डेटाचोरीचा ‘ब्लू व्हेल गेम’

डेटाचोरीचा ‘ब्लू व्हेल गेम’

‘ईएसडीएस’ या नाशिकमध्ये मुख्यालय असलेल्या आयटी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राजीव पापनेजा काही महिन्यांपूर्वी एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सांगत होते, ‘‘डेटा इज मोअर इम्पॉर्टन्ट दॅन बेटा.’’ बाहेर जाताना तुम्ही एकवेळ तुमच्या मुलाला काही वेळेसाठी इतरांकडे सोपवाल; परंतु तुमचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, आयपॅड, टॅब वगैरे कधीही इतरांच्या हातात देणार नाही. कारण त्यात तुमचा वैयक्‍तिक डेटा, तुमच्या ऑनलाइन बिहेवियरचे तपशील असतात. ‘फेसबुक’नं क्विझ, ॲपच्या माध्यमातून गोळा केलेला पाच कोटी लोकांचा डेटा व्यावसायिक वापरासाठी ‘केंब्रिज ॲनालिटिका’ नावाच्या कंपनीला दिल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर जगभर जो भूकंप झालाय, तो पाहता बेटापेक्षा डेटा महत्त्वाचा असल्याची बाब सिद्धच झाली जणू! भारतात त्या भूकंपाचे हादरे, आफ्टरशॉक्‍स बसले. भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमध्ये रणकंदन सुरू आहे. राहुल गांधींनी ‘नरेंद्र मोदी ॲप’वर आरोप केले, तर काँग्रेसनेच ‘केंब्रिज ॲनालिटिका’ची सेवा घेतल्याची माहिती या भानगडी उघड करणाऱ्या ख्रिस्तोफर वायली यानेच जाहीर केली. 

हे अपेक्षितच होतं. कारण भारत हे पाश्‍चात्त्यांसाठी जगातले सर्वांत मोठे ऑनलाइन मार्केट आहे. भारतापेक्षा चीनची लोकसंख्या अधिक असली, तरी त्या देशाने पश्‍चिमेकडून येणारी ऑनलाइन व्यवस्था सीमेवरच रोखून धरलीय. व्हर्च्युअल पोलादी भिंतीच्या रूपाने ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘गुगल’ला प्रवेश नाकारलाय. ‘वुईचॅट’ हा चीनचा स्वतःचा सर्वाधिक लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्म आहे, तर ‘वायबो’ हा ‘ट्‌विटर’चा, ‘टोऊडोऊ युकू’ हा ‘यूट्यूब’चा, ‘बायडू तायबा’ हा गुगल सर्च इंजिनचा, ‘मैपेई’ हा ‘इन्स्टाग्राम’चा चायनीज अवतार आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येएवढे, म्हणजे एक अब्ज ३० कोटी स्मार्टफोन चीनमध्ये आहेत. ५३ कोटी स्मार्टफोनचा भारत दुसऱ्या, तर २२ कोटी ९० लाख स्मार्टफोनसह अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या जूनपर्यंत इंटरनेट वापरणाऱ्या भारतीयांची संख्या ५० कोटींवर पोचेल. गेल्या डिसेंबरमध्ये ती ४८.१ कोटी होती. गेल्या वर्षी हे प्रमाण ११.३४ टक्‍क्‍यांनी वाढले. ४५.५ कोटी शहरी भारतीयांपैकी २९.५ कोटी इंटरनेट वापरतात. ९१.८ कोटींपैकी १८.६ कोटी इंटरनेट यूझर्सचा ग्रामीण भाग मात्र पिछाडीवर आहे. 

जगभरातल्या जवळपास दोनशे निवडणुकांची कामं ‘केंब्रिज ॲनालिटिका’ व तिच्या देशोदेशीच्या फ्रॅंचाइझींनी केल्याचं उघड झालंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक रशियाचा हस्तक्षेप व ‘फेसबुक’च्या डेटाचोरीमुळं वादात अडकलीय. युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडण्याच्या, ‘ब्रेक्‍झिट’च्या प्रक्रियेत कंपनी होती. ख्रिस्तोफर वायलीच्या आरोपांचा धागा पकडून इंग्लंडमधल्या ‘चॅनेल फोर’नं स्टिंग ऑपरेशन केलं. ‘केंब्रिज ॲनालिटिका’चा ‘सीईओ’ ॲलेक्‍झांडर निक्‍स याने दिलेल्या कबुलीत, राजकीय पक्षांसाठी काम करताना कंपनी पैसा वापरते, लाच देते, मुली पुरवते, विरोधकांना ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवते वगैरे गौप्यस्फोट केला. त्या बातम्यांनी जग हादरलं.

