समतावादी शिवराय

Chatrapati Shivaji Maharaj
Chatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजीमहाराजांचा इतिहास जसा शौर्याचा-औदार्याचा आहे, तसाच तो समतेचादेखील आहे. इतिहासावर नजर टाकल्यास शिवरायांचा समतावाद सुस्पष्टपणे अधोरेखित होतो. "भेदाभेद भ्रम अमंगळ' हा संत तुकाराममहाराजांचा समतेचा संदेश शिवरायांनी शिरोधार्य मानला होता. शहाजीराजे-जिजाऊ यांचे समतावादी संस्कार स्वराज्यातल्या मावळ्यांना संघटित करण्यासाठी शिवरायांना प्रेरणादायक ठरले होते. आजच्या संशयग्रस्त, कलुषित काळात शिवरायांच्या समतेची महाराष्ट्राला, भारताला नितांत गरज आहे. अशा या रयतेच्या राजाची, समतावादी राजाची आज जयंती आहे, त्यानिमित्त... 

छत्रपती शिवाजीमहाराजांचा इतिहास जसा ढोल-तलवारींचा-लढायांचा-शौर्याचा आहे, तसाच तो औदार्याचा आणि समतेचादेखील आहे. त्यांनी आपल्या राज्यात सार्वजनिक आणि खासगी जीवनात कधीही भेदाभेद केला नाही. शिवरायांचं राज्य केवळ एका धर्माचं, एका जातीचं, एका पंथाचं किंवा एका घराण्याचं राज्य नव्हतं, तर त्यांचं राज्य हे "रयतेचं राज्य' होतं. रयत याचा अर्थ आहे "प्रजा'. प्रजा म्हणजे तमाम जनता आणि अर्थात रयतेचं राज्य म्हणजे सर्व जाती-धर्मांतल्या जनतेचं राज्य होय. 

त्यांच्या सैन्यात अक्षरशः सगळ्या जाती-धर्मांमधले मावळे होते. शिवरायांच्या स्वराज्यात अत्यंत महत्त्वाच्या पदांवरही सगळ्याच जाती-धर्मांमधले सहकारी होते. स्वराज्यात अत्यंत महत्त्वाचं पद म्हणजे "गुप्तहेरप्रमुख'. शिवरायांच्या गुप्तहेरप्रमुखपदी बहिर्जी नाईक होते. बहिर्जी नाईक हे रामोशी समाजातले होते. आजच्या शासनप्रणालीत "आयबी', "रॉ' आदी केंद्र सरकारी गुप्तचर संस्था आहेत. कोणत्याही राज्याच्या यशस्वी शासनप्रणालीसाठी गुप्तचर यंत्रणा अत्यंत महत्त्वाची असते. अशा महत्त्वाच्या संस्थेच्या प्रमुखपदी शिवरायांनी रामोशी समाजातल्या सहकाऱ्याची नियुक्ती केलेली होती. 
मदारी मेहतर हा शिवरायांचा सहकारी होता. मेहतर या समाजाची अवस्था 17 व्या शतकात काय असेल? पण शिवरायांनी मदारी मेहतर यांना अत्यंत विश्‍वासू सहकारी म्हणून निवडलं होतं. यावरून हे स्पष्ट होतं, की शिवरायांनी आपल्या जीवनात अस्पृश्‍यतेला थारा दिलेला नव्हता. शिवरायांच्या पायदळाचा पहिला प्रमुख नूरखान बेग होता. 

