- केतन पुरी, editor@esakal.com
छावा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मराठ्यांच्या इतिहासातील रक्तरंजित क्रांतिपर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर चित्रित झालेला हा चित्रपट लोकप्रिय ठरतोय. नामवंत साहित्यिक शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ कलाकृतीवर आधारित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तिकीट विक्रीचे उच्चांक गाठत आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने विविध बाजूने चर्चा घडल्या, इतिहासाच्या अनेक मुद्द्यांवर उघडपणे पुन्हा एकदा चर्चा घडू लागली. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छावा चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला इतिहास आणि त्याची वास्तव इतिहासाशी घातलेली सांगड.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाच्या सुरुवातीलाच ‘छावा’ कादंबरीचे हे चित्रपट रूपांतर असल्याची प्रांजळ कबुली दिली आहे. या चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास, लढायांचे प्रसंग आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचा अखेरचा काळ भव्य- दिव्य स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेली बुऱ्हाणपूरची स्वारी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. हे शहर मुघलांचे अतिशय आवडीचे शहर. मराठ्यांनी बुऱ्हाणपूरवर हल्ला करून मुघलांची किती नाचक्की केली, याविषयी औरंगजेबाचा पुत्र असलेला अकबर मोठे मार्मिक वर्णन करतो. तो लिहितो,
'वास्तविक पाहता हा विस्तीर्ण प्रदेश म्हणजे भूतलावरील स्वर्गच होय आणि बुऱ्हाणपूर म्हणजे विश्वरूपी सुंदरीच्या गालावरील तीळ होय. पण आज ते शहर उद्ध्वस्त होऊन गेले आहे.” मराठ्यांच्या या पराक्रमाची गाथा मोठ्या थरारक पद्धतीने दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. चित्रपटात दाखवण्यात आलेली साहसदृश्ये अप्रतिम आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाचा जबडा फाडला होता का, याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते. या चित्रपटाच्या माध्यमातून हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. छत्रपती संभाजी महाराजांनी असे कृत्य केल्याचा कोणताही समकालीन अस्सल पुरावा नाही.
मग हे कथानक आले कुठून? तर कोठेवाले यांच्या ‘संगीत छेडलेला छावा’ या नाटकाच्या मुखपृष्ठावर छत्रपती संभाजी महाराज एका सिंहाचा जबडा फाडत आहेत अशा स्वरूपाचे चित्र महान चित्रकार धुरंधर यांच्या मुलीने रेखाटले होते. तो प्रभाव पुढे भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटावरही पडला असावा, कारण त्यांनीही त्यांच्या चित्रपटामध्ये अशा पद्धतीने दृश्य दाखवले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दृश्य अतिशय सुंदरपणे चित्रित केले आहे. हे दृश्य भावनिक आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या पडद्यावर उत्तम पद्धतीने दाखवला आहे. चित्रपटाच्या शेवटी राजाराम छत्रपतींचे मंचकारोहण ज्या पद्धतीने दाखवले आहे, तेही चित्रण वास्तवदर्शी आहे.
स्वराज्याचे छत्रपती, आपले मोठे बंधू शत्रूच्या तावडीत आहेत. अशाप्रसंगी त्यांच्या मनाची, येसूबाई राणीसाहेबांच्या मनाची काय परवड झाली असेल हे अतिशय प्रभावीपणे दाखवले आहे. चित्रपटामध्ये सोयराबाई राणीसाहेबांचे पात्र शंभूराजेंच्या विरोधात उभे करत असताना मात्र काही गोष्टी खटकल्या.
