जनआंदोलन आणि आणीबाणी (१९७० ते १९८०) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chipko Agitation

भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सत्तरचे दशक प्रचंड वादळी व राजकीय उलथापालथीचे दशक म्हणून ओळखले जाते.

जनआंदोलन आणि आणीबाणी (१९७० ते १९८०)

प्रचंड वादळी व राजकीय उलथापालथीचे दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्तरच्या दशकाने भारतातील राजकारण, समाजकारण यांना विलक्षण कलाटणी दिली. बिहार, गुजरातमधील विद्यार्थी आंदोलनांपासून जयप्रकाश नारायण यांच्या झंझावातापर्यंत आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर उसळलेल्या जनक्षोभानंतर त्याच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्यापर्यंतच्या अनेक घटना पाहणारे हे दशक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरले. या झंझावाती दशकाचा वेध....

भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सत्तरचे दशक प्रचंड वादळी व राजकीय उलथापालथीचे दशक म्हणून ओळखले जाते. बांगलादेश मुक्तीनंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकप्रियता शिगेला पोहचल्याचे आणि आणीबाणीमुळे रसातळाला गेल्याचे याच काळात जनतेने अनुभवले. जयप्रकाश नारायण यांच्या झंजावातापुढे याच दशकात काँग्रेसचा पालापाचोळा झाला आणि देशाने प्रथमच विरोधी पक्षाचे सरकार अनुभवले. गुजरात, बिहारमधून सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाची परिणती अखेर कॉंग्रेसच्या पतनात झाली. लोकशाहीच्या सबलीकरणासाठी हा लढा आवश्यकच होता. यामुळे विरोधी पक्षांनाही उमेद, विश्वास मिळाला. लोकशाहीत सत्तारूढ पक्षाप्रमाणेच विरोधकही सक्षम असण्याची गरज असते.

तरच सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळतो. जेपींच्या आंदोलनाने हा हेतू बऱ्याच अंशी साध्य झाला. या आंदोलनानांतरच देशात विरोधी राजकीय पक्षांना प्रथमच जनाधार मिळाला. त्यावेळचे सरकार फार काळ टिकले नाही. मात्र, त्यानंतर विविध निवडणुकांत विरोधकांनी सत्ता मिळवून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आज देशात एकही असे राज्य नाही की जेथे काँग्रेसतर पक्षाचे सरकार किमान एकदा तरी सत्तेवर आलेले नाही. याची मुहूर्तमेढ सत्तरच्या दशकांत रोवली गेली.

बांगलादेशची निर्मिती

दक्षिण आशियातील संतुलन राखण्याच्या दृष्टीने सत्तरच्या दशकाच्या प्रारंभीच एक महत्त्वाची घटना घडली. ती म्हणजे सोव्हिएत रशियासमवेत भारताचा झालेला करार. ९ ऑगस्ट १९७१ रोजी झालेल्या या करारामुळे भारताला सुरक्षिततेची हमी देणारा मित्र मिळाला. अमेरिका व चीन पाकिस्तानची पाठराखण करीत असल्याने सत्तासंतुलनाच्या दृष्टीने रशियाशी मैत्री होणे फार महत्त्वाची होती. त्याची प्रचिती लगेचच झालेल्या पाकिस्तान युद्धात दिसून आली. पूर्व पाकिस्तानातील अनागोंदी, पश्चिम पाकिस्तानातून पाठवलेल्या सैन्याने सुरु केलेले प्रचंड अत्याचार यामुळे पूर्व पाकिस्तानातून लाखोंच्या संख्येने निर्वासित भारतात येऊ लागले. याचा भारतावर आर्थिक ताण येऊ लागला. परिस्थिती चिघळत गेली अन् याचे पर्यवसान ३ डिसेंबर १९७१ रोजी भारत- पाकिस्तान युद्धात झाले. पाकिस्तानी हवाई दलाने, नौदलाने भारतीय ठाण्यांना लक्ष्य केले. भारतीय सैन्याने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय नौदलाने कराची बंदरातील दोन पाकिस्तानी विनाशिकांना जलसमाधी दिली.

