अंतर्मुख करणारं ‘ललित चिंतन’

आजकाल होतं काय, एखादी व्यक्ती, तिचं हटके वागणं, एखादी अघटित घटना, त्यामुळं आपण काही क्षण अस्वस्थ किंवा पुलकित होतो.
Gandh Antaricha
Gandh AntarichaSakal

हलकंफुलकं, पण नुसताच टाइमपास नव्हे. वैचारिक, पण वाचकांना हमखास जांभई द्यावयास लावणारं नव्हे. निबंधाचा जसा नुसता निबंध, लघुनिबंध, ललित निबंध असा प्रवास झालाय, त्याप्रमाणे हे आहे ललित चिंतन. भानू काळे हे आजचे मराठीतील आघाडीचे लेखक. कादंबरी, चरित्रलेखन, प्रवास वर्णन, शोधपत्रकारिता असे अनेक लेखन प्रकार त्यांनी सहजपणे हातावेगळे केलेत. पण झालंय काय, अंतर्नादचं मराठी साहित्यातील योगदान एवढं मोठं आहे, की आपण त्यांना अंतर्नादचे संपादक किंवा सर्वेसर्वा म्हणूनच ओळखतो. त्यांनी सहजपणे आणि समर्थपणे हाताळलेले साहित्यप्रकार तसे विसरून जातो. पण, या पुस्तकाबाबत तसं करता येणार नाही. हे आहे ‘ललित चिंतन’, मराठी साहित्यातील एक नवा, हवाहवासा वाटणारा प्रवाह.

आजकाल होतं काय, एखादी व्यक्ती, तिचं हटके वागणं, एखादी अघटित घटना, त्यामुळं आपण काही क्षण अस्वस्थ किंवा पुलकित होतो. नंतर काही काळानं, खरंतर काही क्षणांत त्या घटना, त्या व्यक्ती आपल्या मनातून नकळत हद्दपार करून आपली रुळलेली आणि मळलेली पाऊलवाट आपण पुन्हा चालायला लागतो. मात्र, अशावेळी लेखक अस्वस्थ होऊन चिंतनात मग्न होतो. ‘वेद झाला वेदनेचा’ असं काही होतं. साध्या, सोप्या, सरळ, प्रवाही शब्दांत लेखकाचं चिंतन आपल्यासमोर येतं आणि हे पुस्तक वाचल्यावर ‘काढुनी चष्मा डोळ्यांवरचा, स्वत:स आपण पुन्हा पहावे,’ हे आपल्या लक्षात येतं.

या पुस्तकात आहेत, अशा ४४ छोट्या-मोठ्या घटना आणि व्यक्ती. आज आपण ‘ग्लोबल व्हिलेज’मध्ये आहोत. सारं जग एकमेकांत गुंतलेलं एक छोटं खेडं बनलंय. त्यामुळं व्यक्ती आणि घटना निवडताना खेडं, गाव, शहर, देश, परदेश असा आपपर भाव नाही. छोट्या घटनेत फार मोठा आशय दडलेला असतो आणि फार मोठ्या घटना, आंदोलनं, संघटना यांचे पाय शेवटी मातीचेच असतात. ‘मानवाचे अंती गोत्र एक’ हे सारं हसतखेळत सहजपणे समजावून देत प्रत्येक प्रकरण पुढं जातं. आपण सहजपणे वाचत जातो आणि प्रत्येक प्रकरण वाचल्यावर आपण अस्वस्थ होऊन विचार करतो, नकळत अधिक समंजस होतो.

