ये पैसा... है कैसा...

माणसाला सुखी होण्यासाठी किती पैसा आवश्‍यक असतो? आयुष्यात पैसा गरजेचा असतोच. पैसा जवळ असला की पर्याय उपलब्ध होतात.
Money
MoneySakal
Summary

माणसाला सुखी होण्यासाठी किती पैसा आवश्‍यक असतो? आयुष्यात पैसा गरजेचा असतोच. पैसा जवळ असला की पर्याय उपलब्ध होतात.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

माणसाला सुखी होण्यासाठी किती पैसा आवश्‍यक असतो? आयुष्यात पैसा गरजेचा असतोच. पैसा जवळ असला की पर्याय उपलब्ध होतात. स्वातंत्र्य लाभतं, हॉस्पिटलची बिलं भागवता येतात, तुम्ही तुम्हाला हवं तिथं राहू शकता...हे खरं आहे. संकल्पनात्मक स्तरावर बोलताना हे ठीक आहे; पण एक प्रश्‍न उरतोच. आपल्याला किती पैसा आवश्‍यक आहे? कारण, याला काही मर्यादा नसते. आपल्याला अमुक इतके पैसे पुरेत असं सांगता येत नाही, त्यामुळे या प्रश्‍नाचं उत्तर देणं अर्थातच अवघड आहे. एखाद्या माणसाच्या दृष्टीनं १० हजार रुपये खूप असतील, एखाद्याला एक लाख रुपये पुरेसे असतील, तर एखाद्याला एक कोटी रुपयेसुद्धा कमी पडतील. तरीसुद्धा आपण या प्रश्‍नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू या. आपल्याला किती पैसा ‘आवश्‍यक’ आहे याचं उत्तर नाही देता येणार; पण आपल्याला ‘सुखी होण्यासाठी’ किती पैसा आवश्‍यक आहे या प्रश्‍नाचं उत्तर देण्याचा मात्र आपण प्रयत्न करू शकतो.

जगात लक्षाधीश, कोट्यधीश, अब्जाधीश लोक आहेत. पैशाला कुठली ‘अपर लिमिट’ नाहीये. एक विनोद आहे : You can never be rich enough and you can never be thin enough. हा याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे.

आपल्याला सुखी होण्यासाठी किती पैशांची गरज असते यासंदर्भात बऱ्याच कॉलेजेसमध्ये संशोधनपर अनेक अभ्यास झाले आहेत. या गोष्टीचा मानसशास्त्रीय, वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास झाला आहे. त्यातून असं दिसून आलं आहे की, याचा एक विशिष्ट आकडा आहे. पश्‍चिमेत हा आकडा आहे ७५ हजार डॉलर्स...म्हणजेच आपल्याला सुखी होण्यासाठी ७५ हजार डॉलर्स इतक्‍या वार्षिक (करपूर्व) उत्पन्नाची आवश्‍यकता असते.

या अभ्यासात त्यांना आढळलं की, ज्या लोकांचं उत्पन्न २० हजार होतं त्यांच्यापेक्षा ४० हजार उत्पन्न असणारे लोक जास्त सुखी होते. ज्यांचं उत्पन्न ६० हजार होतं ते ४० हजार उत्पन्न असणाऱ्या लोकांपेक्षा जास्त सुखी होते, ७० हजार उत्पन्न असणारे लोक ६० हजार उत्पन्न असणाऱ्या लोकांपेक्षा सुखी होते; पण ७५ हजार डॉलर्सपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या लोकांच्या बाबतीत सुखाचा आलेख काही आणखी वर चढत गेला नव्हता; म्हणजे, तुमचं उत्पन्न ७५ हजार डॉलर्स...१ लाख डॉलर्स...सव्वा लाख डॉलर्स असं वाढत गेलं, तरी तुमच्या सुखात त्या त्या प्रमाणात वाढ होत नाही; पण सुरुवातीला मात्र हा आलेख चढत जातो. समजा, सुरुवातीला तुम्ही शून्यावर आहात, अगदी अन्नान्नदशा आहे...अशा वेळी तुम्हाला पाच हजार डॉलर्स मिळाले तरी खूप आनंद होईल; पण त्यानंतर एका टप्प्यावर...७५ हजार डॉलर्सचा आकडा गाठल्यानंतर हा आलेख स्थिर होतो. मग तुमच्या आनंदात...सुखात फारसा परक पडत नाही.

