पुतीन यांच्या डोक्यात चाललंय काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vladimir putin

अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांदरम्यान व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत भेट झाली. मात्र तुम्हाला खरा पुतीन समजून घ्यायचा असल्यास त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांचा मागोवा घेणं महत्त्वाचं आहे.

पुतीन यांच्या डोक्यात चाललंय काय?

- ख्रिस अलेक्झांडर

ख्रिस अलेक्झांडर हे कॅनडाचे राजदूत आणि मंत्री राहिले आहेत. सहा वर्षे त्यांनी माॅस्कोमधील कॅनेडीयन दूतावासात उच्चाधिकारी म्हणून काम केले. १९९५ मध्ये सेंट पिटर्सबर्गचे उपमहापौर म्हणून काम करत असलेल्या पुतीन यांच्याशी ख्रिस यांची पहिली भेट झाली. त्यानंतर अनेकदा दोघे भेटले. जी-८ देशांच्या शिखर परिषदेत त्यांनी पुतीन यांचे संपर्क अधिकारी म्हणून काम केले. ख्रिस अलेक्झांडर सांगताहेत पुतीन यांच्या डोक्यात काय चाललंय, त्यांची रणनीती काय, याबद्दल खास ‘सकाळ’ ‘अवतरण’साठी...

अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांदरम्यान व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत भेट झाली. मात्र तुम्हाला खरा पुतीन समजून घ्यायचा असल्यास त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांचा मागोवा घेणं महत्त्वाचं आहे. मी पुतीन यांचा उल्लेख रशियन अराजक असा करेन. एक कडवा राष्ट्रवादी, जो त्यांची मते अमान्य असलेल्यांबद्दल अत्यंत असहिष्णू आहे. रशियाला आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी हिंसाचार आणि विद्‌ध्वंसक नीतीचा वापर करणे आवश्यक आहे, यावर ब्लादिमीर पुतीन यांचा ठाम विश्वास आहे. मी असं का म्हणतो, त्याला आधार आहे. पुतीन यांनी आपल्या किशोरवयात तत्कालीन सोव्हिएत महासंघाची अत्यंत निरंकुश आणि क्रूर मानली जाणारी गुप्तचर संघटना केजीबीमध्ये काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. अर्थातच पुतीन यांना केजीबीच्या दडपशाही, प्रपोगंडा मशिनरी, सर्व प्रकारच्या अमानवी मूल्यांचे आकर्षण होते.

पुतीन यांनी आतापर्यंतच्या आयुष्यात ‘केजीबी’ची ही तत्त्वे पाळली. चेचेन्या युद्धाचा वापर करून पुतीन सत्तेवर आले. त्यानंतर जॉर्जीया, सीरियामध्ये लष्करी आक्रमण, युक्रेनवर दोनदा आक्रमण, राजकीय विरोधकांना संपवणे, इतर लोकशाही देशांमध्ये हस्तक्षेप करणे, राजकीय शत्रूंचा परदेशात पाठलाग करून त्यांच्या हत्या करणे. ही सर्व केजीबीची कार्यप्रणाली पुतीन यांनी अंगिकारली.

जर्मनीत केजीबीचे अधिकारी म्हणून काम करत असलेले पुतीन जेव्हा रशियाला परतले आणि सत्तेपर्यंत पोहोचले, त्यावेळी रशिया एक कमकुवत देश होता. सोव्हिएत महासंघाची शकले झाली होती. युक्रेनसह अनेक राज्य या संघातून फुटून निघाले. संपूर्ण रशियात गोंधळाचे वातावरण होते. सेंट पीटर्सबर्ग बंदरासह अनेक ठिकाणांवर संघटित गुन्हेगारीने नियंत्रण मिळवले होते. जेव्हा पुतीन सेंट पीटर्सबर्ग आणि नंतर मॉस्कोच्या केंद्रीय सरकारमध्ये आले, त्यावेळी १९९० च्या दशकात रशियामध्ये भ्रष्ट व्यवहार, मूठभर उद्योजक, संघटित गुन्हेगारी आणि लाच देणाऱ्यांचे एक वेगळेच आर्थिक मॉडेल तयार झाले होते. पुतीन यांनी या मॉडेलमध्ये थेट भूमिका बजावली. हे मॉडेल विकसित करण्यात पुतीन यांनी भूमिका निभावली, असं रशियाच्या विरोधी नेत्या नवल्नी आपल्या व्हिडीओमध्ये सांगतात.

