कन्हैय्या कुमार म्हणतो, 'विद्यार्थ्यांच्या विरोधात सरकारनेच पुकारले युध्द'

दीपा कदम
रविवार, 12 जानेवारी 2020

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला, देशभरात सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत असलेला रोष या सगळ्या पार्श्वभूमीवर जेएनयूतील विद्यार्थी संघटनेची माजी अध्यक्ष आणि भाकपचा नेता कन्हैय्या कुमारनं सकाळला विशेष मुलाखत दिली आहे. 

प्रश्‍न : देशभरातील विद्यार्थी, तरूण अस्वस्थ आहेत. रस्त्यावर उतरतायत. हे कधीपासून सुरू झालेय आणि त्याची कारणे काय वाटतात? 
उत्तर : जे आज देश अनुभवतोय ते मागच्या साडेपाच वर्षात देशातल्या सर्वच विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळते आहे. महाराष्ट्रात पुण्यातील एफ़टीआयपासून ही सुरूवात झालेली आहे. गजेंद्र चौहान यांना एफटीआयमध्ये आणल्यानंतर पहिली ठिणगी पडली होती. ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही, त्यांना ते ते तुमच्या विचारांचे आणि पक्षाचे आहेत म्हणून तिथे आणून बसवणे हे घातक आहे. लोकशाहीला हरताळ फासून स्पर्धा, नियम अटी, समित्यांचे अहवाल दुर्लक्षित करून पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात येत आहे. या सरकारने पुणे विद्यापीठ, पेरियार आंबेडकर सर्किट, हैद्राबाद, अलाहबाद, जादवपूर,जामिया, अलिगड आणि जेएनयू या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विराधात मागील पाच वर्षात विरोधात युध्द पुकारले आहे. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रश्‍न : सरकारच्या तुलनेत विद्यार्थी ही छोटी ताकद झाली त्यांच्या विरोधात युध्द.. 
उत्तर : अमेरिकेत ट्रॅम्पला निवडणूक जिंकायची आहे तर इराणच्या विरोधात त्यांनी युध्द पुकारले आहे. अमेरिकनेने त्यांचा शत्रू देशाच्या बाहेर निर्माण केला ओ. पण आपल्या विद्यमान सरकारने देशातल्या विद्यार्थ्यांच्या विरोधातच युध्द पुकारत देशाच्या अंतर्गतच शत्रू निर्माण करत आहे. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत हे देखील ते विसरलेत. 
विद्यार्थ्यांची ताकद काय आहे हे या सरकारला माहित आहे. आणिबाणीच्या काळातील विद्यार्थीच आज नेते आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची ताकद फोफावू नये यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे. लोकं रस्त्यावर उतरू शकतात आणि विद्यापीठं यामध्ये मोठी भूमिका बजावू शकतात हे त्यांना माहित आहे. विद्यार्थ्यांनी घाबरायला पाहिजे यासाठी सरकारच्या धोरणांच्या विरोधात बोलणे बंद करावे यासाठी हिंसा केली जाते. 

