धोके दाखवून द्या...

आपल्याकडं मूल जन्माला येत नाही तोच त्याच्या अवतीभवती मोबाईलचा संचार सुरू होतो! ते अगदी तान्हं असतं तेव्हापासून आजूबाजूच्या मोठ्यांच्या हातात ते फोन बघत असतं.
 cyber crime gaming mobile brain hack digital
cyber crime gaming mobile brain hack digitalSakal

- मुक्‍ता चैतन्य

आपल्याकडं मूल जन्माला येत नाही तोच त्याच्या अवतीभवती मोबाईलचा संचार सुरू होतो! ते अगदी तान्हं असतं तेव्हापासून आजूबाजूच्या मोठ्यांच्या हातात ते फोन बघत असतं. फोनशिवाय ते बाळ मोठ्यांना बघतच नाही; त्यामुळं अर्थातच हे अत्यंत महत्त्वाचं काहीतरी ‘प्रकरण’ आहे हे त्याच्या मनात-मेंदूत पक्कं होतं.

शिवाय, अगदी बाल्यावस्थेपासून लहान मुलांना मोठ्यांचे फोन हाताळायला मिळतात; त्यामुळं फोन वापरणं, त्यातली वेगवेगळी फीचर्स एक्स्प्लोअर करणं यांत आपण काहीतरी जगावेगळं करतोय असं मुलांना वाटत नाही.

तंत्रज्ञान कसं वापरायचं हे आजच्या मुलांना शिकवण्याची गरज नसते. त्यांना ते माहीत आहे; पण तंत्रज्ञान वापरत असताना त्याचा योग्य वापर करायचा कसा, त्याचे दुष्परिणाम टाळायचे कसे हे मात्र मुलांना माहीत नाही; कारण, त्याविषयी त्यांना प्रशिक्षित करण्याची कुठलीही व्यवस्था आपल्याकडं नाही. दुष्परिणामांमध्ये सगळ्यात काळजीचा विषय आहे तो मानसिक स्वास्थ्याचा.

नऊ ते १७ या वयोगटांतली १० पैकी सहा मुलं कमीत कमी तीन तास कुठल्या ना कुठल्या सोशल मीडियावर, नाहीतर गेमिंग प्लॅटफॉर्मवर आज आहेत. मुलांचा सरासरी स्क्रीनटाईम सहा तासांपेक्षा जास्त आहे. या सगळ्याचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतच असतो. ही बाब आज मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित आहे.

स्वप्रतिमेचं काय?

मुलं सोशल मीडियावर असतात, अनेकदा अगदी लहान वयापासून असतात. सोशल मीडियावर मुलांना ट्रोल करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. नुकतीच घडलेली घटना याचं उदाहरण म्हणून सांगता येईल.

‘यूपी बोर्डा’च्या दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या उत्तर प्रदेशातल्या प्राची निगमला तिच्या दिसण्यावरून प्रचंड ट्रोल केलं गेलं. कारण काय तर, तिच्या चेहऱ्यावर केस आहेत. मात्र, ट्रोल करताना, आपण एका दहावीतल्या मुलीला ट्रोल करत आहोत, याचं भान नेटकऱ्यांना राहिलं नाही.

परिणामी, ‘मी पहिली आले नसते तर बरं झालं असतं,’ असं प्राचीला वाटून गेलं. तिनं मिळवलेल्या गुणांपेक्षा तिच्या चेहऱ्यावरच्या केसांची चर्चा केली जात असताना, या सगळ्याचा तिच्या मानसिक स्वास्थ्यावर काय आणि कसा परिणाम होईल याचा कुणीही विचार केला नाही.

उज्जैनमधल्या १६ वर्षांच्या मुलानं स्त्रीचं मेकअप् केल्यावर त्याला एवढं ट्रोल केलं गेलं की, त्या मुलानं निराश होऊन आत्महत्या केली. अशी कितीतरी उदाहरण देता येतील. ट्रोल करणारे समवयीन असतातच; पण त्यांच्या कितीतरी पट अधिक प्रौढ मंडळीही त्यात असतात.

ज्यांच्याकडून समजदार-समंजस वर्तनाची अपेक्षा असते तेच ऑनलाईन जगात मुलांना वेठीला धरतात, त्यांना क्रूरपणे ट्रोल करतात, त्यांचा मानसिक, लैंगिक छळ करतात.

मुलांना त्यांच्या दिसण्यावरून, वजनावरून, त्वचेच्या रंगांवरून ट्रोल केलं जातं. यामुळे त्यांच्या स्वप्रतिमेला तडे जाऊ शकतात. ‘मी चांगला दिसत नाही...’,‘मी बारीक नाहीये...’, ‘मी आकर्षक नाहीये...’, ‘मी कुणालाच आवडत नाही’ असे विचार सातत्यानं मनात येत राहतात. पुढच्या आयुष्यात हे सगळं निराशेत परिवर्तित होण्याची प्रचंड शक्यता असू शकते.

गेमिंगचा विळखा

गेमिंगची संपूर्ण बाजारपेठ ‘ग्राहकानं पुनःपुन्हा तो गेम खेळायला यायला हवं’ या तत्त्वावर आधारलेली आहे. त्यामुळं ग्राहकानं परत परत खेळायला यावं यासाठीचे विविध ट्रिगर्स गेम्समध्ये जाणीवपूर्वक पेरलेले असतात.