अफजलखान भेटीच्या प्रसंगी शिवरायांवर पडणारा सय्यद बंडाचा वार जिवाजी महाले यांनी वरच्या वर उडवला. क्षणाचाही विलंब झाला असता तर काय झालं असतं? जिवाजी महाले हे नाभिक समाजातले होते. त्यांच्यामुळं शिवरायांचे प्राण वाचले. त्यामुळंच इतिहासात म्हटलं जाई ः "होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी.' जिवाजींप्रमाणेच शिवाजी काशिद हेही नाभिक समाजातले होते. पन्हाळा वेढ्याच्या प्रसंगी ते प्रतिशिवाजी होऊन सिद्दीच्या भेटीला गेले. तिथं त्यांना ओळखलं गेलं. त्यातच त्यांचा अंत झाला. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, कान्होजी जेधे, बाजी पासलकर, हंबीरराव मोहिते, नेमाजी शिंदे, प्रतापराव गुजर इत्यादी शूरवीरांनी आनंदानं मृत्यूला मिठी मारली; पण त्यांची शिवरायांवरची आणि स्वराज्यावरची निष्ठा बदलली नाही. याचं कारण म्हणजे शिवरायांनी आपपरभाव कधीही बाळगला नाही. 

शिवरायांनी मुरारबाजी आणि बाजीप्रभू देशपांडे यांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली होती. मुरारबाजी देशपांडे यांना पुरंदरचे किल्लेदार म्हणून नेमण्यात आलं होतं, तर बाजीप्रभू हे बांदलांच्या फौजेत महत्त्वाच्या पदावर होते. ते कायस्थ होते. त्यांनी स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलं. 

शिवरायांच्या स्वराज्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या पदांवर सगळ्या जाती-धर्मातले मावळे होते. निंबाजी पाटोळे, शामाखान, तेलंगराव हे शिवरायांचे सरदार होते. रामाजी गडदरे, जानराव वाघमारे, अमरोजी पांढरे, बहिर्जी वडगरे, खंडोजी आटोळे, बळवंतराव देवकाते, देवाजी उघडे इत्यादी शिलेदार व सुभेदार होते. ही सगळी नावं पाहिली तरी स्पष्ट होतं, की शिवरायांनी महत्त्वाच्या पदांवर नेमणुका करताना जातिभेद पाळला नाही. दौलतखान हा अरमार दलाचा प्रमुख होता. इब्राहिम खान हा तोफखानाप्रमुख होता. शिवरायांच्या अनेक शरीररक्षकांपैकी एक होता सिद्दी इब्राहिम. 

शिवरायांनी आपल्या राज्यात भेदाभेद केला नाही, हे वरच्या सगळ्या उदाहरणांवरून स्पष्ट व्हावं. शिवरायांनी खऱ्या अर्थानं समतेचं स्वराज्य निर्माण केलं. आज आपणही शिवरायांपासून प्रेरणा घेऊन समतावादी भूमिका घेणं हे खरं शिवप्रेम होय. आपल्या गावात, नगरात असणारी जनता ही स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या मावळ्यांची वारसदार आहे. शिवरायांनी विषमता बाळगली नाही, हा शिवरायांचा उदात्त गुण होता. शिवरायांच्या समतावादी भूमिकेचा गौरव करताना महात्मा फुले म्हणतात ः 
"लंगोट्यास देई जानवे पोशिंदा कुणब्याचा। काळ तो असे यवनाचा ।। 
कुळवाडीभूषण पोवाडा गातो भोसल्यांचा । छत्रपती शिवाजींचा।।' 

लंगोट परिधान करणाऱ्या मावळ्यांना शिवरायांनी लढण्याचा अधिकार दिला, त्यांना शिलेदार-सुभेदार-बारगीर-गुप्तहेर-किल्लेदार इत्यादी पदांवर नेमले. जानवं दिलं म्हणजे प्रतिष्ठा मिळवून दिली. कष्ट करणाऱ्या रयतेचं पालनपोषण केलं. कुळवाडीभूषण म्हणजे सगळ्यांचाच राजा. भोसलेकुळात जन्मलेले शिवाजीमहाराज हे कष्टकरी, श्रमकरी, उपेक्षित, वंचित, गोरगरीब, सर्वसामान्य रयतेचे राजे होते. अशा छत्रपती शिवाजीराजांचा पोवाडा महात्मा फुले मोठ्या अभिमानानं गातात. 

