।।चरैवेति।।

गावात काही गोष्टी घडतात. काही बिघडतात. चळवळीच्या कामाचा एक टप्पा येतो. त्या गावातल्या कामाचा गवगवा होतो. प्रवास संपत नाही.
woman Labour
woman Laboursakal
Summary

गावात काही गोष्टी घडतात. काही बिघडतात. चळवळीच्या कामाचा एक टप्पा येतो. त्या गावातल्या कामाचा गवगवा होतो. प्रवास संपत नाही.

- दीपाली गोगटे, sakal.avtaran@gmail.com

गावात काही गोष्टी घडतात. काही बिघडतात. चळवळीच्या कामाचा एक टप्पा येतो. त्या गावातल्या कामाचा गवगवा होतो. प्रवास संपत नाही. चढ-उतार येतात. एखाद्या बाबतीत आदर्श काम केलेली गावं पुढच्या काळात लंबकाचं दुसरं टोक गाठतात. कारण गावातले बदल हे विज्ञानाच्या भाषेत पदार्थात कायमचे होणारे रासायनिक बदल नाहीत. लंबकाची दोन्ही टोकं तितकीच खरी असतात. मग कार्यकर्ता म्हणून या चढ-उतारांना झेलण्याचं बळ कुठून मिळवायचं?

उन्हाच्या टळटळीत दुपारी बाबल्याकाका आणि रघू चळवळीच्या ऑफिसात आले. बाबल्याकाका नि रघूच्या गावाने गावाला लागून असलेल्या जंगलावर काही वर्षांपूर्वी दावा केला. हा दावा होता जंगल सांभाळण्यासाठीचा, वाढवण्यासाठीचा. त्यांच्या गावसमाजाला हे हक्क मिळाले खरे, पण तेव्हापासून आजूबाजूची गावं विरोधी पार्टीत गेली. वनहक्क कायद्यामुळे काय घडू शकते हे गावाला; म्हणजे गावातल्या मोजक्या माणसांना समजले. इथूनच त्यांची आणि शेजारच्या गावांची वाट वेगळी झाली.

गावात गेली अनेक वर्षे चळवळीने पाणी आणि वनसंवर्धनाची कामे केली आहेत. उपजीविका संवर्धनासाठी गावात मोठी गुंतवणूक केली आहे. हे सर्व करताना गावाने एकत्र बसणे, एकत्र चर्चा करणे झाले म्हणूनच चळवळीने पुढचे पुढचे पाऊल उचलले. पण गेली एक-दोन वर्षे ग्रामसभा लावली जात नाही. लोकं बसत नाहीत. चळवळीच्या प्रत्येक मिटिंगमध्ये हा विषय निघतोच. गावाला झालंय काय?

कार्यालयात या दोघांना बघून मी न राहवून विचारलं, ‘‘बाबल्याकाका, करायचा कसा पुढे तेच मला समजेना झाले आहे.’’ गोष्ट बाबल्याकाच्या इतकी मर्मावर बसली की तो भडाभडा बोलायला लागला. ‘‘तुला काय बाई मलाच कळेना झालंय की काय करायचं काय या लोकांना. ये सांगितलं तर येत नाही. बस म्हटलं तर बसत नाही, पण म्हणून गावात काही भानगड होते म्हणशील तर तसाही नाही. लग्नाचा कायदा कराय मला बोलवतात. मयताला दुसऱ्याकडं जातात, येतात. ते सगळं वेवस्थशीर सुरू आहे, पण मिटिंगला बोलावशील तर नाही जमं. काय झाला विचारू तर सगळे उगाच रहतात.’’

‘मी तर सांगतो की हां की ना कायतरी सांगा. पटत नसेल तर तसा, पण कोणतरी चार शेजारची माणसा तुमच्या कानात काही सांगतात. तुम्ही काहीतरी आपला डोकां चालवा ना. लोकं सांगं वयम्‌वाले एक दी जंगल त्यांच्या नावावर वं करतील. अरे, असा होलच कसा. काहीतरी आपला आपला पण डोकं लावा.’’ रघू न राहवून बोलला.

पुढचे एक दोन तास इकडून तिकडून फार बोललो आणि मग पुढची कुणीतरी भेटीची माणसं आली तसा विषय एकदम थांबला. दोन तास आम्ही पाच-सहा वर्षांत हिंडून आलो. एकत्र काळजी केली. काही आता पुढे घडणारच नाही, अशा लंबकाच्या त्या टोकापर्यंत जाऊन आलो नि मग परत उठताना बाबल्याकाका बोलला, ‘‘बरं बघू, बरं कसं कसं होतं. तू म्हणतेस तशा दोन तीन महिन्यातून तरी आख्यांची मोठी मिटिंग लावू. दर महिन्याचे नाही बसत तर नको बसूदेस त्यांना. पण मिटिंग चुकवायची नाही. बघूदेस बरं बोलून एकदा त्यांच्याशी.’’ असं म्हणत गावाची काळजी करणारी जोडगोळी उठली.

