ओढ आजही मातृभूमीची...

कोरोनामुळे दोन वर्षांत बाहेर जाण्याची कुठेही संधी नव्हती. ती संधी मिळाली. गोठणगाव. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड टेकड्या आणि घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेलं गाव.
Tibet
TibetSakal
Summary

कोरोनामुळे दोन वर्षांत बाहेर जाण्याची कुठेही संधी नव्हती. ती संधी मिळाली. गोठणगाव. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड टेकड्या आणि घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेलं गाव.

कोरोनामुळे दोन वर्षांत बाहेर जाण्याची कुठेही संधी नव्हती. ती संधी मिळाली. गोठणगाव. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड टेकड्या आणि घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेलं गाव. याच गावाजवळील इटियाडोह कालव्याच्या काठावर आहे तिबेट कॅम्प. दचकला असाल ना नाव ऐकून. जेव्हा इथं जाण्यासाठी संधी मिळाली, तेव्हा मनात अनेक विचार आणि कुतूहल होतं. रक्त गोठवणारी थंडी आणि त्यात नागपूरपासून १८५ किलोमीटवर जायचं. एवढ्या लांब अंतरावर दुचाकीने जाणं माझ्यासाठी धाडस होतं. प्रवास सुरू झाला, इटखेडा आलं आणि त्या चौकातून सुरू झाला तिबेट कॅम्पकडे जाण्याचा प्रवास. २५ किलोमीटरचा प्रवास. या भागात मोबाईल कव्हरेज नाही. संपर्काचं माध्यमच निकामी झालं.

सिरोली, महागाव, नवनीतपूरवरून तिबेट कॅम्प आलं. दुपारचा एक वाजला. कॅम्पमध्ये प्रवेश करणार होतो; मात्र काय विचारायचं, कोणाकडे जायचं, त्यांची भाषा समजेल काय... अशा अनेक प्रश्नांची यादी डोळ्यांसमोरून जात होती. शेवटी हिंमत केली. स्वागत कमानीतून प्रवेश घेतला. दुचाकी बौद्ध मंदिराच्या पुढे लावली. मंदिरात, परिसरात चौफेर नजर फिरविली. काही ग्रामीण मजूर रंगरंगोटी करत होते. ‘कोणी आहे का इथं?’ एकाला सहज विचारलं. तो म्हणाला, ‘भाऊ, इथं कोणी नाही. आत जा, कोणीतरी भेटेल.’ मंदिराच्या शेजारील इमारतीत दाखल झालो. दोन व्यक्ती खुर्चीवर बसल्या होत्या. बरं वाटलं. नमस्कार केला. म्हणालो, ‘नागपूरवरून आलोय. तुमच्याशी बोलायचं आहे.’ ती व्यक्ती म्हणाली, ‘हम कुछ बताएंगे नही, आप उधर जाए.

दो बजे के बाद ही हमारे ऑफिसर मिलेंगे.’ मी म्हणालो, ‘ठीक आहे. यहाँ बैठ सकता हू?’ ते म्हणाले, ‘बैठिये.’ लगेच एक खुर्ची दिली. त्याला माझं नाव सांगितलं. भेटण्याचं कारण सांगितलं. पाच मिनिटांत चर्चा सुरू झाली. त्याला माझ्याबद्दल कदाचित आपुलकी वाटली असेल. ‘आप का नाम क्या है?’ ‘कर्मा डुग्गल, वय ५० वर्षं.’ मी सहज चर्चा म्हणून प्रश्न विचारू लागलो. कर्मा म्हणाले, ‘१९७२ ला माझं कुटुंब इथे आलं. तिबेटवर चीनने हल्ला केला. आम्ही निर्वासित झालो. आम्हाला इथे जागा मिळाली. माझा जन्मही नव्हता. मी इथेच जन्मलो. तिबेटवर माझं प्रेम आहे. मला तिबेटला जायला आवडेल. मी तिबेटच्या मुक्तिदिनाची वाट पाहात आहे. मरेपर्यंत मी त्या क्षणाची वाट पाहीन. भारतात जन्म झाला, भारतावर माझं प्रेम आहे; पण तिबेट माझा देश आहे. मी भारताचा ऋणी आहे. आम्हाला जागा दिली, प्रेम दिलं.’