शिवरायांचा कालखंड हा 17 व्या शतकातला आहे. 17 वं शतक म्हणजे मध्ययुगीन कालखंड होय. हा सरंजामी कालखंड होता. नंतरच्या काळात राष्ट्रवाद, देशभक्ती, धर्मनिरपेक्षता, स्त्री स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, समता इत्यादी मूल्यांचा जयजयकार करणाऱ्या युरोपमध्ये 17 व्या शतकात अंधारयुगच होतं. अशा काळात शिवरायांनी जोपासलेला समतावाद आजही दीपस्तंभासारखा आहे. शिवरायांना विषमता, शोषण, गुलामगिरी मान्य नव्हती. त्यामुळंच ते व्यापारीकरार करण्यासाठी सहा ऑगस्ट 1677 रोजी आलेल्या डच प्रतिनिधींना म्हणाले होते ः ""आदिलशाहीच्या कारकिर्दीत तुम्हाला स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकत घेण्याची आणि विकण्याची अनिर्बंध परवानगी होती; पण माझ्या राज्यात स्त्री आणि पुरुष यांना गुलाम म्हणून विकण्याची आणि विकत घेण्याची परवानगी मिळणार नाही. असे काही करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, तर माझी माणसे (अधिकारी) तुम्हाला प्रतिबंध करतील. या कलमाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे.'' मध्ययुगीन सरंजामी काळात शिवरायांनी गुलामगिरीविरुद्ध घेतलेली ही कडक भूमिका केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर जगासाठी प्रेरणादायक आहे. 

शिवरायांच्या समतावादी भूमिकेचा गौरव करताना इतिहास-धर्मशास्त्र-तत्त्वज्ञान-प्राच्यविद्या यांचे अभ्यासक शरद पाटील म्हणतात ः "शिवाजीमहाराजांचं व संभाजीमहाराजांचं खरं माहात्म्य त्यांच्या जात्यंतक समतावादी शाक्त हौतात्म्यात आहे.' शिवरायांना तुळजाभवानीबद्दल नितांत आदर होता. त्या आदरापोटी त्यांनी प्रतापगडावर तुळजाभवानीचं मंदिर बांधून घेतले. या पाठीमागे भाबडा भाव नव्हता, तर समतेचं तत्त्वज्ञान होतं. तुळजा ही समतावादी होती. तुळा (तुला) म्हणजे मोजणं-मापणं. आपल्या राज्यातल्या उत्पादनाचा भाग समान मोजून प्रजेला समान वाटप करणरी तेरणा-मांजरा खोऱ्यातली महामाता म्हणजे तुळजाभवानी होय. तुळजाभवानी हे समतेचं प्रतीक आहे. 

शिवरायांचं घराणं हे वारकरी पंथ-सूफी पंथ यांना मानणारं होतं. "भेदाभेद भ्रम अमंगळ' हा संत तुकाराममहाराजांचा समतेचा संदेश शिवरायांनी शिरोधार्य मानला. शहाजीराजे-जिजाऊ यांचे समतावादी संस्कार स्वराज्यातल्या मावळ्यांना संघटित करण्यासाठी शिवरायांना प्रेरणादायक ठरले. 

शिवरायांचे हेच समतावादी संस्कार आत्मसात करून आपणही आपापसातले जातीय, धार्मिक विद्वेष दूर करून समतावादी समाज निर्माण करायला हवा. आज सभोवताली जातीय-धार्मिक-सांस्कृतिक-भाषिक-प्रांतीय विद्वेषानं समाज त्रस्त झालेला आहे. वातावरण अत्यंत कलुषित, संशयग्रस्त आणि कृत्रिम झालेलं आहे. अशा काळात शिवरायांच्या समतेची महाराष्ट्राला, भारताला नितांत गरज आहे. 

समतेचं तत्त्वज्ञान घेऊन समतावादी लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराज होत. शिवरायांच्या जयंतीनिमित्त रयतेच्या या समतावादी राजाला त्रिवार वंदन! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com