

लेखक- डॉ दत्तात्रय फलके
विसाव्या शतकात बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी उत्तर महाराष्ट्रात रावबहादूर रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि पद्मश्री काकासाहेब वाघ ही तीन मंडळी आघाडीवर होती. या बहुजनांच्या नेत्यांनी समाजाला दिशा देण्याचे जे महत्कार्य केले, त्या कार्याची नव्या पिढीला ओळख व्हावी, यादृष्टीने हे कार्य आजच्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे.
काकासाहेब वाघ हे त्यांच्या पिढीतील एक अत्यंत धडाडीचे आणि कर्तबगार नेते होते. सामाजिक, राजकीय, शिक्षण, सहकार, कारखानदारी या विविध सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या काकासाहेब नावाच्या वाघाने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. सर्वसामान्य शेतकरी व बहुजनांविषयी तळमळ बाळगणाऱ्या काकांनी आयुष्यभर आपला स्वाभिमान जपला. समाजहित आणि तत्कालीन गरजा लक्षात घेऊन त्यांनी अनेक राजकीय पक्ष बदलले. पण आपल्या शेतकऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी ते कायम एकनिष्ठ राहिले. अनेक संकटांमध्येही ते तालुका व जिल्हाचा विकास हेच ध्येय ठेवून शेवटच्या श्वासापर्यंत निर्धाराने कार्यरत होते.
काकासाहेब वाघ यांना पाच भाऊ व चार बहिणी होत्या. १८९८ मध्ये देवराम ऊर्फ काकासाहेब वाघ यांचा जन्म वडील सयाजी व आई बजाबाई यांच्या पोटी रानवड या गावी झाला. त्या वेळी वाघ घराणे पंचक्रोशीत एक सधन आणि सुसंस्कृत कुटुंब म्हणून ओळखले जायचे. सुपीक आणि समृद्ध अशी दीडशे एकरपेक्षा जास्त जमीन त्यांच्याकडे होती. गावची पाटीलकी गेल्या दोन दशकांपासून त्यांच्याकडे होती. १८०७ मध्ये सयाजीबाबांचा मोठा मुलगा रामचंद्र यांचे लग्न झाले; पण दुर्दैवाने पुढच्याच वर्षी त्यांचे मानमोडी आजारात नाशिकला निधन झाले. पुढे १९०८ ला विधवा सुनेचे लग्न मखमलाबाद येथील मुलाशी करून देणारे पुरोगामी विचाराचे सयाजीबाबा काकासाहेबांनी आपल्या घरीच पाहिले होते. काकासाहेब वाघ व त्याचे मोठे बंधू गावातील विष्णू भटाजवळ शिक्षण घेऊ लागले. लहान असताना शेतात छोटी-मोठी कामे करणे, गुरे वळणे, घरातील काही कामांमध्ये मदत करणे, मित्रांसह खेळणे आणि नातेवाइकांकडे फिरणे यात त्यांचे बालपण गेले. सरकारी शाळेत शिकण्यासाठी आजोळी लोणवाडी येथे पाच किलोमीटर पायी जावे लागत असे. धूळपाटीवर अक्षरे गिरवीत बसणे यांना सुरवातीला कंटाळवाणे वाटले. नंतर पाटी-पेन्सिल मिळाली. मामाच्या गावी त्यांना दगडू नावाचा मित्र मिळाला. कुस्तीच्या आवडीतून ते तालमीत जाऊ लागले. १९११ मध्ये वडिलांनी पिंपळगाव बसवंत येथील माध्यमिक शाळेत काकासाहेबांना घातले. माध्यमिक शाळेत असताना त्यांनी कुस्ती, व्यायाम आणि पोहण्याचा छंद जोपासला. पुढील शिक्षण घेण्यासाठी काकासाहेब वाघ यांच्या वडिलांनी त्यांना आजीसोबत नाशिकला पाठवले.