‘चीनच्या अत्याचाराला तिबेटमधील बांधव कंटाळले आहेत. अत्याचाराचा कळस गाठला. धर्मगुरू दलाई लामा यांच्याविषयी चीन पराकोटीचा द्वेष करतो. त्यांचा फोटोही लावू देत नाही. आम्हाला तिबेट हवाय. त्याच आशेवर भारताचं नागरिकत्वही स्वीकारलं नाही. आमची येणारी पिढी तिबेटमध्ये जाईल.’ सांगताना कर्मा भावविवश झाले. ‘तिबेटच्या स्वातंत्र्याचा जश्न पाहायचा आहे. आम्ही निर्वासित आहोत. जास्त बोलणार नाही. तुम्ही जा आता.’ असं कर्मा सांगू लागले.

चीनने १९५९ मध्ये तिबेटला कवेत घेतलं. चिनी ड्रॅगनचे विषारी फुत्कार तिबेटी नागरिकांच्या आयुष्यात विष कालवू लागले. लोक सैरावैरा झाले. हजारोंच्या कत्तली झाल्या. चिनी ड्रॅगन तिबेटची लाल माती विषयुक्त करू लागला. बौद्ध भिख्खूंवर अत्याचार झाले. मिळेल त्या मार्गाने तिबेटी भारतात दाखल झाले. काहींनी हिमाचलमधील धर्मशाळेत आसरा घेतला, काही कर्नाटकात गेले, काही दिल्लीत दाखल झाले, काही महाराष्ट्रात आले, तेही नक्षल्यांच्या रक्तपाताने लाल झालेल्या गोठणगावच्या मातीत. हा परिसर नक्षल्यांचा गड होता. १९७२ ला लहान मुलांना घेऊन तिबेटियन दाखल झाले. नदी-नाल्यांच्या आसऱ्याने तंबू ठोकले. चिनीसारखे दिसत असल्याने चिनी आल्याच्या वावड्या उडाल्या. अनेक वर्षं पाण्यापावसात तंबूत काढले. शेवटी राज्य शासनाने त्यांना हक्काची जागा दिली. कौलारू घरं बांधली. कसायला शेती दिली.

गेल्या ४९ वर्षांत अनेक चढ-उतार आले. त्यांनी सोसले. भारताप्रती त्यांचं प्रेम आजही आहे. मात्र, ४९ वर्षांत त्यांची देशात जाण्याची ओढ सूतभरही कमी झाली. भारताप्रती कृतज्ञता आणि देशाप्रती प्रेम यांचा मिलाफ या तिबेट कॅम्पमध्ये पदोपदी पाहायला मिळतो. इटियाडोह कालव्याच्या शेजारी तिबेटींचे दोन कॅम्प आहेत. पहिल्या कॅम्पमध्ये ६० घरं, तर दुसऱ्या कॅम्पमध्ये ८० घरं आहेत. दोन्ही कॅम्प आता गावं झालीत. त्यांची घरं दिमाखात, भयमुक्त आणि निर्धास्त उभी आहेत.

