जगातला सगळ्यात प्राचीन आणि वैश्विक एकात्मतेच्या पायावर विकसित झालेला आर्य सनातन वैदिक धर्म आणि संस्कृती जिथे निर्माण झाली त्या पुण्यभूमी भारतामध्ये आपला जन्म झाला हे आपलं भाग्य आहे. ‘पुण्यभूमी म्हणून जी गौरवान्वित होण्यासाठी पात्र आहे, या पृथ्वीवरच्या सर्व जीवांना आपली कर्मं फेडण्यासाठी जिथे जन्म घ्यावाच लागेल.
मनुष्यत्वाकडून ईश्वरत्वाकडे उन्नत होणाऱ्या प्रत्येकाला मोक्षप्राप्तीसाठी शेवटी जिच्या आश्रयाला यावं लागेल, जिथे मानवतेने सभ्यता, उदारता, शुचिता, शांती या मूल्यांचा चरम उत्कर्ष साधला आहे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जी आत्मपरीक्षण आणि अध्यात्मविद्येची भूमी आहे अशी या पृथ्वीवर जर कोणती जागा असेल - तर ती भारत आहे.’ असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे.
प्रत्येकाला जीवनाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत स्वतःला सिद्ध करायचं असतं. याचा परिणाम म्हणजे स्ट्रेस नावाचा राक्षस तुम्हाला कायमचा ग्रासतो. त्याच्याशी निगडित विविध प्रकारचे आजार माणसाचं स्वास्थ्य पोखरून टाकतात. मग आपलं स्वास्थ परत मिळवण्यासाठी धडपड केली जाते.
स्वामी विवेकानंदांनी १२५ वर्षांपूर्वी ध्यान आणि त्याच्या पद्धती यांवर केलेली भाषणं आपण वाचली तर लक्षात येईल की, आजच्या तरुणांच्या सर्व समस्यांचं इतकं परिपूर्ण, अचूक, बिनतोड, मार्मिक आणि चपखल समाधान अन्यत्र सापडणं दुर्मीळ आहे.
स्वामीजींचे ध्यान आणि त्याच्या पद्धती यावरील विवेचन वाचताना प्रकर्षाने जाणवतं ते एका सिद्ध पुरुषाच्या आत्मानुभवाचं सहज प्रागट्य. ध्यानाला बसायची जागा कशी असावी इथपासून ते ध्यान करताना बाळगण्याची सावधगिरी, योगशास्त्रानुसार ध्यानाच्या पायऱ्या कोणत्या, मनाला ध्यानासाठी कसं तयार करावं हे सांगताना हळूहळू स्वामीजी आपल्याला ध्यानाच्या परमोच्च स्तराकडे घेऊन जातात.
ज्यांना आर्य सनातन धर्म आणि वैदिक संस्कृती, वेदांतातील मूलभूत संकल्पना, जीव, जगत, ईश्वर, माया, ब्रह्म, आत्मा, कर्मसिद्धांत, अद्वैत वेदांत यांची पुरेशी ओळख नाही अशा पाश्चिमात्य श्रोत्यांसमोर त्यांच्याच भाषेत हे सर्व अतिशय ओघवत्या वाणीने, तर्कशुद्ध प्रमाणांच्या माध्यमातून समजावत स्वामीजी श्रोत्यांना ध्यान म्हणजे काय, त्याच्या पद्धती कोणत्या या विषयात कसे सहजपणे घेऊन जातात हा अनुभव काही वेगळाच आहे.
जीवन हे सुख-दु:खांनी, कडू-गोड अनुभवांनी, आशा-निराशेच्या रंगांनी भरलेलं आहे हा माणसाचा अनुभव वैश्विक आहे. आपलं सर्व सामर्थ्य आणि कौशल्य पणाला लावूनही जेव्हा माणसाला अपेक्षित प्राप्त होत नाही, तेव्हा जीवनातील हतबलता, अनिश्चितता त्याला प्रत्ययाला येते.
प्रारब्धाची सीमा ओळखून पुरुषार्थ करणे आणि अंतर्यामी ईश्वराला जाणून चरम शांती, समाधान आणि ज्ञान याचे अधिकारी होणे ही कला केवळ तोच आपल्याला शिकवू शकतो, ज्याने हे आपल्या जीवनात प्रत्यक्ष साधलं आहे. स्वामीजींचे शब्द अष्टपैलू हिऱ्यासारखे चमचमतात, त्यांना तपस्येचं कोंदण आहे.
सद्गुरूकृपेचं अधिष्ठान आहे, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच्या त्रिवेणी संगमाचं सिंचन आहे, म्हणूनच ते अंतर्यामी ईश्वराला भिडतात. मानवी जीवनाचं परमोच्च ध्येय म्हणजे ईश्वरप्राप्ती असा ज्यांचा निश्चय झालेला आहे त्यांना या पुस्तकातून साधनमार्गावर दृढतेने कसं चालावं याचा वस्तुपाठ मिळेल.
पुस्तकाचे नाव : ध्यान आणि त्याच्या पद्धती
लेखक : स्वामी विवेकानंद
अनुवाद : डॉ. वैदेही लिमये
प्रकाशन : साकेत प्रकाशन, पुणे व छत्रपती संभाजीनगर
(०२०-२४४३६६९२, ०२४०- २३३२६९२)
पृष्ठं : १८४,
मूल्य : २५० रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.