"अप्रगल्भ समीक्षका'चे कवितावाचन

गणेश कनाटे
सोमवार, 13 जुलै 2020

गेल्या दोन भागांत कवितेची निर्मितीप्रक्रिया वाचकाने कशी समजून घ्यायची याबद्दल चर्चा करीत आहोत. त्याच अनुषंगाने विचार करीत असताना कवितेची संहिता वाचताना त्यात काय बघावे किंवा त्यात वाचकाला काय दिसू शकते, याचाही थोडा विचार केला पाहिजे.

शब्दकोशात "दाभण' या शब्दाचा अर्थ "मोठी सुई' आणि "सुई' या शब्दाचा अर्थ "लहान दाभण' असा दिला आहे. त्याच धर्तीवर गमतीने असे म्हणावेसे वाटते की "समीक्षक' म्हणजे "प्रगल्भ आणि प्रशिक्षित वाचक' आणि "वाचक' म्हणजे "अप्रगल्भ आणि अप्रशिक्षित समीक्षक.' कारण वाचकाचे कवितावाचन/रसग्रहण ही देखील गंभीर क्रिया आहे आणि समीक्षकाच्या शास्त्रकाट्यालासुध्दा आस्वादाची जोड अभिप्रेत आहेच.

गेल्या दोन भागांत कवितेची निर्मितीप्रक्रिया वाचकाने कशी समजून घ्यायची याबद्दल चर्चा करीत आहोत. त्याच अनुषंगाने विचार करीत असताना कवितेची संहिता वाचताना त्यात काय बघावे किंवा त्यात वाचकाला काय दिसू शकते, याचाही थोडा विचार केला पाहिजे.

कवितेची संहिता वाचताना रसिकाला प्रश्न पडायला हवा की मी या विशिष्ट शब्द समूहाला, या विशिष्ट पद्धतीने लिहिलेल्या रचनेला कविता का म्हणतो; कथा, कादंबरी, लेख इत्यादी का म्हणत नाही? कारण एक शतकापूर्वी पद्यरचनेचे छंद, वृत्त, अलंकार, प्रतिमा, प्रतिक, रुपक, मिथक यांचा वापर करून लिहिलेली रचना हे जे सर्वमान्य स्वरुप होते ते गेल्या शंभर वर्षांत आमुलाग्र बदलून गेले आहे. कर्ता, कर्म आणि क्रियापदाच्या गद्यस्वरुप वापरातूनही काव्यनिर्मिती होऊ शकते. त्या रचनेतही काव्यगुण असू शकतात हे आता कुणी अमान्य करत नाही आणि याची शेकडो उदाहरणे दिली जाऊ शकतात. अगदी कवितेच्या माध्यमातून कथाही सांगितली जाऊ शकते हे अनेक चांगल्या कवींनी त्यांच्या रचनांतून दाखवून दिले आहे. मराठीतले एक उल्लेखनीय कवी गुरुनाथ धुरी यांच्या काही कविता, हिंदीतील प्रख्यात कवी विष्णु खरे यांच्या काही कविता याची साक्ष देतात.

एवढेच नव्हे तर सामान्यतः जिला परंपरेने काव्यभाषा म्हटले जाते तिचा अभाव असलेल्या "अकाव्यात्म' भाषेतही कविता लिहिली जाऊ शकते हे अगदी समकालात कविता लिहिणारे श्रीधर तिळवे, चंप्र देशपांडे, सलील वाघ इत्यादी कवींच्या रचनांतून दाखविले जाऊ शकते. कवितेला विषयांचे तर कुठलेही बंधन नसतेच. ती जशी आत्मशोधाची असते तशीच ती विश्वबोधाचीही असते. ती जशी अत्यंत व्यक्तिगत भावनांची अभिव्यक्ती असते तशीच ती सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटीतांनाही आपल्या कवेत घेते. ती जशी निराश करते तशीच ती क्रांतीचे स्फुल्लिंगही जागृत करते. मग रसिकाला एखादी संहिता वाचत असताना नेमका हे काव्य आहे असा बोध कधी आणि का होतो याबद्दल सजग रसिकाने किंवा वर म्हटल्याप्रमाणे "अप्रगल्भ आणि अप्रशिक्षित समीक्षका'ने विचार करायला हवा, असे वाटते. गेल्या कधी दशकांत याबाबतची सजगता फारच कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे काव्य म्हणजे काय आणि काय म्हणजे काव्य नव्हे याबद्दल प्रचंड गोंधळाची स्तिथी मराठी भाषेच्या सांस्कृतिक पर्यावरणात निर्माण झालेली दिसून येते.