कर्मा डुग्गल यांचा निरोप घेतला. तिबेटी लोकांची देखभाल करण्यासाठी त्यांचं स्वतःचं प्रशासन आहे, त्यांचे नियम आहेत. त्याच परिसरात त्यांची प्रशासकीय इमारत आहे. त्यांनी निवडलेले सरपंच आहेत. त्यांच्या भेटीसाठी निघालो, त्या प्रशासकीय इमारतीकडे. या परिसरात दर्शनी भागात युनियन बॅंक आहे. करांडली आणि परिसरातील लोक इथे व्यवहारासाठी येतात. तिबेटींसाठी बॅंकेची ही सुविधा आहे. या परिसरात मानव विरळच. भरदुपारी स्मशानशांतता. मध्येच जंगलातून माकडांचा किंचाळण्याचा आवाज. ‘ऑफिस ऑफ द लीडर कॅम्प’ इमारतीच्या दरवाजाला कुलूप होतं. कोणाला काही विचारण्याची सोय नाही, मोबाईलला कव्हरेज नाही. शेवटी एका पडक्या इमारतीत एक व्यक्ती पोतं अंथरुण बसलेली दिसली. थोडं हायसं वाटलं. बोलता येईल. मनात निश्चय केला. ती व्यक्ती तिबेटी नव्हती. ‘आप अकेले है?’ मी विचारलं. तो म्हणाला, ‘हा साब.’ मी म्हणालो, ‘क्या करते हो?’ ‘साब बॅंक मे आनेवाले लोगों की पर्ची भर के देता हू. दस रुपये मिलते है. दिन मे सौ रुपये कमाता हू. कभी-कभी पचास रुपये भी नही मिलते.’ मी विचारलं, ‘इतने मे गुजारा होता है?’ ‘नही साब. काम नही, क्या करे. जितना मिले, उसमे घर चलाते है. क्या करे.’ मी विचारलं, ‘आप तिबेटी हो?’ तो म्हणाला, ‘नही साब. बांगलादेशी हू. हम रिफ्युजी है.

हमारे चार कॅम्प है, दो किलोमीटर पर. निरंजन नीतई विश्वास नाम है. पुष्पनगर रहता हू.’ त्याला सरपंचाचं घर विचारलं. त्याने बोट दाखवलं. तिथून निघालो. या परिसरात तिबेटीच निर्वासित नाहीत, तर बांगलादेशीसुद्धा आहेत. त्यांची चार गावं आहेत. त्यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. ते आता भारताचे नागरिक झाले. ते आता रिफ्युजी नाहीत. शेजारीच सरपंचाचं घर होतं. लवकर दरवाजावर आलो. बाहेरूनच हाक दिली. आता गेलो. सरपंच कर्मा धमच्चो यांच्या पत्नी डोनमा कामात मग्न होत्या. त्यांनी मास्क लावायला सांगितलं. सरपंच झोपून असल्याचं त्यांनी सांगितलं. मी म्हणालो, ‘नागपूरहून आलोय, बोलावता का त्यांना?’ लगेच घरात गेल्या. कर्मा धमच्चो आले. त्यांना इथे येण्याचं कारण सांगितलं. ते म्हणाले, ‘चला प्रशासकीय ऑफिसमध्ये.’ त्यांच्या मागे निघालो. प्रशासकीय ऑफिसला कुलूप होतं. ते म्हणाले, ‘दो बजे के बाद सुरू होता है. आज शुरू नही हुआ. आप कुछ समय रुके.’ दहा मिनिटांत केंद्रीय तिबेटियन प्रशासकीय अधिकारी कलसंग सिंचोये आले. त्यांना परिचय दिला. ऑफिसच्या आत घेऊन गेले. तीन महिन्यांपूर्वी इथे रुजू झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते सेटलमेंट ऑफिसर असल्याची स्वतःची ओळख करून दिली. ते तिबेटियन प्रशासकीय सेवेत आहेत. यापूर्वी हिमाचलमधील धर्मशाला इथे कार्यरत होते. तिबेटी स्वातंत्र्याबद्दल त्यांना आस्था आहे. तिबेट मुक्त होईल आणि आम्ही आपल्या देशात जाऊ, असा आशावाद त्यांच्या प्रत्येक शब्दात जाणवत होता. भारताने याकरिता पुढाकार घ्यावा, असंही त्यांनी बोलून दाखविलं.