सोयराबाई राणीसाहेब आणि सरसेनापती हंबीरराव यांच्यात असणारे भावा-बहिणीचे नाते दाखवायला हवे होते. कारण, उत्तर भारतामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर चित्रपट पाहणाऱ्या सर्वांनाच त्यांच्या या नात्याविषयी कल्पना असेलच, हे गृहीत धरणे चुकीचे आहे. सरसेनापती हंबीरराव यांनी घेतलेली भूमिका किती योग्य आणि किती महत्त्वाची होती, त्यांचे शंभूछत्रपतींसोबत असणे किती महत्वाचे ठरले हे चित्रपट पाहताना सहजपणे लक्षात येत नाही.
सोयराबाई राणीसाहेब, मंत्री अण्णाजी दत्तो, निळोपंत अमात्य, मोरोपंत पेशवे आणि बाळाजी आवजी चिटणीस यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात केलेल्या कारस्थानांचे चित्रण बेधडकपणे दाखवले आहे. पुढे या मंत्र्यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिल्याचे दृश्य आणि त्या वेळेची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका उत्तम पद्धतीने दाखवले आहे.
चित्रपटामध्ये दाखविलेल्या लढाया उत्तम आहेत. जालना, सातारा, कोकण यांसारख्या प्रदेशात संभाजी महाराजांचे सततचे होणारे झगडे दाखवत असताना एखादा तरी पोर्तुगीज किंवा जंजिरेकर सिद्दींच्या विरोधातील प्रसंग दाखवायला हवा होता, असे राहून राहून वाटते. आपल्या दोनशे मावळ्यांची मुंडकी कापून ती जहाजावर मिरवत मिरवत मुंबईला नेणाऱ्या सिद्दीच्या विरोधात संभाजी महाराजांनी छेडलेले युद्ध भयानक होते.
कोंडाजी फर्जंद यांच्या दगाफटक्याने झालेल्या मृत्यूनंतर तब्बल १६ दिवस जंजिरा किल्ल्यावर तोफांचा भडिमार करणारे संभाजी महाराजांचे रौद्ररूप तत्कालीन इंग्रज, सिद्दी, पोर्तुगीजांना धडकी भरवणारे होते. पोर्तुगीजांना तर आपली राजधानी, पणजी सोडून जाण्याची तयारी करावी लागली होती.
पण अर्थात, चित्रपटाचे बजेट, चित्रपटाची लांबी आणि हाताशी असलेला वेळ पाहता सर्वच गोष्टी दाखवणे शक्य होणार नाही, याची कल्पना आहे. पण निदान संभाजी महाराजांचे मुघलांच्या सोबतच इतर मुख्य शत्रू असलेल्या सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांच्यासोबत झालेला एखादा झगडा पाहायला निश्चित आवडले असते. असो.
चित्रपटाचा शेवट अतिशय प्रभावीपणे दाखवला आहे. शेवटची कसबा संगमेश्वर येथे झालेली लढाई आणि त्यानंतर दाखवलेला चित्रपटाचा शेवट सुन्न करणारा आहे. लढाईचे चित्रण प्रचंड थरारक आहे. मराठ्यांच्या सैन्याने केलेला कडवा प्रतिकार, संभाजी महाराजांचे रौद्ररूप आणि त्यांना पकडून औरंगजेबाच्या छावणीत नेण्यात आले ते दृश्य अंगावर काटा आणणारे आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील अटकेच्या संदर्भाने पाच जणांवर इतिहास अभ्यासक संशयाची सुई फिरवतात. त्यामध्ये शिर्के मंडळी, नागोजी माने, रंगनाथ स्वामी, संभाजी महाराजांचे ब्राह्मण कारकून आणि अगदी कवी कलश यांच्यावरही ते आरोप करण्यात आले आहेत.
पण निश्चित पुराव्याच्या अभावी याबद्दल दोषारोप करणे चुकीचे ठरेल, कुणालाही दोषी ठरवण्यासाठी लागणारे ठोस पुरावे आज उपलब्ध नाहीत. पण कुणाच्या तरी मदतीशिवाय छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले नाहीत, हे शाश्वत सत्य आहे. औरंगजेबाचे इतिहासातील चित्रण जसे केले आहे अगदी तसाच औरंगजेब उभा करण्यात चित्रपटाला यश आले आहे.