काकासाहेब वाघ नाशिकला नियमित शाळेत जाऊ लागले. १९१४- १५ च्या दरम्यान नाशिक शहरात प्लेगची साथ आली. यात अनेक मुलांचा मृत्यू झाला. या साथीत देवराम म्हणजेच काकासाहेब वाघांनी बाहेरगावहून आलेल्या मुलांना मदत केली. हे काकासाहेबांच्या आजीच्या लक्षात आले. आजी त्यांना घेऊन रानवड या आपल्या गावी आल्या. त्यामुळे त्यांची शाळा सुटली. काकासाहेब शेतात काम करू लागले. जिल्ह्यात त्या काळात झालेल्या जवळजवळ सर्व शेतकरी चळवळींमध्येही त्यांचा मोलाचा सहभाग होता. १९१२ मध्ये धुळ्यात झालेल्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या अधिवेशनात ठरल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात मराठा विद्याप्रसारक समाजाची स्थापना करावयाची होती. या संदर्भात डी. आर. भोसले, कर्मवीर रावसाहेब थोरात, सामाजिक कार्यकर्ते गणपत दादा मोरे हे सर्व रानवडला काकासाहेबांकडे गेले. त्या वेळी काकासाहेब शेतात काम करत होते. काकासाहेबांच्या वडिलांनी स्वखुशीने बहुजनांच्या प्रगतीसाठी आपल्या मुलास घेऊन जाण्यास सांगितले. सत्यशोधक समाज आणि त्यातील विचारांनी काकासाहेब झपाटून गेले. नाशिक येथील मराठा बोर्डिंगमध्ये राहून शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी ते जिल्हाभर गावोगावी फिरून धान्य, पैसा, कपडे जमा करू लागले. अत्यंत भारावलेल्या वातावरणात राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रेरणेने सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. १९१३ मध्ये मराठा परिषदेचे सातवे अधिवेशन नाशिकला झाले. १९१५ ला म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी काकासाहेब वाघ या शिक्षण चळवळीत प्रत्यक्ष सक्रिय झाले. १९१६ पासून काकासाहेबांकडे सहकारी पतपेढीचे खजिनदार आणि चिटणीस म्हणूनही जबाबदारी आली. नाशिकमध्ये वेगवेगळ्या परीक्षांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा, मोफत जेवण, त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्याने, जुनी शालेय पुस्तके जमवून ती गरीब विद्यार्थ्यांना गरजेनुसार पुरविणे, व्यायामासाठी सोयी उपलब्ध करवून देणे, परीक्षा झाल्यावर स्नेहसंमेलन भरविणे, मराठा विद्याप्रसारकचे काम या मुलांपर्यंत पोचविणे इत्यादी कामांमध्ये मुख्य सूत्रधार काकासाहेब होते. काकासाहेबांबरोबर पुढील काळात वाघ गुरुजी यांचे योगदानही मोलाचे आहे. ते अत्यंत सक्रिय व उपक्रमशील शिक्षक होते. विद्यार्थ्यांसाठी ते नवनवीन उपक्रम शोधून काढत. ते प्रत्यक्षात आणताना प्रबोधन शिबिरे, मार्गदर्शनवर्ग आणि प्रात्यक्षिकेही घेत. विद्यार्थिसंख्या वाढू लागली. शाळेसाठी जागेची गरज भासू लागली. राकाशेठची जागा काकासाहेबांना वाघ गुरुजींनी सवलतीत मिळवून दिली. या सार्वजनिक उपक्रमामुळे काकासाहेब वाघांसह संस्थेला आवश्यक असलेले कार्यकर्ते भाऊसाहेब हिरे, आण्णासाहेब मुरकुटे, शंकरराव कदम, विठ्ठलराव गाढवे, विठोबा पाटील, दुलाजीनाना पाटील यांच्या रूपाने मिळाले.
