कोण होतास तू...? काय झालास तू? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mns
कोण होतास तू...? काय झालास तू?

कोण होतास तू...? काय झालास तू?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना ९ मार्च २००६ रोजी झाली. शिवाजी पार्क मैदानावर पक्षाची स्थापना सभा झाली. पक्षाच्या स्थापना सभेत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट मी महाराष्ट्रासमोर आणेन’ असं जाहीर केलं. या सभेत त्यांनी महाराष्ट्र विकासाची देखणी आणि आकर्षक स्वप्नं दाखवली. त्यानंतर १ मे २०२२ रोजी औरंगाबाद इथं राज ठाकरे यांनी घेतलेली सभा. ही सभा सुरू असताना जवळच्याच मशिदीमधून बांगेचा आवाज आला आणि राज ठाकरेंनी पोलिसांना आदेश दिले, ‘कोणीतरी जाऊन हे ताबडतोब थांबवा... नाही तर त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. ऐकत नसतील तर च्यायला एकदा काय ते होऊनच जाऊ दे...’

मनसेची स्थापना सभा आणि ही औरंगाबादची सभा यामध्ये १७ वर्षांचं अंतर आहे. या १७ वर्षांच्या काळात मनसेने काय कमावलं आणि काय गमावलं, कोणत्या भूमिका घेतल्या, त्या सोडायची वेळ का आली आणि मनसेला निवडणुकीत मिळालेलं यश याचं गणित मांडू लागल्यावर मनसे कुठल्या टोकाला येऊन उभी आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करू.

एखाद्या पक्षाची राजकारणातली पत ही त्याला निवडणुकीत किती जागा मिळतात, किंवा त्या पक्षाचं उपद्रव मूल्य किती आहे यावर ठरत असते. मनसे मात्र याबाबतीत नशीबवान ठरली आहे. मनसेच्या स्थापनेपासून झालेल्या तीन विधानसभा निवडणुकीत मनसेचे एकूण १५ आमदार निवडून आले आहेत. त्यांपैकी २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, मनसेने लढविलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आले. राज ठाकरे त्यांच्या सभांमध्ये कायम ‘माझ्या हातात कारभार देऊन बघा...’ असं आव्हान करतात. महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना सुरुवातीच्या काळात फार निराश केलेलं नाही. २००९ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदारांचं घवघवीत यश महाराष्ट्रातील जनतेने दिलं. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या व्यक्तीला निवडणुकीत स्वतःच्या विजयासाठी धडपडावं लागत असताना १३ आमदार निवडून येणं हा जनतेने त्यांच्यावर टाकलेला विश्वास होता. त्यातही १३ पैकी ७ आमदार हे मुंबईतले शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ होते. नाशिकचे ३ होते, कल्याण ग्रामीण आणि पश्चिम असे २, तर कन्नडची एक जागादेखील मनसेला मिळाली होती. बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेनेला खिंडार पाडण्याचं काम मनसेने केलं होतं. शिवसेनेला हा मोठा दणका होता.

बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन वर्षांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक ही शिवसेनेसाठी आणि शिवसेनेची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर प्रथमच पेलणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी अधिकच कसोटीची होती. ज्या एका व्यक्तीभोवती शिवसेना वाढली होती, ते बाळासाहेब नव्हते आणि ते असतानाच पक्षातून बाहेर पडून मनसेने भलंमोठं आव्हान उभं केलं होतं. मनसेची ओपनिंग २००९ मध्ये आश्वासक झाली असल्याने २०१४ मध्ये मनसे बहुधा गाफील राहिली. मनसेला या जागा राखून पक्षाचा विस्तार करण्याची संधी मिळाली होती. बाळासाहेबांसारखं वक्तृत्व लाभलेले राज ठाकरे त्यांच्या निधनानंतर संपूर्ण शिवसेना हायजॅक करणार असे अंदाज बांधले जात होते. प्रत्यक्षात मनसेने ही संधी गमावली, किंवा बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पारंपरिक सगळे मतदारसंघ परत मिळवण्याची कमाल केली. २०१४ च्या निवडणुकीत मनसेने २३२ जागांवर उमेदवार उभे केले; पण १ आमदार निवडून आला. त्यानंतर मात्र मनसेने विधानसभेत पुन्हा मान वर काढली नाही. मात्र, त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत १ टक्का मतंही राखता आली नाहीत. २०१४ ची निवडणूक मनसेसाठी फ्लॉप शो ठरला. २००९ मध्ये जिंकलेली एकही जागा मनसेला राखता आली नाही. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे सर्व नेते आणि शिलेदारांना आपले मतदारसंघ राखता आले नाहीत.