प्रश्‍न : कुठल्याच सरकारला विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेऊ नये असे वाटंत असते असे का? आणि विद्यार्थ्यांचा राजकारणातील सहभाग आवश्‍यक का वाटतो? 
उत्तर : कुठल्याच सरकारला विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेऊ नये असे वाटते. यापूर्वीच्या सरकारना देखील तसेच वाटत असे. मात्र त्यांच्यामध्ये आणि विद्यामान सरकारमध्ये फरक असा आहे की पूर्वी पोलिसांकडून विद्यार्थ्यांना धाक दाखवला जायचा आता मात्र गुंडांना विद्यापीठात घुसवले जाते आणि त्यांच्याकडून हल्ला केला जातोय. 
राजकारण समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. विद्यार्थी या देशाचे नागरीक आहेत. बेरोजगारी, महागाई या सर्व प्रश्‍नांची झळ विद्यार्थ्यांना नाही का बसत? विद्यार्थी मतदान करतात. त्यांनी विचार नाही केला तर ते कसे काय मतदान करणार? या देशाच्या समस्यांवर आणि राजकारणावर या देशाचा विद्यार्थी नाही बोलणार तर कोण बोलणार. सर्वात समजूतदार आणि नवीन विचार करणारा विद्यार्थी असतो. समाजातील सर्व प्रकारच्या समस्यांविषयी प्रश्‍न उपस्थित करण्यासाठी सर्वात महत्त्वाची तो "कडी' आहे. विद्यार्थीच जगात घडणाऱ्या घडामोडींना "कनेक्‍ट' असतो, संशोंधन तोच करतो. जी लोकं पोटापाण्याच्या प्रश्‍नांशी झगडत असतात त्यांना तसेही देशातल्या राजकारणाशी काहीही संबंध नसता. पण विद्यार्थीदशा म्हणजे नवीन गोष्टी, प्रश्‍न समजून घेणं त्याची उकल करणं. राजकारण ऐवढी अडचणीची गोष्ट आहे तर विद्यापीठामध्ये राजकारण हा विषय अजून अभ्यासाला का ठेवलाय? देशात आज जितके राजकीय नेता आहेत, ते सर्व विद्यार्थी संघटनेतूनच आलेले आहेत. विद्यार्थ्यांन त्यांच्या हक्‍काची गोष्ट केली तर त्यावर प्रश्‍न उपस्थित केले जातात. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रश्‍न : विद्यार्थी फक्‍क विद्यापीठांच्या प्रश्‍नावर बोलतायत की देशात काय चाललंय त्याचेही भान त्यांना आहे? 
उत्तर : फी वाढ आणि विद्यापीठातल्या इतर प्रश्‍नांवर विद्यार्थी बोलतोच आहे. पण आता जो विद्यार्थी बाहेर पडलाय तो देशातील राजकीय परिस्थिीतवर भाष्य करण्यासाठी बाहेर पडत आहेत. विद्यापीठांच्या प्रश्‍नावर नाही तर सामान्य लोकांच्या प्रश्‍नांवर तरूण बाहेर पडतायत. शेतकरी, कामगार, महिलांच्या प्रश्‍नांवर विद्यार्थी सहभागी होतात. सीएए, एनआरसीच्या विरोधात तो रस्त्यावर उतरलाय. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रश्‍न : विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला काही आकार येईल किंवा यातून काही घडेल असे वाटते का?
उत्तर : 
विद्यार्थ्यांच्या या चळवळीआतून मोठे आंदोलन उभे राहण्याची ताकद मला वाटते. ते लगेचच होईल असे नाही. कारण विद्यार्थ्यांच्या विरोधात सिस्टीम काम करते आहे. विद्यार्थ्यांना समाजासमोर राक्षस म्हणून उभं केले जातेय. विद्यार्थी गांजा पीतात, ते कंडोम वापरतात, ते पार्टी करतात, सैन्याच्या विरोधात आणि हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात असा एक प्रपोगंडा तयार केला जातो. देशाच्या सामान्य लोकांसमोर विद्यार्थ्यांना बदनाम केले जाते. त्यामुळे हे आंदोलन देखील एका निराशेतून जाईल आणि नंतर उसळी घेईल. तोपर्यंत हा संघर्ष विविध टप्प्यात सुरूच राहिल. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रश्‍न : विद्यार्थ्यांचे एवढे मोठे आंदोलन सुरू असताना विरोधी पक्ष तुमच्या सोबत दिसत नाही 
