d k soman
d k soman

गणपती तू, 'गुण'पती तू (दा. कृ. सोमण)

गणराय हा बुद्धीचा स्वामी, कलांचा अधिपती. त्याच्या उपासनेनं सुखं वाढतात, दुःखं जातात असं म्हटलं जातं. येत्या गुरुवारी (ता. तेरा) घरोघरी गणरायांचं आगमन होईल. प्रसन्नतेनं, मांगल्यानं वातावरण भारून जाईल. गणरायाचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करताना आजच्या काळात त्याचे कोणते गुण महत्त्वाचे आहेत, ते अंगी कसे बाणवता येतील, मुलांनी-मोठ्यांनी काय आदर्श घ्यावा आदी बाबींचा ऊहापोह.

येत्या गुरुवारी (ता. तेरा) श्रीगणेशाचं आगमन होत आहे. श्रीगणेश हा "महागुरू.' त्याच्यापासून पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. श्रीगणेशाची पूजा यासाठीच करायची असते. त्याची शिकवण आपण विसरून जाऊ नये, यासाठी तो दरवर्षी येत असतो. माझं बालपण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील सागवे-चिंचाडी या गावी गेलं. मला लहानपणच्या वेळची गणपतीविसर्जनाच्या वेळची ती गोष्ट आजही आठवते आहे. विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी गावातल्या सर्व गणेशमूर्ती नदीवर आणल्या जायच्या. तिथं आरती व्हायची आणि गणपतीच्या मूर्तींचं पाण्यात विसर्जन केलं जायचं. आम्ही मुलं त्यावेळी खूप दु:खी व्हायचो. दहा दिवस गणेशोत्सव साजरा करताना जो आनंद असायचा, तो सारा विरून जायचा. गणेशमूर्तींचं विसर्जन झाल्यावर आम्हा सर्व मुलांचे चेहरे रडवेले व्हायचे. रात्री आईला विचारत असू ः ""आत्ता सर्व गणपती काय करत असतील?'' आई सांगायची ः ""सर्व गणपती एकत्र बसून कुणाच्या घरी कोणतं जेवण होतं, घरातली लहान मुलं काय करत होती, ती भांडत होती की अभ्यास करीत होती... याविषयी एकमेकांशी गप्पा मारत असतील. तू गणपतीसमोर चांगला वागलास ना?'' गणपतीसमोर आम्ही मुलं त्याकाळी खरोखरच न भांडता, समंजसपणे वागत होतो. आई पुढं सांगायची ः ""तुम्हा मुलांच्या वागण्यात चांगली प्रगती होते की नाही, हे पहायला गणपती दरवर्षी घरी येत असतो.'' त्यानंतर खरोखरच आम्ही सर्व मुलं गणपतीच्या त्या दिवसांत अगदी गुण्यागोविंदासारखे वागत होतो. आज मोठेपणी गणपतीचं चरित्र अभ्यासताना लक्षात येतं, की गणपतीचं चरित्र खरंच किती आदर्श आहे. आपण त्याची मोठ्या उत्साहात पूजा करतो, उत्सव साजरा करतो; पण त्याच्यापासून काय शिकतो?
आपण गणपतीपासून काय शिकायचं हेच आता बघू या. गणपती हा आपल्या सर्वांचा "महागुरू' आहे. त्याला आपण महागुरू म्हणतो- कारण तो एकदाच शिकवून जात नाही. शिकलेली गोष्ट शिष्य कृतीत आणतो की नाही, हे तो दरवर्षी येऊन तपासतो. गेली हजारो वर्षं त्यासाठी तो येत आहे आणि पुढंही तो येतच राहणार आहे.