पुतीन यांनी आर्थिक मॉडेलचा वापर करून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा करण्यास सुरुवात केली. ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले होते, मात्र सुरुवातीच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी मोठ्या रशियन राज्याची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. आपला खरा अजेंडा उघड न होऊ देण्याची त्यांनी काळजी घेतली, कारण त्यावेळी रशिया एक देश म्हणून, तर पुतीन अध्यक्ष म्हणून कमकुवत होते. मात्र त्यांच्या अध्यक्षपदाची दहा वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षा उघड करायला सुरुवात केली. २००७ मध्ये म्युनीच इथे भरलेल्या सुरक्षा परिषदेत त्यांनी स्पष्ट केलं की, ते पाश्चिमात्य नियम, परंपरेला बांधील नाही. आवश्यकता पडल्यास रशियाच्या हितासाठी हे नियम मोडायला मागे पुढे करणार नाही. त्याच्या पुढच्या वर्षी पुतीन यांनी जॉर्जियावर आक्रमण केले. काही वर्षांनी असाद यांची खुर्ची वाचवण्यासाठी पुतीन यांनी सीरियात रशियन लष्कर पाठवले.

गेल्या दहा वर्षांपासून पुतीन यांचे लक्ष युक्रेनवर होते. तिथली विकसित झालेली लोकशाही त्यांना खटकत होती. २००४ मध्ये क्रिमीयावर पुतीन यांनी आक्रमण केले. मात्र ते युक्रेनच्या क्षेत्रफळाच्या केवळ सात टक्के प्रदेशावर होते. मात्र त्यानंतर पुतीन यांनी रशियाच्या फौजा पूर्व युक्रेनमध्ये ठेवल्या होत्या. रशियन फौजांना काही प्रमाणात युक्रेनकडून कडवा प्रतिकार झाला. गेल्या आठ वर्षांत पुतीन यांनी युक्रेनवरून आपली नजर हटवली नाही आणि आज पुतीन यांनी निर्णायक युद्धात उडी घेतली आहे. त्यांचे निर्णय, कृती ही पुतीन यांनी आजपर्यंत जोपासलेल्या मूल्यांशी सुसंगत आहे. मात्र पुतीन यांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू जगाला पाहायला मिळाली, ती म्हणजे त्यांची सत्तेची खुंटी मजबूत झाल्यावर. त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. २० वर्षांपूर्वी त्यांच्याकडे त्यांचे इप्सित साध्य करण्यासाठी साधने नव्हती, सत्तेवर मांड बसली नव्हती, मात्र आज पुतीन सर्वशक्तीमान आहेत. सत्तेवर त्यांची एकहाती पकड आहे. लष्करी सामर्थ्याच्या बळावर पुतीन यांनी जगाच्या लोकशाही संरक्षणाच्या मर्यादेची एकप्रकारे चाचणी घेतली. लोकशाहीच्या देशांच्या मर्यादा, उणिवा, पळवाटा पुतीन यांनी शोधून काढल्या आहेत. मात्र युक्रेन युद्धामुळे त्यांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत.

