प्रिय इंग्लंड देशा...

प्रिय इंग्लंड देशा, तुझ्या मागच्या नि आजच्या कित्येक गोष्टींचा तीळभरही अभिमान माझ्या मनी नाही! तुझ्याविषयी असलेली चीड धरून मी इथं पहिलं पाऊल ठेवलं...
Dear England...
Dear England...sakal
Updated on

आंग्लभ्रमण

वैभव वाळुंज

प्रिय इंग्लंड देशा, तुझ्या मागच्या नि आजच्या कित्येक गोष्टींचा तीळभरही अभिमान माझ्या मनी नाही! तुझ्याविषयी असलेली चीड धरून मी इथं पहिलं पाऊल ठेवलं...

इंग्लंड देशा, गेलं वर्षभर तुझी आख्यानं मी माझ्या भाषेतल्या लोकांना ऐकवली. एवढे पोवाडे गाऊनही तुला प्रिय म्हणणं कसंसंच वाटलं म्हणून गीतकार गुलजार यांच्या ओळींवाटे बोलू धजलो. तुझ्या भल्या-बुऱ्या गुण-अवगुणांचं कौतुक लोकांना सांगून आता मी थकलो आहे. आता हे शेवटचं पान लिहिताना तुझ्याशीच बोलावं हे निमित्त समज किंवा आपल्या अजब नात्याची वीण म्हण...

  • या कशा वयात भेटली आहेस मला प्रिये,

  • मी तुझं बीज मनाच्या कुशीत रुजवू पाहतो;

  • पण कुणाच्या वाट्याची माती ढळत नाही,

  • इतर नात्यांच्या वाट्याची पानं हलत नाहीत,

  • माझ्या नात्यांची रोपं कुणाला जागा देत नाहीत...

  • माझ्या आजोळाला गुलाम करणाऱ्या प्रिय देशा,

ज्योती-सावित्रीबाईंचं ऐकून इंग्रजीला आई म्हणालो आणि तुझ्याशी गाठ पडली. तुकारामांसोबत शेक्सपियर अभंगाला धरला आणि तुझ्या खाडीत टाळ कुटायला आलो. कुठ-कुठून आलेल्या आणि तुझ्या भूमीवर माझ्यासाठी घर बनवलेल्या बाबासाहेब, मार्क्स आणि ॲडम स्मिथशी ओळख नसती तर मी तुझ्याशी बोललोही नसतो. स्कॉटिश पबात किंवा केल्टीक गाण्यांच्या तालावर नाचत असता मी तुझा त्यांच्याइतकाच तिरस्कार केला नाही, हे म्हणणं कृतघ्न. ‘थ्री जर्मन बॉम्बर्स’ किंवा ‘लॉर्ड सेव्ह किंग’ गाणाऱ्या बेसूर फुटबॉल हुल्लडबाजांकडे नाक मुरडून पाहिलंच. तुझ्या मागच्या नि आजच्या कित्येक गोष्टींचा तीळभरही अभिमान माझ्या मनी नाही! तरीही पंचक्रोशी न ओलांडलेल्या माझ्या कुटुंबाच्या दारिद्र्याच्या शेतात तुझ्या स्वप्नांची रोपं रुजली. आंतरराष्ट्रीय स्वप्नं खाटेबाहेर बरी म्हणता अमेरिकन ड्रीम सोडून गडी तुझ्या दारी ज्ञानाचा दिवा घेऊन आला. इतिहासाच्या मास्तरांनी तुझ्याविषयी भरवलेली चीड धरून मी इथं पहिलं पाऊल ठेवलं आणि तुझी ब्रिटानिया स्वामिनी दिगंतात गेली, याला माझ्या पूर्वजांचा तळतळाट नसेल, हे मला धाडसाने म्हणवत नाही. पण इतक्या वर्षांची चीड धुऊन काढायला तू पुरे पडलास.