जर तुम्ही परदेशात असाल - यूएसमध्ये किंवा युरोपमध्ये कुठंही - तर एवढ्या उत्पन्नानंतर तुमच्या सुखात फारसा फरक पडणार नाही. तुमचं घर मोठं होईल, गाडी मोठी येईल, तुमचा ‘बॅंक-बॅलन्स’ वाढेल, तुम्ही सुट्टी घालवायला अधिक चांगल्या हॉटेलमध्ये राहाल; पण तुमच्या सुखा-समाधानात त्या प्रमाणात वाढ होत नाही. तुमचा आनंद दुप्पट...तिप्पट झाला, असं होत नाही; पण ७५ हजार डॉलर्सच्या आधीच्या टप्प्यांवर मात्र हा फरक पडेल. ही पाश्‍चात्य देशांतली आकडेवारी झाली. हेच चित्र भारताच्या बाबतीत कसं असेल?

पैसा आपल्याला एका मर्यादेपर्यंत आनंद देतो; पण त्यापुढं तो आपल्याला तितका आनंद देत नाही. या मर्यादेनंतर तुम्ही तुमचं आरोग्य, तुमचे नातेबंध अशा इतर गोष्टींकडे लक्ष देऊ शकता. आपण ही आकडेवारी भारताच्या संदर्भात जशीच्या तशी लागू केली तर ७५ हजार डॉलर्स म्हणजे साधारणपणे वार्षिक ५५ लाख रुपये. म्हणजेच महिना चार लाख ६० हजार. इथल्या हिशेबानं हे आकडे भलतेच मोठे आहेत.

भारतातील सरासरी उत्पन्नाचा आकडा बराच कमी आहे. त्यामुळे महिना चार लाख ६० हजार रुपये उत्पन्नाचा मापदंड इथं योग्यही वाटत नाही. कारण, भारतात व परदेशात अशी तुलना करायची म्हटली, तर ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये बराच फरक आहे.

भारतात तुम्ही केस कापायला गेलात तर १०० रुपये लागतात; पण तेच अमेरिकेत तुम्हाला त्यासाठी ५० डॉलर्स मोजावे लागतील. इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचा दर दोन्हीकडे सारखाच असेल. कदाचित्, तिथं त्या वस्तू थोड्या स्वस्तही असू शकतील. घरं इथं स्वस्त असू शकतील; पण एकूण क्रयशक्तीचा विचार करता ‘पॅरिटी’ म्हणजेच सममूल्यता आहे. साधारणतः तीन त्यांच्याकडच्या गोष्टी आपल्याहून तिप्पट महाग आहेत असं धरलं तर, आपल्याकडचा तुलनात्मक आकडा होईल दीड लाख. म्हणजे महिना दीड लाख रुपये उत्पन्न गाठल्यावर आपला हा आलेख स्थिर होईल.

भारतात जर आपल्याला अगदी व्यवस्थित जगायचं असेल...अ डिसेंट लाईफ, तर आपल्याला किती पैसा आवश्‍यक आहे? तुम्हाला भारतातल्या एखाद्या मध्यम शहरात राहायचं असेल तर चांगल्यापैकी घरासाठी ३० ते ५० हजार रुपये भाडं द्यावं लागेल. तुमच्या कुटुंबाचा मासिक खर्च ५० हजार रुपये असेल. बाकी बचत करणं, सुट्टीवर जाणं, इतर खर्च असं सगळं मिळून तुम्हाला साधारणतः दीड लाख रुपये लागतील. जर तुमचं ध्येय आणखी मोठं असेल तर तुम्हाला महिन्याला दोन लाख रुपये कमावावे लागतील. एखादी व्यक्ती म्हणेल, मला महिन्याला एक लाख रुपये मिळाले की बास! अशा प्रकारे, या प्रश्‍नाचं उत्तर साधारणतः एक लाख ते दोन लाख रुपये उत्पन्न आवश्‍यक आहे असं येईल. आपण याची सरासरी, दीड लाख रुपये, आवश्‍यक असतात असं धरू.