पुतीन यांची देशाच्या संरक्षणाची व्याख्या इतर देशांपेक्षा वेगळी आहे. देशाच्या सीमा सुरक्षित केल्यावर आपल्याला आपल्या शत्रूपासून सुरक्षित असल्यासारखे वाटते. मात्र पुतीन यांना दुसऱ्या देशाचा लचका तोडण्यात रस आहे. देशाच्या सीमा सुरक्षित करण्याच्या नावाखाली जिथे शक्य असेल तिथला भूभाग बळकवण्याचा, त्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न पुतीन यांचा असतो. नाटो या संघटनेबद्दल त्यांची गणितं आहेत. ‘नाटो’ सदस्य राष्ट्रांवर हल्ला करण्याइतके, पुतीन मूर्ख किंवा धाडसी नाहीत. आणि मला वाटते की आपण हे कबूल केले पाहिजे की, जर युक्रेन ‘नाटो’चा सदस्य असता, तर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचं धाडस दाखवलं नसतं. २००८ मध्ये युक्रेनला नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी युक्रेनच्या नेत्यांनी जोरदार हालचाली केल्या. अमेरिकन सिनेटर जॉन मॅकेनसारख्या लोकांनी अमेरिकेत पाठिंबा दिला. मात्र या प्रस्तावाला जर्मनी आणि फ्रान्सने विरोध केला. कारण त्यांना रशियाला दुखवायचे नव्हते. मात्र त्यांच्या कृतीने रशियाला युक्रेनवर हल्ला करण्याचे बळ मिळाले. तेव्हापासून पुतीन यांनी युक्रेनचे आपले लक्ष्य मजबूत केले. जॉर्जियावरही.

रशियाची युक्रेनवर हल्ला करण्याची मजल का गेली, कारण पुतीन यांचा समज आहे की, त्यांनी ‘नाटो’ सदस्य देशांमधील लोकशाही ठिसूळ करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. आणि युक्रेनमधील आपली उद्दिष्टे साध्य करण्यापासून रोखण्यासाठी पुरेसे मजबूत नेतृत्व उदयास येणे शक्य नाही याची त्यांना खात्री आहे.

अमेरिका आणि युरोपियन महासंघाने रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र पुतीन यांना या निर्बंधांची जाणीव होती. मात्र या निर्बंधांना तोंड देऊ शकतो, याचाही आत्मविश्वास होता. पुतीन हे त्यांच्या आर्थिक कामगिरीसाठी कुणालाच जबाबदार नाही. त्यांची सत्ता निरंकुश आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, रशियन जनता कायम आर्थिक त्रास सहन करण्यासाठी तयार असते, जेव्हा जेव्हा त्यांना वाटते की यामध्ये राष्ट्रीय हित सामावले आहे. लेनिन, स्टालिनच्या राजवटीत, दुसऱ्या महायुद्धानंतरचा दुष्काळ, संघर्ष, दडपशाहीच्या दृष्टचक्रातून रशियन जनता गेली. मात्र त्याविरुद्ध उठाव करावासा वाटला नाही. कारण बहुतांश रशियन जनता याकडे देशभक्तीच्या दृष्टीने पाहत होती. आज रशियातील जनमत पुतीन यांच्याकडे अधिक झुकलं आहे. सर्व जनमत सर्वेक्षण सांगतात की, पुतीन यांनी युक्रेनवर चढाई केल्यानंतर, आर्थिक निर्बंधांचा फटका बसू लागल्यानंतरही रशियन जनता पुतीन यांच्या पाठीशी आहे.

मात्र पुतीन यांना नेमकं काय करायचं आहे? रशियन महासंघाशी संबंधित असलेला प्रदेश परत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुतीन यांना युक्रेनची स्वतंत्र ओळख, युक्रेनियन भाषा आणि संस्कृती मान्य नाही. त्यांच्या मते, युक्रेनियन आणि रशियन एकच लोक आहेत. पुतीन जे काही करत आहेत ते नरसंहाराच्या व्याख्येशी जवळपास जात आहे. पुतीनच्या संकल्पनेतील रशियन साम्राज्याचा विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जुन्या सोव्हिएत रशिया आणि झारवादी साम्राज्याचा एक प्रकारचा मिलाफ आहे. या विचाराने १९४५ पासून आणि विशेषत: १९९१ पर्यंत प्रचलित असलेली व्यवस्था उलथून टाकली आहे.

पुतीन यांचे मनसुबे युक्रेन जिंकण्यापेक्षा त्यांना युरोपचे विभाजन करायचे आहे. युरोपियन महासंघात फूट पाडायची आहे. बायडेन यांची अध्यक्षपदाची कारकीर्द अपयशी करायची आहे. निरंकुशता, निर्दयीपणा दाखवला तर ट्रम्पसारखे अनेक पाश्चिमात्य देशातील नेते त्यांच्या छायेखाली येतील असं त्यांना वाटतंय, मात्र सध्या तरी पुतीन यांच्या मनाविरुद्ध सर्व बाबी घडताना दिसत आहेत.