पाकिस्तानला शह देण्यासाठी भारताने पूर्व पाकिस्तानच्या दिशेने जोरदार आघाडी उघडली. बांगलादेश मुक्तिवाहिनीच्या सशस्त्र दलांच्या साथीने भारतीय लष्कराने चार वेगवेगळ्या दिशांनी ढाक्याकडे कूच केले. पाकिस्तानी लष्कराचा प्रतिकार मोडून काढत महत्त्वाची गावे आणि शहरे काबीज करीत भारतीय लष्कराने ढाक्याला सर्व बाजूंनी वेढा घातला. याच दरम्यान अमेरिकेने भारतावर दबाव आणण्यासाठी आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात तैनात करण्याची तयारी सुरू केली. या काळात सोव्हिएत रशियाचे भारताला पूर्ण समर्थन होते. अखेर पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष याह्याखान यांनी जनरल नियाझी यांना शरणागती पत्करण्याचे आदेश दिले. १६ डिसेंबर रोजी भारतीय लष्कराच्या पूर्व विभागाचे लेफ्टनंट जनरल जे. एस. अरोरा यांच्यापुढे पाकिस्तानचे जनरल नियाझी यांनी शरणागती पत्करली. त्याच दिवशी बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली आणि जगाच्या नकाशावर एक नवा देश अवतरला. या युद्धात पाकिस्तानचे ८००० सैनिक मारले गेले तर ९० हजार सैनिकांना भारतीय लष्कराने युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले.

महत्त्वपूर्ण सिमला करार

युद्धातील दारुण पराभवानंतर पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल याह्याखान यांना राजीनामा द्यावा लागला. झुल्फिकार अली भुत्तो यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानात नवे सरकार आले. युद्धसंमाप्तीनंतर दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित होण्यासाठी भुत्तो व इंदिरा गांधी यांच्यात २ जुलै १९७२ रोजी सिमला येथे शिखर बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर सविस्तर वाटाघाटी झाल्या. दोन्ही देशांमध्ये शांतता नांदावी या हेतूने यावेळी सिमला करार करण्यात आला. काश्मीरसह दोन्ही देशांतील सर्व प्रश्न द्विपक्षीय वाटाघाटींनीच सोडवायचे हे या करारात मान्य करण्यात आले. त्यामुळे काश्मीरप्रश्नी तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीचे दरवाजे इंदिरा गांधी यांनी कायमचे बंद करून टाकले. त्यामुळे आज ५० वर्षांनंतरही या कराराचे महत्त्व अबाधित राहिले आहे. गेली ५० वर्षे सिमला करारच भारत- पाकिस्तान चर्चेचा आधार राहिलेला आहे.

बांगलादेशच्या निर्मितीमुळे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा जगभर उंचावली. कणखर, मुत्सद्दी, चतुर नेत्या म्हणून जगभर त्यांची ख्याती झाली. देशातही त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली. पाकिस्तानविरोधात युद्ध जिंकल्याने देशभर भारलेले वातावरण होते. मात्र, त्याचा फार काळ कॉंग्रेसला लाभ उठवता आला नाही. अवघ्या दोन-तीन वर्षांत देशातील वातावरण पुरते पालटून गेले होते. महागाई, भ्रष्टाचारामुळे जनतेत संतापाची भावना होती. त्याचा उद्रेक गुजरातमध्ये झाला.

