारपीडितांवर आधारित आहेत. सवर्ण आणि हरिजन दृष्टिकोनातून दलितकेंद्रित चित्रपटात पीडित दलितांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यात आली आहे, अथवा दयाभावनेतून सवर्ण पात्र उपकारात्मक सहकार्य करताना दिसलं आहे. इतर चित्रपटांमध्ये छोटी-मोठी दलित पात्रं बहुतांशी पीडित, किरकोळ सेवक, अथवा अडाणी स्वभावाची अशी दाखविली आहेत.
संकुचित आणि पुरुषी वर्चस्ववादी दृष्टिकोनातून दलित चित्रणाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर ‘दहाड’ दलित स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून क्रांतिकारी घटना आहे. दहाडची हिरो आधुनिक, सुधारणावादी, सकारात्मक, आक्रमक आणि स्वतंत्र विचाराची स्वावलंबी दलित स्त्री पहिल्यांदाच एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून चित्रित झाली आहे. दिग्दर्शिका रिमा कागती यांनीच कथा, पटकथा रचली असून, अतिशय धाडसाने दलित स्त्री पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट थ्रिलर मिस्टरी जॉनरमध्ये यशस्वी आणि परिणामकारकरीत्या सादर केली आहे. अंजली भाटी या दलित पोलिस अधिकाऱ्याची भूमिका सोनाक्षी सिन्हाने अतिशय वजनदार शैलीत निभावली आहे. ‘दहाड’ गेल्या आठवड्यात अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे.
सकारात्मक आणि मजबूत दलित स्त्रीपात्राचा जन्म ‘दहाड’च्या रूपाने भारतीय सिनेसृष्टीत झाला आहे. कथा सीरियल किलरच्या शोधाची जरी असली, तरी पुरुषी वर्चस्व असलेल्या पोलिस विभागात काम करत असताना स्त्री म्हणून आलेले अनुभव आणि दलित स्त्री म्हणून आलेले अनुभव स्पष्टपणे पाहायला मिळतात; आणि तितक्याच ताकतीने त्याला सामोरं जाणारी अंजली.
गुन्हेगाराच्या हवेलीची झडती घेण्यासाठी गेल्यानंतर पारंपरिक मूल्यावर दृढ निष्ठा असलेला गुन्हेगाराचा बाप अंजली भाटीला ठाकुरी शैलीत थांबवतो. वाडवडिलांच्या हवेलीचं पावित्र्य टिकवून ठेवायला आम्ही जिवंत आहोत, असं सांगत सवर्ण पोलिसांना झडतीसाठी जाण्यास सांगतो, तेव्हा अंजली भाटी आपल्या शैलीत त्याला ऐकवते, ‘तेरे पुरखो का जमाना नहीं है! संविधान का टाइम है, समानता का टाइम है!’ थ्रिलरच्या माध्यमातूनही सामाजिक वास्तवाला योग्यरीत्या अधोरेखित केलं जाऊ शकतं, हे यातून सिद्ध झालं आहे.
आठ भागांत विभागलेल्या सीरीजमध्ये प्रेक्षकांना बांधून ठेवण्याची शक्ती असून, पुढच्या भागात काय, ही जिज्ञासा आहे. शेवटच्या भागात, मध्यमवर्गीय दलितांना आपल्या आडनावामुळे जातिभेदाला सामोरं जावं लागतं म्हणून काहींनी आपली आडनावं बदलली आहेत. अंजली भाटीचे वडील नावाजलेले पोलिस अधिकारी, मेघवाल नावामुळे त्यांना सरकारी नोकरीत त्रास सहन करावा लागला. म्हणून त्यांनी आपल्या मुलीचं आडनाव भाटी केलं होतं, जे अंजलीने पुन्हा अंजली मेघवाल असं केलं.
कारण अट्टल गुन्हेगार आणि सीरियल किलरला तिने यशस्वीरीत्या जेलमध्ये टाकल्यामुळे प्रतिष्ठा मिळाली. प्रश्न होता आयडेंटिटीचा, जी तिने पुन्हा मिळविली. भारतीय सिनेमाच्या इतिहासामध्ये ‘दहाड’ वेबसीरीजने एक महत्त्वाचं स्थान निर्माण करून ठेवलं आहे. पारंपरिक दलित स्त्रीचित्रणाला कठोर आव्हान दिलं असून, मुख्य धारेच्या सिनेमात दलित कथा सकारात्मक दृष्टिकोनातून सादर करण्यास चालना मिळणार आहे. यातून भारतीय सिने-इंडस्ट्रीत अधिक सर्वसमावेशक, वैविध्यपूर्ण आणि आशयघन कलाकृती निर्माण करण्यास मदत होईल.
(लेखक सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत वरिष्ठ संशोधक व चित्रपट अभ्यासक आहेत.)