गणपतीपासून शिकण्याच्या गोष्टींची आपण उजळणी करूया ः
प्रसन्नता :
गणपतीच्या मूर्तीचं नीट निरीक्षण करा. किती प्रसन्न आणि सुंदर दिसते? सारखं टक लावून पाहावंसं वाटतं. आपणही नेहमी हसतमुख आणि प्रसन्न राहिलं पाहिजे. गणपतीचं मोठं डोकं "अधिक ज्ञान ग्रहण करा,' असा संदेश देत असतं. बारीक सुंदर डोळे "प्रत्येक गोष्टींचं सूक्ष्म निरीक्षण करा,' हे सांगत असतात. गणपतीचे मोठे सुपासारखे कान "सर्वच गोष्टी ऐकून घ्या; परंतु त्या गोष्टी सुपासारख्या पाखडून घ्या,' हे सांगत असतात. गणपतीची लांब सोंड "दूरदृष्टीनं निर्णय घ्या,' हे सांगत असते. सरळ सोंड "सरळ मार्गानं जा,' हेही सांगत असते. गणपतीचे चार हात "जास्तीत जास्त काम करा,' हे सुचवत असतात. गणपतीचं मोठं पोट "इतरांचे अपराध पोटात घेऊन त्यांना क्षमा करा,' हे सांगत असतं. गणपतीचं रूप आपल्याला अशा अनेक गोष्टी दर्शवत असतं.

नेतृत्वगुण : गणपती हा गणांचा अधिपती! त्यानं सर्व गणांचा गट तयार करून त्यांचं नेतृत्व केलं. नेता होण्यासाठी लागणारे सर्व गुण श्रीगणेशापाशी होते. नेत्याला स्वत: नेहमी आदर्श राहावं लागतं. प्रसंगी कठोर, तर प्रसंगी प्रेमळ वागावं लागतं. अचूक निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यापाशी असावी लागते. सेवाभावी वृत्तीही असावी लागते. आपल्या टीममधल्या प्रत्येकाची मनं जिंकून घ्यावी लागतात. वेळप्रसंगी त्यांना मदतही करावी लागते. योग्य मार्गदर्शन करावं लागतं. वेळेचं व्यवस्थापनही करता येणं आवश्‍यक असतं.

विद्यासंपन्नता : गणपती हा चौदा विद्यांचा अधिपती! आपण एक विद्या शिकून त्यामध्ये पारंगत होणं आवश्‍यक आहे. हे युग तीव्र स्पर्धेचं आहे. आपण मागं राहून चालणार नाही. वेळ काढून विद्या संपादन करणं गरजेचं आहे. आपलं ज्ञान हीच आपली ताकद असते. आपणास गोष्टींचं ज्ञान असेल, तर आपण निर्भय बनतो. निर्भयतेमुळं हातून मोठी कामं पार पडतात. आपलं ज्ञान इतरांच्याही उपयोगी पडतं. ज्ञानी माणसांना समाजात मानसन्मान मिळत असतो. मिळवलेले ज्ञान हीच आपली संपत्ती असते. हीच आपली गुंतवणूक असते. आपलं ज्ञान कायमचं आपल्याबरोबर राहतं. त्याची चोरी कुणी करू शकत नाही. श्रीगजाननापासून ही एक गोष्ट जरी आपण शिकलो, तरी आपली नक्कीच प्रगती होऊ शकेल.

कलासंपन्नता : गजानन हा चौसष्ट कलांचा अधिपती आहे. आपणही गायन, वाद्यसंगीत, आकाशनिरीक्षण, वाचन, पक्षीनिरीक्षण, पर्वतारोहण, चित्रकला, शिल्पकला इत्यादींपैकी निदान एक तरी कला शिकली पाहिजे. प्रत्येकाला आवडीचं काम मिळतंच असं नाही. आवडीची कला मात्र जोपासता येते. जीवनात जेव्हा सुखद प्रसंग येतात, तेव्हा शिकलेली कला आपलं सौख्य द्विगुणित करते. जेव्हा दु:खद प्रसंग येतो, तेव्हा शिकलेली कला आपलं दु:ख हलकं करते.

