माझ्याबरोबर मुलालाही लोकांनी ओळखावं!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

कम बॅक मॉम - गायत्री सोहम
सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

कम बॅक मॉम - गायत्री सोहम
आईपण नेमकं काय असतं, हे मी अगदी लहान वयात अनुभवलं आहे. म्हणजेच वयाच्या २२व्या वर्षी मी आई झाले. त्यामुळं आपसूकच लहान वयातच सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. त्यातही मी सिंगल मदर. त्यामुळं माझा मुलगा सोहमची जबाबदारी माझ्याकडंच होती. शिवाय प्रेग्नंसीदरम्यान माझं वजन ८६ किलो झालं. अभिनयक्षेत्रात काम करायचं असल्यास अभिनयाबरोबरच आपल्या लुकवरही अधिक भर दिला पाहिजे, हे माझ्या लक्षात आलं. मी तीन वर्षांत वजन कमी केलं. सोहम तीन वर्षांचा झाल्यानंतर मी काम करायला सुरवात केली. ‘मानसीचा चित्रकार तो’ ही स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका माझ्याकडं आली. मी लगेचच होकार कळवत कामाला लागले.

आपल्या इंडस्ट्रीची एक वाईट बाजू आहे की, बऱ्याचदा एकाच प्रकारच्या भूमिकांसाठी तुम्हाला विचारण्यात येतं. नशिबानं माझ्याबाबतीत असं काहीच घडलं नाही. मला अधिकाधिक चांगल्या भूमिका मिळत गेल्या. ‘मानसीचा चित्रकार तो’ या मालिकेनंतर मी ‘कन्यादान’ मालिका केली. यामध्ये मी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

माझी ही भूमिकाही प्रचंड गाजली. मला प्रेग्नंसीनंतरही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळाल्या. विशेष म्हणजे, प्रत्येक भूमिकेमध्ये प्रेक्षकांनी मला स्वीकारलं. कुटुंब, काम आणि मूल सांभळणं इतर महिलांप्रमाणंच माझ्यासाठीही आव्हानात्मक होतं. या सगळ्यांमध्ये माझी आई माझ्यापाठी खंबीरपणे उभी राहिली. सोहम लहान असताना आम्ही नाशिकला राहायला होतो. त्यामुळं कामानिमित्त मला नाशिक ते मुंबई प्रवास करायला लागायचा. सोहमनंही माझी बाजू खूप सांभाळून घेतली. माझी आई त्याच्याबरोबर होतीच; पण ‘आई तू ही घरीच राहा,’ असा हट्ट सोहमनं कधीच केला नाही. मी माझं नाव गायत्री सोहम लावते, कारण माझ्या मुलाचं नाव सोहम आहे! माझ्याबरोबरच माझ्या मुलालाही लोकांनी ओळखलं पाहिजे म्हणून मी ‘गायत्री सोहम’ म्हणून नाव लावायला सुरवात केली. माझ्या यशात सोहमचा खारीचा वाटा आहे. माझं कुटुंब तेव्हाही माझ्यापाठीशी खंबीरपणे उभं होतं आणि आजही आहे.

मला खंत एका गोष्टीची वाटते की, सोहमचं बालपण मी फार काळ एन्जॉय करू शकले नाही. मला घराची आर्थिक बाजूही सांभाळायची होती. त्यासाठी तितकंच काम करणंही गजरेच होतं. शिवाय इंडस्ट्रीमध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठीही मी धडपडत होते. या सगळ्यांमध्ये मी सोहमला फार वेळ देऊ शकले नाही; पण आता मला सोहमला सगळं काही द्यायचं आहे.

आता तो १२ वर्षांचा आहे. त्याच्या शाळेत काही महत्त्वाचे कार्यक्रम असल्यास मी आवर्जून त्याच्याबरोबर जाते. त्याच्याबरोबर एकत्रित वेळ घालवणं माझ्यासाठी स्ट्रेसबस्टर आहे. मी एकदा कुटुंबासाठी वेळ बाजूला काढून ठेवला की, त्या वेळात मी काहीच दुसरं काम करत नाही. सोहमच्या बालपणात जे मी जगले नाही, ते मी आता त्याच्याबरोबर जगत आहे. आम्ही बाहेर कुठे गेल्यावर कोणी माझ्याबरोबर फोटो काढायला आल्यास सोहमला त्याचं फार कौतुक वाटतं. बऱ्याचदा सोहम माझं काम पाहून प्रशंसाही करतो. काही चुकलं असल्यास तो आवर्जून सांगतो. माझ्या मालिकांच्या सेटवरही तो आला आहे. आताही मी ‘मोलकरीण बाई’ ही स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका करत आहे. या मालिकेच्या सेटवरही तो येतो. एकूणच काय, तर आमची माय-लेकाची जोडी भारी आहे.
(शब्दांकन - काजल डांगे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Come Back Mom gayatri soham maitrin supplement sakal pune today