esakal | गुगल आणि गुरुपौर्णिमा!
sakal

बोलून बातमी शोधा

गुगल आणि गुरुपौर्णिमा!

गुगल आणि गुरुपौर्णिमा!

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

जगातल्या कोणत्याही विषयाची माहिती मिळवणं हे सध्या अगदी सोपं झालंय. उदाहरणार्थ, ‘सोमालियातला साम्यवाद’ असो किंवा ‘टांझानियातल्या टमटम’, अशी ज्या कशाची माहिती गुगलवर शोधल्यावर शेकडो लिंक्स क्षणार्धात आपल्या समोर येतात. पहिल्या एक-दोन लिंक्सवरची माहिती दोन-चार मिनिटांत वाचूनही होते. माहितीचं प्रचंड मोठं भांडार डिजिटल तंत्रज्ञानामुळं तयार झालं आहे, इंटरनेटमुळं कोणालाही कुठूनही त्या भांडारातली माहिती मिळवणं शक्य झालं आहे आणि गुगलमुळं ती माहिती क्षणार्धात शोधणं सहजसाध्य झालं आहे. पण, इंटरनेटवर उपलब्ध असते अन् गुगल सर्चमधून मिळते ती ‘माहिती’ असते, ‘शिक्षण’ नाही! नुसती माहिती समोर येऊन शिक्षण होतंच असं नाही. कोणत्याही गोष्टीचं शिक्षण किंवा अभ्यास असा दोन-चार मिनिटांत होऊ शकत नाही. म्हणजे सोशल मीडियावर पोष्टी/कॉमेंटी करायला हा पुरेसा वाटतो, पण तो तसा नसतो!.

कोणत्याही विषयाचा अभ्यास करायचा तर तो गुगलवर आलेली पहिली लिंक वाचून पूर्ण होत नाही. गुगलच्या पहिल्या एक-दोन पानांवरच्या सर्व लिंक्सवरची माहिती वाचणं, वेगवेगळ्या स्रोतांमधली, वेगवेगळ्या दृष्टिकोनांनी लिहिलेली माहिती वाचणं, त्या विषयातली प्रकाशित पुस्तकं वाचणं, त्यातल्या मान्यवर लोकांचे लेख वाचणं हे सारं करावं लागतं. हे सगळं करण्याला एखाद्या विषयाचा अभ्यास करणं किंवा तो शिकणं असं म्हणतात. आणि आणखी एक गंमत म्हणजे शिकणं किंवा अभ्यास करणं म्हणजे ‘ज्ञान’ मिळवणं नाही. एखाद्या विषयाची जमेल तितकी ‘माहिती’ मिळवणं, त्या माहितीचा झपाटल्यासारखा ‘अभ्यास’ करणं आणि ह्या सगळ्यावर आपलं स्वतःचं चिंतन आणि मनन करणं, हे ज्ञान मिळण्यासाठी करावं लागतं. हे सारं सातत्यानं आणि अनेक वर्षे केल्यावर त्या विषयाबद्दल आपल्या मनात जे निर्माण होतं ते ‘ज्ञान’!

इंटरनेटच्या ह्या इन्स्टंट माहितीच्या युगात ‘माहिती म्हणजेच ज्ञान’ असा गैरसमज अनेकांचा असू शकतो. मात्र माहिती, शिक्षण आणि ज्ञान हे समानार्थी नाहीत. ह्या तिन्ही एकच गोष्टी नाहीत. ह्या तीन पायऱ्या आहेत. ही एक चढती भाजणी आहे. माहितीतून शिक्षण होतं आणि शिक्षणातून ज्ञान. गुगल हे माहिती पुरवणारं यंत्र आहे, शिक्षक नाही. विकीपिडीयापासून ते प्रत्यक्ष आयुष्यातल्या शिक्षकांपर्यंतचे सारे हे आपल्याला अभ्यास करायला लावणारे घटक असतात, गुरू असतातच असं नाही. आपल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा ‘व्यास’ आणि त्याचा परीघ ठरवणारं तत्त्व आपल्या स्वतःच्या आतच असतं. ते प्रत्येकाचं आपापलं गुरु-तत्व.

कोणत्याही विषयाची फक्त माहिती घेणं अन् त्याचा अभ्यास करणं ह्याच्या पलिकडं जाऊन त्याचं ज्ञान मिळवण्यासाठी आपल्यातलं गुरुतत्व शोधायला अन् जागं ठेवायला हवं. आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त मनोमन शुभेच्छा.

loading image