भ्रष्टाचाराविरुद्ध पहिले आंदोलन

गुजरातची भूमी ही राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जन्मभूमी. मात्र, या राज्यातील कॉंग्रेसची राजवट भ्रष्टाचारामुळे कुप्रसिद्ध झाली होती. कॉंग्रेसचे तरुण नेते चिमणभाई पटेल राज्याचे मुख्यमंत्री होते. याच काळात मोठा दुष्काळ पडला. यामुळे अन्नधान्य, खाद्यतेलाचे भाव आकाशाला भिडले. भ्रष्टाचारात महागाईची भर पडली आणि जनतेच्या रागाला पारावर उरला नाही. संतापाची ही वाफ अहमदाबादमधील एल. डी. इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडली. मुलांच्या मेसचे मासिक बिल सत्तर रुपयांवरून शंभर रुपये झाल्याचे निमित्त घडले. १९७४ मध्ये या विद्यार्थ्यांनी चिमणभाई सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आणि आंदोलन सुरू केले. आंदोलन हिंसक बनू लागले. मंत्र्यांच्या घरावर मोर्चे निघू लागले. लष्कराला पाचारण करावे लागले. पोलिसांच्या गोळीबारात अनेकांचा बळी गेला. अखेर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सरकार बरखास्त करीत चिमणभाई पटेल यांची पक्षातून हकालपट्टी केली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एखाद्या मुख्यमंत्र्याला सत्तेतून पायउतार व्हावे लागण्याची देशातील ही पहिलीच घटना होती. भ्रष्टाचाराविरोधातील देशातील पहिले यशस्वी आंदोलन म्हणून गुजरातमधील विद्यार्थी आंदोलनाकडे पाहावे लागेल. त्यामुळेच या लढ्याला स्वातंत्र्योत्तर भारतात महत्त्वाचे स्थान आहे.

जे. पी. नावाचा झंजावात

बिहारमध्ये प्रचंड राजकीय अस्थैर्य माजले होते. जमिनीच्या विषम वाटपामुळे ग्रामीण भागात असंतोष धुमसत होता, तर शहरांत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या. गुजरातच्या घटनांनी बिहारमधील विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली. त्यांनी बिहारमधील गैरकारभाराबद्दल आंदोलन सुरू केले. कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली डावे गट महागाईविरुद्ध एक आले होते. त्यांनी निदर्शने सुरू केली. त्यांचा लढा पाहून अखिल भारतीय विद्यार्थी परिषददेखील आंदोलनाच्या स्पर्धेत उतरली. अभाविप आणि बिगर कम्युनिस्ट गटांनी एकत्र येत स्वतःचे एकजुटीचे व्यासपीठ छात्र संघर्ष समिती स्थापन केली. १८ मार्च १९७४ रोजी छात्र संघर्ष समितीने पाटण्यात विधानभवनावर मोर्चा काढला. त्यावेळी जमाव संतप्त झाला.

जमावाने सरकारी कचेऱ्या, पोलिस ठाणी, वृत्तपत्रांची कार्यालये आदी वास्तूंना आगी लावल्या. या धुमश्चक्रीत अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले, तर तिघांचा बळी गेला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी जयप्रकाश नारायण यांना या आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. त्यावेळी जयप्रकाश नारायण ७१ वर्षांचे होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी जयप्रकाश नारायण मंत्रिमंडळात सहभागी व्हावेत यासाठी अनेकदा प्रयत्न केले होते. मात्र, जेपींनी त्याला ठाम नकार दिला होता. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले अनेक नेते मंत्री किंवा विविध सरकारी पदांवर विराजमान झाले होते. जयप्रकाश नारायण मात्र सरकारबाहेर राहून जेव्हा त्यांना वाटेल त्यावेळी ते नेहरूंच्या धोरणांवर टीका करीत असत. यामुळे त्यांच्याभोवती एक वेगळेच वलय निर्माण झाले होते.

