"व्यायाम म्हणजे शरीराची पूजाच' (देवदत्त नागे)

devdatta nage
devdatta nage

शरीराला हानी पोचेल असं मी कधीच करत नाही. मी धूम्रपान आणि मद्यपान करत नाही. फक्त डाएट, व्यायाम करून आपण हेल्दी राहत नाही. हानिकारक गोष्टी टाळणंही तितकंच आवश्‍यक आहे. आपलं शरीर हे एक मंदिर आहे. ते चांगलं कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

लहानपणापासूनच मला "सुपरमॅन', "बॅटमॅन', "हि-मॅन' म्हणजेच सुपरहिरो फार आवडायचे. आपणही या सुपरहिरोसारखं बनलं पाहिजे, असं सारखं वाटायचं; पण त्यासाठी शरीररचनाही तशी हवी. एवढ्या लहान वयात ते काही शक्‍य नव्हतं; पण जसजसं वय वाढत गेलं, समज येत गेली तिथपासून फिटनेसकडे, आरोग्याची निगा राखण्याकडे मी लक्ष द्यायला सुरवात केली. इयत्ता नववीमध्ये असतानाच मी व्यायाम करण्यास सुरवात केली. माझी व्यायामाची सुरवात झाली ती जोर-बैठकांपासून. मग हळूहळू मी जीममध्ये जाऊ लागलो. आता तर फिटनेस, वर्कआऊट, व्यायाम म्हणजे काय, हे खऱ्या अर्थानं मला समजलं आहे. माझी नेहमीची वर्कआऊटची वेळ संध्याकाळी किंवा रात्री असते; पण सकाळी उठल्यावर मी पहिलं पुशअप्स, क्रंचेस असे काही व्यायामाचे प्रकार करतो. सकाळी काही व्यायामाचे प्रकार झाले, की मी सायकलिंग करतो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा माझं सायकलिंग असतंच. मी मुंबईमध्ये सायकलिंग करतोच; पण याव्यतिरिक्त थोडा बदल म्हणून अलिबागला गेलो, की बीचवरसुद्धा सायकलिंग करतो. तिथं सायकलिंग करायला मला प्रचंड आवडतं. वर्कआऊट अगदी ठराविकच वेळेत करायचा किंवा त्यासाठी विशिष्टच वेळ दिला पाहिजे वगैरे माझे आग्रह नसतात. उदाहरणार्थ, मी कधी सायकलिंग अर्धा तास करतो आणि कधी एक ताससुद्धा करतो. माझ्या वर्कआऊटचंही तसंच आहे. आजचा वर्कआऊट पुरेसा आहे, असा शरीरानं ग्रीन सिग्नल दिला, की मी थांबतो. अती किंवा जबरदस्तीनं मी कधीच वर्कआऊट करत नाही. माझी व्यायाम किंवा वर्कआऊट करण्याची पद्धतही फार वेगळी आहे. इतरांसारखा मी चार-चार तास व्यायाम करत नाही.

खाण्यावर प्रेम आणि नियंत्रणही
तुम्हाला ऐकून आश्‍चर्य वाटेल; पण माझ्या जेवणाच्या वेळादेखील ठरलेल्या नसतात. माझा खास असा डाएट प्लॅनदेखील नाही आहे. भूक लागली, की मी खातो. मला मांसाहारी पदार्थ प्रचंड आवडतात. शिवाय भात मी खूप खातो. बऱ्याचदा रात्री अकरा किंवा बारा वाजता चित्रीकरण संपतं. मग तेव्हा एकच उपाय "बडेमिय्यॉं' रेस्टॉरंटला जायचं आणि बटर चिकन पोट भरून खायचं, इतका मी फूडी आहे. मी माझ्या जिभेचे चोचले पुरवतो; पण एक सांगतो, मी फळं खूप खातो. माझ्या जेवणात सगळ्या प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. जितका मी "नॉनव्हेज लव्हर' आहे, तितकाच मी "व्हेज लव्हर'ही आहे. चॉकलेट्‌सनी तर माझा पूर्ण रेफ्रिजरेटर भरलेला असतो. मात्र, एकच आहे, की माझं माझ्या खाण्यावर नियंत्रण आहे. फक्त मला चहा अजूनही सोडता आला नाही. मी दिवसभर खूप चहा पितो. चहाचं प्रमाण मला कमी करायचं आहे. त्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. जीमला जाण्यापूर्वी मी ब्लॅक कॉफी पिण्यास सुरवात केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला घरी बनवलेलं जेवणच जेवायला आवडतं. घरच्या जेवणासारखं पौष्टिक जेवण दुसरं कुठंच मिळू शकत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. शरीराला पोषक आहार कसा मिळेल, याकडे माझा जास्त भर असतो. पोटभरून जेवायचं मी बऱ्यापैकी टाळतो. एकाचवेळी मी खूप खात नाही. कधीकधी मला मध्येच रात्रीही भूक लागते. तेव्हाही मी उठून जेवतो. आरोग्याच्या दृष्टीनं गोड पदार्थ कमीत कमी खावेत. मी गोड पदार्थांना माझ्यापासून लांबच ठेवतो. मिठाई तर मी कधीच खात नाही. तेलकट पदार्थ असतील किंवा ज्या कॅलरीज तुम्ही खाता त्या बाहेर पडणंदेखील तितकंच गरजेचं असतं. त्या कॅलरीज व्यायाम, वर्कआऊट करूनच बाहेर पडतात. काही खाऊ नका असं नाही; पण जे काही खाल ते प्रमाणात खा.