बाबल्याकाकाच्या शेवटच्या शब्दांनी मला एकदम पूर्णाबाईच्या समोर नेऊन बसवलं. काही महिन्यांपूर्वी जव्हारला नाश्ता करताना अचानक बऱ्याच महिन्यांनी खानावळीच्या दाराशी पूर्णाबाई दिसली. मला पाहिलं तशी मोठं हसली, पण खात असलेल्या माणसापाशी कसं जावं म्हणून तशीच घुटमळली. तिच्यासाठीही मिसळ सांगितली आणि तिला जबरदस्तीनच बसवलं. आता एकदम तिला ओळख पटली. आजपर्यंत आम्ही दोघी भेटलो होतो ते तिच्या घरी-तिच्या गावात नाहीतर चळवळीच्या ऑफिसात. अशा जागी आमची पहिलीच भेट. तिच्या गावात विहीर चालू आहे आणि गावातल्या तरुण पुढाकार घेणाऱ्या मंडळींनी जोरात काम चालवलं आहे, हे माझ्या माहितीत होतं. तिचं गाव सहाएक वर्षांपूर्वी चळवळीशी जोडलं गेलं. पेसा कायद्याचा चपखल वापर करून गावानं आपली ग्रामसभा ग्रामपंचायतीतल्या इतर पाड्यांपासून वेगळी केली. तिथून त्यांनी त्यांच्या विचारानं चालायला सुरुवात केली. वारकरी परंपरा जपणाऱ्या पहिल्यापासून एकजूट असणाऱ्या गावानं हा ग्रामसभेचा मंत्र चांगलाच उचलला. सगळ्या गोष्टी एकत्र सर्वांसमोर बोलायच्या. एकत्र काय ते ठरवायचं हे गावानं चारेक वर्षांत आत्मसात केलं. गावाला हक्क मिळेपर्यंतचा काळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे फार लांबला, पण गावानं हार नाही मानली.

‘तुला आठवतं ना आपण किती मिटिंगी केल्या नि ते मोर्चे काढले. गावात कितीदा बसलो आपण गोष्टी चावळायला. आता ते काहीच नाही बघ.’

पूर्णाबाई गावातली समजदार आणि पुढाकार घेणारी बाई. ती असं म्हणते म्हटल्यावर पुढे खोदाखोद करणं भागच होतं.

‘आता बघ विहिरीवर माणसं लावायची तर आमच्यासारख्या म्हताऱ्यांना पण काम द्या ना. काही नाही तर थोड्या तरी दगडी इकडून तिकडं करू, पण हे आजची पोरं त्यांच्यासारख्या तरण्याताठ्यांनाच कामावर लावतात. गावाला पैसा भेटतो तर दहा रुपये त्यांतले तुम्ही घ्या, पण पाच तर म्हाताऱ्यांच्या हातात ठेवा. विहिरीचे पैसे सगळं वाचूनबिचून दावलं त्यांनी. तसं काही नाही, पण मी म्हणते ग्रामसभेत बोलला तर पाहिजे. लोकां कशी नाही बोलत त्यांनाच माहीत. गुमान येतात नि जातात.’’ मी मध्येच तिला तोडत विचारलं, ‘‘तू तर नाही ना गप बसणारी. पोरांचं काही पटत नसेल तर सांग ना तसं त्यांना. तुम्ही म्हातारी माणसं बोलला नाही तर कसं जमेल?’’

पूर्णाबाई मग खूप जुन्या जुन्या आठवणी काढत बसली. एकदम मन भरल्यासारखं उठत म्हणाली, ‘‘काहीतरी करायच लागेल. एवढा आपण भांडून झगडून गावाला ग्रामसभा आणली. आता सोडून नाही जमणार. मिटिंगी पहिल्यासारख्या कराय लागतील.’’

पूर्णाबाई अशी अचानक भेटून गेली आणि एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटायला लागलं. पहिल्या वर्षातल्या गावातल्या अनेक मिटिंग आणि त्यांच्याशी बोललेल्या गोष्टी आठवायला लागल्या. तेच तिनं मला परत सागितलं; पण आता ते तिचं होतं. तेच शब्द, पण तिच्याकडून आलेले. पूर्ण तिचे होऊन आलेले. बाबल्याकाकाही आज उठताना हेच म्हणून उठला.

गावात काही गोष्टी घडतात. काही बिघडतात. चळवळीच्या कामाचा एक टप्पा येतो. त्या गावातल्या कामाचा गवगवा होतो. म्हणून कधीच And they lived happily for ever असा प्रवास संपत नाही. चढ-उतार येतात. एखाद्या बाबतीत आदर्श काम केलेली गावं पुढच्या काळात लंबकाचं दुसरं टोक गाठतात. कारण गावातले बदल हे विज्ञानाच्या भाषेत पदार्थात कायमचे होणारे रासायनिक बदल नाहीत. लंबकाची दोन्ही टोकं तितकीच खरी असतात. मग कार्यकर्ता म्हणून या चढ-उतारांना झेलण्याचं बळ कुठून मिळवायचं?

बाबल्याकाका नि पूर्णाबाईसारखी माणसं अचानक आश्वस्त करून जातात. आपण चळवळ म्हणून गावात काही घडवतो हा अहंकार आलाच तर पुसून टाकतात. चळवळीचा ‘अथक चालण्याचा’ मंत्र त्यांनी खराखुरा आतून उचललेला असतो. काहीही झालं तरी ते ‘‘बरं, बघू कसं करायचं ते,’’ असं म्हणून पुढे चालू लागतात. त्याच चळवळीचा एक अंश असण्यापलीकडे अजून काय भाग्याचं?

(लेखिका वयम्‌च्या कार्यकर्त्या आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com