दुष्टांचा नाश : श्रीगजाननानं अनेक दुष्ट राक्षसांचा नाश केला. आपणही श्रीगणेशाचा आदर्श घेऊन आपलं नुकसान करणाऱ्या- आपल्या स्वत:मधलं अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, अनारोग्य, अस्वच्छता, अनैतिकता इत्यादी राक्षसांना- नष्ट केलं पाहिजे.
विघ्नहर्ता : श्रीगणेश हा विघ्नहर्ता आहे. आपणही समाजकार्यात भाग घेऊन इतराची दु:खं, संकटं दूर केली पाहिजेत. सण-उत्सव साजरे करताना थोडी काटकसर करून बचत केली पाहिजे आणि समाजातल्या गरीब- गरजू लोकांना मदत केली पाहिजे.
दु:खहर्ता : गणपती हा दु:खहर्ता आहे. तो भक्तांची दु:खं दूर करतो. आपणही समाजातल्या गरिबांना मदत करून त्यांची दु:खं दूर करू शकतो. भारतीय सण-उत्सवांमध्ये दानाचं विशेष महत्त्व आहे. दान म्हणजे "डोनेशन' नव्हे. "डोनेशन' देणाऱ्याचं नाव व "डोनेशन' काय दिलं, ते जाहीर केलं जातं. दान हे गुप्त ठेवायचं असतं. एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या हातालाही कळता कामा नये. दुसऱ्यांचं दु:ख दूर करण्याएवढं दुसरं पुण्य नाही.

सुखकर्ता : गणपती हा सुखकर्ता आहे. इतरांना आपल्या कृतीमुळं सुख मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमी करायला हवा.

पर्यावरणरक्षक : गणपती हा पर्यावरणरक्षक होता. औषधी वनस्पती त्याला प्रिय होत्या. निसर्ग त्याला प्रिय होता. आपणही पर्यावरणरक्षणाकडं लक्ष द्यायला पाहिजे. गणेशाचा उत्सव साजरा करत असताना जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

मातृ-पितृभक्त : गणपती हा मातृ-पितृभक्त होता. पार्वतीनं जेव्हा सिद्धी प्राप्त करून येण्यास सांगितलं, त्यावेळी स्कंद मोरावर बसून तीर्थयात्रा करायला निघाला. गणपतीनं आपल्या आई-वडिलांची पूजा करून त्यांना प्रदक्षिणा घातली. पार्वतीनं गणपतीचे अभिनंदन करून त्याला अमृताचा मोदक दिला; तसंच अग्रपूजेचा मान दिला जाईल, असा वर दिला. आपणही आपल्या आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. त्यांना सुख दिलं पाहिजे.

चातुर्य : गणपतीचं चातुर्य विशेष दिसून येतं. माता-पित्याची पूजा करून त्यांना प्रदक्षिणा घालणं आणि महर्षी व्यासांना महाभारत लिहिताना अट घालणं यांतून गणपतीचं विशेष कौशल्य दिसून येतं. अनलासूर वगैरे राक्षसांना मारताना त्यानं कौशल्याचा वापर केल्याचं दिसून येतं. चातुर्य कठीणप्रसंगी कसं वापरायचं हे आपण त्यातून शिकू शकतो.

आपण गणेशाची पूजा आपल्यात चांगला बदल व्हावा यासाठी करत असतो; परंतु केवळ गणेशपूजनानं आपल्यात चांगला बदल होणार नाही, दु:ख दूर जाऊन सौख्य प्राप्त होणार नाही. त्यासाठी आपल्या स्वत:लाच प्रयत्न करावे लागतील. गणेशपूजन करताना गणेशाचा आदर्श आपण आपल्यासमोर ठेवायला हवा. त्याचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी प्रयत्न करावयास हवेत. मुलं जेव्हा "गणेशपूजा का करायची,' असं पालकांना विचारतात, तेव्हा त्यांना "श्रीगणेशाचे हे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी! म्हणूनच श्रीगणेशाचा आदर्श ठेवा,' असं उत्तर द्यायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com