जयप्रकाशजींचा नैतिक अधिकार मोठा होता. त्यांच्या आगमनाने विद्यार्थी चळवळीला मोठी उभारी आली. जेपींनी विद्यार्थ्यांना वर्गावर बहिष्कार टाकण्यास सांगितले. शिक्षण सोडून लोकांत एक वर्षभर जागृती निर्माण करण्याचा आदेश दिला. साऱ्या बिहारमध्ये शाळा, महाविद्यालये बंद करू पाहणारे विद्यार्थी आणि पोलिसांच्या मदतीने ती सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणारे संस्थाचालक असा संघर्ष पेटला. शहरात याचे लोण अधिक वेगाने फोफावले.

संपूर्ण क्रांतीचे स्वप्न

जेपींनी ५ जून १९७४ रोजी पाटण्यात एका प्रचंड मिरवणुकीचे नेतृत्व केले. त्याची सांगता गांधी मैदानावरील सभेने झाली. तेथेच जेपींनी संपूर्ण क्रांतीची घोषणा केली. स्वातंत्र्य चळवळीने जी आश्वासने दिली आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण क्रांती आवश्यक आहे असे जेपींनी स्पष्ट केले. ऐन तारुण्यात असताना त्यांनी जे संपूर्ण क्रांतीचे स्वप्न पाहिले होते ते त्यांना प्रत्यक्षात आणायचे होते. लोकांमधील उत्साहाला वळण लावून देशव्यापी लोकचळवळ संघटित करण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी त्यांनी सर्व विरोधक, कामगार संघटना, शेतकरी संघटनांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते.

त्याचाच एक भाग म्हणून जेपींनी ६ मार्च १९७५ रोजी संसदेवर मोर्चाचे आयोजन केले. यावेळी जेपींशी चर्चा करावी असे जाहीर आवाहन केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांनी केले होते. त्यांना याचे प्रायश्चित्त भोगावे लागले. इंदिरा गांधीच्या मंत्रिमंडळातून त्यांची तत्काळ उचलबांगडी झाली. जेपींचा मोर्चा यशस्वी होऊ नये म्हणून सरकारने कंबरच कसली होती; पण बंदीला न जुमानता लोकांचे लोंढेच्या लोंढे राजधानीत धडकू लागले. सहा मार्च रोजी जेपींनी संसदेच्या दिशेने चालायला सुरवात केली. मोर्चात तब्बल साडे सात लाख लोक सहभागी झाले होते. बोट क्लबवर जेपींनी हृदयाला ठाव घालणारे भाषण केले.

आणीबाणीने देश हादरला

१२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची लोकसभेची निवडणूक अवैध ठरविली. २५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी घोषित केली अन् एकच हलकल्लोळ माजला. जेपींसह विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना अटक करण्यात आली. वृत्तपत्रांवर बंधने लादण्यात आली. यावेळी देशभरात सुमारे ३६ हजार जणांना मिसाखाली अटक करण्यात आली होती. या काळात लोकशाही हक्कांची प्रचंड गळचेपी झाली. पुढे दीड वर्षे देशात आणीबाणीचे पर्व सुरू होते. सर्व विरोधकांनी आणीबाणीविरोधात देशव्यापी लढा उभारला. भारताच्या लोकशाही इतिहासातील हा काळा कालखंड मानला जातो. विनोबा भावेंनी आणीबाणीचे वर्णन अनुशासन पर्व असे केल्याने मोठा वाद निर्माण झाला. पुढे त्यांनी व जे. कृष्णमूर्ती यांनी आणीबाणी उठवण्यासाठी प्रयत्न केले. अखेर १८ जानेवारी १९७७ रोजी इंदिरा गांधींनी आणीबाणी समाप्तीची घोषणा करीत निवडणुका जाहीर केल्या. सर्वांसाठी हा आश्चर्याचा धक्काच होता.