माझ्या देशी काळे इंग्रज पेरणाऱ्या देशा,

डून स्कूल किंवा कॉन्व्हेन्ट शिकल्या बाया-बाप्प्यांना तू आपला वाटशीलच. चर्च जात्या किंवा भारतातच माल्ट वाईन लाभल्या घरांना तुझं कौतुक असेल. कपडे बदलावे तसे देश बदलणाऱ्या अधिकारी-आमदारांच्या पोरांना तुझा डिंडीम मुबारक असो; पण मातृभू सोडून तुझ्यासारख्या भलत्या बाईच्या कुशीत विसावणं मला अजूनही विचित्र वाटतं. माझ्या देशातल्या जातींएवढीच भयानक तुझी पेहराव-बोली-उठणं बसणं बघून वर्ग ओळखण्याची कला आणि बिझनेस कार्ड काढून स्मॉल टॉक करणं मी सोडू धजलो, ते फक्त आपली ओळख या सगळ्या बनावटींच्या पलीकडे आहे याच्या विश्वासावर. तुझ्या भांडवली बाजारात माझ्यासारख्या बणग्या पुस्तकबंबाळ खेडूत पोराला काय मिळो? पण तरी काय म्हणून स्टोनहेंजच्या दगडांशी ही आपुलकी, शनीच्या पाषाणमूर्तीचे भाऊबंद वाटतात का म्हणून? तुझ्या जर्सी गाईंच्या बेटांवर माझ्या लहानपणीची ऊब, व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधून आलेला चकटफू नॉस्टॅल्जिया तितकाच बकिंगहॅम राजवाड्याशी? घरामागल्या महारवाड्याची आठवण इथं सरे-ससेक्सच्या कुरणांशी कशाला? बस्तरच्या आठवडा बाजारात कोंबड्यांच्या झुंजीनंतर चाखलेल्या मटणाची गोडी ग्लासगोच्या शेपर्ड्स पायला, बेलफास्टच्या वाटेत काकडताना दिल्लीच्या त्रयस्थ थंडीचे भास, वेल्सच्या दऱ्याखोऱ्यात शिलाँगच्या खासी टेकड्यांनी भरलेले ऊर, स्वातंत्र्य नाकारणाऱ्या गोऱ्या चमडीवाटे अचानक भासणारे मायेचे स्पर्श कुठल्या गणितात? पुलवामाच्या लग्नात गायलेल्या गाण्यांची सावली वेस नेल्सनच्या आर ॲण्ड ब्लूजमध्ये कशासाठी? जीवन मोठी गोष्ट असते हे ऐकून होतो; पण तू मला फितवूत इथवर घेऊन येशील, हे मी ठरवलं नव्हतं.

साम्राज्याने पृथ्वी कुरतडणाऱ्या; पण जगाच्या मजूर गरिबांना वळचण-आसरा देणाऱ्या देशा, तो वैभव नेमका कुठला, म्हणताना आता दोस्त - गणगोत तुझं नि माझं नाव एका दमात घेतात. कोण कुठला म्हणून आता माझ्या मळ्याच्या-गावाच्या नावाआधी लोक तुझी ओळख सांगतात. आता या विचित्र बांधावर उभं राहिलं, मला तुझा मळवट पुसता येईना.

तुला वैतागून आफ्रिकेत गेलो, तर तिथं तुझे आवाज, गावी परतलो तर तिथं तुझ्या गप्पा, मराठीत लिहून चुकलो तिथं तुझी गाणी परत. आता आपली ही जमेना-करमेनाची हकीकत कितीक काळ मनात! तुझ्या-माझ्या प्रेमाच्या कुजबुजी ओळखीच्या वर्तुळामध्ये कितीक बाबा! तू नसतास तर माझा देश सोन्याची चिमणी झाला असता म्हणणाऱ्यांवर मला इतका विश्वास नाही; पण तू नसतास तर नसता खाल्ला देशोदेशीचा मेवा एका अंगणात.

चर्चमध्ये भरणाऱ्या इफ्तार पार्ट्या, सोबत नाचणारे भारत-पाकिस्तानचे वैष्णवजन, दर खंडातल्या सिगारेटी-सगळ्या टोळ्यांचे नाच, देशोदेशीचे लेखक आणि कवी कुठे भेटले असते शेतकऱ्याच्या पोराला एका उंचीवर बोलत. नाश्त्याला बेचव इंग्लिश ब्रेकफास्ट खाल्ल्यानंतर दुपारी इथेओपियन इंजिरा आणि संध्याकाळी चायनाटाऊनच्या टोफूसोबत तुर्की बकलावा आणि त्यावर बनारसी पान मला एकाच दिवसात देऊ केलंस. तुझा धनी आता नवा आणि कदाचित उद्या माझी कातडी सोलू पाहणारा कोणी होईल तेव्हा आपण कसे असू एकमेकांशी? माझ्या कातडीचा कुणी इथे बसत होता तेव्हाही आपण त्याविषयी जितके उदासीन होतो तेवढेच राहू का? तुझ्यावर क्षतीमात्र विश्वास ठेवू नये, असं मला इतिहासाने शिकवू नये... मला पुन्हा तुझ्या मिठीत यायला आवडतं, तुझ्या एलिझाबेथ यांचं निधन झाल्यावर मी पुन्हा देशभर सुतक ठेवतो. जाहीर सुट्टीचं हेच आपलं असं मनमिळीचं परस्परविरोधी नातं प्रिये, मी कुणाला सांगू नये नि तू कुणाला बोलू नये.

(काहीसा) तुझाच,

वैभव वाळुंज

(समाप्त)

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com