esakal | वन डे ट्रीप : देवकुंडच्या रंगछटा
sakal

बोलून बातमी शोधा

वन डे ट्रीप  : देवकुंडच्या रंगछटा

वन डे ट्रीप : देवकुंडच्या रंगछटा

sakal_logo
By
प्रशांत ननावरे

पाण्याच्या किती वेगवेगळ्या रंगछटा असू शकतात, हे बघायचं असेल तर देवकुंड धबधब्याची सहल नक्की करा. क्षणोक्षणी आपण त्या रंगछटांच्या प्रेमात पडत जातो...

माणगाव तालुक्यातील पाटनस येथील देवकुंड धबधबा मुंबईपासून साधारण १३५ किलोमीटर अंतरावर आहे. अंतिम ठिकाण हे जरी मुख्य आकर्षण असले, तरी तिथवर पोहचण्याचा प्रवासही तितकाच रंजक आहे. मुंबई-पनवेल-वडखळ नाका-पाली या रस्त्यावरून पावसाळ्यात प्रवास करताना निसर्गाचे वेगळेच रूप पाहायला मिळते. दूरवर जाणारा रस्ता, छोटी-छोटी गावं, आजूबाजूला शेती, डोंगररांगा, धुक्यामध्ये गुडूप झालेले सुळके, आकाशात दाटून आलेले पावसाळी ढग आणि वाटेत अधूनमधून हजेरी लावणारा पाऊस अंतिम ठिकाणाची उत्सुकता वाढवत नेतो.

ताम्हिणी घाटाच्या प्लस व्हॅलीतून कोकणाच्या पदरात कोसळणाऱ्या देवकुंड धबधब्यावर पोहचण्यासाठी सात किलोमीटरचा ट्रेक करणे अनिवार्य आहे. चढ-उतार फार नसले तरी दीड-दोन तासांची चाल थोडी दमवणारी वाटू शकते; पण वाटेतील निसर्गसौंदर्याचा आनंद घेत मार्गक्रमक करत राहिलात तर थकवा अजिबात जाणवणार नाही. हा संपूर्ण रस्ता दाट जंगलातून जातो. त्यामुळे ट्रेकला सुरुवात करताना तिकीट खिडकीवर वाटाड्याची चौकशी केल्यास सोबतीला महीतगार व्यक्तीही मिळते. चारपाच जणांचा ग्रुप असल्यास वाटाड्याचीही आवश्यकता नाही, कारण गावकऱ्यांनी जागोजागी धबधब्याकडे जाण्याच्या खाणाखुणा करून ठेवलेल्या आहेत. शिवाय, मळलेल्या वाटेवर इतर पर्यटकही साथीला असतातच. देवकुंड धबधबा वर्षाचे बाराही महिने वाहत असला, तरी जंगलाची आणि धबधब्याची खरी मजा घ्यायची असेल तर पावसाळाच योग्य आहे.

हळूहळू जंगल, पठार, पायवाटा असा प्रवास करत आपण त्या डोंगररांगांच्या कुशीत शिरू लागतो. एके ठिकाणी डाव्या बाजूला संथपणे वाहणारी कुंडलिक नदी आणि त्याच्या बाजूने जाणारी पायवाट लागते. अथांग पसरलेल्या नदीपात्रात बाजूचे डोंगर आणि आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं असतं. दूर क्षितिजावर आकाश आणि पाणी एकमेकांना बिलगतानाचं दृष्य नितांतसुंदर दिसतं. दगड-मातीचा रस्ता, डोंगर पार करताना वाटेत लहान-मोठ्या ओढ्यांमधून मार्गक्रमण करावे लागते. दोन मोठ्या ओढ्यांतील पाण्याची पातळी थोडी जास्त आहे; मात्र मदतीसाठी गावकरी आणि सुरक्षिततेसाठी दोरखंड असल्यामुळे ते सहज पार होतात. शेवटच्या मोठ्या ओढ्यावर एक लाकडी पूल बांधण्यात आलेला आहे. स्थानिकांनीच हा पूल बांधला असून त्यावरून जाण्यासाठी शुल्क द्यावे लागते. या पुलाच्या पलीकडे गेल्यानंतर एक छोटा चढ चढून गेल्यावर तुम्ही एका अद्‍भुत वर्तुळात प्रवेश करता. जिथे प्रथमदर्शनी दोन विशाल दगडांच्या मधून प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या देवकुंड धबधब्याचे दर्शन होते. वेग आणि वाऱ्यामुळे फेसाळत्या पाण्याचे तुषार सर्वत्र उडत असतात आणि ते अंगावर झेलतच आपण ते विलोभनीय दृष्य पाहण्यात मग्न होऊन जातो.

आकाश निरभ्र असेल तर उन्हामुळे नितळ पाण्यावर चमचमणाऱ्या चांदण्याची गर्दी झालेली असते आणि पाऊस पडत असेल तर पाण्यामध्ये टपोऱ्या थेंबांमुळे संगीतनिर्मिती होत असते. बाजूच्या डोंगरावर पडणाऱ्या पावसाचे थेंब त्या वर्तुळात तुषारांची झालर तयार करत असतात. आकाशातून ड्रोनच्या माध्यमातून हा नजारा पाहणे वेगळा अनुभव ठरतो. देवकुंड धबधबा हा कुंडलिका नदीचा उगम मानला जातो. पाण्याचा प्रचंड वेग आणि खोलीमुळे धबधब्याच्या खाली भिजता येत नसले तरी धबधब्याच्या पाण्यात मनसोक्त डुंबण्याची मजा अनुभवता येते. पाण्याखाली जाऊन फोटो आणि व्हिडीओग्राफी करता येण्याइतपत हे पाणी नितळ आहे. आकाशाचा रंग, ऊन, पावसाप्रमाणे पाणी वेगवेगळा रंग धारण करत असतं आणि क्षणोक्षणी आपण त्याच्या प्रेमात पडत असतो. पाण्यात डुंबण्याची मजा घेतल्यानंतर आणि निघण्यापूर्वी धबधब्याच्या समोर एखाद्या दगडावर शांतपणे मांडी घालून बसून कोसळणाऱ्या पाण्याचं निरीक्षण करणं हा या सहलीचा सर्वोच्चबिंदू आहे.

nanawareprashant@gmail.com

loading image
go to top