आकाशवाणीवरून देशाला संबोधित करताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या, ‘‘१८ महिन्यांपूर्वी देश संकटाच्या खाईत लोटला जाणार होता. त्यामुळे आणीबाणी लावावी लागली. आता परिस्थिती सुधारल्याने आपण निवडणुका घेऊ शकतो.’’ यानंतर अवघ्या चारच दिवसांनी २३ जानेवारीला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाच्या स्थापनेची औपचारिक घोषणा करण्यात आली. या निवडणुकीत जेपी मुख्य प्रचारक होते. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी देशाच्या मोठ्या शहरांत लाखोंच्या सभा घेतल्या. त्यावेळी जेपींचा इतका प्रभाव होता, की त्यांच्या झंजावातापुढे सारे निष्प्रभ झाले.

धक्कादायक निवडणूक निकाल

२२ मार्च १९७७ रोजी या ऐतिहासिक निवडणुकीचे निकाल लागले. देशाच्या इतिहासातील धक्कादायक निकालांनी व्यापलेली ही निवडणूक होती. प्रत्यक्ष पंतप्रधान इंदिरा गांधी सुरक्षित अशा रायबरेली मतदारसंघातून पराभूत झाल्या, तर शेजारी अमेठीत संजय गांधी यांना साधे नामोनिशाण नसलेल्या विद्यार्थ्यांने हरविले. इंदिरा गांधीच्या मंत्रिमंडळातील ४९ पैकी तब्बल ३४ मंत्री पराभूत झाले. लोकसभेत ५४२ जागांपैकी जनता पक्ष व मित्रपक्षांना मिळून ३०० हून जास्त जागा, तर कॉंग्रेसला अवघ्या १५४ जागा मिळाल्या. उत्तर प्रदेशात सर्वं ८५ तर बिहारमध्ये सर्व ५४ जागांवर कॅंग्रेस पराभूत झाली. देशात प्रथमच बिगरकॉंग्रेस सरकार सत्तेवर आले; पण सुरवातीपासूनच पंतप्रधान कोणाला बनवायचे यावरून संघर्ष झाला. अखेर जेपी आणि जे. बी. कृपलानी या ज्येष्ठ नेत्यांनी ठरविल्याप्रमाणे मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. अंतर्गत वादामुळे जनता सरकारचा प्रयोग फार काळ चालला नाही. अवघ्या सव्वादोन वर्षांत सरकार कोसळले. पुढच्याच निवडणुकीत इंदिराजी पुन्हा सत्तेवर आल्या. १० जानेवारी १९८० रोजी त्या पुन्हा पंतप्रधान बनल्या.

भारतीय जनता पक्षाची स्थापना

१९७९-८० च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जनता पक्षातून पूर्वाश्रमीचे जनसंघाचे लोक बाहेर पडले. सहा एप्रिल १९८० रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्याची घोषणा करण्यात आली. या पक्षातील सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते १९७७ च्या आधी जनसंघात होते. पुढे १९८४ मध्ये भाजप लोकसभेची पहिली निवडणूक लढला. त्यावेळी पक्षाचे केवळ दोन खासदार निवडून आले. मात्र, या पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी कधीच हार मानली नाही. कुशल संघटन, बिगर कॉंग्रेसवाद घेऊन पुढे निघालेल्या भाजपने आज देशातील सर्वांत बलवान पक्ष म्हणून ख्याती मिळविली आहे. अशा प्रकारे राजकीय उलथापालथीचे हे दशक ठरले.

श्रीहरिकोटामध्ये अवकाशतळ

उपग्रह प्रक्षेपणात आज भारत जगात आघाडीवर आहे. या क्षेत्रातील प्रगतीमुळे भारताचे नाव आघाडीच्या विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसले आहे. त्याची मुहूर्तमेढ ९ ऑक्टोबर १९७१ रोजी रोवली गेली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याच दिवशी आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यांतील श्रीहरिकोटा या बंदरावर सुसज्ज अवकाशतळ सुरू झाला. उपग्रह प्रक्षेपणासाठी अतिशय सुयोग्य ठिकाण असल्याचे श्रीहरिकोटाने केंद्राने आतापर्यंत वारंवार सिद्ध करून दाखविले आहे.

