विद्यार्थी आंदोलनात बदलाची बीजे

धनंजय बिजले
शनिवार, 18 जानेवारी 2020

सध्या एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सर्वसामान्यांचे अधिकार याविषयी चर्चेला तोंड फुटले असताना माहिती अधिकाराच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्त्या अरुणा रॉय यांच्याशी सद्यःस्थितीबाबत केलेली बातचीत.

प्रश्‍न : माहिती अधिकार कायद्याच्या भवितव्याबाबत आपल्याला काय वाटते?
रॉय : रेशन कार्ड असो की आधार कार्ड, शासन व्यवस्था नेहमी लोकांकडेच माहिती मागते. माहितीचा अधिकार हा एकमेव कायदा आहे, की जेथे लोक व्यवस्थेकडे आपल्याला हवी ती हक्काची माहिती मागू शकतात. वर्षानुवर्षे जे घडतंय ते मुकेपणानं पहात राहण्याची संस्कृती या कायद्यामुळे आता बदलली आहे. लोक आता व्यवस्थेला प्रश्‍न विचारत आहेत. प्रश्‍न विचारण्याची संस्कृती रुजत आहे. हा कायदा वापरणाऱ्यांवर अनेक ठिकाणी हल्ले झाले. यात ८० जणांचा बळी गेला आहे. पण तरीही लोक मागे हटण्यास तयार नाहीत. माहितीच्या अधिकाराचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. त्यामुळे याला चांगले भवितव्य आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

: माहिती अधिकार कायद्याची सद्यःस्थिती काय आहे?
: देशात दरवर्षी ७० ते ८० लाख लोक माहितीच्या अधिकाराचा वापर करीत आहेत. जगात सर्वाधिक वापर आपल्याकडे होतो. ज्या ज्या देशांत माहितीचा अधिकार आहे त्यामध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. याचे अन्य देशांतील लोकांना फार कौतुक वाटते. ते आपल्या देशात पाहणीसाठी येतात.

: या कायद्याची धार बोथट करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यावर काय वाटते?
: माहितीद्वारे सर्वसामान्य माणूस सत्तेत हिस्सा मागतो. व्यवस्थेला उत्तरदायी बनवितो. त्यामुळे असे प्रयत्न केले जाणारच. हे आव्हान पेलतच पुढे जावे लागणार. न्यायालय तसेच अन्य मार्गांनी अशा प्रयत्नांना रोखण्याचे काम करावे लागणार. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांसाठी भविष्यात फार मोठे आव्हानात्मक काम आहे.

: देशात सध्या विद्यार्थ्यांची मोठी आंदोलने सुरू आहेत. त्याबाबत आपल्याला काय वाटते?
: अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, भाषण स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे प्रकार सध्या घडत आहेत. एखाद्याने विरोधी मत मांडले की त्याला देशद्रोही ठरविले जाते, सोशल मीडियात ट्रोल केले जाते. त्यामुळे सर्वसामान्यच नव्हे तर समाजातील मान्यवरही आपली स्पष्ट मते मांडण्यास संकोच करतात. त्या पार्श्‍वभूमीवर देशाच्या विविध शहरांतील विद्यार्थी निडरपणे पुढे येत आहेत, हे लोकशाहीसाठी आश्‍वासक चित्र आहे. आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राजकीय पक्षांना, तुम्हा-आम्हाला भीतीच्या वातावरणाविरुद्ध निर्भीडपणे आवाज कसा उठवायचा हे शिकविले आहे. राजकीय मानसिकता बदलण्याचे काम विद्यार्थी करीत आहेत. 

: विद्यार्थी आंदोलने आपणास इतकी महत्त्वाची का वाटतात? 
: विद्यार्थी प्रगल्भपणे ही आंदोलन करीत आहेत. आंदोलनात ते घटनेचा विचार पुढे आणत आहेत. गेले दहा वर्षे आम्ही हेच सांगत होतो. आता हीच मागणी या तरुणांची आहे. लोकशाही पद्धतीने, संयतपणे ते मागण्या मांडत आहेत. त्यामुळे ही आंदोलने लोकप्रिय आहेत; पण त्यात सवंगपणा नाही. त्यात एक तर्क आहे, बुद्धी आहे. घटनेचा मार्ग सोडलेल्या थोरामोठ्यांना जागेवर आणण्याचे काम विद्यार्थी करीत आहेत. घटनेला विसरू नका, त्याच्या आधारेच आपण उभे आहोत, हे त्यांनी लक्षात आणून दिले आहे. हे सांगण्यात मोठे धारिष्ट्य आहे. ज्यांना समजायचे ते यातून समजून घेतील. एक मात्र नक्की, सर्वसामान्यांमध्ये आलेली भीतीची मानसिकता बदलण्याचे काम या आंदोलनांनी केले आहे. समाजाला विद्यार्थ्यांनी दिलेली ही एक भेटच आहे.

: या आंदोलनांमागे डाव्या संघटना असल्याचा आरोप होत आहे. त्याबद्दल तुमचे मत काय?
: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) आंदोलनामागे कदाचित डावे असू शकतात. कारण ‘जेएनयू’ नेहमीच डाव्यांचा गड राहिलेला आहे आणि पुढेही राहील. मात्र विविध शहरांतील ‘जामिया मिलिया’सह अन्य विद्यापीठांतही ‘सीएए’पासून ते अन्य मागण्यांसाठी विद्यार्थी धीटपणे आंदोलन करीत आहेत. त्यामागे डावे नाहीत. हा नागरिकांचा आगळावेगळा आविष्कार आहे. घटनात्मक अधिकारांचा हुंकार आहे. आंदोलनांतील अनेक तरुणांच्या मुलाखती मी पाहिल्या. ते संयतपणे आपल्या संविधानिक अधिकारांविषयी बोलत आहेत. सर्व राजकीय पक्षांनी यातून धडा घेण्याची गरज आहे.

: जगात अनेक देशांत सध्या विविध मागण्यांसाठी आंदोलने पहायला मिळत आहेत. तुम्हाला यात काही समानता दिसते?
: जगात अनेक ठिकाणी अशाच प्रकारचे हुकूमशाही वृत्तीचे शासनकर्ते पहायला मिळत आहेत. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली जात आहे. आणि जर जगातील तरुण याविरुद्ध आवाज उठवित असतील तर हे नक्कीच आशादायी चित्र आहे. या आंदोलनाला कोणी एक चेहरा, नेता नाही. त्यामुळे हे आंदोलन कोणी मोडू शकत नाही.

: फाशीच्या शिक्षेबाबत नेहमी चर्चा होते. आजही आपला फाशीला विरोधच आहे का?
: फाशीची शिक्षा असूच नये, असे मला आजही वाटते. कारण आपण घृणास्पद कृत्याचा बदला या नजरेतून त्याकडे पाहतो. ‘बदला’ व ‘न्याय’ या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. बलात्काऱ्यांना फाशी देण्याने बलात्कार थांबणार नाहीत. त्यासाठी समाजाची सोच बदलायला हवी. ही मोठी प्रक्रिया आहे. असे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे; पण ती फाशीच असायला पाहिजे असे नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Bijale article Student Movement