सर्जकांची ऊर्जाशक्ती आणि दमनाचे परिणाम!

आता हिटलरचं गुणगान करायचं, उदात्तीकरण करण्याचं कारण काय असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. हे वाकडे प्रश्न पडायलाच हवेत.
hitler
hitlersakal
Updated on

- नीलेश खरे, saptrang@esakal.com

(आता हिटलरचं गुणगान करायचं, उदात्तीकरण करण्याचं कारण काय असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. हे वाकडे प्रश्न पडायलाच हवेत. मात्र हा हिटलरचं गुणगान करण्याचा नाही, तर त्याच्यातल्या राक्षसी प्रवृत्तीच्या मुळाचा शोध घेण्याचा छोटेखानी प्रयत्न आहे. यात प्रतिवादाचं स्वागतच आहे, तरच त्यांची उत्तरं शोधली जातात)

व्हिएन्ना ॲकॅडमी ऑफ फाइन आर्ट्समध्ये त्याला प्रवेश नाकारला गेला. ते वर्ष होतं १९०८. तो उत्कृष्ट वास्तुचित्रकार होता. त्याला माणसं मात्र रंगवता येत नसत. माणसांना कुठे रंग असतात? एखाद्या वास्तुसारखी साचेबद्ध भव्यता माणसांना नसते. नकार मिळाल्यानंतरही त्यानं चित्रकलेशी जुळवून घेण्याचे प्रयत्न पुढेही सुरूच ठेवले.

कला विद्यापीठात प्रवेश मिळवून मोठा कलाकार होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या या स्वप्नाळू तरुणानं आयुष्यात मोठी उलथापालथ पाहिली, घडवून आणली. शेवटी आत्महत्या केली. अपयश काही स्वीकारलं नाही. त्याचं नाव होतं ॲडॉल्फ हिटलर’!

कुप्रसिद्धीची आस?

व्हिएन्नात असताना हिटलरनं अनेक जलरंग चित्रं आणि पोस्टकार्ड्स रंगवली. त्यानं रंगवलेली चित्रं साधारणत: ऑस्ट्रिया आणि जर्मनीतील गावं, चर्च, पूल आणि शांत निसर्गदृश्यं यांच्यावर आधारित होती. काही समीक्षकांच्या मते, त्याची चित्रं तांत्रिकदृष्ट्या सक्षम होती, परंतु त्यात मौलिकता किंवा भावनिक खोलीचा अभाव होता.

तरीही, त्याच्या चित्रांना पर्यटक आणि स्थानिक लोकांमध्ये मागणी होती. त्याच्या अंदाजे २ हजारांहून अधिक कलाकृतींपैकी काही आजही अस्तित्वात आहेत आणि त्याच्या ऐतिहासिक कुप्रसिद्धीमुळं लिलावात उच्च किमतीला विकल्या जातात. ही कुप्रसिद्धीची आस त्याला केव्हा लागली? हिटलर असा का वागला? त्याची अभिव्यक्ती का नाकारली गेली?

त्याच्या उमद्या, संवेदनशील, उत्कट अभिव्यक्तीची हेटाळणी झाली, त्याला जबाबदार कोण? अकादमीच्या परीक्षकांनी त्याच्या वास्तुशिल्प रेखाटनातील कौशल्याची प्रशंसा केली, परंतु त्याच्या एकूणच कलात्मक प्रतिभेत कमतरता असल्याचं मत नोंदवलं. विशेषत: मानवी आकृत्या रंगवण्यात तो अपयशी ठरत असे.

या नाकारल्या जाण्याचा त्याच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाल्याचं भविष्यातल्या घटनाक्रमात दिसून येतं. हिटलरच्या मनात ज्यू लोकांबद्दल तीव्र द्वेष होता, जो त्यानं आपल्या ‘माइन काम्फ’ या पुस्तकात व्यक्त केला. त्याला ज्यू लोक हे जर्मनीच्या सर्व समस्यांचं मूळ वाटत असत.