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत काकासाहेब कधी कार्यकारी मंडळाचे सभासद, तर कधी सचिव म्हणून कार्यरत होते. १९२७-२८चा तो काळ होता. काकासाहेब सचिव असताना शेतकी व औद्योगिक प्रशिक्षण शाळा सुरू केली. मराठा हायस्कूल, केटीएचएम व इतर महाविद्यालये आज ज्या जागेत उभी आहेत, ही जागा एका ख्रिश्चन बाईकडून मिळवून देण्यात काकासाहेबांचे योगदान महत्त्वाचे आहे. पिंपळगाव परिसरात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात होते. हे ओळखून काकासाहेबांनी परिसरात फिरून अडीच लाख रुपये जमा केले. स्वतःच्या सत्तरीसाठी जमा झालेले दोन लाख रुपये देऊन कार्यकारी मंडळाचा प्रशासकीय ठराव करून अर्ज विद्यापीठात पाठविण्यात आला. या सर्व धावपळीत विद्यापीठाकडे वेळेत अर्ज पोचू शकला नाही. आपले हे वर्ष वाया जाईल, असे वाटल्यावर कुलगुरूंना भेटून त्यांनी पिंपळगाव महाविद्यालयाची परवानगी मिळविली. पिंपळगाव महाविद्यालय उभारणीत पैसे कमी पडले. पत्नीचे दागिने गहाण ठेवून बांधकाम पूर्ण केले. १९४३ मध्ये त्यांनी निफाडला ए. व्ही. स्कूल काढले. १९४६ पर्यंत त्यांनी जिल्हाभर पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक अशा एकूण १३९ शाळा स्थापन केल्या. याच काळात पुणे येथील छत्रपती शाहू महाराज महाविद्यालय उभारणीत काकासाहेबांचा सहभाग मोलाचा आहे. मराठा बोर्डिंगचे काम सुरळीत मार्गी लागल्यावर त्यांनी उपजीविकेसाठी बांधकाम व्यवसाय स्वीकारला. १९३४ ला नाशिकमधील बांधकामाची चार-पाच चांगली कामे केल्यावर १९५४ मध्ये नाशिक महापालिकेची इमारत बांधण्याची जाहिरात आली. १७ ऑक्टोबर १९३४ ला त्यांनी सुरू केलेले महापालिकेच्या इमारतीचे बांधकाम १९३७ मध्ये पूर्ण केले. अंदाजपत्रक व करारनाम्यात डी वॉटरिंगचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे काकांना या कामात मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. तशाही परिस्थितीत त्यांनी काम पूर्ण केले. परंतु नगर पालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी काकांच्या बिलाबद्दल दंडात्मक कारवाईचा वापर करून पूर्ण इमारतीच्या बांधकामाच्या बिलापेक्षा जादा दंडाची आकारणी केली. एकाही नगरसेवकाने काकांच्या आर्थिक नुकसानाची पर्वा केली नाही. अशा बिकट परिस्थितीतसुद्धा काकासाहेबांनी स्वतःचा बाणेदारपणा सोडला नाही. भरसभेत त्यांनी एकच विनंती केली. इमारतीचा एकूण खर्च एक रुपया दाखवावा. तसा उल्लेख इमारतीवर करावा व त्यानुसार एक रुपयाच्या व्हाऊचर काकांनी सही करून दिले. आजही नाशिकच्या मेन रोडवरील पालिकेच्या इमारतीवर काकांचे नाव व इमारतीची किंमत एक रुपया लिहिलेली आहे. आजच्या समस्त कॉन्ट्रॅक्टरांसाठी अनुकरणीय असेच हे उदाहरण आहे.
काकांनी केलेल्या विपुल सामाजिक कार्यामुळे त्यांनी संपूर्ण जिल्हाभर कार्यकर्त्यांची एक सक्षम फळी उभारली होती. यातूनच पुढे त्यांनी आपली पहिली निवडणूक १९३७ मध्ये स्वतंत्र ब्राह्मणेतर पक्षाकडून विधानसभेसाठी लढविली. बहुजन समाज एकत्र काम करू लागला. या ठराविक वर्गाला आणि त्यांच्या आत्मकेंद्री राजकारणाला शह देण्यासाठी काकासाहेबांनी १९४६ ला कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९४८ ला काँग्रेसला सत्ता मिळाली. पक्षात वाद निर्माण झाले अन् १९५२ मध्ये काकासाहेब शेतकरी कामगार किसान पक्षात गेले. काही फरकाने निफाड मतदारसंघातून ते पराभूत झाले. १४ मे १८४५ ला रानवड येथील