
प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
एखादा पदार्थ असा असतो ज्यावरून संपूर्ण समाजाची खाद्यसंस्कृती उलगडते. तो पदार्थ बनवण्याच्या पद्धतीवरून लोकांचे स्वभाव आणि सवयी लक्षात येतात. असाच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे दाल पकवान. या पदार्थाच्या नावावरून तो कोणत्या समुदायाशी निगडित आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता भासत नाही. दाल पकवानमध्ये नावाप्रमाणेच दोन पदार्थ आहेत आणि दोन्ही पदार्थ एकमेकांना पूरक आहेत. तेलात तळलेले कुरकुरीत पकवान आणि भिजवून-शिजवून तडका दिलेली चमचमीत डाळ. याच्या साथीला अनेकदा पुदिन्याची चटणी आणि बारीक चिरलेला कांदा. दिवसाच्या कुठल्याही वेळी हा पदार्थ खाल्लात तरी पुढील कमीत कमी चार-पाच तास काहीही खाण्याची आवश्यकता भासत नाही.