पर्यावरणवादी आंदोलनांची मुहूर्तमेढ

याच दशकात देशात पर्यावरणासाठीच्या लढ्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. सन १९७३ मध्ये हिमाचल प्रदेशातील गांधीवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांनी अलकनंदा नदीच्‍या खोऱ्यात चिपको आंदोलन सुरू केले. झाडांना आलिंगन देत महिलांनी जंगलतोडीला विरोध दर्शविला. १९७६ मध्ये विख्यात पक्षितज्ज्ञ सालीम अली यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये सायलेंट व्हॅली बचाव आंदोलन झाले. साहित्यिक, प्राध्यापक, तज्ज्ञ या आंदोलनात उतरल्याने यातून देशभर पर्यावरण जागृतीसाठी विचारमंथन झाले, तर १९७८ मध्ये उत्तर काशी भागातील टिहरी धरण प्रकल्पाविरुद्ध बहुगुणा यांनी दंड थोपटले.

‘ॲंग्री यंग मॅन’चा उदय

चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, असे म्हटले जाते. बाहेर जनता महागाई, भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करीत असताना देशाला चित्रपटाच्या पडद्यावर अमिताभ बच्चनच्या रूपाने अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा नायक मिळाला. १९७३ मध्ये प्रकाश मेहरा यांच्या ‘जंजीर’मधून संतप्त युवक आला, तर १९७५ मध्ये यश चोप्रा यांच्या ‘दीवार’ने त्यावर कळस चढविला. चित्रपटातील नायक जणू जनतेचा प्रतिनिधीच झाला होता. अमिताभ बच्चन यांच्यात त्यावेळी समाज आपले प्रतिबिंब पाहत होता. याच दशकात १९७५ मध्ये रमेश सिप्पी यांचा ‘शोले’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाने इतिहास घडविला.

रोजगार हमी योजनेला सुरुवात

१९७२ च्या दुष्काळानंतर महाराष्ट्रात राज्य सरकारने लोकांना रोजगार देण्याचा प्रयोग केला होता. १९७९ मध्ये बेरोजगारांना रोजगाराची खात्री देणाऱ्या रोजगार हमी योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेचे देशभर कौतुक झाले. या योजनेतून कोट्यवधी लोकांच्या हाताला काम मिळाले.

पोखरणमध्ये यशस्वी अणुचाचणी

१८ मे १९७४ रोजी राजस्थानातील पोखरण येथे भारतीय अणुशास्त्रज्ञांनी पहिली यशस्वी अणुचाचणी घेतली. यामुळे साऱ्या जगाला विस्मयाचा धक्का बसला. भारताने शांतता व स्वयंपूर्णतेसाठी ही अणुचाचणी घेतल्याचे जाहीर करत जगातील टीकेची धार बोथट केली. या अणुचाचणीने भारताचे जगातील स्थान उंचावले.

महत्त्वाचा घटनाक्रम...

१९७१

 • १० मार्च १९७१ : गरिबी हटावचाचा नारा देत लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला लक्षणीय यश. एकूण ३५२ जागांवर विजय.

 • ९ ऑगस्ट : भारत आणि सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये परस्पर सुरक्षिततेची हमी देणारा ऐतिहासिक मैत्री करार.

 • ९ ऑक्टोबर : उपग्रह अंतरिक्षात प्रक्षेपित करण्यासाठी श्रीहरिकोटा येथील अवकाशतळ कार्यान्वित झाला.

 • ३ डिसेंबर : भारत-पाकिस्तान दरम्यान युद्धाला तोंड फुटले. हे युद्ध १६ डिसेंबर १९७१ पर्यंत सुरू राहिले. सन १९४७ पासून पाकिस्तानात समाविष्ट असलेला पूर्व पाकिस्तानचा भाग या युद्धानंतर पाकिस्तानपासून विलग झाला आणि बांगलादेश हे नवे राष्ट्र उदयास आले.