काही लोकांना आयुष्यात फक्त पैशाच्या मागं धावायचं नसतं, काही लोकांना धावायचं असतं, तर काहींना थोडं धावायचं असतं; पण जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न मासिक एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला जितका आनंद मिळणं शक्‍य आहे, तितका मिळू शकणार नाही. त्यामुळं आणखी पैसा आवश्‍यक आहे.

पैसा म्हणजेच सगळं काही नसतं, असं म्हणू नका. पैसा एका मर्यादेपर्यंत तुम्हाला बरीच सुखं देऊ शकतो. त्यामुळे, तुम्ही जर, करिअरमध्ये काय ध्येय बाळगू, असा विचार करत असाल तर, एक दिवस मला महिना दीड लाख रुपये पगार असला पाहिजे (किंवा एक लाख...दोन लाख) हे एक ध्येय बाळगता येईल.

(तुमचं ध्येय यापेक्षा मोठंही असू शकेल...ठीक आहे, काही हरकत नाही. तुमचं ध्येय छोटंही असू शकेल. जर ते छोटं असेल तर एक लक्षात घ्या की, आणखी थोडा पैसा तुमचं जीवनमान अधिक सुधारू शकेल, तुमचं आयुष्य अधिक सुखी बनवू शकेल).

यासंदर्भात केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, उत्पन्नाच्या या आकड्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांच्या सुखाची पातळी कमी होती. आणि, या आकड्यानंतर आनंदात फारसा फरक पडत नाही.

एके काळी माझ्याकडं पैसा नव्हता. कॉलेजमध्ये असताना मला वाटायचं की, माझ्याकडे अजून थोडे पैसे असते तर मी बाईक घेऊ शकलो असतो. त्या वेळी माझ्यासाठी बाईक ही फार महत्त्वाची गोष्ट होती. आज मी बाईक घेऊ शकतो; पण आता मला बाईक फिरवण्यात तेव्हासारखा आनंद वाटत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्याकडे अशा दृष्टिकोनातून बघा. आपण किती मिळवायचं आहे हे ठरवा. हे असं ठरवणं अवघड असतं; पण आयुष्यात कुठलं आर्थिक ध्येय नसलं तरीही अवस्था अवघडच असते. तुमचं काही ध्येयच नसेल, बस्स्‌, करिअरमध्ये चांगली कामगिरी करायची आहे एवढाच विचार असेल तर, ते चांगलं म्हणजे किती...आणि कुठंवर, हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो.

त्यामुळे, पैशाबरोबर हा आनंदाचा...सुखाचा आलेख जिथवर चढत जातो तिथवर पोहोचा. त्यानंतर तुम्ही म्हणू शकता, ‘आता मला पैशाच्या मागं धावण्याची गरज नाही, आता मी ‘स्पोर्टस्’कडे लक्ष देऊ शकतो, मला वाचन करायचं आहे, मला माझ्या छंदांना वेळ द्यायचा आहे, नात्यांना वेळ द्यायचा आहे.’

पटतंय का बघा. हा विषय मांडणं सोपं नाही; पण आयुष्यात अमुक एवढा पैसा मिळवायचा आहे असं ध्येय बाळगा. जर तुम्ही हे ध्येय बाळगलंत तर तुम्ही ते एक दिवस नक्की साध्य कराल!

टेक केअर!

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com