दहावीनंतर असे निवडा करिअर

डॉ. श्रीराम गीत
Friday, 14 June 2019

वाटा करिअरच्या 

वाटा करिअरच्या 

आपण आज फ्लॅशबॅकमध्ये जाऊन थोडक्‍यात पाहायचे असे आपले ठरले आहे. चुणचुणीत मुले-मुली ऑफबीट करिअरची नावे घेतात. फॅशन डिझाईन, ऑटो डिझाईन, सिने डायरेक्‍टर, वाइल्ड लाइफ फोटोग्राफर, डीजे, गेमिंग इत्यादी. हुशार मुले-मुली सहसा शास्त्रात घुसण्याचा विचार करतात. त्यांच्या स्वप्नात थेट बायोटेक, नॅनोटेक, एरोनॉटिक्‍स, इस्रो, आयसर, आयआयटी येत असते, तर काही हुशारांना फायनान्स, डेटा ऍनालिस्ट, क्‍लाउड, रोबोटिक्‍स, शेअर मार्केट व मॅनेजमेंट खुणावते. बाकीचे सारे जुन्या पठडीतले समजायला हरकत नसावी. म्हणजे तेही हुशारच असतात, फक्त मेडिकल, इंजिनिअरिंग, एनडीए या तिनातच ते खूश असतात. हल्लीचे एक फॅड म्हणजे यूपीएससी देऊन यश मिळवण्याचे. फॅड हा शब्द अशासाठी, की हा प्रवास पदवीनंतर सुरू होत असतो, हे पुनःपुन्हा त्यांना सांगूनही पटवून घेण्याची इच्छा नसते. मग तयारी आत्तापासून का नाही करायची हाच त्यांचा हेका चालू राहतो. यथावकाश त्यांच्यासाठी सविस्तर येणार आहे. सुजाण वाचकहो व ही लेखमालिका आजच वाचायला लागणारे नवीन वाचक मित्रहो, या साऱ्याची उत्तरे तशी साधी आहेत. 

चुणचुणीत मुलामुलींनी कोणतीही शाखा घेऊन बारावी पूर्ण केली तरी छान, पण खरेतर सायन्समध्ये त्यांचे काहीच काम नाही हे नक्की. अगदी जुन्या गाण्याच्या चालीवर "मेरे अंगनेमे तेरा क्‍या काम है?' 
दुसऱ्या गटाला सायन्सशिवाय पर्यायच नाही, तर जुन्या पठडीतील साऱ्यांसाठी म्हणजे मेडिकल, इंजिनिअरवाल्यांना सायन्स घेणेच भाग आहे. अर्थातच निदान शास्त्र व गणितात ऐंशी मार्क असले तर निभावेल हे पक्के. कमी असल्यास दुप्पट कष्टांची तयारी हवी. केवळ पालकांनी मोठ्ठा क्‍लास, मोठ्ठी फी भरून लावला तर फज्जा उडलाच, असे समजा. 

आता राहिला एकच गट. फायनान्स, क्‍लाउड, रोबोटिक्‍स, शेअर मार्केट वगैरेवाला. गणितावर प्रभुत्व हवे. केवळ गणितातील मार्क इथे उपयोगी नाहीत. बारावीपर्यंतचे गणित लखलखीत राहिले, तर या क्षेत्रातील रस्ते उघडतात. अन्यथा या क्षेत्रात क्वचित प्रवेश होतो, पण एक-दोन वर्षांतच हे जमत नाही, झेपत नाही, हे कळू लागते. 
इयत्ता दहावीच्या पालकांसाठीचा फ्लॅशबॅक इथेच संपला! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: choose your perfect career after 10th