अतिशय खुनशी, थंड डोक्याने निर्णय घेणारा, अति महत्त्वाकांक्षी आणि संशयी असा औरंगजेब होता. दक्षिणेत आल्यावर तो टोप्या विणत असे, कुराण लिहीत असे, तो सडपातळ पण काटक शरीराचा होता, उंचपुरा होता. त्याच्या अखेरच्या काळात त्याची दाढी पोटापर्यंत वाढलेली होती. अशी अनेक वर्णने इतिहासात आढळतात.
हे सर्वकाही दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने उत्तम पद्धतीने केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे त्याला आपला किमांश फेकून द्यावा लागला होता. औरंगजेब आणि संभाजी महाराज दोन वेळेस एकमेकांच्या समोर आले. दोन्ही भेटीनंतर भारताच्या इतिहासाला फार वेगळे वळण लागले आहे.
पहिल्या भेटीनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे यशस्वीपणे औरंगजेबाच्या मगरमिठीतून निसटले आणि छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक करून घेत मराठ्यांच्या साम्राज्याची पायाभरणी केली. पुढे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब एकमेकांच्या समोर आले.
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची अमानुषपणे हत्या केली. त्यामुळे मराठे पेटून उठले आणि मुघलांची अनिर्बंध सत्ता अस्तास जाऊ लागली. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान इथल्या तमाम मराठमंडळींना प्रेरणा देऊन गेले. हा मराठ्यांच्या रक्तरंजित क्रांतिपर्वाचा पहिला अध्याय अतिशय भव्यदिव्यपणे दाखवण्यात आलाय, ही विशेष जमेची बाजू आहे.
ऐतिहासिक चित्रपट म्हटलं, की इतिहास अभ्यासक मंडळींचे कथानकासोबत लक्ष जाते कपड्यांकडे, वास्तूकडे, शस्त्रांकडे... छत्रपती संभाजी महाराजांच्या हातामध्ये दाखवण्यात आलेली तलवार, त्यांनी संगमेश्वरच्या लढाईच्या प्रसंगात वापरलेला पट्टा, शिरस्त्राण, चिलखत हे सगळे काही अस्सल पुराव्यांच्या आधारे तयार करण्यात आले होते.
मुघल सरदार आणि मराठ्यांचे दाखवण्यात आलेले कपडे विशेषतः औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराजांचे कपडे सुद्धा वास्तव इतिहासाच्या जवळ जाणारे आहेत. औरंगजेबाचा तंबू चित्रपटात दाखवलाय त्यापेक्षा भव्य होता असा अभ्यासकांचा अंदाज आहे. रायगड फार सुंदर दाखवलाय. गडावरील राजसदर देखील भव्य दाखवली आहे.
कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मैत्रीचे चित्रणही सुंदर आहे. चित्रपटाच्या शेवटी संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यामध्ये काव्याची प्रतियोगिता प्रभावीपणे दाखवली आहे. पण छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना औरंगजेबाच्या समोर आणल्यानंतर त्याने आपले सिंहासन सोडले आणि जमिनीवर बसून तो ईश्वराची करुणा भाकू लागला.
त्या वेळी कवी कलश यांनी ‘यावन रावण की सभा संभू बंधयो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खुब खेल्यो रणरंग, जो रबी छबी लखतही नथीत होत बदरंग, त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग’ अशा स्वरूपाचे काव्य केले होते. यवनरूपी रावणाच्या सभेत बजरंगाप्रमाणेच शंभूराजेंनाही बांधण्यात आले आहे. रक्ताचा रंग खेळल्यामुळे त्यांचे अंग शेंदूर फासलेल्या हनुमंताप्रमाणे दिसत आहे.
