'नकारात्मकता काढून टाका' (धनश्री काडगावकर)

धनश्री काडगावकर
रविवार, 9 जून 2019

आपलं आयुष्य आनंदी होण्यासाठी मानसिक अन्‌ शारीरिक आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या जे पाहिजे ते मिळालं नाही, तर आपण नाराज होतो. त्यामुळं आपल्यात नकारात्मकता येते. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यासह मानसिक स्थितीवरही होतो. त्यामुळं आपल्यातली नकारात्मकता काढून टाकून आनंदी राहणं ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आपण मानसिकदृष्ट्या शांत राहतो, त्यावेळी आपणही आरोग्यसंपन्न असतो.

आपलं आयुष्य आनंदी होण्यासाठी मानसिक अन्‌ शारीरिक आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या जे पाहिजे ते मिळालं नाही, तर आपण नाराज होतो. त्यामुळं आपल्यात नकारात्मकता येते. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यासह मानसिक स्थितीवरही होतो. त्यामुळं आपल्यातली नकारात्मकता काढून टाकून आनंदी राहणं ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आपण मानसिकदृष्ट्या शांत राहतो, त्यावेळी आपणही आरोग्यसंपन्न असतो.

आपलं आयुष्य आनंदी होण्यासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्यामध्ये प्रामुख्यानं आपलं मानसिक अन्‌ शारीरिक आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या जे पाहिजे, ते जर मिळालं नाही तर आपण नाराज होतो. त्यामुळे आपल्यात नकारात्मकता येते. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यासह मानसिक स्थितीवरही होतो. त्यामुळं आपल्यातली नकारात्मकता काढून टाकून आनंदी राहणं ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आपण मानसिकदृष्ट्या शांत राहतो, त्यावेळी आपणही आरोग्यसंपन्न असतो. त्यासाठी आपलं दैनंदिन जीवन योग्य प्रकारे जगण्याची गरज आहे. चित्रीकरणामुळे आम्हाला अनेकदा या गोष्टी पाळता येत नाहीत; पण ज्यावेळी शक्‍य असेल, त्यावेळी त्याची आम्ही नक्कीच अंमलबजावणी करतो. आहारावर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणं कोणत्या ना कोणत्या शारीरिक हालचाली करणंही उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. मग तुम्ही डान्स करा, खेळ खेळा काही काही करा. ज्या गोष्टींतून आत्मसमाधान मिळतं, त्या गोष्टी आवर्जून करा.

माझा आरोग्याचा मंत्र म्हणजे कामात झोकून देणं. अभिनयात असल्यानं मी माझ्या पात्राशी इतकी एकरूप होते, की त्यातून मला खूप समाधान मिळतं. आजकाल अनेकजण डाएटच्या नावाखाली पाश्‍चिमात्य पदार्थ खातात. त्यामुळे नकळत आपलं आरोग्य बिघडतं. मात्र, मला जे आवडतं, ते मी खाते. सध्या मी "तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या चित्रीकरणामुळे कोल्हापूरमध्ये असल्यानं तिथल्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारते. खरंतर व्यायाम आणि आहार हाच चांगल्या आरोग्याचा मंत्र आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न मी करते.
मालिकेच्या चित्रीकरणामुळे आमचं वेळेचं गणित ठरलेलं नसतं. कधी सकाळी, तर कधी रात्रीही चित्रीकरण असतं. त्यामुळे खाण्यापिण्याच्या वेळा अनेकदा पाळता येत नाहीत. त्यातच मी मांसाहारी जेवण खातं नाही. मात्र, ज्या गोष्टींमधून प्रोटिन मिळेल, ते शाकाहारी पदार्थ आवर्जून खाते. सॅलड तर माझ्या आहारात नक्कीच असतं. मला आईनं बनवलेल्या पुरणपोळ्या खूप आवडतात. त्यातच गोड पदार्थांची मी चाहती आहे; पण गुलाबजाम, खजूर आवडतात. मात्र, मी माझ्या मनावर ताबा ठेवते. अर्थात मन मारून काही गोष्टी अजिबात करत नाही. आपल्याला रोज वडापाव आवडणार नाही; पण कधीतरी वाटलं तर तो नक्कीच खावा. मी शक्‍यतो मसालेदार पदार्थ टाळते. त्यामुळे ऍसिडिटी मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणून मी काळजी घेते. दररोज चार लिटर पाणी पिते. तसंच, सकाळी उठल्याबरोबर गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिते. मला फळं खूप आवडतात. त्यातच आंबा मला अतिशय आवडतो. कलिंगडही आवडतं. फळ खाल्यानंतर खूप हेल्दी वाटतं. ज्या भागात जाते, तिथली फळं मी आवर्जून खाते. माझी मैत्रीण काश्‍मीरला गेली होती, तिनं खास माझ्यासाठी तिथलं सफरचंद आणलं होतं. ते खाऊन खूप समाधान वाटलं.

