दापोली - कोकणातलं हिल स्टेशन

Dapoli
Dapoli

वीकएंड पर्यटन
कोकणातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं, असा प्रश्न कोणी विचारल्यास सहजपणे दापोलीचं नाव सांगितलं जातं. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० फूट उंचीवर वसलेल्या दापोलीतलं हवामान आल्हाददायक असतं. म्हणूनच उन्हाळ्यात इथं पर्यटकांची गर्दी असते. याच कारणामुळे दापोलीला ‘मिनी महाबळेश्‍वर’ असं सार्थ नाव मिळालंय. दापोली ते आंजर्ले या सुमारे २६ किलोमीटरच्या रस्त्यावर मुरुड, हर्णे आणि आंजर्ले किनारे आहेत. मुरुडपासून डावीकडे वळाल्यास करदे बीचवर जाता येतं. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामुळंही दापोलीचं नाव जागतिक स्तरावर पोचलं आहे. 

कोकणातलं थंड हवेचं ठिकाण, या व्यतिरिक्त दापोलीची ओळख प्रसिद्ध प्राचीन आणि ऐतिहासिक ठेव्यांमुळंही जगभर पसरलेली आहे. पन्हाळे काझी इथल्या लेण्या, उन्हवरेतलं गरम पाण्याचं कुंड, दाभोळची खाडी, हर्णेजवळचा सुवर्णदुर्ग आणि त्याच्या रक्षणासाठी बांधलेले कनकदुर्ग, फतेदुर्ग आणि गोवा किल्ला, मुरुडचं दुर्गादेवी मंदिर, दापोलीजवळचं केशवराज मंदिर, चंडिका मंदिर आदी मंदिरं आवर्जून भेट देण्यासारखी आहेत. मुरुडचा समुद्र किनारा दापोलीपासून सुमारे १२ ते १३ किलोमीटरवर आहे. किनाऱ्याजवळच दुर्गादेवीचं प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराचं छत पिरॅमिडच्या आकाराचं आहे.

सभागृहात कलाकुसर असलेले २८ स्तंभ आहेत. गाभाऱ्यात दुर्गादेवीची मूर्ती आहे. मंदिरात मराठीमध्ये लिहिलेला एक शिलालेखही आहे. प्रवेशद्वारातच पोर्तुगीज बनावटीची एक प्रचंड पितळी घंटा आहे. मुरुडच्या किनाऱ्यावर डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटकांची पावसाळ्याव्यतिरिक्त इतर ऋतूंमध्ये गर्दी असते. हिवाळ्यात या किनाऱ्यावर स्थलांतरित पाणपक्ष्यांची मोठी गर्दी असते.

दापोलीपासून सुमारे ३० किलोमीटरवरील पन्हाळे काझी इथं लेण्या आहेत. या लेण्या गाणपत्य आणि नाथ संप्रदायातील आहेत. लेण्या आणि शिल्प असलेल्या २९ गुंफा आहेत. या लेण्या बौद्ध आणि हिंदू पद्धतीच्या आहेत.

लेण्यांच्या वरच्या भागात कदंब राजांनी बाराव्या शतकात बांधलेला प्रणालक किल्ला आहे. पन्हाळे काझीजवळच उन्हवऱ्यात गरम पाण्याचे कुंड आहेत. दापोली-गुहागर रस्त्यावर सुमारे ३० किलोमीटरवर चंडिका देवीचं मंदिर आहे. पाचूसारख्या हिरव्यागार कोंदणात डोंगरातील शिळांमध्ये कोरीव काम करून हे मंदिर बांधण्यात आलं आहे. 

हर्णे गावात प्रवेश करताच लक्ष वेधून घेतं ते भव्य कृष्ण मंदिर. कदंब राजांच्या काळात बांधलेलं मूळ मंदिर काळाच्या ओघात नष्ट झाल्यानंतर हर्णेच्या ग्रामस्थांनी वर्गणी काढून हे भव्य मंदिर उभारलंय. हर्णे बंधरापासून सुमारे एक किलोमीटरवर भर समुद्रातल्या सुमारे आठ एकर खडकावर सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग बांधण्यात आला आहे. या १५ बुरूज असलेल्या जलदुर्गाची तटबंदी आजही मजबूत आहे. हा जलदुर्ग १६६०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतला. 

या किनाऱ्यावरच पुढं आंजर्ले हे कड्यावर वसलेलं गाव लागतं. या गावातलं गणेश मंदिर, कड्यावरचा गणपती या नावानं प्रसिद्ध आहे. हे मूळ मंदिर ११५० मध्ये बांधण्यात आल्याचं सांगितलं जातं. दापोलीजवळच आसूद गावाजवळच्या एका टेकडीवर केशवराज मंदिर आहे. या सुमारे एक हजार वर्षांपूर्वीच्या विष्णू मंदिरात जाणारी वाट नारळी-पोफळीच्या बनातून जाते. मंदिराच्या आवारात एका डोंगरातून बारमाही झरा वाहत असतो.
केशवराज मंदिरापासून अवघ्या २-३ किलोमीटरवर वाघेश्‍वराचं हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराच्या सभागृहात लाकडी खांब असून, त्यांवर पुराणातील प्रसंग कोरले आहेत. गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे. 

कसे जाल? ः पुण्याहून पौड-ताम्हिणी घाट-माणगावमार्गे सुमारे १८२ किलोमीटर. दुसरा मार्ग भोर-वरंध घाटमार्गे आणि तिसरा मार्ग महाबळेश्‍वर-आंबेनळी घाट-पोलादपूर-खेडमार्गे. मुंबईहून सुमारे २३० किलोमीटर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com