प्रत्येक प्रकरण महत्त्वाचं आहे; पण मला अधिक अस्वस्थ करणारी सात प्रकरणं आहेत. ''वाचन संस्कृती आणि शहामृग'', ''विनी मंडेला शमू न शकलेली एक आग'', ''गोरी गोरी पान'', ''खार आणि हनुमान'', ''मुनाफची बिर्याणी'', ''चंदूभाईची फिलॉसफी'', ''मोबाईल आणि लेखणी''. अर्थात, ही माझी निवड आहे. अर्थात हा ‘साबुदाण्यामाजी काळे गोरे’ असा प्रकार आहे. प्रत्येक वाचकाची निवड वेगळी असणार. मात्र, प्रत्येक प्रकरणाचं शीर्षक हे असं वाचकांच्या मनात कुतुहल निर्माण करणारं आहे. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, या ४४ लेखांपैकी बहुतेक लेख दीड-दोन पानांत संपतात. फापटपसारा न करता किमान शब्दांत, मोजकं आणि नेमकं कसं सांगावं, याचा हा वस्तुपाठ आहे. आणि या दीड-दोन पानांत अस्वस्थ करणारं, आपणाला विचाराला प्रवृत्त करणारं चिंतन असतं आणि एखादं नवं सुभाषित असतं. एक उदाहरण घेऊया. पंढरपूरची वारी आपणा सर्वांच्या परिचयाची आहे. त्याची बेरीज आणि वजाबाकी यावर अनेकजण अनेकदा चर्चा करतात. मात्र, ही सहजसोपी चर्चा झाल्यावर लेखक लिहितो, ‘पंढरपूरबद्दल आपली मतं काही असोत, आपल्याला हे सर्व आवडो वा न आवडो, एक गोष्ट मात्र नक्की, इथं भलंबुरं जे काही आहे, तेच शेवटी भारताचं वास्तव रूप आहे, हाच आपला देश आहे, हेच ‘आपले’ आहे. एखाद्या माणसाला आपलं मानलं, की त्याच्या सर्व गुणदोषांसह त्याला स्वीकारावं लागतं. समाजाचं आणि देशाचंही तसंच असावं.’

साध्या साध्या गोष्टींच्या आणि घटनांच्या मध्ये फार मोठा आशय दडलेला असतो. आपल्या देशातील टोकाची जडणघडण, प्रवृत्ती, प्रकृती, संस्कृती आणि विकृतीही दोन लेखांमधून आपल्यासमोर येते. पहिला लेख हा ‘अप्रामाणिकपणा कुठून येतो?’ हा लेख एका बातमीवर आधारित आहे. १७ साली सर्व वृत्तपत्रांत एक वाचनीय बातमी होती. रत्नागिरीतील एक शेतकरी टेंपोत भरून आपले आंबे नाशिकला पाठवत होता. वाटेवर भर गावात टेंपो उलटला. ड्रायव्हर, क्लीनर जखमी होऊन रस्त्यावर. आंब्याच्या पेट्या फुटून आंबे रस्त्यावर पसरलेले. ड्रायव्हर, क्लीनर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले. लोकांची गर्दी आंबे पळविण्यात गुंतलेली. लेखकाचं मुक्त चिंतन अनेक अंगानं पुढं जातं. जगातल्या अनेक विचारवंतांनी जे सांगितलंय, ‘भारत अजून एक देश बनलेला नाही. स्वत:चं घर आणि परिवार या पलीकडं या देशात एकसंधपणा नाही.’ या ठिकाणी लेखक येऊन थांबतो आणि ‘दूधवाला, कचरेवाला, पेपरवाला’ या लेखात लेखक आपल्या लक्षात आणून देतो तीन नगण्य माणसं. मात्र, ती तीन माणसं नसतील, तर आपला दिवस सुरू होऊ शकणार नाही. या तिघांनाही नगण्य अपमानित वाटावं असं वेतन मिळतं. समाजात मान नसतो. मग ही तीन माणसं एकही खाडा न करता हे व्रत का सांभाळतात?- या देशातील संस्कृतीचे आणि विकृतीचे आपल्याला कळलेले आणि नकळलेले धागे कोणते?’

दीड-दोन पानांच्या छोट्या लेखांबरोबरच तीन-चार मोठे लेख आहेत. मोठे म्हणजे, सात-आठ पानांचे! त्यातील दोन मला अधिक महत्त्वाचे वाटतात. त्यातील एक ‘विनी मंडेला शमू न शकलेली आग’. असाच दुसरा लेख आहे ‘हर हर नर्मदे’. माणसांच्या आयुष्याप्रमाणेच माणसांनी सारं आयुष्य उधळून जीवाच्या करारानं भोवतालच्या समाजाचं भलं व्हावं म्हणून उभारलेल्या चळवळींचं प्राक्तनही आपल्यादृष्टीनं असंच अनाकलनीय आहे, ही गोष्ट हा लेख आपणाला समजावून देतो. मानवी जीवन, आंदोलनं, चळवळी यांतील अंगोरे कंगोरे सहजपणे सांगत हे पुस्तक पुढं जातं. असो! पुस्तकाचं मुखपृष्ठ अप्रतिम आहे; मनमोहक रंगांची उधळण करणारं. अप्रतिम- अंतर्नाद बंद केल्यावर (किंवा पडल्यावर?) भानू काळे यांचं हे चौथं पुस्तक सांस्कृतिक समृद्धीसाठीची माझी वाटचाल अंतर्नाद बंद पडले तरी अजून अथकपणे सुरू आहे म्हणून सांगणारं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com