लेझी लॅड... लेझी लॅड सैंया... लो कर लो बात!

आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. मला तुम्हाला सांगायचं आहे ते आळशीपणाबद्दल.
Lazy People
Lazy PeopleSakal
Summary

आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. मला तुम्हाला सांगायचं आहे ते आळशीपणाबद्दल.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. मला तुम्हाला सांगायचं आहे ते आळशीपणाबद्दल. हा विषय आपल्या सगळ्यांशीच संबंधित आहे. आळशीपणा माणसाला पूर्णतः संपवू शकतो...उद्‌ध्वस्त करू शकतो.

आळशीपणावर मात करणं ही अगदी सोपी; पण त्याच वेळी सर्वांत अवघड अशी गोष्ट आहे. आळशीपणामुळे तुमचे सगळेच्या सगळे प्लॅन, सगळं ज्ञान, सगळी माहिती, तुमचं ध्येय हे सगळं जागच्या जागी थांबतं. जर तुमच्या अंगात आळस भरला असेल तर तुमच्या हातून काहीही काम होणार नाही. काय करायचं आहे हे तुम्हाला माहीत असतं, कशा प्रकारे अभ्यास करायला हवा हे कळत असतं, किती मेहनत करावी लागणार हेही माहीत असतं; पण प्रत्यक्षात तुम्ही काहीही करत नाही, इतका आळस तुमच्यात भरलेला असतो.

तरुण मुलांमध्ये आळशीपणा प्रचंड वाढलाय हे अलीकडे माझ्या लक्षात आलं आहे. आणि, त्यांच्यात आळशीपणा मोठ्या प्रमाणात वाढणं ही धास्ती वाटायला लावणारी गोष्ट आहे. तसा मनुष्यप्राण्याचा आळशीपणाकडेच कल असतो. तरुणवर्ग हा तर ‘फुल ऑफ एनर्जी’ असतो असं आपण समजतो. व्यक्ती जेव्हा तरुण असते तेव्हा ती सर्वाधिक ‘ॲलर्ट’ आणि बळकट असते, त्यामुळे तरुणांनी आळशी असायचं काहीच कारण नाही. त्यांनी कार्यक्षम व सक्रिय असायला हवं, असं आपल्याला वाटत असतं. हे सगळं मी कुणी वयस्क, ज्येष्ठ या नात्यानं सांगत नाहीये. तुम्हा सगळ्यांनाही ते माहीतच आहे. या आळशीपणाचं मुख्य कारण आहे तंत्रज्ञानामुळे मिळणारं ‘इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशन...’ झटपट समाधान!

आपल्या हातात जो फोन असतो, त्यामुळे आपल्याला काही छानशा गोष्टी खूप सहजपणे मिळत जातात. इतक्‍या सहज की, आयुष्यात मेहनत वगैरे करण्यात रसच उरत नाही. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता फोनचंच उदाहरण घेऊ या.

त्यावर शॉपिंग करता येतं, मनोरंजनासाठी व्हिडिओ बघता येतात, खाण्याचे पदार्थ ‘ऑर्डर’ करता येतात, मित्र-मैत्रिणींशी संपर्क करता येतो आणि हे सगळं फक्त ‘टच’द्वारे मिळतं. फक्त फोनच्या स्क्रीनवर कुठं कुठं ‘टच’ करावं लागतं, की झालं काम!

आता शॉपिंगसाठी बाहेर जायचं म्हटलं तर तुम्हाला वाटतं, ‘बाहेर कोण जाणार?’ मनोरंजनासाठी बाहेर जाऊन कुठल्या क्रीडाप्रकाराचा आनंद घेण्याऐवजी तुम्हाला वाटतं ‘इथंच व्हिडिओ गेम्स खेळू या!’

हे सगळं फार भयंकर होत चाललं आहे. आता फोनवरून खाण्याचे पदार्थ मागवता येतात, त्यामुळे ‘आता स्वयंपाक कुठं करत बसू!’ असं वाटतं. मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष जाऊन कशाला भेटायचं, ‘चॅट’वर बोलणं होतंच की आणि प्रत्यक्ष जाण्यापेक्षा व्हिडिओ कॉल करू या असं वाटतं. हे बरं नाही.

मी याबद्दलचा एक व्हिडिओ पाहिला. त्यात मी ‘चीप डोपामिन’ ही समस्या आहे, असं ऐकलं. आता तुम्ही म्हणाल, हे ‘चीप डोपामिन’ म्हणजे काय? तर डोपामिन हे आपल्या मेंदूतील एक ‘प्लेझर केमिकल’ असतं. हे सगळं तंत्रज्ञान वगैरे येण्याआधी तुम्ही

जेव्हा जेव्हा मेहनत करत होतात, तेव्हा तेव्हा तुमच्या मेंदूत डोपामिन स्रवत होतं...तुम्ही मेहनत केलीत, त्याचं बक्षीस म्हणून...तुला आता छान ‘फिलिंग’ देतो असं म्हणून.

तुम्ही जर अर्धा तास धावण्याचा व्यायाम केलात तर तुम्हाला ते कळेल. तुम्ही बघा, अर्धा तास धावून आलेला कोणताही माणूस सांगेल, ‘अरे, अर्ध्या तासानंतर काय ‘फिलिंग’ येतं, सांगतो!’

प्रत्यक्ष धावताना माणसाला ते मुश्‍किल वाटतं; पण अर्ध्या तासानंतर मात्र ‘रनर्स हाय’ अनुभवता येतं. ही डोपामिनची कमाल असते.