 • ३१ डिसेंबर : संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्याबाबतच्या घटनादुरुस्तीला राष्‍ट्रपतींची मंजुरी.

१९७२

 • २१ जानेवारी : ईशान्य भारतातील मेघालय, मणिपूर व त्रिपुरा या प्रांतांना स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा प्रदान.

 • २४ मे : नामदेव ढसाळ यांच्या नेतृत्वाखाली दलित पॅंथर या संघटनेची मुंबईत स्थापना.

 • ३ जुलै : भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांच्यात सिमला करार.

 • : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा १०+२+३ अाकृतिबंध लागू करण्यात आला.

 • : महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये भीषण दुष्काळ. महाराष्ट्रात ३० हजार गावे या दुष्काळात होरपळून निघाली. रेशनसाठी दुकानांसमोर मोठ्या रांगा.

१९७४

 • जानेवारी : भ्रष्टाचाराविरोधात देशातील पहिले जनआंदोलन. गुजरातमध्ये सरकारविरुद्ध विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू.

 • १८ मे : राजस्थानातील पोखरण येथे भूगर्भात अणुचाचणी यशस्वी.

 • : जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलनाचे देशव्यापी जनआंदोलनात रूपांतर.

१९७५

 • जून : गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव.

 • १२ जून : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १९७१ मधील लोकसभा निवडणुकीविरुद्ध राजनारायण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा निकाल. न्या. जगमोहन सिन्हा यांनी गांधी यांची निवड अवैध ठरवून सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले.

 • २४ जून : इंदिरा गांधी यांनी संसदेत मतदान करू नये, या अटीवर पंतप्रधान म्हणून राहण्यास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता.

 • २५ जून : जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विरोधकाचे रामलीला मैदानावर प्रचंड आंदोलन.

 • २६ जून : इंदिरा गांधींकडून आणीबाणीची घोषणा. देशभरात अनेक विरोधी नेत्यांना अटक.

 • ७ नोव्हेंबर : इंदार गांधींची निवड वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा एकमुखी निर्णय.

 • १२ नोव्हेंबर : प्रकृतीच्या कारणास्तव जयप्रकाश नारायण यांची कारागृहातून मुक्तता.

 • १३ सप्टेंबर : महागाईच्या विरोधात ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मध्यमवर्गीय कामगार गृहिणींचा लाटणे मोर्चा.

१९७६

 • जून : बडोदा डायनामाईट खटल्यात जॉर्ज फर्नांडिस यांना अटक.

१९७७

 • जानेवारी : मार्चमध्ये निवडणुका घेण्याची इंदिरा गांधी यांची घोषणा. विरोधी जनता पक्षाची स्थापना.

 • मार्च : लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा पराभव. जनता पक्षाला घवघवीत यश.

 • २४ मार्च : मोरारजी देसाई यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी. देशात प्रथमच काँग्रेसतर सरकारची स्थापना. बडोदा डायनामाईट खटल्यातील आरोपींची नव्या सरकारकडून मुक्तता.

 • मे : इंदिरा गांधीवरील गुन्ह्यांची चौकशीसाठी जनता सरकारकडून शहा आयोगाची नियुक्ती.

 • ३ ऑक्टोबर : जनता सरकारकडून इंदिरा गांधींना अटक. दुसऱ्या दिवशी मुक्तता.

१९७९

 • २८ जुलै : पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर चरणसिंह यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी.

 • ९ ऑगस्ट : शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली चाकणला शेतकरी संघटनेची स्थापना.

 • २० ऑगस्ट : चरणसिंह सरकारचा राजीनामा.

१९८०

 • ८ जानेवारी : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस (इंदिरा) पक्षाला दोनतृतीयांश बहुमत. जनता पक्ष पराभूत.

 • १४ जानेवारी : इंदिरा गांधींचा पंतप्रधान म्हणून शपथविधी.

 • ६ एप्रिल : भारतीय जनता पक्षाची स्थापना.