ओम् शांती ओम्

शांत...स्थिरचित्त राहणं हे आयुष्यात यशस्वी होण्याचं एक रहस्य आहे. मी कुणी योगगुरू किंवा आध्यात्मिक गुरू नाहीये; पण, या अत्यंत कमी लेखल्या गेलेल्या गुणाच्या सामर्थ्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे.
ओम् शांती ओम्
Summary

शांत...स्थिरचित्त राहणं हे आयुष्यात यशस्वी होण्याचं एक रहस्य आहे. मी कुणी योगगुरू किंवा आध्यात्मिक गुरू नाहीये; पण, या अत्यंत कमी लेखल्या गेलेल्या गुणाच्या सामर्थ्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

शांत...स्थिरचित्त राहणं हे आयुष्यात यशस्वी होण्याचं एक रहस्य आहे. मी कुणी योगगुरू किंवा आध्यात्मिक गुरू नाहीये; पण, या अत्यंत कमी लेखल्या गेलेल्या गुणाच्या सामर्थ्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे.

जे लोक स्थिरचित्त असतात ना, ते आयुष्यात खूप पुढं जातात. हा गुण स्वतःमध्ये कुणीही रुजवू शकतो. तुम्ही जगातील मातब्बरातील मातब्बर नेते पाहा. त्या सर्वांमध्ये एक गुणवैशिष्ट्य दिसतं...ते सर्व जण अत्यंत शांत, स्थिरचित्त असतात. त्यांच्याबद्दल काहीही वाईट लिहिलं जात असो, बोललं जात असो, विरोधी पक्ष त्यांच्याबद्दल काहीही म्हणोत, प्रसारमाध्यमांत त्यांच्याबद्दल काहीही म्हटलं जावो, ते नेहमी शांत असतात. बडे नेते नेहमी शांत असतात.

स्थिरचित्त असणं हा गुण नेहमी कमी लेखला गेला आहे. शांत, स्थिरचित्त राहणं हे खरं तर तुमचा स्वतःवर ताबा असल्याचं लक्षण आहे.

नेता बनणं याचा अर्थ घोषणा देणं किंवा काही तरी भव्यदिव्य ‘व्हिजन’ असणं एवढाच नसतो. या गोष्टी अर्थातच चांगल्या असतात; पण स्थिरचित्तता हा गुण बरेचदा पाहायला मिळत नाही. मात्र, तो स्वतःमध्ये रुजवता व जोपासता येतो. जर तुम्ही शांत, स्थिरचित्त असाल तर तणावपूर्ण परिस्थितीत तुमच्यावर विश्वास टाकला जाऊ शकतो, तुमच्यावर अवघड कामं सोपवली जाऊ शकतात. तुम्हाला मोठे प्रोजेक्ट्स दिले जाऊ शकतात. हे उत्तम नेत्याचं एक सुलक्षण म्हणता येईल.

समजा, तुमच्या घरी अचानक पाहुणे आले...तुमची (अचानक) सरप्राईज-टेस्ट जाहीर झाली आहे...तुम्हाला मीटिंगला पोहोचायचं आहे; पण तुम्हाला टॅक्सी मिळत नाहीये...आयुष्यात अशा गोष्टी होतच असतात. आयुष्यात अशा गोष्टी आपल्यावर येऊन आदळतच असतात. अशा वेळी तुमचा तणाव एकदम वाढतो आणि मन अशांत होतं. तुम्ही एकदम अस्वस्थ होता, व्याकुळ होता किंवा सध्या जो शब्द वापरला जातो तसे ‘ट्रिगर’ होता.

‘ट्रिगर’ म्हणजे काय?

तर ‘ट्रिगर’ म्हणजे तुमचा तोल सुटतो. तुमचं तुमच्या भावनांवर नियंत्रण राहत नाही. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या काही लोकांच्या दृष्टीनं ही अगदी ‘कूल’ वगैरे गोष्ट असेल; पण वास्तव जीवनामध्ये तुम्ही जेव्हा एखादी कंपनी चालवत असता, एखादा उद्योग चालवत असता, घर सांभाळत असता किंवा एखादा खेळाचा सामना असतो आणि जेव्हा काहीतरी अत्यंत वाईट घडतं, त्या वेळी खराखुरा नेता शांत, स्थिरचित्त राहतो. शांत राहणं म्हणजे आपण किती शांत आहोत हे फक्त दाखवणं नव्हे. तुम्ही जर खरंच स्थिरचित्त असाल तर तुम्ही सुस्पष्ट विचार करू शकता. जर तुमचं मन शांत नसेल तर तुम्हाला नीट विचार करता येत नाही. यामागं साधंसं जीवशास्त्रीय कारण आहे. आपल्याला दोन मेंदू असतात. एक असतो ‘आदिम मेंदू’- जो डोक्याच्या मागच्या भागात असतो. हा मेंदू माकडासारखा किंवा कोणत्याही प्राण्याच्या मेंदूसारखा असतो. मूलतः त्याचा अत्यंत तत्पर प्रतिसाद असतो - लढा अथवा पळा. पूर्वीच्या काळी जंगलात समोरून वाघ किंवा अन्य कुठला प्राणी आला की काय व्हायचं, एक तर त्याच्याशी दोन हात करा किंवा, त्याच्याशी लढणं काही शक्य नाही बाबा, त्यापेक्षा धूम ठोकलेली बरी. हाच प्रतिसाद अजूनही आपल्यात आहे.