प्राचीन काव्यशास्त्रात आचार्य कुंतक यांनी वक्रोक्ती आणि आचार्य आनंदवर्धन यांनी ध्वनी सिद्धांत मांडले. अर्थातच "रसात्मक वाक्‍य म्हणजे काव्य' ही व्याख्याही आपल्या हाताशी होतीच. ही परंपरा आपण अनेक योग्यायोग्य कारणांसाठी अक्षरशः टाकून दिली. हा मराठी भाषकांच्या हातून घडलेला "गुनाह-ए-अजीम' म्हणजे मोठ्ठा गुन्हा आहे. विसाव्या शतकातील आचार्य काणे, हार्वर्ड विद्यापीठातील संस्कृत विषयाचे प्रोफेसर डॅनियेल इंगॅल्स यांच्या मते तर आचार्य आनंदवर्धन हे काव्यशास्त्राचे किंवा पोएटिक्‍सचे जगातील सगळ्यात महत्त्वाचे भाष्यकार होते. तसेच आचार्य कुन्तक यांनी मांडलेला वक्रोक्तीचा सिद्धांत तर अनेक पाश्‍चात्य परंपरेतील महत्त्वाचे समीक्षक आणि सिद्धांतकार मांडताना दिसतात. उदाहरणार्थ सेमियॉटिक्‍स (चिन्हमीमांसा) चा महत्त्वाचा भाष्यकार, समीक्षक मायकेल रिफातेरी कवितेची व्याख्या करताना त्याच्या "सेमियॉटिक्‍स ऑफ पोएट्री' या ग्रंथाच्या सुरुवातीलाच असे म्हणतो की poetry expresses concepts and things by indirection. ही मांडणी आचार्य कुन्तकाच्या वक्रोक्ती सिद्धांताच्या जवळ जाणारी आहे.

हे सिद्धांत वापरून एखादी रचना कविता आहे किंवा नाही किंवा ते उत्तम काव्य आहे किंवा नाही, हे तपासता येते. परंतु, यासाठी या सैद्धांतिक गोष्टींचे किमान माहितीच्या स्तरावरचे ज्ञान कवीला व रसिकाला दोघांनाही असायलाच हवे. या पार्श्वभूमिवर कविता वाचणाऱ्या रसिकाला काही मुलभूत स्वरुपाचे मानदंड किंवा भालचंद्र नेमाडे ज्यांना प्रमाणकं म्हणतात ती उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे वाटते. ती खालीलप्रमाणे असू शकतील.

1) वाच्य अर्थाच्या पातळीवर न थांबणारी रचना कविता असते मग ती करता, कर्म, क्रियापदाचे गद्य रचनेचे व्याकरणिक नियम पळून लिहिली गेली असली तरी.
2) ध्वनित किंवा व्यंजित अर्थ उपलब्ध करून देणारी रचना कविता असते. तो अर्थ कितीही स्पष्ट किंवा अस्पष्ट किंवा गूढ असला तरी.
3) आपला विषय व आशय वक्र पद्धतीने (indirection) सांगणारी रचना कविता असते.
4) हिंदीत वाईट कवितेचे लक्षण सांगण्यासाठी एक उत्तम शब्द आहे "सपाटबयानी'. (मराठीत याचा प्रतिशब्द सापडला नाही.) "सपाटबयानी' नसलेली रचना कविता असते.
5) तत्वज्ञान या ज्ञानशाखेतील तर्क या संज्ञेस पात्र होईल अशी अभिव्यक्ती नसलेली परंतु, एक विशिष्ट "काव्यतर्क' असलेली रचना कविता असते.

शेवटी आणखी एक गोष्ट अधोरेखित केली पाहिजे ती ही की कविता हा एक रुपबंध असला तरी तो केवळ रुपनिष्ठ नसतो. कवितेच्या रुपनिष्ठ आकलनात संहितेत बाहेरून काहीही येत नाही, संहिता हीच अंतिम ठरते परंतु, कविता ही कला काही निर्वात पोकळीत निर्माण होत नाही. कवितेत वापरलेले शब्द, अलंकार, प्रतिमा, प्रतीकं, रुपकं, मिथकं, आदिबंध हे काहीही स्वयंभू नसतात. त्यांना काहीएक सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय संदर्भ आणि परंपरा असतातच. अगदी निरर्थ भासणाऱ्या शब्दांनाही. म्हणून कवितेचा बोध होत असताना रसिकाने म्हणजेच "अप्रगल्भ आणि अप्रशिक्षित समीक्षकाने' त्या संहितेच्या मागे उभ्या असलेल्या मानवी इतिहासाचा आणि संस्कृतीचा संदर्भ ध्यानात घ्यायला हवा.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Critisisam of poem