हे ट्रिगर्स भावनिक असतात, बौद्धिक असतात, स्वप्रतिमेशी संबंधित असतात, जिंकण्याशी संबंधित असतात आणि स्पर्धात्मक प्रेरणा जाग्या ठेवणारेही असतात. असे अनेक ट्रिगर्स - जे ग्राहकानं परत परत खेळायला यावं, खेळताना त्यातच रमून जावं म्हणून पेरलेले असतात - त्यांची माहिती मुलांना असणं आवश्यक असतं.

कारण, गेमिंगच्या बाजाराचा ‘मुलं’ हा महत्त्वाचा आणि प्रमुख ग्राहक आहे. त्यामुळं मुलांनी जास्तीत जास्त वेळ गेमिंग करावं यासाठी जे जे शक्य आहेत आणि आवश्यक आहेत ते ते ट्रिगर्स गेम्समध्ये असतात. त्यातूनच मग गेमिंगचं व्यसन लागण्याची दाट शक्यता असते. या व्यसनातून नैराश्य, एकटेपणा, अस्वस्थता आदी बाबींना सुरुवात होऊ शकते.

गेमिंगमध्ये व्यसन निर्माण करणारे घटक असतात. ही माहिती जर मुलांना मिळाली तर त्यांचं गेमिंगचं प्रमाण कमी होईल की नाही यापेक्षाही ते माहितीपूर्ण निवड करू शकतील आणि माहितीपूर्ण निवड करणं हे डिजिटल-काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे.

पोर्नचा सापळा

मुलांपर्यंत आज पोर्न वेगवेगळ्या माध्यमांतून पोहोचतं आहे. ॲडल्ट कन्टेंटचा बाजार वयात येणाऱ्या आणि त्या टप्प्‍याच्या आधीच्या मुलांनाही लक्ष्य करताना दिसतोय. सोशल मीडिया, गेमिंग प्लॅटफॉर्म्स, निरनिराळे चॅनल्स, ओटीटी प्लॅटफॉर्म्स असा सगळीकडून सॉफ्ट पोर्नचा आणि ॲडल्ट कन्टेंटचा मारा सुरू आहे.

वयानुसार गोष्टी बघणं ही पद्धत आणि विचार या दोन्ही बाबी मागं पडत चालल्या आहेत. याचे निरनिराळे मनोसामाजिक परिणाम आहेत. भारतात ॲडल्ट कन्टेंट बघणारी मुलं अनेकदा, त्यातही लैंगिक छळाचा कन्टेंट अधिक बघतात, असं एक संशोधन सांगतं. हिंसा, लैंगिक कन्टेंट मुलं मोठ्या प्रमाणावर बघत-वाचत असतात.

याचे परिणामही मुलांवर होतातच. स्वतःच्या देहाविषयीच्या आणि दुसऱ्याच्या देहाविषयीच्या चुकीच्या कल्पना विकसित होणं, दुसऱ्याविषयी सन्मान आणि परवानगी (कन्सेंट) याचा विचार न होणं, सतत लैंगिक कन्टेंट बघितल्यामुळे त्याविषयीच्या भावना आणि समज बोथट होत जाणं,

स्त्रीला उपभोग्य वस्तू समजणं, लैंगिक संबंधांविषयीच्या चुकीच्या कल्पना तयार होणं असे अनेक धोके संभवतात. ज्यातून न्यूनगंड, स्वतःच्या भावनांविषयी शंका घेणं, त्यातून नैराश्य आणि इतर मानसिक प्रश्नांची सुरुवात होण्याची दाट शक्यता असू शकते.

डिजिटल-स्पेस मुलांसाठी जितकी उपयोगी तितकी ती घातकही असू शकते हे लक्षात घेतलं पाहिजे. अनेक मुलं सोशल मीडियावर जायला लागल्यानंतर त्यांच्या स्वभावात, वर्तणुकीत बदल होतो असं लक्षात आलं आहे.

अनेक मुलांना सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगमुळे नैराश्याचा आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागतो, अनेक मुलांची स्वप्रतिमा विस्कळित होते, तर इतर अनेकांच्या आयुष्यात सतत काहीतरी ‘हॅपनिंग’ सुरू आहे हे सोशल मीडियावर बघून ‘आपलं आयुष्य अगदीच बेचव आणि बोअर आहे,’ असं अनेक मुलांना वाटतं.

यातून ‘आपल्या जगण्याच्या नेमक्या प्रेरणा काय आहेत?’ असा अगदी मूलभूत प्रश्न मुलं आता विचारू लागली आहेत. डिजिटल-स्पेसनं मुलांच्या भावविश्वात उलथापालथ केली आहे. म्हणूनच, मुलांनी डिजिटल-जगात पाऊल टाकण्यापूर्वी आणि त्यांनी या जगात प्रवेश केल्यावरही मुलांशी सतत या विश्वाविषयी बोलत राहणं आवश्यक आहे.

इथल्या धोक्यांची, होणाऱ्या परिणामांची माहिती त्यांना देणं, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधणं आवश्यक आहे. पालकांबरोबरच समाज म्हणून ही आपल्या सगळ्यांचीही जबाबदारी आहे.

(लेखिका ह्या ‘सायबर-मैत्र’च्या संस्थापक, तसंच सायबर-पत्रकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com