चौकशी सुरू
 ब्रिटिश संसदेने या प्रकरणाची खासदारांच्या विशेष समितीमार्फत चौकशी सुरू केलीय. ख्रिस्तोफर वायलीने त्या समितीपुढं दिलेल्या जबानीत ‘केंब्रिज ॲनालिटिका’, तसेच कॅनडामधील ‘ॲग्रिगेट आयक्‍यू’ कंपनीने जगभर कुणाकुणाला व कोणकोणत्या सेवा दिल्या, त्याचे तपशील दिले. अमेरिकेतही मार्क झुकेरबर्ग, सुंदर पिचई व जॅक डोर्स या अनुक्रमे ‘फेसबुक’, ‘गुगल’ व ‘ट्‌विटर’च्या ‘सीईओं’ना चौकशीसाठी पाचारण करण्यात आलंय. 

वायली म्हणतो, हा सगळा प्रकार म्हणजे आधुनिक जगातला नवा वसाहतवाद आहे. अर्थात, दीडशे वर्षं अशी वसाहत राहिलेल्या भारताचा उल्लेख अपरिहार्य आहे. वायलीच्या शब्दांत, भारत हा इतका मोठा देश आहे, की इथलं एकेक राज्य ब्रिटनपेक्षा मोठं ठरावं. त्यात या महाकाय देशात कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात सतत निवडणुका होत असतात. अर्थात, ‘केंब्रिज ॲनालिटिका’ किंवा तिची भारतीय फ्रॅंचाइझी ‘ओवलेनो बिझनेस इंटेलिजन्स’ म्हणजे ‘ओबीआय’सारख्या पीआर कंपन्यांना मोठं मार्केट उपलब्ध होत असतं. इतक्‍या मोठ्या कंपन्याच कशाला हव्यात! आपल्याकडे अलीकडं अगदी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका निवडणुकीतही पीआर कंपन्यांना भरपूर कामं असतात. वरवर ही कामं, मतदारांशी बोलून त्यांची राजकीय मतं पक्षांना कळवायची अन्‌ पक्षांचा अजेंडा मतदारांपर्यंत पोचवायचा, या स्वरूपाची दिसत असली, तरी खरं काम त्यापलीकडं आहे. पोलिस जसं आवाहन करतात ना, की बाहेरगावी किंवा सहलीला गेलात, तर जाण्याआधी व तिथं पोचल्यावर फोटो वगैरे सोशल मीडियावर टाकू नका. त्यामुळे तुम्ही घरी नाहीत, हे चोरट्यांना समजतं व ते घर ‘साफ’ करतात. 

थोडक्‍यात, तुमचा सगळा ऑनलाइन वावर, वापर, व्यवहार, सामाजिक व राजकीय कल ‘फेसबुक’ किंवा अन्य माध्यमातून संबंधितांना कळतो. त्याआधारे तुमच्यावर भावनिक, मानसिक प्रयोग केले जातात. ब्रेनवॉशिंग होतं. मेल, पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला रस असलेल्या गोष्टींचा मारा केला जातो. खोटी गोष्टही अनेकदा सांगितली, की खरी वाटायला लागते. तुमची मतं बदलू लागतात. केवळ तुमचं ऑनलाइन बिहेवियर जाणून घेण्यापुरतं हे मर्यादित नाही. ती वर्तणूक काय असायला हवी, तुम्ही कुणाच्या बाजूने उभं राहायला हवं, हे ठरविण्याचे हे प्रयोग आहेत. काही महिन्यांपूर्वी आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ‘ब्लू व्हेल गेम’सारखा हा प्रकार आहे. म्हणून प्रत्येकाने बेटा जपतो, तसा आता डेटा जपायची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com