कनेक्‍टेड असूनदेखील एकटे

सुखदा चौधरी
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

सध्या आपण राहतो ते तंत्रज्ञानाचे सुवर्णयुग आहे. तंत्रज्ञानाने जगाचे रूपांतर एका छोट्याशा खेड्यात केलेले आहे. तंत्रज्ञानामुळेच हजारो मैल दूर बसलेल्या आपल्या प्रियजनांशी आपल्या घरात आरामात बसून संवाद साधणे कधी नव्हे इतके सोपे झाले आहे आणि हा संवाद म्हणजे केवळ बोलणे नव्हे, तर व्हिडिओ कॉल्सच्या माध्यमातून आपण त्यांना याचि देही याचि डोळा आपल्यासमोर बघूदेखील शकतो. मला बरेचदा वाटते की ही किती मोठी देणगी आहे. आपण कुणाशी कधीही कुठल्याही अडचणीशिवाय संवाद साधू शकतो.

सध्या आपण राहतो ते तंत्रज्ञानाचे सुवर्णयुग आहे. तंत्रज्ञानाने जगाचे रूपांतर एका छोट्याशा खेड्यात केलेले आहे. तंत्रज्ञानामुळेच हजारो मैल दूर बसलेल्या आपल्या प्रियजनांशी आपल्या घरात आरामात बसून संवाद साधणे कधी नव्हे इतके सोपे झाले आहे आणि हा संवाद म्हणजे केवळ बोलणे नव्हे, तर व्हिडिओ कॉल्सच्या माध्यमातून आपण त्यांना याचि देही याचि डोळा आपल्यासमोर बघूदेखील शकतो. मला बरेचदा वाटते की ही किती मोठी देणगी आहे. आपण कुणाशी कधीही कुठल्याही अडचणीशिवाय संवाद साधू शकतो. मात्र तंत्रज्ञानाच्या या गर्दीत असूनदेखील एकटी असलेली माणसे आजूबाजूला पाहिली की साहजिकच मन या कनेक्‍टिव्हिटीच्या दुसऱ्या बाजूचा विचार करायला लागते. असे वाटते की जगाला सतत जोडून ठेवणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या अतिरेकाने आपल्याला एकटे पाडले आहे.
कदाचित हे आपल्यापैकी अनेकांना विचित्र वाटेल परंतु तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सतत कनेक्‍टेड असलेल्या शहरी वातावरणात एकटेपणाची जाणीव लोकांमध्ये वाढू लागली आहे. ही जाणीव आपल्याला अंतर्मुख करणारी आहे. मात्र याचे मूळ हे आपणच ठरवून बदल केलेल्या आपल्या जीवनपद्धतीमध्ये आणि संवादमाध्यमांमध्ये आहे. काही वर्षे मागे जाऊन आपल्या खेड्यातील जीवनशैलीचा विचार करूया. लोक एकमेकांशी कसे जोडले जातात याचे ते उत्तम उदाहरण होते. मुळात खेड्याच्या जीवनशैलीची रचनाच अशी होती की लोकजीवन एकमेकांवर अवलंबून होते आणि त्यामुळे लोक एकमेकांशी प्रत्यक्ष बोलल्याशिवाय राहूच शकत नसत. त्या जीवनशैलीमध्ये अशा काही सार्वजनिक जागा होत्या जिथे स्त्री-पुरुष सहज, कुठल्याही कारणाशिवाय एकत्र येऊन एकमेकांशी बोलत असत. एकमेकांना आपल्या जीवनातील घडामोडी सांगत असत. सुखदुःखाच्या गप्पा होत असत. आपल्या गोष्टी, आपले जीवन एकमेकांबरोबर वाटल्या जात असे. याउलट आजची शहरी जीवनशैली बघा. मी स्वतःला भाग्यवान म्हणेन कारण माझ्या पिढीचे लोक त्यांच्या शेजारी, अगदी त्यांच्या आजूबाजूच्या वस्तीत राहणाऱ्या लोकांनासुद्धा ओळखत असत. प्रत्येकाने प्रत्येकाला ओळखण्याचे ते दिवस कधीच सरलेत. फ्लॅट सिस्टिममध्ये राहणाऱ्या अनेक लोकांना अगदी शेजारी कोण राहतो तेदेखील माहिती नसते, मग बोलणे, संवाद वगैरे तर दूरच राहिला. आपण अगदी साचेबद्ध असे जीवन जगायला लागलो आहोत.
बदलत्या काळाबरोबर हल्ली आपण हायपर कम्युनिकेशनकडे जाऊ लागलो आहोत. म्हणजे आपल्या एका छोट्याशा मित्रपरिवाराबरोबर अधिकाधिक कनेक्‍टेड राहणे याकडे आपला कल असतो. यात आपले कुटुंब आणि फार फार तर एक-दोन मित्रांचा समावेश असतो. या छोट्याशा वर्तुळात आपण जगत असतो. यांच्या बाहेर असणाऱ्या लोकांशी आपल्या दैनंदिन जीवनाचा फारसा संबंध नसतो. हे जीवन आपल्या पूर्वीच्या जीवनशैलीच्या अगदी विरुद्ध आहे. तेव्हा मोठा मित्रपरिवार असणे, समाजात अनेक लोकांशी ओळख असणे ही प्रतिष्ठेची गोष्ट मानली जात असे. इतकेच नव्हे तर समाजातील ही ओळख लोकांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असायची. आपली समाजात काय ओळख आहे आणि आपल्याला पुढे काय व्हायचे आहे याबद्दल आपल्या संकल्पना स्पष्ट करणारा असा हा सामाजिक संबंध असे.
मात्र आपण आत्मसात केलेले बदल आपल्याला अधिकाधिक एकटे बनवू लागले आहेत. हा एकटेपणा दूर करण्यासाठी आपल्याला फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपच्या चॅटिंगच्या आपल्या आरामदायक दुनियेतून बाहेर निघून प्रत्यक्ष संवादासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील. आपल्याला दीर्घकाळ टिकणारी मैत्री, आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करण्यासाठी पावले उचलावी लागतील. दुर्दैवाने हे कसे करायचे याचे शिक्षण आपल्याला कधीच दिले गेलेले नाही. यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की माणूस माणसाबरोबर संवाद साधताना कचरू लागलेला आहे. आपण एकमेकांना आपले सुख-दुःख सांगू शकत नाही, अगदी साधा संवादसुद्धा अनोळखी व्यक्तीसोबत सुरू करताना आपली त्रेधातिरपीट उडते आहे. मात्र मनुष्याच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हे सगळे करता यायला हवे. नसल्यास, मानसिक आरोग्य बिघडेल.
मात्र याचा अर्थ सगळे मार्ग संपले असा होतो काय? तर नक्कीच नाही. आपल्याला व्हॉट्‌सऍप चॅट आणि महिन्यातून एकदा व्हिडिओ कॉलच्या विश्वातून बाहेर यावे लागेल आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात सामाजिक संवाद आणि मित्रपरिवार वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कदाचित यासाठी आपल्याला समाजात कसे वावरावे, मित्र कसे बनवावे आणि कुटुंबाच्या बाहेरच्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध कसे निर्माण करायचे याचे शिक्षण घ्यावे लागेल. कारण इतर कोणत्याही कौशल्याप्रमाणे मित्र बनवणे आणि मैत्री टिकवणे हेदेखील एक कौशल्य आहे आणि त्याचा सराव सुटल्यास आपण ही कला विसरून जातो.
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: connected asunhi ekate