शालेय शिक्षणाचा व्यापक विचारवेध... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

educational progress book

संस्थेने ‘देशोदेशीचे शालेय शिक्षण’ हे वीस देशांच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेणारे पुस्तक प्रकाशित केले

शालेय शिक्षणाचा व्यापक विचारवेध...

- दिलीप फलटणकर

यशवंतराव चव्हाण सेंटर आणि शिक्षण विकास मंच ही शिक्षणाला नवा आयाम देणारी संस्था एकत्रपणे शिक्षणक्षेत्रात काम करत आहेत. संस्थेने ‘देशोदेशीचे शालेय शिक्षण’ हे वीस देशांच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेणारे पुस्तक प्रकाशित केले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरचे हे बारावे प्रकाशन आहे. कोरोना काळात झालेल्या व्याख्यानमालेचे शब्दांकन आणि संपादन करणे हे खूप अवघड काम धनवंती हर्डीकर, अजित तिजोरे आणि डॉ. माधव सूर्यवंशी या संपादक मंडळाने केले आहे. माजी शिक्षण संचालक व शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.

देशोदेशीच्या शिक्षणात कोणते मूलभूत बदल होत आहेत ? या देशांच्या शिक्षण पद्धतीत चांगल्या बाबी कोणत्या आहेत, त्यातील कोणत्या गोष्टी उपयोगी पडतील हे समजून घेऊन वाटचाल करावी लागणार आहे, यासाठी मला हे पुस्तक जास्त महत्त्वाचे वाटते.

आपण प्रवासाला जातो, तेव्हा कोठे जायचे ? का जायचे ? हे उद्दिष्ट निश्चित केलेले असते. मुक्कामावर पोहोचतो, पण त्यासाठी केलेल्या वाटचालीच्या पाऊलखुणा महत्त्वाच्या असतात म्हणूनच यशाहूनही प्रयत्न सुंदर असे म्हणतो.

या पुस्तकाच्या तीन भागांतील पहिला भाग अतिशय महत्त्वाचा आहे. ‘तुलनात्मक शिक्षणशास्त्र’ या शिक्षणक्षेत्रातल्या नव्या विषयाचा सांगोपांग अभ्यास डॉ. वसंत काळपांडे आणि शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक किशोर दरक यांनी नेमकेपणानं मांडला आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या विभागातील अजित तिजोरे यांचा ‘ कोरोनानंतरची शाळा आणि शिक्षण व्यवस्था ’ यावर अभ्यासपूर्ण लेख आहे.

पुस्तकाच्या शेवटी ‘समारोप’ हा धनवंती हर्डीकर यांचा लेख या पुस्तकातील वाचनीय लेख आहे. आपण इसापनीतीतील गोष्ट वाचल्यावर तळातील तात्पर्य वाचलेच पाहिजे असे असते, असा हा लेख आहे.

शिक्षणाचा आशय, त्याची अंमलबजावणी शिक्षणातील समानता, स्वातंत्र्य, बालशिक्षणाचं महत्त्व असे दिशादर्शक विचार लक्षात घ्यायलाच हवे असे आहेत. या लेखात त्यांनी शिक्षणाच्या गाभ्याला हात घातला असून शिक्षणाचे भावविश्व कसे निकोप असावे या बाबतचा विचार सांगणारा हा उत्तम लेख आहे.

आपल्या देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नुकताच संपन्न केला. गेल्या पंच्याहत्तर वर्षांत काय घडले आणि घडायला हवे, यासाठी प्रत्येक शिक्षक, पालक, संस्थाचालक, धोरणात्मक निर्णय घेणारी यंत्रणा, शिक्षणातील पर्यवेक्षण करणारे अधिकारी या सर्वांनी वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे.

एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात सामाजिक प्रश्न पण तेवढेच मोठे आहेत. ऑनलाईन शिक्षणाचे कौतुक करताना आकलन आणि स्वयंअध्ययन या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नव्या राष्ट्रीय धोरणातील सर्व चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी कशी होते त्यावर त्याचे यश अवलंबून आहे.

भोवतालची जागतिक परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. बदलते हवामान, उर्जेचे प्रश्न, मोबाईलच्या अतिवापराचे प्रश्न व त्याचे परिणाम.... याकडून ज्ञानरचनावादी शिक्षणाकडे, स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून सर्जनशीलतेकडे खूप वाव आहे हे लक्षात घ्यायला हवे.

पुस्तकाचा दुसरा भाग हा या पुस्तकाचा गाभा आहे. त्या त्या देशातील शालेय शिक्षणाबरोबर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक गोष्टींची ओळख करून दिली आहे. शिकवण्यापेक्षा शिकायला मदत करणारे वातावरण निर्माण करा, असा संदेश हे ‘देशोदेशीचे शालेय शिक्षण’ आपल्याला देत आहे.

उद्याच्या शिक्षणाचा विचार करताना, आज काय करायला हवे याबाबत दुसऱ्या भागात एकवीस देशांच्या शिक्षणाचा विचार मोलाचा आहे. आता शिक्षणातून समृद्धीपेक्षा मानसिक शांतता, सामाजिक शांतता आणि विश्वशांती आवश्यक आहे. शाश्वत विकासासाठी चिकित्सा करणे, विश्लेषण करणे, निर्मिती करणे आणि शिक्षण जीवनाशी जोडण्याचे काम हे देश करीत आहेत.