शरीराला हानी पोचेल असं मी कधीच करत नाही. मला एका गोष्टीचा खूप माज आणि अभिमान आहे, की मी धूम्रपान आणि मद्यपान कधीच करत नाही. या गोष्टींना माझा विरोध आहे. कारण आरोग्य, फिटनेसच्या दृष्टीनं या गोष्टी करणं फार चुकीचं आहे. फक्त डाएट, व्यायाम करून आपण हेल्दी राहत नाही. या गोष्टी करणंही टाळलं पाहिजे. आपलं शरीर हे एक मंदिर आहे. आधी म्हटलं जायचं, की व्यायामशाळेमध्ये म्हणजेच "व्यायाममंदिरा'मध्ये जाऊन स्वतःच्याच शरीराची पूजा करणं म्हणजे व्यायाम. स्वतःच्या शरीराला प्रत्येकानं मंदिर माना. ते चांगलं कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न करा. जीममध्येही तुम्ही स्वतःसाठी जा. इतरांसाठी जाऊ नका. मी आतापर्यंत माझ्या शरीराच्या फिटनेसाठीच जीममध्ये गेलो आहे. एखाद्या व्यक्तीसारखं बनायचं आहे किंवा दिसायचं आहे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जीममध्ये जाणं फार चुकीचं आहे. जे काही कराल ते स्वतःसाठी करा. शरीर आणि मन फिट ठेवण्यासाठी करा.

"जय मल्हार' या मालिकेआधी मी कुठंही ऑडिशनसाठी जायचो तेव्हा माझी बॉडी आणि मस्क्‍युलर लूक असल्यामुळं मला नकार मिळायचा. तेव्हा मला फार वाईट वाटायचं. कारण माझ्याबरोबर ऑडिशनला येणाऱ्या लोकांची पोट सुटलेली असायची. फिटनेसशी तर संबंधच नाही. प्रत्येक ऑडिशनला नकार मिळायला लागल्यानं मी चक्क व्यायाम सोडला होता. माझं पोट कसं सुटेल याकडे मी लक्ष द्यायला लागलो होतो; पण व्यायामाशिवाय मी राहू शकत नाही. पुन्हा मी मूळपदावर आलो. "जय मल्हार' मालिकेच्या ऑडिशनसाठी मी गेलो, तेव्हा बघताच क्षणी मला महेश कोठारे सर म्हणाले ः ""मला या मालिकेसाठी जसा कलाकार हवा होता तो तूच आहेस.'' त्यांना माझी ऑडिशनही खूप आवडली. माझी फिट बॉडी आणि मस्क्‍युलर लूक मला इथं कामी आलं आणि एक वेगळाच देवदत्त नागे प्रेक्षकांच्या समोर आला. या मालिकेच्या वेळी माझ्यावर एक वेगळीच जबाबदारी होती. कारण तमाम प्रेक्षकांना खंडेराया हट्टाकट्टा दिसायला हवा होता. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान माझं रात्री दोन वाजता जरी पॅकअप झालं, तरी मी तीन वाजेपर्यंत जीममध्ये पोचायचो. तेव्हा मी गोरेगावला जीममध्ये जायचो. ती जीम माझ्यासाठी चोवीस तास सुरू असायची. कितीही कंटाळा आला असला किंवा मी कितीही थकलेला असलो तरी जीममध्ये जावं लागायचं. कधीकधी तरी जीमच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यावर गाडीमध्ये झोपही लागायची; पण "जय मल्हार'साठी सतत वर्कआऊट करणं महत्त्वाचं होतं आणि ते मी त्यावेळी फक्त माझ्यासाठीच नव्हे, तर खंडेरायाच्या भूमिकेसाठी केलं.

अद्यापही मला कोणत्या भूमिकेची गरज म्हणून वजन कमी करावं किंवा वाढवावं लागलं नाही. मी नैसर्गिकरित्या बॉडी कशी बनवता येईल, याकडे लक्ष देतो. मी "नॅचरल बॉडीबिल्डर' आहे. अजूनपर्यंत मी बॉडी बनवण्यासाठी कोणत्याच ग्रोथ हार्मोन्सचा वापर केलेला नाही. वजन कमी करणं किंवा वाढवण्याची एक दुसरी बाजूही आहे. दोन महिन्यांत पाच किलो वजन तुम्ही कमी करत असाल, तर ते शरीराला हानिकारक आहे. बऱ्याचदा वजन वाढवण्यासाठी खूप कॅलरीज घेतल्या जातात. खाण्याचं प्रमाण वाढवलं जातं. हे करणं फार चुकीचं आहे. याचा मेंदू, हृदय आणि किडनी यावर परिणाम होतो. शरीराच्या कोणत्याच इंद्रियांना हानी पोचता कामा नये. कोणतीही गोष्ट एकदम करायला गेली, की ती शरीरासाठी धोकादायक ठरते हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रत्येकानं स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. शरीर कसं चांगलं ठेवता येईल, फिटनेस कसा राखता येईल याकडे प्रत्येकानं आवर्जून लक्ष द्यायला हवं. माझ्यासारखं फक्त वर्कआऊट आणि मस्क्‍युलर लूक बनवायाला पाहिजे असं काही नाही. तुमचं हार्टदेखील कसं हेल्दी ठेवता येईल, याचा अभ्यास करा. वयाची पन्नाशी गाठली असली, तरी सकाळी प्रसन्न वातावरणात थोडं चाललं तरी आरोग्यासाठी ते फायदेशीरच ठरणार आहे.
(शब्दांकन : काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com