खरं तर व्यायाम हा प्रत्येकासाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी सकाळीच उठून व्यायाम करते. मात्र, सकाळी शक्‍य झालं नाही तर रात्री किंवा जेव्हा वेळ मिळेल, त्यावेळी व्यायाम करते. माझ्या व्यायामामध्ये कार्डिओ, रनिंग, जॉगिंग, फंक्‍शनल ट्रेनिंग, वेट ट्रेनिंगचा समावेश असतो. माझ्या प्रशिक्षकानं माझं वजन, वय आणि उंचीनुसार कोणते एक्‍झरसाईझ करायचे, हे सांगितलं आहे. त्यानुसारच हे व्यायाम करते. सध्या मी कोल्हापूरमध्ये आलोक पद्माकर याच्या मसल ट्री जिममध्ये एक्‍झरसाईझ करते. त्यापूर्वी मी मसल युनिटमध्ये एक्‍सरसाईज करत होते. सध्या सर्वजण प्रसिद्धी आणि पैशांच्या मागं लागले आहेत. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. मात्र, चांगलं काम होण्यासाठी जसा होमवर्क करावा लागतो, त्याचप्रमाणं शरीरसंपदेकडे लक्ष देण्यासाठीही चांगलाच होमवर्क केला पाहिजे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम गरजेचाच आहे. मी कोल्हापूरला ज्या बिल्डिंगमध्ये राहते, तिथं खूप लहान मुलं आहेत. ती सायकल खेळतात. माझ्या मनात आलं, तर मीही सायकलिंग करते. त्यामुळं अनेक जण मला पाहून "वहिनीसाहेब' सायकलवर म्हणतात अन्‌ आश्‍चर्यचकितही होतात.

व्यायामाबरोबर मी योगालाही महत्त्व देते. मात्र, सध्या फारसं जमत नाही. मी सूर्यनमस्कार आवर्जून घालते. तसंच, मेडिटेशनही करते. मनःशांतीसाठी युट्यूबवर श्री श्री रविशंकर, सद्‌गुरूंचे व्हिडिओ पाहते. त्यामुळं मला मानसिक समाधान मिळतं. ध्यानधारणा केल्यानंतर मला खूप बरं वाटतं. मी अथर्वशीर्षाचं पठणही करते.
आपल्या आयुष्यात सुख अन्‌ दुःखाचे अनेक प्रसंग येतात. त्यामुळे आपण डगमगून जातो. अशा वेळी आपल्याला साथ देतात ते आपले कुटुंबीय. कारण, ते आपला कधीच वाईट विचार करत नाहीत. त्यामुळं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्या कुटुंबीयांमध्ये रहा, फिरायला जा, सण-उत्सव अन्‌ लग्नसमारंभांना एकत्रपणे जा. त्यातून तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. मालिकेतला एखादा प्रसंग चांगला झाला नाही, तर काही जण थेट बोलतात. त्यामुळं आपल्याला राग येतो अन्‌ आपण नकारात्मक होतो. मात्र, आपली आई नेहमीच कौतुक करत असते. तिला वाईट काहीच दिसत नाही. खरं तर आपल्या माणसांचे कौतुकाचे शब्द आपल्याला प्रोत्साहन देत असतात. त्यामुळं आपल्या कुटुंबाशी संवाद साधा. आपल्या मुलांना ज्या गोष्टी आवडतात, त्याच गोष्टी त्यांना करू द्या. आपल्या कुटुंबीयांना महत्त्वाच्या कामासाठी वेळ द्या. त्यासाठी कधीही कॉम्प्रमाईज करू नका. त्याचप्रमाणं आपलं काम अन्‌ कुटुंब या गोष्टींची गल्लत कधीच करू नका. आपलं काम झालं, की ते तिथंच विसरून जा अन्‌ घरी आल्यावर कुटुंबात रमा. मात्र, कुटुंबातून आपल्या कामाच्या ठिकाणी गेलो, तर तिथल्या कामावरच लक्ष केंद्रित करा. दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या असल्या, तरी त्यांचा बॅलन्स साधा. इकडचं तिकडं अन्‌ तिकडंच इकडं आणू नका. ही गोष्टीचा ताळमेळ साधला, तर आपलं आयुष्य नक्कीच सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही.

मला एखाद्या मालिकेसाठी कधी वजन कमी करायला किंवा वाढवायला सांगितलं नाही; पण "तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा यांची उंची व व्यक्तिमत्त्वानुसार मलाही "वहिनीसाहेब' म्हणून दरारा दाखवायला लागणार होता. त्यामुळं मी तीन ते चार किलो वजन वाढवलं. मुंबईमध्ये असताना मी खूप आळशी होते. मात्र, अनेक जण जिममध्ये जात असल्याचं पाहून मीही वर्षाचे पैसे भरले अन्‌ जिमला जाऊ लागले. मात्र, दहा दिवसांच्या पलीकडं मी जिमचं तोंडही पाहिलं नाही. मात्र, कोल्हापुरात आल्यानं माझं मन बदललं. आमच्या मालिकेतले कलाकार जिमला जातात. ते आपल्या शरीरासाठी कष्ट घेतात. हे कष्ट अन्‌ त्यांच्यात झालेला बदल पाहून मीही जिमला जाण्याचा निर्णय घेतला. तसंच, प्रशिक्षित प्रशिक्षकाकडूनच मार्गदर्शन घेत आहे. फिटनेसच्या बाबतीत मला प्रियांका चोप्रा, आलिया भट अन्‌ मलाईका अरोरा खूप आवडतात. त्यांचा आदर्श इतरांनीही घेऊन नेहमीच आनंदी राहिलं पाहिजे.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhanashri kadgaonkar write health article in saptarang