देशातील तिबेटी निर्वासितांचं प्रशासन कसं चालतं याची माहिती त्यांनी दिली. गोठणगाव तिबेटियन कॅम्पमध्ये १०४० लोक राहतात. शाळा, दवाखाने, मंदिर, राइस मिल, तिबेटी सहकारी संस्था, यासह वृद्धाश्रम असल्याचं सांगितलं. १९७२ नंतर आपल्या सरकारने बऱ्याच सुविधा दिल्या आहेत. मात्र, त्या सुविधा अपुऱ्या आहेत. येथील लोकांना रोजागाराचं साधन नाही. शासनाने रेशनचं धान्य द्यावं, काही शेती योजनांचा लाभ द्यावा, जेणेकरून उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल. कलसंग सिंचोये म्हणाले, ‘‘जवाहरलाल नेहरूंचे आमच्यावर उपकार आहेत, त्यांच्यामुळेच आम्हाला भारतात आसरा मिळाला. महाराष्ट्र शासनाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. २०१४ मध्ये भारत सरकारने तिबेटियन नागरिकांसाठी एक पॉलिसी तयार केली. यात विविध योजनांचा लाभ कसा देता येईल, यावर भर दिला आहे. निर्वासितांसाठी हा करार आहे. ही पॉलिसी लागू केल्यास तिबेटियन लोकांना याचा लाभ होईल. मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश राज्यांनी हा करार लागू केला आहे. महाराष्ट्राने हा करार लागू करावा, असं आम्हाला वाटतं.’’ कलसंग सिंचोये हे युवा अधिकारी आहेत, त्यांनाही मातृभूमीची ओढ आहे. तिबेटमध्ये आता कोणी त्यांचे नातेवाईक नाहीत, जे होते ते जिवंत असतील की नाही, याची शाश्वती नाही. संपर्क नाही. तरीही देशप्रेमाची भरती त्यांच्या हृदयाच्या सागरात आहे.

कलसंग सिंचोये म्हणाले, ‘‘सरकारने अर्धा एकर शेती दिली, त्यातून उत्पन्न नाही. भविष्यात उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न होईल. आमचे प्रयत्न सुरू आहेत. तिबेटियन को-ऑपरेटिव्ह सोसायटीची राइस मिल आहे, त्यातून फारसं उत्पन्न नाही. सरकारने विविध योजनांचा लाभ दिल्यास हा प्रश्न सुटू शकतो.’’ सरपंच कर्मा धमच्चो यांनाही उदरनिर्वाहाची चिंता सतावत आहे. तिबेटमधून आले तेव्हा ते १५ वर्षांचे होते, आता ६८ वर्षांचे झाले. त्यांनाही तिबेटमुक्तीची आस आहे. एक पिढी संपल्याचं ते सांगतात. दुसरी पिढी त्या वाटेवर आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तिबेटला जाऊ, अशी दुर्दम्य इच्छा आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, डोळ्यांनी दूरचं दिसत नाही. प्रपंच चालविण्याच्या अडचणी आहेत. पेन्शनवर घर सुरू आहे. आता हे किती दिवस सुरू राहील, सांगता येत नाही. पत्नी डोनमा यामजोम त्यांना सहकार्य करतात, त्यांनाही मातृभूमीची ओढ आहे.

देशासाठी युवकांचं योगदान

तिबेटियन को-ऑपरेटिव्ह सोसायटी आहे. यात अधिकारी म्हणून वॉगटप आले. ते या सोसायटीचा कारभार पाहतात. ते तिबेटवरून आले. त्यांना तिबेटला जाण्याची ओढ आहे. तिबेटच्या मातीला स्पर्श करण्याची मनात घालमेल सुरू आहे. २०१४ मध्ये ते इथे आले. हिमाचलमध्ये ते शिक्षक होते. त्यांच्यासोबत पेमा इमाबस्टो ही युवती काम करते. ती अकाउंटंट आहे. तिचं शिक्षण बीएपर्यंत झालं. पहिली ते पाचवी तिबेट कॅम्पमध्ये शिक्षण घेतलं, त्यानंतर ती धर्मशाला इथे गेली. तिचं उर्वरित शिक्षण तिथेच झालं. ती फार आशावादी आहे. तिचा जन्म भारतात झाला. तिबेटवर तिचं प्रेम अफाट आहे. संधी मिळाली तर स्वतःच्या देशात जाऊ, असं गर्वाने सांगते. पेमा सांगते, ‘‘तिबेटमध्ये वडिलांचे वडील आहेत, त्यांचे भाऊ-बहीण आहेत; पण संपर्क नाही. ते जिवंत आहेत नाही, हेसुद्धा सांगता येत नाही. असतील तर कुठे आहेत हेसुद्धा माहिती नाही.’’ ती आई-वडिलांसोबत कॅम्पमध्ये राहते. भाऊ आहे, लहान बहीण आहे. भाऊ सैन्यात आहे. तो नुकताच इथे आला. तो स्वेटर विकायला गेल्याचं सांगते. येथील अनेक युवक सैन्यात आहेत, त्यांचा त्यांना अभिमान आहे.