शेतकरी मेळाव्यात ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासह कॉ. डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कम्युनिस्ट पक्षात गेले. १९५४ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली निफाडमधून निवडून आले आणि आमदार झाले. काकासाहेबांचे निकटचे स्नेही कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचा मृत्यू १९६१ मध्ये झाला. डॉ. पंजाबराव देशमुखांच्या विनंतीवरून काकासाहेब पुन्हा १९६२ ला काँग्रेस पक्षात आले. १९६७ ला काँग्रेस जिल्हाध्यक्ष असलेल्या काकांच्या समितीने सुचविलेल्या सर्वच कार्यकर्त्यांची तिकिटे नाकारली गेल्याने काकांच्या मार्गदर्शनाखाली जन काँग्रेस पक्ष स्थापन केला. आता यापुढे अजिबात सक्रिय राजकारण करणार नाही, या अटीवर १९६९ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. मुंबई प्रांताने तेव्हा समान दर्जाच्या इगतपुरीच्या तांदळास कमी आणि गुजरातच्या तांदळास जास्त भाव दिला. काकांनी या भागात दौरा करून वस्तुस्थिती समजून घेतली. शासनाकडे पत्रव्यवहार व प्रत्यक्ष पाठपुरावा केला. मोरारजी देसाईंना भेटून काम झाले नाही. याविरुद्ध लढा उभारला गेला. मोरारजींना प्रचंड राग आला. त्यांनी काकासाहेबांना सहा जिल्ह्यांतून हद्दपार केले. अशावेळी त्यांच्या पत्नी गीताई यांनी या लढायाचे नेतृत्व केले. चारशे महिला तयार केल्या. शासन नमले. काकांनी निर्भयतेने हा लढा यशस्वी करून दाखविला. काकासाहेबांनी असाच लढा लढून केद्राई धरणाचे पाणी चांदवडमधील जागीरदार यांच्याविरोधात पवित्रा घेऊन खडक माळेगावला मिळवून दिले.
एकदा एका शासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामात फेरफार केला. श्रीमंत माणसाच्या शेतातून जाणारा रस्ता पैसे घेऊन परस्पर शेजारच्या गरीब शेतकऱ्यांच्या शेतातून वळविला. तो शेतकरी शासकीय कचेरीत खेटे मारून थकला आणि तक्रार घेऊन काकासाहेबांकडे आला. काकासाहेब त्याच्यासोबत तत्काळ शेतावर गेले. त्यांनी प्रत्यक्ष सगळी परिस्थिती समजावून घेतली. इंजिनिअरला बोलावून जाब विचारला. कलेक्टरकडे नेऊन त्या शेतकऱ्याचा प्रश्न मिटवला. असे एक ना शेकडो बिकट प्रसंग काकांनी सोडविले. १९३० मध्ये अतिवृष्टीमुळे चांदवड, निफाड, येवला व इतर काही तालुक्यांतील लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काकासाहेबांना हे कळताच त्यांनी शासकीय मदतीची वाट न पाहता या परिसरात फिरून कपडे, पैसे व धान्य गोळा करून लोकांपर्यंत मदत पोचविली. या मदतीमुळे अनेक जण काकासाहेबांना आयुष्यभरासाठी जोडले गेले. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा म्हणून अनेक दूध डेअरी सहकारी तत्त्वावर सुरू केल्या. भविष्यात उत्पादन वाढल्यास मुंबई, पुणे, औरंगाबाद, धुळे, जळगाव या ठिकाणी दूध व दुग्धजन्य पदार्थ पुरविता येतील. १९५२ च्या भीषण दुष्काळात शासनाकडून कामे मंजूर करून घेतली. पिंपळगाव, लोणवाडी, रानवड, सारोळे, कोटमगावमार्गे पंधरा मैलाचा रस्ता लोकसहभागातून बांधला. याच काळात टेलिफोनचा प्रसार होत होता. काकासाहेबांनी काळाची पावले ओळखून निफाड कारखान्यावर ५० टेलिफोनचे एक केंद्र सुरू केले. शेतकरी सहकारी बँक स्थापन केली. दरम्यानच्या काळात काकासाहेब महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सदस्य होते. त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून निफाड तालुक्यात सर्वाधिक इलेक्ट्रिकेशन करून घेतले.