युक्रेनवर आक्रमण झाल्यावर रशियामध्ये निदर्शने झाली, ते बघून अनेक लोकांना पुतीन यांची सत्ता कमजोर होईल, असं वाटतं. मात्र २०१४ मध्ये पुतीन यांच्याविरोधात यापेक्षा जास्त संख्येने निदर्शने झाली होती. आजची संख्या नगण्य म्हणावी लागेल. पुतीन यांना ड्युमा (रशियन संसद) आणि प्रादेशिक सरकारामध्ये कुठलाही विरोध नाही. प्रपोगंडा मशीनरीवर पुतीन यांचे वर्चस्व आहे. पुतीन अत्याधुनिक आहेत, शक्तिशाली आहेत आणि आजच्या रशियन जनतेचे वर्णन करायचे झाल्यास ते ब्रेनवॉश आहेत, असं म्हणता येईल. त्यामुळे युक्रेन रशियन लोकांचे अधिकार हिरावून घेत आहे, रशियन लोकांना संपवण्याचे काम सुरू आहे, या पुतीन यांच्या अजेंड्यावर बहुतांश रशियन लोकांचा विश्वास आहे. खरं तर युक्रेन एक लोकशाहीवादी देश आहे, युक्रेन कमी भ्रष्ट आणि मजबूत प्रशासकीय संस्था म्हणून वेगाने उदयास येत होता. रशियापासून एकदम वेगळा आणि पुतीन यांना या युक्रेनचा जास्त धोका वाटतो.

पुतीन यांची युक्रेनची रणनीती अपयशी ठरली, जर ते युक्रेनला पराभूत करू शकले नाहीत तर पुतीन आतापर्यंतच्या सर्वात गंभीर राजकीय संकटात सापडण्याची शक्यता आहे. कारण लष्करी मोहिमेत अपयशी ठरलेल्या नेतृत्वाला रशियन जनता सत्तेबाहेर फेकते, हा मोठा इतिहास आहे. अफगाणिस्तानमध्ये रशियाला अपयश आल्यानंतर सत्तेत मोठे बदल झाले. स्टालिनचे फिनलँडविरुद्धचे युद्ध फसले होते. त्यामुळे हिटलरने रशियावर आक्रमण केले. १९०५ मध्ये जपानने रशियन नौदलाला पराभूत केले. त्यानंतर क्रांती होऊन १९१७ मध्ये लेनिन सत्तेवर आले. याचा अर्थ साफ आहे, लष्करी पराभव हा मास्कोच्या सत्तेचा समतोल बिघडवू शकतो.

युक्रेनच्या युद्धात आतापर्यंत मारले गेलेल्या रशियन सैनिकांची संख्या ही अफगाणिस्तानमध्ये पहिल्या चार वर्षांत गमावलेल्या सोव्हिएत संघाच्या सैनिकांच्या संघाएवढी आहे. त्यानंतर रशियना अफगाणिस्तान मोहीम गुडांळावी लागली होती. युक्रेनमध्ये ज्या वेगावे रशिया विमानं आणि जवान गमावत आहे, त्याचा दर भंयकर आहे. मात्र युक्रेनला मदत करणे महत्त्वाचे आहे. तिसऱ्या महायुद्धाला तोंड फोडण्यासाठी नव्हे तर लोकशाही देशाला स्वरक्षणासाठी मदत करण्यासाठी. त्यामुळे जग अस्थिर नव्हे तर अधिक स्थिर राखण्यासाठी युक्रेन आणि लोकशाही टिकून राहणे महत्त्वाचे आहे. मात्र पुतीन एवढ्या दूर निघून गेलेत की त्यांना केवळ लष्करी कारवाई थांबवू शकते, हे देखील तेवढंच खरं आहे.

(शब्दांकन : पूनम शर्मा, अमेरिका)