'गटारी अमावस्या' नकोच...!

संतोष शेणई
Wednesday, 31 July 2019

ऋतुबदलांमुळे पोट खराब झालेले असताना मांसाहार व मद्यपान केल्याने शरीराचे नुकसानच होते. म्हणून गटारी नकोच.

गटारी का नको?

श्रावणात कित्येक लोक कांदा-लसूण, मांसाहार, तसेच मद्यपान सोडतात. श्रावणात उपास असतात. श्रावण महिना पूर्ण होईपर्यंत कडक पथ्ये पाळणे सोपे जावे यासाठी आषाढाच्या शेवटच्या दिवशी दारू आणि मांसाहाराचे सेवन करून मन तृप्त करण्याची प्रथा सुरू झाली आहे. पिणाऱ्यांसाठी एक बहाणा एवढाच याचा अर्थ असतो. पण ऋतुबदलांमुळे पोट खराब झालेले असताना मांसाहार व मद्यपान केल्याने शरीराचे नुकसानच होते. म्हणून गटारी नकोच. त्याऐवजी या दिवशी दिव्यांचे पूजन करून जीवनातील अंधकार दूर व्हावा यासाठी प्रार्थना करा. जीवनदीप उजळा.

दीप अमावस्येचे महत्त्व

आषाढमासाच्या अखेरच्या दिवशी दीप उजळून सभोवतालचा काळोख नष्ट करायचा असतो. हा दिवस भाग्योदय घडवणारा. घरात अखंड लक्ष्मीचा वास घडवून आणणारा. भाग्योदय तेव्हाच होतो, जेव्हा देहही सक्षम असतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि संप्रेरकांचे संतुलन करवण्यासाठी संस्कृतीने करून दिलेली आठवण म्हणजे दीप अमावास्या. या दिवसानंतर आषाढातला घनगर्द काळोख मागे टाकायचा आणि श्रावणातील मांगल्याचे स्वागत करायचे असते.

deep amavasya

श्रावणाच्या पहिल्या दिवशी जरा-जिवंतिकेचे पूजन करायचे असते. जरा म्हणजे म्हातारपण. जिवंतिका म्हणजे जगण्याची जिजीवीषा. वृद्ध होईस्तोवर चांगले जीवन जगायचे असेल तर देहातील दीप घासूनपुसून लख्ख ठेवले पाहिजेत, याची आठवण करून देणारा हा आजचा दिवस.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deep Amavasya is important than Gatari