आकाशात सूर्योदय झाल्यावर काजवे निस्तेज होतात अगदी त्याचप्रकारे हे शंभुराजा, तुझ्या तेजापुढे निस्तेज झालेल्या औरंगजेबाने आपले तख्त त्यागले आहे. या ओळी अंगावर शहारा आणणाऱ्या आहेत. या औरंगजेबासमोर उभे केले असताना कलश यांनी म्हणून दाखवल्या असत्या तर आणखी प्रभावी वाटल्या असत्या. पण आपल्याला निर्मात्यांच्या मर्यादा समजून घ्याव्या लागतील.
छत्रपती संभाजी महाराजांच्या देदीप्यमान नऊ वर्षांच्या कारकीर्दीवर चित्रपट बनवणे सोपे नाही. या चित्रपटामुळे त्यांच्या इतिहासावर अभ्यास करणारे अनेक तरुण पुढे येतील, या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेरित होतील ही अपेक्षा आहे.
दिग्दर्शक उतेकर यांनी सत्यजित वैद्य, तेजस अरबूने यांसारख्या इतिहास तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याने चित्रपट निर्माण केल्यामुळे यात दाखवण्यात आलेले शस्त्र, कपडे, दरबारी रीतिरिवाज, पत्रे, वाड्यांचे सेट्स वास्तवाच्या जवळ जाणारे ठरले. निश्चितच भविष्यात मराठ्यांचा इतिहास अतिशय वैभवशाली आणि भव्यदिव्य स्वरूपात दिसत राहील, याविषयी खात्री वाटते.
रामसेजची लढाई हवी होती....
रामसेजची लढाई हा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील फार रोमहर्षक प्रसंग आहे. शहाबुद्दीन खान, बहादूरखान कोकलताश, कासिमखान किरमानी यांसारख्या सरदारांना तब्बल पाचसहा वर्षे झुंजवत ठेवणारा किल्ला मराठ्यांच्या शौर्यगाथेचे जिवंत उदाहरण आहे. शहाबुद्दीन खानाने किल्ल्याच्या उंचीचा लाकडी धमधमा तयार केला होता.
जेव्हा भीमसेन सक्सेना त्याठिकाणी पोचला, तेव्हा त्याने तो धमधमा करून पाहिला होता. तो म्हणतो, पाचशे पेक्षा जास्त लोक एकाच वेळी त्यावर उभे राहू शकतील एवढा मोठा होता. त्याला यश लाभले नाही म्हणून बहादूरखानाची नेमणूक रामसेजवर करण्यात आली. त्याने अनेक प्रयत्न केले. एकदा त्याच्या मोतद्दाराने सांगितले, मला भूत वश करण्याची शक्ती आहे.
मला शंभर तोळ्यांचा सोनेरी नाग तयार करून द्या. तो मी हातात घेऊन चालायला लागेल, माझ्या ताकदीने गडावरील मराठ्यांना भूत वश करतील आणि आपण सहजपणे किल्ल्यापर्यंत पोहोचू. झालेही तसेच. तो सोन्याचा नाग घेऊन निघालेला माणूस, त्यामागे बहादुरखानाचे सैन्य हे अर्ध्या वाटेपर्यंत चालत आले आणि अजून वरून मराठ्यांचा प्रतिकार झाला नाही.
सर्वांना चेव चढला. तेवढ्यात गडावरून गोफणीच्या दगडाचा एवढा जोरदार मारा झाला की तो मोतद्दार उडून पडला आणि त्याच्या हातातील सोन्याचा नाग लांब फेकल्या गेला. मुघलांची अशी फजिती रामसेज वरील मराठ्याच्या सैनिकांनी भरपूर वेळेस केली. अशा गोष्टी चित्रपटात दाखवल्या गेल्या असत्या, तर आणखी रोमांचकारी दृश्ये आणि इतिहासाच्या पानात कमी चर्चिल्या गेलेले किस्से लोकांना अनुभवायला मिळाले असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.