त्याच्या विचारसरणीवर एकोणिसाव्या शतकातील युरोपातील ज्यूविरोधी (Anti-Semitic) चळवळींचा प्रभाव होता. त्याने ज्यूंना ‘निकृष्ट’ आणि ‘जर्मन संस्कृतीसाठी धोका’ मानलं होतं. त्याचा हा द्वेष कदाचित त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अपयशांमुळं, म्हणजे व्हिएन्ना येथील कला शाळेत नाकारलं जाणं आणि त्याला ज्यूंवर दोष देण्याच्या प्रवृत्तीमुळं वाढला असावा.

१९१३ मध्ये हिटलर म्युनिकला गेला आणि तिथंही त्यानं चित्रकला सुरू ठेवली. पहिल्या महायुद्धापर्यंत तो आपल्या चित्रांवरच अवलंबून होता. त्याच्या चित्रांमध्ये एक निखळ शांतता आणि सौंदर्य दिसते, जे त्याच्या पुढील आयुष्यातील हिंसक आणि विध्वंसक स्वभावाशी पूर्णपणे विसंगत आहे. त्याच्या कलाकृतींमध्ये बहुतेकदा वास्तुशिल्पाचा प्रभाव दिसतो.

त्याला इमारतींचे रेखाटन करताना विशेष आनंद मिळत असावा असं वाटतं. त्याच्या चित्रांमध्ये रंगांचा वापर सौम्य आणि संयत होता, जणू तो निसर्गाच्या साधेपणाला कॅनव्हासवर उतरवत असे. अर्थात, हिटलरच्या चित्रकार म्हणून जगलेल्या कारकिर्दीला उत्तम म्हणणे कदाचित अतिशयोक्ती ठरेल, परंतु त्याच्या चित्रांमध्ये एक विशिष्ट कौशल्य आणि समर्पण नक्कीच दिसतं. त्याचे रंग वास्तवाशी प्रामाणिक आहेत. ठासून सत्य सांगणारे आहेत.

...तर इतिहास वेगळा असता?

हिटलरच्या ज्यूविरोधी धोरणामागं कोणतीही एकच घटना जबाबदार नव्हती, तर ही त्याच्या वैयक्तिक द्वेष, जर्मनीतील आर्थिक-सामाजिक संकटं आणि नाझी प्रचार यांचा एकत्रित परिणाम होता. त्याच्या या धोरणामुळं मृत्यूचं तांडव मानल्या जाणारा होलोकॉस्ट (Holocaust) घडला, ज्यात सुमारे ६० लाख ज्यू लोकांची हत्या झाली.

हा इतिहासातील एक काळा अध्याय आहे, जो मानवतेच्या क्रूरतेचं प्रतीक मानला जातो. अकादमीत प्रवेश मिळाला असता किंवा त्यानं राजकारणाऐवजी चित्रकलेला प्राधान्य दिलं असतं, तर कदाचित इतिहास वेगळा घडला असता का? त्याच्या कलात्मक ऊर्जेचं नियमन झालं नसतं, तर आज विध्वंसाचा रंग जगाला कसा दिसला असता? त्याच्या कलाकृती आजही अभ्यासक आणि संग्राहकांसाठी कुतूहलाचा विषय आहेत.

त्या एका व्यक्तीच्या जीवनातील त्या काळाची झलक दाखवतात, जेव्हा तो विध्वंसक नेता नव्हता, तर एक साधा चित्रकार होता, जो आपल्या ब्रशनं जगाकडं पाहण्याचा प्रयत्न करत होता. हिटलरच्या या मवाळ, सहवेदना व्यक्त करणाऱ्या चित्रकार रुपावर नजर टाकल्यानंतर आपल्या प्रत्येकाला अनेक प्रश्न पडतात.

सर्जनाची शक्ती कलाकाराकडं उपजत असते, कारण त्यांची ग्रहणशक्ती, समवेदनक्षमता उच्च कोटीची असते. आपल्या भोवताली होणारे सूक्ष्म बदल ही कलासक्त मनं टीपकागदासारखे टिपत असतात. त्यांच्या प्रतिक्षिप्त क्रिया वेगळ्या असतात.

प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म विश्लेषण करत असल्यानं हे लोक प्रस्थापित व्यवस्थेपेक्षा काही नवं घडवू पाहतात. हा नव्याचा शोध कधी क्रांतीकडं घेऊन जातो, तर कधी विनाशाकडं. कलाकार ऊर्जा उपजत घेऊन जन्मतो, तर तिला दिशा समाज देतं असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com