गांधी, आंबेडकर समजले

सरपंच कर्मा धमच्चो आणि त्यांची पत्नी डोनमा यामजोम फार प्रेमळ आहेत. त्यांना तिबेटबद्दल प्रेम आहे, भारताबद्दल आदर आहे. सरपंच कर्मा धमच्चो कुटुंबाची माहिती देताना म्हणाले, ‘‘दोन मुलं आणि दोन मुली आहेत. दुर्दैवाने एका मुलाचा मृत्यू झाला. शिक्षणासाठी मुलं बाहेर आहेत. एक मुलगी धर्मशाला इथे शिक्षिका आहे. मुलगा एम.कॉम. झाला. दिल्लीत सीएचं शिक्षण घेत आहे. दुसरी मुलगी डेहराडून इथे शिक्षण घेते. ती एलएल.बी., एलएल.एम. झाली. शिक्षणाशिवाय आमच्याकडे दुसरी संपत्ती नाही. शिक्षणामुळे आम्हाला बाबासाहेब आंबेडकर कळले. त्यांच्यामुळे बुद्ध धम्म पुन्हा उदयास आला. गांधींना आम्ही नमन करतो.’’ सरपंच कर्मा धमच्चो यांचा भारतीय महापुरुषांबद्दलचा आदरही भारावून टाकतो.

कॅम्पमध्ये वृद्ध...

१९७२ मध्ये तिबेटियन इथे आले, तेव्हा अनेकजण तारुण्यात होते. आता त्यांची वृद्धापकाळाकडे वाटचाल सुरू आहे. वृद्धांकरिता इथे वृद्धाश्रम आहे. २० वृद्ध इथे आहेत. वृद्धापकाळामुळे त्यांना विविध व्याधी जडल्या आहेत. त्यांच्या सेवेसाठी केल्सान छोटा, रेन्झीन लामो, कॅन्सान सुकी कार्यरत आहेत. तन्जी झिब्वा हे ८० पेक्षा अधिक वयाचे आहेत. ते तिबेटमधून आले. त्यांचे वडील तिबेटमध्ये शेती करायचे. काका गुराखी होते. त्यांची बहीण तिबेटमध्ये आहे. मात्र, तिच्याशी संपर्क नसल्याचं ते सांगतात. ते वृद्धाश्रमात इतर सहकाऱ्यांसोबत राहतात. तिबेटमुक्तीची त्यांना आशा आहे. ‘‘चीनच्या पाशातून तिबेट मुक्त झाल्यास शेवटचे डोळे तिथे मिटतील, अशी आशा करतो,’’ असं तन्जी झिब्वा सांगतात. त्यांच्यासोबत काही भन्ते राहतात. त्यातीलच छाबा. ते इथे पूजापाठ करतात. वृद्धांना बुद्धाचं प्रवचन सांगतात. ७० पेक्षा अधिक वय झालेल्या येथील वृद्धाचं देशाप्रती प्रेम कमी झालेलं नाही. आपल्या हक्काच्या देशात जाऊन त्या मातीत देह ठेवण्याची इच्छा त्यांचं मातीशी नातं सांगते.

भारताच्या मधोमध असाही १०४० लोकांचा तिबेट हा देश त्यांनी हृदयात जिवंत ठेवला आहे. सायंकाळचे सात वाजले. कॅम्पमधून पावलं पुढे सरकत नव्हती; पण पर्याय नव्हता. शेवटी प्रत्येकाचं मातृभूमीवर प्रेम असतं. तिबेटियन लोकांच्या पाच तासांतील भेटीचा प्रसंग विसरण्यासारखा नाही. त्यांच्या अनेक अडचणी आहेत. रस्ते नाहीत. मोबाईलचं नेटर्वक नाही. रोजगार नाही. पुढे काय होईल, याचा अंदाज नाही, तरी त्यांच्यातील देशभक्ती आपल्याला भावते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com