‘एआय’च्या शर्यतीत ‘डीपसीक’चा थरार!

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा विषय आता तंत्रज्ञान क्षेत्रापुरता मर्यादित न राहता त्याचा वापर सर्व क्षेत्रात होताना दिसत आहे.
Deepseek
Deepseeksakal
Updated on

- संदीप कामत, saptrang@esakal.com

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा विषय आता तंत्रज्ञान क्षेत्रापुरता मर्यादित न राहता त्याचा वापर सर्व क्षेत्रात होताना दिसत आहे. अनेक कंपन्यांनी एआय मॉडेल विकसित करण्यासाठी अब्जावधी डॉलरचा खर्च करीत आहे. या क्षेत्रात ‘एजीआय’ म्हणजे ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ ही संकल्पना विकसित होत आहे. ‘एजीआय’ म्हणजे मानवी मेंदूला मागे टाकून बलाढ्य आणि सर्वज्ञात अशा तंत्रज्ञानापर्यंत पोहोचणे.

मराठीमध्ये आपण त्याला ‘ब्रह्मज्ञान’ म्हणता येईल. हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आल्यावर कोणताही प्रश्न वा समस्या चुटकीसरशी सोडवता येईल. जो देश एआयची स्पर्धा जिंकेल तो केवळ जागतिक बाजारपेठ काबीज करेल असे नाही, तर विविध क्षेत्रात अव्वल स्थान मिळवेल, यात शंका नाही. भविष्यातील अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रे एआयवर आधारित असतील. सध्याच्या घडामोडी पाहून अनेकांना १९६९ मधील अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील अवकाश तंत्रज्ञानाची चुरस आठवते.

जवळपास दशकभराच्या शर्यतीनंतर चंद्रावर पहिला व्यक्ती उतरवून अमेरिकेने आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यानंतर पुढे अनेक नवी लहान-मोठी तंत्रज्ञान विकसित झाली आणि अमेरिकेला जगावर अधिराज्य करण्याचा जणू अधिकारच मिळाला. आता पुन्हा एकदा ‘एआय’च्या निमित्ताने कदाचित तशीच वेळ आली आहे, अशा बऱ्याच चर्चा सिलिकॉन व्हॅलीमध्ये ऐकायला येतात.

दोन वर्षांपूर्वी चॅटजीपीटी ही कल्पना सर्वांसाठी नवीन होती; परंतु चॅटजीपीटी येताच तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. तेव्हापासून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा परवलीचा शब्द झाला. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या चॅटजीपीटीनंतर पुन्हा नवे काय येणार, याबाबत चर्चा सुरू असताना मागील आठवड्यात चिनी कंपनीच्या ‘डीपसीक’ या एआय चॅटबोटने मात्र वेगळाच थरार निर्माण केला आहे.

गेल्या काही वर्षात अमेरिका आणि चीनमधील चुरस आता शीतयुद्धाप्रमाणे भू-राजकीय झाली आहे. दुसऱ्या महायुद्धात स्वित्झर्लंडने कोणाचीही बाजू न घेता दोन्ही गटाने शस्त्रास्त्रे विकल्याने त्यांचा मोठा फायदा झाला. आता तशीच परिस्थिती एनव्हिडीयाची आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानासाठी अत्यावश्यक असलेले हार्डवेअर (जीपीयू) तयार करणारी ती सध्याची जगातील सर्वात मोठी एकमेव अमेरिकन कंपनी आहे.

या कंपनीचा व्यवसाय चीनमध्येही आहे; पण चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षा पाहता त्यांचे संशोधकही अमेरिकेपूर्वी ‘एजीआय’ अर्थात त्या ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचतील आणि जगावर राज्य करतील, अशी भीती पाश्चिमात्य देशांमध्ये पसरली आहे. त्याची दखल घेत दोनेक वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेचे या क्षेत्रातील वर्चस्व अबाधित राखण्यासाठी एनव्हिडीयासह अन्य कंपन्यांना त्यांचे उत्पादन चीनला विकण्यास प्रतिबंध लावला. त्यामुळे चीन ‘एआय’ संशोधनामध्ये काही वर्षे का होईना नक्की मागे पडेल, असा एक भ्रमही तयार झाला होता.

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात चीनने ‘डीपसीक-आर १’ नावाचे एआय मॉडेल सादर केले. सुरुवातीला ही एक क्रांतिकारी घटना असेल, असे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते. चीनने यापूर्वी अशी अनेक मॉडेल तयार केली होती, मात्र एकतर त्यांची विश्वासार्हता कमी होती किंवा अमेरिकेने चीपसंदर्भात लावलेल्या प्रतिबंधामुळे सिलिकॉन व्हॅली त्यांना फारसे महत्त्व देत नव्हती; पण आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. चिनी कंपनीने केवळ ‘डीपसीक’ हे मॉडेलच नव्हे, तर त्याबरोबर एक शोधनिबंधही प्रकाशित केला. याबाबत माध्यमांमध्ये बातम्या झळकल्यानंतर त्याचे पडसाद जगभरात उमटत खळबळ उडाली.

