दगडांच्या देशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dagdanchya Desha by K C Pande Nashik News

दगडांच्या देशा

लेखक : के. सी. पांडे

प्रत्येक मनुष्य जन्माला येतो, आणि स्वतःच्या परीने आपले जीवन जगतो. पण आपण निरीक्षण केले असता, आपल्या लक्षात येईल की, इतिहास हा जन्माला आलेल्या प्रत्येकाची आठवण ठेवत नाही. तो फक्त त्यांचीच आठवण ठेवतो, जे सर्व जगापेक्षा काही वेगळं करतात. जीवनात त्यांनाच यश आणि सुखाची प्राप्ती होऊ शकते. यश हे नशिबाने मिळत नाही. निश्चित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी सतत वाटचाल म्हणजे यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवे आहे ते मिळणे म्हणजे यश आणि जे मिळालं आहे, त्यात गोड वाटणं म्हणजे सुख होय. मी हे सांगण्याचे कारण म्हणजे मी हे सगळे टप्पे अनुभवले आहेत, ते क्षण मी जगलो आहे, अजूनही मी याच सुत्रावर अखंडपणे चालत आहे.

गारगोटीमुळे देशात आणि परदेशात मला ओळखत मिळालीच होती. पण असं म्हणतात, की जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागते, हे खरे आहे. माझा दगडांच्या दुनियेतील हा प्रवास कठोर कष्टाचा आणि अत्यंत संघर्षमय होता. गारगोटी संकलन करत असताना हजारो किलोमीटर मला प्रवास करावा लागला. अतिदुर्गम भागात त्यावेळी वाहतुकीची फारशी सुविधा उपलब्ध नव्हती. तरीही दिवस-रात्र ज्या-ज्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे, ती जागा शोधणे, तेथील सर्व घटकांशी व्यवस्थितरीत्या संवाद साधून त्यांच्याकडून काम करुन घेणे. अशा अनेक तारेवरच्या कसरती मला एकाच वेळी कराव्या लागल्या. गारगोटी संग्रहालयाचे उद्घाटन हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले पाहिजे, अशी मनीषा मी मनाशी बाळगून होतो.

हेही वाचा: आर्य चाणक्य : भारतीय राज्यशास्त्राचा जनक

त्यादृष्टीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली. अल्पावधीत गारगोटीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात देखील माझी वेगळी ओळख निर्माण झाली होती. मी असे काहीतरी वेगळेपण जपले आणि अस्तित्त्वात आणले, जे अन्य कोणालाही माहीत नव्हते. गारगोटी मी सर्व समाजाच्या निदर्शनास आणून दिली. गारगोटीचे महत्त्व दाखविले. त्यामुळे समाजातील तसेच नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशभरात सर्वच घटकातील सर्वसामान्यांपासून विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांच्या मनात गारगोटी आणि के. सी. पांडे असे समीकरण तयार झाले. माझे परमस्नेही तथा मित्र सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यासमवेत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना आमंत्रण देण्याचे ठरले. त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील शिवसेना (Shivsena) पक्षाचे इतर आमदारही माझ्याबरोबर गारगोटी संग्रहालयाच्या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर बरोबर आले तर बरे होईल, अशी इच्छा व्यक्त केली. यासाठी आम्ही प्रयत्न केले. प्रयत्न जर प्रामाणिक असेल तर आपणास निश्चितच यश मिळते. आपल्या बाजूने सकारात्मक बाबी घडू लागतात, याची मला पूर्ण खात्री होती.

हेही वाचा: ग्रीष्माचे अवतरण

त्यावेळचे तत्कालीन आमदार कल्याणराव पाटील (येवला), मंदाकिनी कदम (निफाड), पांडुरंग गांगड (इगतपुरी) हे तिन्ही लोकप्रतिनिधी व आमदार कोकाटे यांच्यासमवेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट मिळावी, यासाठी प्रयत्न केले. अगदी अल्प कालावधीतच मातोश्रीहून आम्हाला भेटीची वेळ कळवण्यात आली. ही माझ्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांपैकी एक आहे, असे मी मानतो. चार आमदार व मी एकत्र येणे ही काही सोपी गोष्ट नव्हे. प्रत्येकाचे जिल्ह्यातील वेगवेगळे मतदार संघ, नाशिक शहरापासून त्यांचे असलेले दूर अंतर, त्यांचा रोजचा असणारा दिनक्रम. त्यात मातोश्रीची वेळ मिळणे, माझे ठरलेले परदेशातील दौरे या सर्वांचा योगायोग साधून येणे, हे एक कठीण काम होते. पण ईश्वर कृपा म्हणा किंवा माझे नशीब म्हणा. अत्यंत कमी कालावधीत मी व चारही आमदार एकत्र येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईला मार्गस्थ झालो. माझ्या संघर्षमय आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचा साक्षीदार होण्यासाठी आम्ही सर्व निघालो होतो. एक मोठी घटना साकारण्यासाठी सृष्टी जणू मला सहाय्य करत होती...

(लेखक सिन्नरस्थित गारगोटी या आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)

हेही वाचा: परीक्षा जवळ असते की लांब?

Web Title: Dagdanchya Desha By K C Pande Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top