समजा, तुम्ही अर्धा तास काम केलंत, तुम्ही सगळी गणितं सोडवलीत, जो जो अभ्यास असेल तो तो केलात तर तुम्हाला डोपामिन मिळेल... अगदी थोडंसं मिळेल. आपण आज काहीतरी केलं याचं तुम्हाला समाधान लाभेल; पण जर तुम्ही इंटरनेटवर शॉपिंग, व्हिडिओ गेम्स हे सगळं करत राहिलात तर काय होतं...इन्स्टन्ट डोपामिन! या सगळ्या गोष्टी तुमच्या मेंदूची वाट लावत आहेत.

तुम्ही एक-दोन तास काम केल्यानंतर तुमचा मेंदू तुम्हाला जे एवढंसं डोपामिन देतो, ‘हे घे, मजा कर’ असं म्हणून, तेच जर तुम्ही अशा प्रकारे झटपट मिळवत राहिलात तर ते बरं नव्हे. आपण जर कुत्र्याला सांगितलं की, ‘जा, अर्धा किलोमीटर पळत जाऊन भोज्जा शिवून परत ये, मग मी तुला हे छोटंसं बिस्किट देईन,’ तर ते पळत जाऊन भोज्जा शिवून परत येईल. आपण त्याला सांगितलं की, ‘पुन्हा जा...मी तुला आणखी एक बिस्किट देईन,’ तर ते पुन्हा जाईल. अशा प्रकारे ते दिवसभर धावत राहील. त्यामुळे त्याचा व्यायाम होईल आणि त्याला बिस्किटांचं बक्षीस मिळत राहील; पण हेच जर तुम्ही त्या कुत्र्याला सांगितलंत की, ‘तू इथंच बस. मी ही सगळी बिस्किटं इथंच ठेवतो, चांगली ढीगभर ठेवतो’ आणि मग त्याला सांगितलंत की, ‘जा, आता भोज्जाला शिवून ये...’

तर आता तो कुत्रा का धावेल?

मेंदूचंही असंच होतं. अशा प्रकारे आपल्यात आळशीपणा वाढत जातो.

आपण कधी आळशीपणा करतोय हे आपल्याला व्यवस्थित कळत असतं.

तुम्हाला झोपेची गरज असते, विश्रांतीची गरज असते, हा काही आळशीपणा नव्हे. काम करून आल्यावर माणसाला मनोरंजनाची गरज असते; तोही आळशीपणा नसतो. आपल्याला ती मर्यादा कधी ओलांडली जाते ते व्यवस्थित कळत असतं. आपलं वागणं आळशीपणाच्या ‘कॅटेगरी’त कधी येतं आणि आपल्याला ‘रिफ्रेश’ होण्याची गरज कधी असते ते आपल्याला माहीत असतं.

त्यामुळे ‘आळशीपणा’, ‘खरीखुरी विश्रांती’ व ‘रिफ्रेश होणं’ कशाला म्हणायचं ते प्रत्येकानं आपापलं ठरवायचं. ते मी सांगणार नाही. आपण भयंकर आळशीपणा कधी करतोय हे ज्याचं त्याला माहीत असतं.

मनुष्यप्राण्यामध्ये खूप क्षमता असते. माणूस ‘अल्ट्रा-मॅरेथॉन’ धावू शकतो. मॅरेथॉन ४२ किलोमीटरची असते...२६ मैलांची, तर अल्ट्रा-मॅरेथॉन १६० किलोमीटरची असते...१०० मैलांची! लोक ही मॅरेथॉन धावतात. मनुष्यप्राणी हे साध्य करू शकतो, तो मोठमोठ्या कंपन्या उभारू शकतो, अत्यंत गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाचा शोध लावू शकतो.

मनुष्यप्राण्याची जी क्षमता असते तिच्यापेक्षा आपण सगळे खूप खालच्या पातळीवर ‘ऑपरेट’ करत असतो. त्यामुळे ‘मी तर खूपच काम करतो,’ असं अजिबात समजू नका. असं अजिबात नसतं. त्यात जर तुमच्या अंगात आळस भरला तर आधी तुम्ही जे ५० टक्के केलं असतं, त्यातलं फक्त दहा टक्केच करू शकाल. कारण, आळसामुळे तुम्ही तुमची क्षमता, बुद्धिमत्ता वापरणार नाही. पर्यायानं तुम्ही आयुष्यात सुखी होऊ शकणार नाही.

‘आजचा आळस हे उद्याचं दुःख आहे,’ ही गोष्ट लक्षात ठेवा. आळस हा ‘स्लो ड्रग ॲडिक्‍शन’सारखाच असतो. तुम्हाला तो रोखावाच लागेल. तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल की मी आळशीपणा करणार नाही...शारीरिकदृष्ट्याही नाही आणि मानसिकदृष्ट्याही नाही.

तुम्हाला रोज पुढं जावंच लागेल. काहीतरी करावंच लागेल. माणसाची शरीररचना हालचालींसाठीच झालेली आहे. प्राचीन काळी आपण जंगलात होतो. आपली उत्क्रांती ही जंगलापासून झालेली आहे; कुठल्या कॉम्प्युटर-रूमपासून नव्हे. त्यामुळे शरीर हलतं-चालतं राहील असं काहीतरी रोज करत राहायला हवं; पण बरेच लोक ते करत नाहीत. ही गोष्ट चांगली नाही.

तुम्ही रोज काहीतरी काम करा. अभ्यास असेल, इतर काही काम असेल, काहीही असेल; पण ते करत राहा. बसून राहायचं...चाललंय आपलं...असं करू नका. उद्या बघू...परवा करू असं करू नका.

हा लेख नुसता वाचून सोडून देऊ नका. त्यातून प्रेरणा घ्या आणि कामाला लागा. तुम्ही माझे वाचक असाल, तर यू आर नॉट अलाऊड टू बी लेझी. टेक केअर!

(सदराचे लेखक हे तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com