भांडतो; लगेच गट्टी करतो!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

मालिकेतील जोड्या प्रत्यक्ष आयुष्यात काय करतात, त्यांचे एकमेकांशी पटते का, ते कसे राहतात हे प्रत्येकालाच जाणून घ्यायची इच्छा असते. या जोड्या ऑनस्क्रीनपेक्षा ऑफस्क्रीन कशी धमाल करतात, तसेच त्यांची मजा-मस्ती, मैत्रीचे नाते नेमके कसे आहे हे पाहायला प्रेक्षकांना तितकेच आवडते. मात्र, एखाद्या मालिकेत अनोळखी आणि नवे चेहरे पाहायला मिळाले, तर त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच असते.

जोडी पडद्यावरची - विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर
मालिकेतील जोड्या प्रत्यक्ष आयुष्यात काय करतात, त्यांचे एकमेकांशी पटते का, ते कसे राहतात हे प्रत्येकालाच जाणून घ्यायची इच्छा असते. या जोड्या ऑनस्क्रीनपेक्षा ऑफस्क्रीन कशी धमाल करतात, तसेच त्यांची मजा-मस्ती, मैत्रीचे नाते नेमके कसे आहे हे पाहायला प्रेक्षकांना तितकेच आवडते. मात्र, एखाद्या मालिकेत अनोळखी आणि नवे चेहरे पाहायला मिळाले, तर त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच असते. बऱ्याचदा ऑनस्क्रीन असलेले त्यांचे प्रेमाचे नाते, मैत्रीपूर्ण भाव तितकेच निखळ आणि घट्ट असतात. असेच काहीसे अभिनेत्री अक्षया हिंदळकर आणि अभिनेता विशाल निकम यांच्या बाबतीत घडले आहे.

अक्षया आणि विशाल हे दोघे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेमुळे एकत्र आले आहेत. या दोघांची ही पहिलीच एकत्रित मालिका आहे. एकमेकांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना विशालच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. तो पटकन उत्तरला, ‘माझ्या आणि अक्षयाच्या पहिल्या भेटीबद्दल मी आधी सांगतो. मालिकेच्या प्रोमो शूटदरम्यान मी अक्षयाला पहिल्यांदा भेटलो होतो. मी तिच्याशी ओळख करायला म्हणून गेलो तर तिने फार भाव खाल्ला. माझ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आणि जास्त न बोलता ती तिथून निघून गेली.’ यावर अक्षया लगेच म्हणाली, ‘मी विशालला ओळखत नसल्याने त्याच्यासोबत थोडीशी कटूच वागले, मात्र विशाल पुन्हा बोलायला आला तेव्हा मी अजिबात भाव न खाता त्याच्याशी मैत्री केली.’

एकमेकांच्या आवडत्या-नावडत्या गुणांबद्दल विचारले असता अक्षया म्हणाली, ‘विशालमधला आवडता गुण म्हणजे तो जसा आहे तसाच तो इतरांसमोर दाखवतो. तो सेटवर सर्वांची खूप काळजी घेतो. विशेष म्हणजे, मला तो एक मैत्रीण म्हणून फार जपतो. नावडता गुण म्हणजे, विशाल समजूतदार असला तरी फारच चिडखोर आहे.

त्याला लहानसहान गोष्टी फार खटकतात आणि तो लगेचच चिडतो. त्याचा हा स्वभाव मला बिलकूल आवडत नाही.’ यावर विशाल म्हणाला, ‘अक्षयामधला आवडता गुण म्हणजे, ती सेटवर सगळ्यांशीच मिळूनमिसळून वागते. विशेष म्हणजे, तिच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिने स्वतः घेतली आहे आणि अशी कर्तृत्ववान मैत्रीण असल्याचा मला फारच अभिमान आहे. नावडता गुण फक्त एक नाही, तर अनेक आहेत! त्यातला त्यात सांगायचे म्हणजे ती स्वतःची अजिबात काळजी घेत नाही, सतत सेटवर धडपडत असते. दुसरे म्हणजे ती फारच साधी राहते, जे मला बिलकूल आवडत नाही आणि माझ्यासोबत खूप भांडते.’

एकमेकांची फारच काळजी घेणारी आणि त्यांच्यातली मैत्री घट्ट करत जाणारी ही जोडी ऑनस्क्रीनही अगदी खुलून दिसते. अक्षयाच्या बोलण्यातून कळले, की चित्रीकरणादरम्यान सर्वांत जास्त सीन्स हे विशालसोबत झाल्याने एक मित्र म्हणून तो तिला जास्त चांगला कळला आणि त्यांच्यातली मैत्री घट्ट होत गेली.

सेटवरील मजामस्तीबद्दल बोलताना विशाल म्हणाला, ‘अक्षया तर एकदा चक्क कशाला तरी आदळून पडली होती आणि तिच्या पायाला दुखापत झाली होती. त्या वेळी सेटवरील सर्वच लोकांची तारांबळ उडाली होती. मला अक्षयाची काळजीही वाटत होती आणि रागही येत होता. आम्ही जिमला जायचे ठरवले होते. अगदी पहिल्या दिवशी दोघेही जिमला गेलो. त्या दिवशी अक्षयाचा उत्साह पाहून तर असे वाटले, की खरेच जिमला जायचे अक्षयाने मनावर घेतले आहे. मात्र, अगदी दुसऱ्याच दिवशी बघतो तर काय अक्षया गायब झाली होती. भांडणाबद्दल बोलू तितकेच कमी आहे.’ यावर मात्र अक्षया पटकन म्हणाली, ‘विशालच माझ्याशी सतत भांडतो, चिडतो आणि प्रत्येक वेळी मी त्याला सॉरी बोलायला त्याच्याजवळ जाते. अगदी थोड्याच वेळात आम्ही एकत्रही येतो. बऱ्याचदा बाहेर जेवायला जातो, सेटवर गप्पा-गोष्टीही चांगल्याच रंगतात.’

(शब्दांकन - स्नेहा गांवकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Couple on screen vishal nikam and akshaya hindalkar