‘डीपसीक’बाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचे धक्के बसले. ज्यांनी हे मॉडेल सादर केले, ती कुणी विख्यात कंपनी नव्हती, तर चीनमधून जागतिक शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या एका ‘हेज फंड’ कंपनीने ते आणले होते, तेही त्यांचा ‘साइड प्रोजेक्ट’ म्हणून! त्यांनी एनव्हिडीयाच्या अत्याधुनिक व महागड्या चिप्स न वापरता जुन्या आणि कमी क्षमतेच्या चिप्स वापरून हे मॉडेल विकसित केले. त्यासाठी आम्ही शेकडो मिलियन डॉलरचा खर्च न करता केवळ ५५ लाख डॉलरमध्ये तयार केले आहे,’ असे त्यांचे म्हणणे होते. तरीही या मॉडेलची कार्यक्षमता ही ‘ओपन एआय’सारख्या कंपन्यांनी विकसित केलेल्या मॉडेल्सना आव्हान देणारी होती. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की ‘एआय’च्या या स्पर्धेत अमेरिका मागे पडली की काय?

जुन्या आणि स्वस्त चिप्समध्ये असे करता येत असेल, तर मग महागड्या अत्याधुनिक चिप्स कोण घेणार? त्यात अनेक कंपन्यांच्या गुंतवणुकीचे काय होणार? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. धक्कादायक बाब म्हणजे हे मॉडेल ‘ओपन सोर्स’ म्हणजे त्याचा प्रोग्राम कुणालाही वापरण्यास खुला असल्याने अनेकांनी तो पडताळायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी जागतिक शेअर बाजारात त्याचे कसे पडसाद उमटतील आणि विशेषतः एनव्हिडीयाच्या शेअर्सवर काय परिणाम होतील, याचीही सर्वांना उत्सुकता लागली होती. महत्त्वाची बाब म्हणजे एनव्हिडीया ही कंपनी इतकी मोठी आहे, ती त्यामुळे संपूर्ण शेअर बाजार हादरणार, याची सर्वांनाच धास्ती होती.

‘डीपसीक’ बाजारात आल्यानंतर लगेच एलन मस्क, सॅम अल्टमन यांच्यापासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याही प्रतिक्रिया आल्या. ‘डीपसीक’च्या प्रगतीचे कौतुक करताना सॅम अल्टमन यांनी ‘ओपन एआय’ची पुढची मॉडेल्स यापेक्षाही चांगली बनवू, असे सांगितले. अध्यक्ष ट्रम्प यांनी नेहमीचा आक्रमक पवित्रा टाळत अमेरिकन कंपन्यांसाठी हा एक ‘वेकअप कॉल’ असल्याचे सांगितले. दरम्यान, अनेक अभियंत्यांनी ‘डीपसीक’ हे खरोखरच एक प्रगत एआय मॉडेल असल्याचे मान्य केले. ‘डीपसीक’ला विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांचा दर्जाही चांगला होता. त्यामुळे एलन मस्क यांच्यासह अनेकांनी हे मॉडेल एवढ्या स्वस्तात कसे तयार झाले, याबाबत शंका व्यक्त केली.

आतापर्यंत एआय मॉडेल्स बनवताना डेटा फीड करून त्यास प्रशिक्षित केले जायचे. म्हणजे लहान मुलाला आपण बोट धरून चालवायला शिकवतो तसे; मात्र ‘डीपसीक’ हा स्वतःच शिकतो. ही संकल्पना काही नवीन नाही, पण ती इतक्या चांगल्याप्रकारे प्रत्यक्षात येईल, असे कुणालाही वाटले नाही. ‘डीपसीक’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला अपूर्ण वा विस्कळित डेटामधून प्रभावी माहिती तयार करता येते. त्यासाठी वापरलेले तंत्रज्ञानही वाखाणण्यासारखे आहे. आतापर्यंत तयार झालेल्या मॉडेल्सचा जेवढा मेंदू मोठा, तेवढा तो महागडाही. त्यातुलनेत ‘डीपसीक’चा मेंदू लहान असूनही त्याने साधलेली प्रगती हेच त्याचे वेगळेपण आहे. समजा एका पेशंटला रुग्णालयात गेल्यानंतर प्रत्येकवेळी आजाराचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेल्यास वेळ आणि पैसाही अधिक लागेल; पण पेशंटला एकाच डॉक्टरने तपासले आणि नंतर हवे असल्यास विशेषज्ज्ञाकडे पाठवल्यास वेळ आणि खर्चही वाचेल. ‘डीपसीक’चे मॉडेलही तसेच काम करते. त्याची ऊर्जाखपतही कमी असल्याने त्यांचा खर्च ४० टक्क्यांनी कमी होतो.

