‘यशस्वी’ भव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cricket Iranian trophy india vs Australia bcci kl rahul social media sport

इराणी करंडक सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याने या खेळीत मोडला....

‘यशस्वी’ भव

- शैलेश नागवेकर

इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे रथीमहारथी फलंदाज नांगी टाकत होते. त्या वेळी तेथून फार दूर नसलेल्या ग्वाल्हेरमध्ये इराणी करंडक सामना सुरू होता आणि त्यात एक फलंदाज धावांचे इमले रचत होता.

थक्क करणारी फलंदाजी करत त्याने पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात शतक करून पुन्हा एकदा आपल्या अंगी असलेल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. इराणी करंडक सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याने या खेळीत मोडला....

धावा काय आणि विकेट काय... त्यापेक्षा मला लहान वयात चिंता असायची ती, पुढचं जेवण मिळेल की नाही याची..! अशी हृदयाला भिडणारी भावना अगदी काही वर्षांपूर्वीच व्यक्त करणारा हा फलंदाज आहे यशस्वी जयस्वाल....

मोठ्या प्रमाणात चर्चा होत असलेल्या गावसकर-बॉर्डर कसोटी मालिकेच्या धामधुमीत यशस्वीची ही विक्रमी खेळी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली नसेल; पण बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली तरी पुरेशी आहे. केएल राहुलचा हरपलेला फॉर्म...

मग शुभमन गिलला का संधी दिली जात नाही, अशी सोशल मीडियावर होणारी तुफान चर्चा... त्याअगोदर रणजी क्रिकेट स्पर्धेत खोऱ्यानं धावा करणाऱ्या सर्फराज खानऐवजी सूर्यकुमार यादव याला कसोटी संघात देण्यात आलेलं स्थान... त्यावरून ओसंडून जाणारा सोशल मीडिया.... पण या सर्व माहोलात आणि त्यानंतरच्या चर्चेतही यशस्वीची विक्रमी कामगिरी तशी दुर्लक्षितच राहिली.

ज्वाला सिंग हे यशस्वीसाठी जणू दुसरे पालकच. यशस्वीला त्यांनी दत्तक घेतलं आणि तिथूनच स्थैर्य मिळालेला, किंबहुना पुढच्या जेवणाची चिंता मिटलेला यशस्वी क्रिकेटकडे पूर्ण लक्ष देऊ शकला. नुकत्याच झालेल्या इराणी करंडक सामन्यातील द्विशतक आणि शतक अशा खेळामुळेच यशस्वी चर्चेत आला नाही,

तर मुंबई, त्यानंतर भारत अ आणि भारताच्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक संघात केलेल्या कामगिरीने यशस्वीची ओळख भारतीय क्रिकेटला अगोदरच झाली होती. २०२२ मध्ये यश धूल याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वकरंडक जिंकला आणि त्यात प्रभाव पाडणारा यशस्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा प्राधान्याचा खेळाडू झाला.

गतवेळच्या आयपीएलमध्ये सुरुवातीला तो अपयशी ठरला, त्यामुळे काही सामन्यांसाठी वगळण्यात आलं; पण नंतर संधी मिळताच सलामीला जॉस बटलरच्या तोडीस तोड फलंदाजी करून दाखवली.

मुंबई संघात खेळतानाही दुसऱ्या बाजूला पृथ्वी शॉसारखा तडाखेबंद सलामीवीर सहकारी असताना यशस्वीची बॅट प्रखरपणे तळपली. त्याची धावांची भूक शतकावर मर्यादित रहात नाही, ती दीडशतक-द्विशतकाकडे झेपावते. हीच क्षमता त्याच्यासाठी पुढचे दरवाजे उघडू शकते.

गुणवत्ता आणि क्षमता असली की शिखराकडे झेपावण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नसते. घरच्या गरिबीतूनही मार्ग काढत, आव्हानांचे अडथळे पार करत स्वप्नपूर्तीचं लक्ष्य साधणाऱ्या अनेक यशोगाथा आहेत. पण यशस्वीची कहाणी थक्क करणारी आहे. मैदानावरील क्रिकेटच्या टेंटमध्ये रहाणं, खेळता खेळता मैदानावरच पाणीपुरी आणि फळं विकून स्वतःच्या भुकेला शमविण्यासाठी केलेली मेहनत केवळ थक्क करणारी; पण अशा प्रवासात दैवस्वरूप माणसं मिळत असतात.

अशी आहे ‘यशस्वी’ वाटचाल...

 • यशस्वीचा जन्म उत्तर प्रदेशमधला. प्रथम श्रेणी अ दर्जाच्या सामन्यात पदार्पणातच द्विशतक करणारा सर्वांत लहान खेळाडू ठरल्यानंतर भारतीय क्रिकेटच्या नकाशावर त्याची ओळख झाली.