आताच्या काळात जर आपण स्थिरचित्त नसू तर हा मेंदू आपला ताबा घेतो... ‘अरे यार...वाट लागली...हे काही मला जमणार नाही. हे बंद कर. तुझ्याकडून काहीतरी चुकीचं घडेल...’ हा ‘आदिम मेंदू’ खूप जलद काम करतो; पण त्याला निर्णय उत्तम प्रकारे घेता येत नाहीत. खरं तर तो निर्णय घेण्याच्या बाबतीत वाईट असतो. मग तुम्ही घाबरता आणि पळ काढता अथवा ती गोष्ट सोडून देता. मात्र, हे घाबरणं फक्त त्या क्षणापुरतं असतं.

मग स्थिरचित्त कसं व्हायचं?

जर तुम्ही शांत...स्थिरचित्त असाल तर तुमच्या डोक्याच्या पुढच्या भागात असणारा ‘तर्कशुद्ध मेंदू’ काम करतो. हा मेंदू योग्य निर्णय घेतो - ठीक आहे, आता काही करता येत नाहीये; पण आपण पुन्हा दहा मिनिटांनी प्रयत्न करून बघू या. इथून त्या गल्लीत जाऊ या, तिथून टॅक्सी मिळते का बघू, नाहीतर तिथून रिक्षा मिळू शकेल...ठीक आहे, आपण त्यांना फोन करून सांगू की, आम्हाला यायला उशीर होणार आहे...परिस्थिती कोणतीही असली तरी हा मेंदू योग्य निर्णय घेईल. अशा प्रसंगी तुमचा ‘आदिम मेंदू’ ‘आता सगळं संपलं... वाट लागली’ असं तुम्हाला सांगत असतो; पण जर तुम्हाला आयुष्यात नेता बनायचं असेल तर तुम्हाला स्थिरचित्त व्हावंच लागेल.

हे कसं साध्य करायचं? अशा सगळ्या गोष्टींचा स्वतःवर परिणाम न होऊ देण्यासाठी काय करायचं?

जर तुम्ही जगात आजूबाजूला पाहिलंत, त्यातल्या वाईट बातम्याच पाहिल्यात, तर तुम्ही भयंकर अस्वस्थ व्हाल. जग इतकं मोठं आहे, त्यात सुमारे ८०० कोटी माणसं राहतात. काही लोकांसाठी एखादा दिवस अत्यंत वाईट असणार, काही लोकांच्या दृष्टीनं तर तो आयुष्यातला सर्वात दुर्दैवी दिवस असेल. या भयंकर बातम्यांचा तुमच्या मेंदूवर विपरीत परिणाम होईल, तुम्ही अक्षरशः संपून जाल. त्यामुळे तुम्ही या गोष्टींचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नका. फार बातम्या पाहू नका. दीर्घ श्वसन करा. श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करा. कदाचित्, तुम्हाला हे खूप ‘अंडररेटेड’ वाटेल; पण त्यामुळे ‘आदिम मेंदू’ तुमचा ताबा घेणार नाही आणि तुमचा ‘तर्कशुद्ध मेंदू’ शाबूत राहील. जर तुम्ही नियमित व्यायाम केलात तर तुम्ही खडतर परिस्थिती उत्तमरीत्या हाताळू शकाल. तुमच्या ‘आदिम मेंदू’ला व्यायाम टाळायचा असतो आणि तर्कशुद्ध मेंदूला तो करायचा असतो. जर तुम्ही नियमित व्यायाम केलात तर तुमचा ‘तर्कशुद्ध मेंदू’ कार्यरत राहतो. तुम्ही ताण-तणाव टाळता. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये डायलॉग आहे ना, ‘टेन्शन लेने का नही...देने का!’ आपल्याला टेन्शन घ्यायचंही नाहीये व द्यायचंही नाहीये.

तुम्ही आयुष्याचं नियोजन करा. तुम्ही जेव्हा एखादं ध्येय ठरवता तेव्हा, प्रतिकूल तेच घडेल, सगळ्या गोष्टी सुरळीत होणार नाहीत असं गृहीत धरून नियोजन करा. समजा, तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही तिथं वीस मिनिटं आधी पोहोचण्याच्या बेतानं घरातून निघा. विमानतळावर जाताना घरातून थोडं लवकरच निघा. समजा, तुम्ही तिथं थोडं लवकर पोहोचलात तरी काहीही बिघडत नाही. त्या वेळी तिथं मस्तपैकी कॉफीचा आस्वाद घ्या...पण टेन्शन घेऊ नका. जिथं माझ्या स्थिरचित्ततेची कसोटी लागेल अशी परिस्थिती मला निर्माणच होऊ द्यायची नाहीये, अशी धारणा ठेवा.

जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागते, तुमचं एखादं काम तडीला जात नाही, तुमचा पडता काळ असतो, अशा वेळी मनात भावनांचा उद्रेक होतो... अशा वेळी श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करा. अशा भावनांमुळे ताण-तणाव निर्माण होतो. अशा वेळी ‘जाऊ दे!’ म्हणा. वाइटात वाईट काय घडू शकेल याचा विचार करा - लोक मला हसतील...हसू देत, शिव्या देतील...देऊ देत.

तुम्ही जसजसे मोठे व्हाल, तसतसे ‘मॅच्युअर’ होत जाता. ‘मॅच्युअर’ म्हणजे काय? ‘मॅच्युअर’ म्हणजे शांत, स्थिरचित्त माणूस. जो परिस्थिती समजून घेतो व ज्याचा तोल ढळत नाही असा माणूस. जर तुमचा तोल अगदी सहज ढळत असेल तर तुम्हाला ‘मॅच्युअर’ व्यक्ती म्हणता येणार नाही. त्यामुळे स्थिरचित्त व्हा व पर्यायानं ‘मॅच्युअर’ बना. कारण, स्थिरचित्तता म्हणजेच नेतृत्व होय. त्यामुळे हा गुण अंगी बाणवा. टेक केअर!

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com