‘डीपसीक’ बाजारात आल्यानंतर जागतिक शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली. एनव्हिडीयाचे शेअर जवळपास १७ ते १८ टक्क्यांनी कोसळले. त्याचे पडसाद इतर कंपन्यांच्याही शेअर्सवर झाले. एवढेच नव्हे, तर काही लहान एआय स्टार्टअप्सच्या शेअर्समध्ये ५ ते १० टक्के घट झाली. ‘डीपसीक’ ही सुरुवात असेल, तर अन्य चिनी कंपन्या भविष्यात आणखी काय करतील, याबाबत चर्चा सुरू झाल्या. डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष होताच आठवडाभरात ‘डीपसीक’ सादर करून चीनने एकप्रकारे अमेरिकेला इशारा दिल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.

आता पुढे काय?

‘डीपसीक’चे आगमन ही केवळ तांत्रिक प्रगती नाही, तर एक भू-राजकीय टप्पाही आहे. येथून चांगल्या आणि वाईट गोष्टी दोन्ही घडू शकतात. ‘डीपसीक’च्या लहान मॉडेलच्या व्यापक क्षमतांमुळे अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडू शकते. उदाहरणार्थ, आरोग्यसेवेमध्ये जटिल वैद्यकीय इमेजिंग किंवा रुग्ण डेटाचे विश्लेषण करून लक्षणे पूर्णतः प्रकट होण्यापूर्वी आजारांचे भाकीत करण्यास ते सक्षम ठरू शकते. वित्तीय सेवांमधील सायबर फसवणूक शोध यंत्रणा असो किंवा शेअर बाजारातील भाकीत करणे असो, अशा अनेक व्यवहारांसाठी ते फायदेशीर ठरू शकते. पर्यावरण विज्ञान आणि हवामान संशोधनात मोठ्या डेटासेट्सची प्रक्रिया सुलभ आणि स्वस्त करण्याच्या डीपसीकच्या क्षमतेचा फायदा होईल.

नैसर्गिक आपत्ती आणि संसाधन व्यवस्थापनासाठी अधिक चांगले भविष्यसूचक करता येईल. शिक्षणाच्या क्षेत्रात, तो विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार शिक्षण अनुभव साकारता येईल. कृषी क्षेत्रात अचूक शेतीसाठी वापरून उत्पन्न वाढवता येईल. एकूणच एआय तंत्रज्ञान पुढे जाऊन त्याची अष्टपैलूता दाखवेल, अशी आशा आहे. त्याचबरोबर आता जास्त सावध असणेही गरजेचे आहे. ‘डीपसीक’सारख्या लहान, स्वस्त आणि प्रगल्भ मॉडेल्समुळे अनेक क्षेत्रांमधला तोल ढळू शकतो.

शस्त्र, संरक्षण, सायबर सुरक्षा आणि जागतिक पुरवठा साखळी यामध्ये ‘डीपसीक’च्या संभाव्य वापरामुळे ‘एआय’चा नैतिक उपयोग आणि आंतरराष्ट्रीय नियमांबाबत प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ, ‘डीपसीक’सारखे तंत्र वापरून सायबर हल्ले करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी डिजिटल युद्धामध्ये आक्रमक वापर केला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानाच्या प्रकाशनामुळे, त्याचे फायदे समान रीतीने वितरित करण्यासाठी आणि गैरवापराच्या धोक्यांना कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि देखरेखीचीसुद्धा आता आवश्यकता आहे.

भारतीय ‘एआय’ची वेळ

या सर्व घडामोडींबरोबर जगातले सर्वांत जास्त कॉम्प्युटर इंजिनिअर असताना भारतात असे संशोधन का होऊ शकत नाही, असा प्रश्न नेटिझन्स विचारताना दिसत आहेत. त्याची काहीही कारणे असली तरी आता भारताच्या सार्वभौम सुरक्षेसाठी स्वदेशी एआयची वेळ आता झाली आहे. ज्या तंत्रज्ञानाचे परिणाम बाजारपेठा, उद्योग आणि जागतिक राजकारणांवर दिसून येत आहेत, त्यात मागे राहणे आपल्याला परवडणारे नाही.

‘नासा’ने अनेक वर्षांपूवी संशोधन करून अमेरिकेच्या अंतराळवीरांना गुरुत्वाकर्षण नसतानाही चालेल असे पेन तयार करून दिले. त्याचवेळी रशियाने मात्र आपल्या अंतराळवीरांना सरळ पेन्सिल देऊन हा प्रश्न सोडवला होता. भारत ‘जुगाड’ संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. ‘डीपसीक’कडून प्रेरणा घेऊन भारतानेही आता मुसंडी मारायची तयारी करायला हवी.

(लेखक कॅलिफोर्नियामध्ये टेक्नॉलॉजी क्षेत्रात गेली दोन दशके कार्यरत आहेत. @sankam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com