
तुमच्या आवडीचा ड्रेस तुम्ही घातलात, तर तो ड्रेस घातल्यानंतरचा आत्मविश्वास तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आपोआप दिसतो.
‘आत्मविश्वास महत्त्वाचा’
मुळात तुमचं शरीर योग्य आकारात असेल, टोन्ड असेल तर जगातला कोणताही ड्रेस तुमच्यावर भारीच दिसेल. त्यानंतर येतं तुम्ही तो ड्रेस कसा कॅरी करता. तो ड्रेस घातल्यानंतर तुमच्यात किती आत्मविश्वास असतो, हे महत्त्वाचं आहे. लोकांना आवडतं म्हणून एखाद्या ड्रेसची निवड करण्यापेक्षा, मला काय आवडतं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्या आवडीचा ड्रेस तुम्ही घातलात, तर तो ड्रेस घातल्यानंतरचा आत्मविश्वास तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आपोआप दिसतो.
एखादा कार्यक्रम, समारंभ, इव्हेंटनुसारच मला ड्रेसची निवड करायला आवडतं. मला भारतीय पेहराव जेवढा आवडतो, तेवढेच वेस्टर्न पोशाखही आवडतात. माझी उंची आणि व्यक्तिमत्त्व चांगलं असल्यानं मला सगळ्या प्रकारचे ड्रेसेस चांगले दिसतात. त्यामुळे नवीन येणारे ट्रेंड्स मी फॉलो करते; पण त्यात मला माझी स्टाइल काय असायला हवी, हे जास्त महत्त्वाचं वाटतं.
कपड्यांचा रंग निवडताना मला इंग्लिश कलर्स जास्त आवडतात. जे रंग विशेष करून बाहेर जास्त दिसत नाहीत, त्या रंगांचे कपडे मला खरेदी करायला आवडतात. कपड्यांसोबत ॲक्सेसरीजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कपड्यांसोबत शूज, सॅंडल्स आणि मीटिंग्जना जाताना पर्सही तितकीच महत्त्वाची आहे.
माझ्या कपड्यांना मॅचिंग होण्यापेक्षा सूट होतील असे शूज वापरायला मला जास्त आवडतं. पर्सच्या बाबतीतही ढीगभर पर्सेस वापरण्यापेक्षा क्वालिटी आणि ब्रॅन्डेड पर्स मला वापरायला आवडतं. तुमचा प्रत्येक ड्रेस लक्झरी, ब्रॅंडेडच असला पाहिजे, हे गरजेचं नाही. अर्थात क्वालिटी महत्त्वाची आहे; पण कपड्यांपेक्षा पर्स आणि घड्याळाच्या बाबतीत मला ब्रॅंड महत्त्वाचा वाटतो. मला इअरिंग्ज फार आवडत नाहीत; पण घड्याळांचं माझ्याकडे चांगलं कलेक्शन आहे.
हेल्दी केस, नॉर्मल मेकअप, ट्रेंडी ड्रेस, आपल्याला व्यवस्थित येतील असे शूज किंवा सॅंडल, ब्रॅंडेड पर्स आणि घड्याळ ही माझी स्टाइल आहे आणि त्यात भर म्हणून मी दुबईवरून दोन खूप सुंदर गोल्ड चेन आणल्या आहेत. त्या कधी-कधी वापरायला मला आवडतात.
फॅशन टिप्स
१) तुमचं शरीर फिट असेल, तर जगातला कोणताही ड्रेस तुमच्यावर उठून दिसेल.
२) कार्यक्रम, ठिकाण आणि परिस्थितीनुसार तुम्ही ड्रेसची निवड करावी.
३) अशा ड्रेससोबत ॲक्सेसरीज तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यात शूज आणि पर्सची निवड चांगली असावी.
४) तुम्ही ट्रेंड्स फॉलो करत असला, तरी तुमची स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कपड्यांची निवड खूप महत्त्वाची आहे.
५) खूप सारे कपडे वापरण्यापेक्षा, ठरावीक; पण दर्जेदार कपडे असावेत. शॉर्ट ड्रेस आणि साडीवरून कोणाचीही तुलना करू नये.