महापालिका निवडणुकांमध्येदेखील मनसेने पहिल्या निवडणुकीत खातं खोललं होतं. २००७ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले. पुणे महानगरपालिकेत मनसेचे ८, नाशिक महानगरपालिकेत १२ आणि ठाणे महापालिकेत ३ नगरसेवक निवडून आले. २०१२ मध्ये मनसेने मुंबईत २८ जागा जिंकल्या होत्या त्याचवेळी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे ४० नगरसेवक निवडून आले आणि राष्ट्रवादीच्या मदतीने त्यांनी सत्तेची पाच वर्षं पूर्ण केली. पुणे महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी पिंपरीमध्ये मनसेचे ४ नगरसेवक होते. मात्र, पाच वर्षांनी २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत ७ नगरसेवक निवडून आले. नाशिक महापालिकेत ५ नगरसेवक निवडून आले, तर पुणे महापालिकेत मनसेचे केवळ ३ नगरसेवक निवडून आले आहेत; पिंपरी महानगरपालिकेत १ नगरसेवक आहे. मुंबईतल्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा देऊन पक्षांतर केलं.

विधानसभा, महापालिकांमध्ये यश मिळाल्यानंतर मनसेला ते टिकवता का आलं नाही, या प्रश्नाच्या खोलात जाण्याची आवश्यकता आहे. ३६० अंशांच्या कोनात नेता भूमिका बदलू लागला की, नेत्याची विश्वासार्हता कमी होते.

काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष वैचारिकदृष्ट्या दोन ध्रुवावरची टोकं आहेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाचे पूल बांधताना शब्दप्रभू असणाऱ्या राज ठाकरेंना २०१२ च्या सुमारास शब्द कमी पडत होते. मात्र, कौतुकाचं प्रशस्तिपत्रक देण्याचा तिथून सुरू झालेला प्रवास २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत चारी मुंड्या चीत झाल्यानंतरच थांबला. त्यानंतर काही काळासाठी मनसेचं प्रदीर्घ चिंतन सुरू झालं. विरोधकांसोबत राहूनच आपली जागा तयार करता येईल, असा साक्षात्कार मनसेला झाला. ज्यांच्या कौतुकाचं तोरण बांधलं जात होतं, ते नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर असताना २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडिओ’चा कार्यक्रम राज ठाकरेंनी मनसेच्या बॅनरखाली हाती घेतला. लोकसभेच्या या निवडणुकीतील प्रचारात जर काही लक्षात राहणारं होतं, तर तो हा व्हिडिओचा कार्यक्रमच होता. लोकसभा निवडणुकीतला विरोधकांचा पराभव आपलाच मानून मनसे पुन्हा एकदा कोषात गेली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच राज ठाकरेंना आलेल्या ईडीच्या नोटिशीनंतर मनसेने ‘लाव रे तो व्हिडिओ’चा दुसरा सीझन सुरूच केला नाही. यंदाच्या गुढी पाडव्याला त्याचं उत्तर दिलं गेलं. कथानक आणि कलाकार सर्वच बदललंय. ३६० डिग्रीमध्ये राजसाहेब भूमिका आणि व्यासपीठ बदलू शकतात, हे मतदारांनी गुमान मान्य करायचं. त्यांच्या सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहत तात्पुरता दिलासा तर लोक देतात; पण मतदान करताना विश्वासार्हता तपासतातच.

राज ठाकरेंनी पक्षस्थापनेला महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांच्या भाषणात त्यांनी ‘मला ट्रॅक्टरवर जिन्स घालून बसलेला शेतकरी पाहायचाय...’ असं म्हटलं होतं. राज ठाकरे यांच्या या वाक्याने शहरासोबतच ग्रामीण भागातल्या तरुणांनाही भुरळ घातली होती. २०१४ मध्ये त्यांनी महाराष्ट्राचा आराखडा जाहीर केला. सुंदर आणि रचनात्मक शहरांच्या विकासासाठी आवर्जून वास्तवात आणावा असा आराखडा तयार केला होता. पाणी, शिक्षण, प्रशासनापासून मराठी अस्मितेचा आणि खेळांपर्यंतचा विचार केलेला आहे. आदर्श राज्याच्या या कल्पनेत कुठंही हिंदू, मुसलमान, मंदिर, मशीद यांचा ओझरता संदर्भच काय; पण उल्लेखही सापडत नाही. राज ठाकरेंनी यात आदर्शवत एकोप्याचं राज्य चित्रित केलं होतं. भूमिका स्पष्ट करताना त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते, ‘‘पुढच्या १०० - १५० वर्षांचा विचार करायचा, तर समाजात विचार पेरण्याचं काम हा आराखडा करेल.’’ समाजात रचनात्मक काही करण्याची भूमिका गुंडाळून ठेवत आता कड्याच्या टोकावर मनसे येऊन थांबली. एका राजाचा हा प्रवास शोकांतिकेच्या वाटेने गेल्यास आश्चर्य वाटू नये. विकासाचा आराखडा ते राज्याचाच आखाडा मात्र करण्याचा टप्पा त्यांनी आज गाठलाय हे नक्की.

Web Title: Deepa Kadam Writes Mns Party Raj Thackeray Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top