 • यशस्वीचं कुटुंब तसं सर्वसामान्य. वडील भूपेंद्र जयस्वाल यांचं उत्तर प्रदेशमध्ये छोटंसं हार्डवेअरचं दुकान.

 • यशस्वीला लहानपणापासून क्रिकेटची आवड. प्रगती करायची असेल तर मुंबईत जायला हवं याची जाणीव झाल्याने वयाच्या ११ व्या वर्षी मुंबई गाठली.

 • घरात चार मुलं, त्यांचं संगोपन करताना वडिलांची दमछाक, अशा परिस्थितीत एक मुलगा मुंबईला जातोय म्हटल्यावर वडिलांनी त्याला अडवलं नाही.

 • यशस्वीचे काका हीच कुटुंबातील एकमेव व्यक्ती मुंबईत राहणारी; परंतु त्यांचंही घर लहान असल्यामुळे यशस्वीला सामावून घेणं कठीण.

 • अशा परिस्थितीत दूध विक्रेत्याच्या दुकानात यशस्वी मदत करू लागला. यामागचा हेतू हा या दुकानात राहायला मिळण्याचा.

 • मुंबईतील एका शाळेत प्रवेश, सोबत क्रिकेट, अशा आव्हानामुळे सराव केल्यानंतर दमलेला यशस्वी दुकानात मदत करण्याऐवजी थकून झोपायचा, परिणामी दुकानमालकाने बाहेर काढलं.

 • काकांनी आझाद मैदानावरील मुस्लिम युनायटेड क्लबमध्ये खेळण्याबरोबर राहण्याचीही कशीबशी सोय केली.

 • क्लबच्या माळ्यांच्या झोपडीत राहता राहता पोट भरण्यासाठी यशस्वी खेळातून वेळ मिळाल्यावर मैदानावर फळं आणि पाणीपुरी विकायचा.

 • आव्हानात्मक परिस्थितीत क्रिकेटमध्ये कमालीची प्रगती करणाऱ्या यशस्वीवर मुंबईतील स्थानिक प्रशिक्षक ज्वाला सिंग यांची नजर पडली आणि तेथून खऱ्या अर्थाने यशस्वीची यशस्वी वाटचाल सुरू झाली.

 • ज्वाला सिंग यांनी सर्वप्रथम यशस्वीची व्यवस्थित राहण्याची सोय केली. यशस्वीचं जणू काही पालकत्वच त्यांनी घेतलं. त्याला सर्व प्रकारे मदत करून क्रिकेट सरावासाठीही पूर्ण मदत केली.

 • मुंबईतील विख्यात शालेय क्रिकेटच्या हॅरिस शील्ड स्पर्धेत यशस्वीने नाबाद ३१९ धावा आणि ९९ धावांत १३ विकेट अशी कामगिरी केली. शालेय क्रिकेटध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट मिळवून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवल्यानंतर यशस्वीची दखल घेण्यास सुरुवात.

 • यशस्वीने आपला आलेख कमालीचा उंचावत नेला. बघता बघता ५२ शतकं आणि २०० हून अधिक विकेट अशी दिमाखदार कामगिरी.

 • यशस्वीच्या पालकांनी ज्वाला सिंग यांना यशस्वीचे गार्डियन म्हणून अधिकार दिले.

 • यशस्वीला मुंबईच्या १६ वर्षांखालील संघात स्थान मिळालं आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघातही निवड.

 • भारताच्या १९ वर्षांखालील संघातून खेळताना २०१८ मधील आशिया करंडक स्पर्धेतील सामन्यात ८५ धावांची खेळी, त्यामुळे सामन्यात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार.

 • भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाल्यानंतर सरावासाठी बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आलं, तिथे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर त्याचा रूमपार्टनर होता. सराव शिबिर संपल्यानंतर अर्जुनने यशस्वीची सचिनशी भेट घडवली आणि त्याच्या खडतर प्रवासाची माहिती दिली. सचिनने लगेचच स्वाक्षरीची बॅट यशस्वीला भेट दिली.

 • १६ ऑक्टोबर २०१९ रोजी यशस्वीने विजय हजारे १९ वर्षांखाली राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत झारखंडविरुद्ध द्विशतक केलं. अ श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणात द्विशतक करणारा तो सर्वांत लहान खेळाडू ठरला.

क्रिकेटमध्ये नेहमीच मानसिक ताण याबाबत बोललं जातं; परंतु अनेक वर्षं मी दररोज मानसिक ताण सहन करतच वाढलो आहे, त्याचा परिणाम मला मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यास झाला. लहान वयात खेळत असताना धावा करणं आणि विकेट घेणं यापेक्षा मला पुढचं जेवण मिळणार आहे की नाही याचीच चिंता असायची.