उत्तर : धर्माच्या आधारे नागरीकत्व देणारा कायदा करण्याची हिंमत विद्यमान सरकारने दाखवली याला आताचा विरोधी पक्ष पण जबाबदार आहे. धर्मनिरपेक्षता या शब्दाची सत्ताधारी खिल्ली उडवातात, कारण त्यांनी धर्मनिरपेक्षता अधिक जाणतेपणाने राबविली असती तर त्याची आज या लोकांनी खिल्ली उडवली नसती. मात्र या आंदोलनाला कोणी नेता नाही, हे फार चांगले आहे. आता जे विरोधात बसलेत ते यांना सत्तेवर आणण्यास जबाबदार आहेत. गांधीच्या देशात गांधीची हत्या करणाऱ्या गोडेसे या दहशतवाद्याला जिंदाबाद केले जाते याची जबाबदारी विरोधकांना घ्यावी लागेल. लोकं कंटाळून रस्त्यावर उतरलेत. त्यामुळे विरोधकांना लोकं नेता मानायला तयार नाहीत, आणि विरोधक देखील त्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रश्‍न : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विद्यार्थ्यांनी आणि तरूणांनी मोठा प्रतिसाद दिला होता. त्याची कारणे काय आणि आता विद्यार्थ्यांनी पाठ का फिरवली असावी असे वाटते?
उत्तर : नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जोडले होते. विद्यार्थ्यांची स्वप्नं आणि नरेंद्र मोदींची तार जुळली होते. मी गरीब कुटुंबातून आलोय. माझ्या गरीब आईने कष्ट करून मला वाढवलंय. मी चहा विकायचो हे मोदींचे संवाद होते. देशातील करोडो गरीबांना त्यावेळी असे वाटले की ही व्यक्‍ती आपल्या प्रश्‍नांना समजून घेईल. पण तसे झाले का? देशात गरीबी वाढलीय आणि अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. 5 लाख ट्रिलियन इकॉनॉमी विषयी बोलताबोलता देशाचा विकास दर 5 वर आला आहे. 45 वर्षात सर्वाधिक बेरोजगारी आहे, महिलांवरच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालीय. आर्थिक असमानतेमध्ये वाढ झाले आहे. खूप कमी लोकं आहेत ज्यांच्या संपत्तीत कितीतरी पटींनी वाढ झालीय. तर करोडो लोकांच्या गरीबीत मात्र वाढ झाली आहे. गरीब अधिक गरीब झालेत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तरूणांना मोदी जी स्वप्नं दाखवंत होते, ती पूर्ण झालेली नाहीत. महिलांमध्ये देखील मोदीची लोकप्रियता बऱ्यापैकी होती. मात्र देशभरात जिथे आंदोलन सुरू झाली आहेत त्यात महिलांनी पुढाकार घेतला आहे. उन्नावमध्ये कुलदीप सेंगर जो भाजपचा आमदार होता त्याला वाचवण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत होते. तुम्ही एका बलात्काऱ्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करणार असाल तर तुमच्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होते. चिन्मयानंदवर आरोप करण्यात आलेल्या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता जे बुरखा घालून येतात त्यांच्याकडील शस्त्र तुमचा धर्म जाणणार नाहीत. तुमच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित करणाऱ्यावर तो कोणत्याही धर्माचा असला तरी हल्ला केला जाणार आहे हे विद्यार्थ्यांना आणि देशातील तरूणांना कळून चुकलेले आहे. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रश्‍न : शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करण्याची संधी मिळाली, तर प्राधान्य कशाला द्याल? 
उत्तर : कोणत्याही देशाच्या अर्थसंकल्पाचा दहा टक्‍के हिस्सा हा शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. देशातल्या विद्यापीठांकडे आज शैक्षणिक पायाभूत सुविधांसाठी निधी नाही. शिक्षक, लायब्ररी, संशोधन या सर्वासाठी पैसा लागतो. विकसित देश बनण्यासाठी तुमचा किती शिक्षणावर खर्च होतो हे पाहणे आवश्‍यक ठरते. अजूनही आपल्याकडे उच्च शिक्षणाकडे वळण्याचे प्रमाण कमी आहे. सिलेबस अपडेट व्हायला हवे. विद्यापीठांमध्ये सगळ्या जातीधर्माचे, प्रकारचे आर्थिक स्तर असणारे, वेगवेगळ्या प्रदेशाचे प्रतिनिधीत्व करणारे विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळायला हवी. विज्ञान, तंत्रज्ञानात संशोधन करण्यावर प्राधान्य देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांवर कल्पना लादता कामा नयेत. तुम्ही विचार काय करायला पाहिजे हे विद्यापीठाने शिकवता कामा नये तर कसा विचार करायला पाहिजे हे शिकवायला पाहिजे. शिक्षण हे रोजगाराभिमुख आणि राष्ट्र उभारणीस हातभार लावणारे असावे.

National Yuva Din युवा दिन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cpi leader kanhaiya kumar special interview for sakal deepa kadam