काकासाहेब १९५७ ते १९६२ दरम्यान आमदार होते. या काळात त्यांनी जिल्ह्यातील अनेक जटिल प्रश्न मार्गी लावले. दूरदृष्टी ठेवून सहकारी तत्त्वावर त्यांनी निफाड, रानवड, नाशिक व कादवा कारखान्यांकरिता मंजुरी मिळवून दिली. साखर संघाचे अध्यक्ष असताना, केंद्राकडून एक हजार २५० टनांचे लायसेन्स मिळवून दिले. थोड्याच दिवसांत निफाड कारखान्यांची क्षमता वाढविण्याची गरज निर्माण होताच काकांनी प्रयत्न सुरू केले. आमदारकीच्या काळात त्यांनी दिंडोरी, निफाड, येवला तालुका बागायती करण्याचा मोठा प्रयत्न केला. बागायतीकरणाला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी गंगापूर कॅनॉल व पाटचाऱ्या काढून शेता-शेतात पाणी पोचविले. त्याचप्रमाणे पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड धरणांचे प्रकल्प मंजूर करून आणले. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले पाणी आटवून त्यांच्या विहिरींमध्ये पाणी पोचवावे, यासाठी ते कटिबद्ध होते. २२ मार्च १९६१ला गंगापूर धरणाच्या प्रलंबित कामाकडे शासनाचे लक्ष वेधले. या महत्त्वपूर्ण कामाच्या दिरंगाईबाबत विधानसभेत आपली भूमिका रोखठोक शब्दात मांडली. १९४० च्या सुमारास त्र्यंबकजवळील तळवाडे या गावी रात्री आग लागली. काकासाहेब त्यादिवशी बाहेरगावी होते. त्यांना माहीत होताच ताबडतोब त्या गावी जाऊन तेथील लोकांना दहा-बारा पोते धान्याची सोय केली. शासकीय यंत्रणेचे त्या घटनेकडे लक्ष दिसत नाही, असे त्यांच्या लक्षात आल्यावर ताबडतोब कलेक्टरशी चर्चा करून त्यांना घटनास्थळी नेले व तेथील पीडितांना शासकीय मदत मिळवून दिली.
असाच एक प्रसंग नाशिक- मालेगाव दंगलप्रसंगी घडला. हिंदू- मुसलमान दंगल थांबविण्यात पोलिसांनासुद्धा अपयश आले. मग एका पोलिस अधिकाऱ्याने काकासाहेबांची भेट घेऊन त्यांना जुन्या नाशिकमध्ये आणले. काकासाहेबांनी दंगल करणाऱ्यांना स्पष्ट सांगितले, तुमच्यापैकी ज्यांना दंगल करायची आहे त्यांनी पुढे या, मी तुम्हाला थांबवायला आलो आहे. मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला भांडू देणार नाही. त्यामुळे तुम्ही मला आणि या माझ्या सहकाऱ्यांना आत्ताच मारून टाका. यावर ते सर्व घाबरून निघून गेले. अशा प्रसंगातून काकासाहेबांचा निर्भीडपणा दिसून येतो.
१९५६ मध्ये नाशिक जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. इगतपुरी तालुक्यातील आदिवासींना कंदमुळे खाऊन जगावे लागत होते. काकासाहेबांनी तेथील आदिवासींची परिषद घेऊन एक मोठा मोर्चा संघटित केला. मामलेदार कचेरीला घेराव घालून आठ दिवसांत आदिवासींची खावटी मिळवून दिली. काकासाहेब आपले संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे आणि कष्टात जगले. त्यांनी आयुष्यभर निःस्वार्थी वृत्तीने केलेले काम यामुळे समाजाकडून मान, लोकांचे प्रेमही त्यांना भरभरून मिळाले. आयुष्यात अनेक भव्यदिव्य कामे उभी केल्याने नाशिक जिल्ह्यातील बहुजन समाजाने काकांना आदराने कर्मवीर ही लोकपदवी बहाल केली. काकासाहेब अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे आधारस्तंभ, नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे आद्य सचिव, सक्रिय कार्यकर्ते, विविध सहकारी साखर कारखान्यांचे संस्थापक, निफाड कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, इंडियन शुगर इंडस्ट्री कॉर्पोरेशनचे (नवी दिल्ली)अध्यक्ष, नॅशनल को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचे सदस्य, स्वातंत्र्यसेनानी, अभ्यासू आमदार, शिक्षण सुधारक, व्यासंगी सहकार नेते, बहुजनांचा खंबीर आधार होते. काकासाहेबांचे विविध क्षेत्रांतील काम पाहून भारत सरकारने २६ जानेवारी १९७० ला त्यांना पद्मश्री पदवी बहाल केली. सर्व अधिकारी काकांना काकासाहेब असे आदराने म्हणत असत. पुढे तेच प्रचलित राहिले. एका अल्प आजाराने २२ जुलै १९७३ ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
(कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ताहाराबाद, ता. बागलाण, जि. नाशिक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.