तो सहजी विकेट देत नाही...

विराट कोहलीला मी १६ वर्षांखालील वयोगटातील क्रिकेटपासून ओळखत आहे. साधारणतः २००४ ची गोष्ट असेल. देशातील गुणवत्ता शोध समितीचा मी अध्यक्ष होतो.
virat kohli
virat kohliesakal

विराट कोहलीला मी १६ वर्षांखालील वयोगटातील क्रिकेटपासून ओळखत आहे. साधारणतः २००४ ची गोष्ट असेल. देशातील गुणवत्ता शोध समितीचा मी अध्यक्ष होतो. विराट कोहलीला आम्ही तेव्हाच हेरले होते. प्रमुख संघासाठी बेंटस्ट्रेंथ तयार करण्याच्या हेतूने आम्ही २३ वर्षांखालील संघाची बांधणी करत होतो.

ऑस्ट्रेलियात इमर्जिंक करंडक स्पर्धा होती. त्यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड यांचेही संघ होते. न्यूझीलंड संघात तर सात कसोटी क्रिकेट खेळलेले खेळाडू होते. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा नसल्यामुळे इतर देशांनी त्यांचे ‘अ’ संघ खेळवले होते. प्रवीण आमरे आपल्या संघाचा प्रशिक्षक होता.

आपली अंतिम लढत न्यूझीलंडविरुद्ध होती आणि न्यूझीलंडने २७० धावा उभारल्या होत्या हे आव्हान सोपे नव्हते. आमरेने विराटला, तू सलामीला खेळशील का, असे विचारले. विराट लगेचच तयार झाला आणि त्याने १२३ धावांची खेळी करून भारतीय संघाला जिंकून दिले होते.

विराटची यावरून एकहाती लढण्याची वृत्ती किती कणखर आहे हे लक्षात येते. तो सहजासहजी विकेट देत नाही. प्रतिस्पर्ध्यांना आपली विकेट कमवायला लावतो. क्रिकेटसाठी केवळ गुणवत्ता आणि क्षमता असणे पुरेसे नसते तर सध्याच्या आव्हानात्मक स्पर्धांत टिकायचे असेल, तर तेवढाच उच्चकोटीचा फिटनेसही आवश्यक असतो. २००८ मध्ये आयपीएलमध्ये बंगळुरु संघात निवड झाल्यानंतर विराटला तंदुरुस्तीचे महत्त्व पटले.

भविष्यात आपल्याला पुढं जायचं असेल, तर कमालीची तंदुरुस्ती आवश्यक आहे हे त्याला उमजलं आणि सध्याच्या क्षणाला तो तंदुरुस्ती कशी असावी याचा आदर्श खेळाडू आहे. यासाठी निर्धार आणि शिस्त असणे गरजचेचे असते. स्पर्धा-सामने असो वा नसो किंवा विश्रांती असो, विराट कधीही व्यायामापासून दूर जात नाही. भारतीय संघ खेळत नसला तरी तो जिममध्ये असतो.

विराटप्रमाणे आपल्यालाही प्रगती करायची आहे, असे अनेक तरुण खेळाडूंना वाटत असेल पण त्यासाठी तो करत असलेली मेहनत करायची तयारी ठेवायला हवी. केवळ चौकार-षटकारांनी डाव सजत नसतो तर एकेरी-दुहेरी धावाही महत्त्वाच्या असतात आणि त्या पळण्यासाठी तुमच्या पायात ताकद असावी लागते हे विराटने दाखवून दिले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यात विराटने गाजवलेली खेळी आदर्शवत होती. २०१६ मध्ये भारतात झालेल्या ‘ट्वेन्टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेत मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला सामना असो वा गेल्या ‘ट्वेन्टी-२०’ स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला एकहाती विजय असो.

विराट प्रत्येक वेळी मैलाचा दगड उभा करत आहे. मध्यंतरीच्या काळात विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला होता. विराटला आता विश्रांती द्या, असा सूर अनेक जण लावत होते. विराटही निर्धारानं मेहनत घेत होता. पण त्यानं धीर सोडला नव्हता.

आपल्या शैलीत काही दोष निर्माण झाले आहेत का, याचा तो शोध घेत होता. याचा अर्थ असा, की कितीही मोठे खेळाडू झालो तरी शिकण्याची वृत्ती तसूभरही कमी झाली नव्हती. केवळ एका मोठ्या खेळीचा प्रश्न होता आणि अफगाणिस्तानविरुद्ध तो शतकी खेळी खेळला आणि त्यानंतर एखाद्या धरणातून मोठा प्रवाह बाहेर यावा याप्रमाणे विराट शतके आणि धावा करत आहे.

विराटच्या खेळाचे विश्लेषण करतो तेव्हा या गोष्टीही लक्षात घ्यायला हव्यात. सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम मोडणे सोपे नाहीच. तसेच एका विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक धावांचाही सचिनच्या नावे असलेला विक्रम मागे टाकणे चॅलेजिंगच. पण विराटने ते या विश्वकरंडक स्पर्धेत साध्य केले.

कर्णधार म्हणून विराटला विश्वकरंडक जिंकता आलेला नाही, पण २०११ च्या विश्वविजेत्या संघाचा तो सहकारी होता. आता रविवारी अहमदाबादमध्ये पुन्हा विश्वकरंडक उंचावलेला विराट पाहायचा आहे. तेथेही त्याचे शतक पाहायचे आहे. त्यासाठी त्याला शुभेच्छा !

(लेखक भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तसेच निवड समितीचेही अध्यक्ष होते.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com