कालिदासाचा अनोखा राम...

कालिदासाला रामाची कथा आपल्या शब्दांत सांगावीशी न वाटली तरच नवल ! रघुवंश हे रघुकुलातील राजांचं चरित्र सांगतं. यामध्ये त्यानं रघुकुलातील २८ राजांची कथा दिली आहे.
Shriram
ShriramSakal

कालिदासाला रामाची कथा आपल्या शब्दांत सांगावीशी न वाटली तरच नवल ! रघुवंश हे रघुकुलातील राजांचं चरित्र सांगतं. यामध्ये त्यानं रघुकुलातील २८ राजांची कथा दिली आहे. दिलीप, रघु, अज, दशरथ, राम आणि रामोत्तर राजे यात आले आहेत. त्यातील सर्ग १० ते १५ यामध्ये रामाची कथा येते.

वाल्मीकींच्या रामायणात आणि कालिदासानं सांगितलेल्या रामकथेत कैक फरक आहेत. महत्त्वाचा फरक असा, की वाल्मीकी रामायणाचा नायक राम आहे, तर कालिदासाच्या कृतीचा नायक ‘रघुवंश’ आहे. आणखीही असं, की वाल्मीकी इतिहास सांगत आहेत, त्यांची कथा कुठंही न रेंगाळता पटपट पुढं सरकते; पण कालिदास मात्र जिथं जिथं सौंदर्य दिसेल तिथं रमत, वाचकाला ते उलगडून दाखवत जातो. जसं - ''रघुवंश''मधील लंकेहून अयोध्येला परत जातानाचा प्रसंग. वाल्मीकी रामायणात हा प्रसंग परिस्थितीला अनुसरून आहे - कोणाकोणाला अयोध्येला न्यायचं आहे, सगळे आले की नाही, लवकर लवकर तयार व्हा, घाईनं चला, सगळ्यांची खाण्याची सोय करणं... अशा रुक्ष असल्या तरी वास्तवादी गोष्टी त्यामध्ये आल्या आहेत. पुष्पक विमानातून जाताना राम सीतेला - रणभूमी, रावणवधाचं स्थान, सैन्य उतरलेली जागा, नलसेतू, किष्किंधा, सुग्रीवाशी भेट झालेलं स्थान, पंपा सरोवर, पंचवटी, अगस्ती आश्रम, चित्रकुट, श्रुंगवेरपूर, नंदीग्राम व अयोध्या दाखवतो. सीतेच्या गैरहजेरीत जे जे घडलं, ते राम वेळ मिळताच तिला सांगत आहे.

कालिदासाचा राम मात्र पुष्पक विमानातून अयोध्येकडं जाताना सीतेला प्रत्येक स्थानाचं रसपूर्ण वर्णन करून सांगतो. नुसतंच ''हा पहा मी बांधलेला सेतू'' असं न म्हणता, "ज्याप्रमाणे आकाशगंगा शरद ऋतूच्या निरभ्र आकाशाचं द्विभाजन करते, तसं मी बांधलेला हा सेतू फेसाळ समुद्राचे दोन भाग करतो!", किंवा माल्यवान पर्वत दाखवताना कालिदासाचा राम म्हणतो, 'सीते, वर्षा ऋतूच्या सुरुवातीला, तुझ्या शोधात मी इथं फिरत असताना मेघांनी ढाळलेली पावसाची पहिली सर आणि माझ्या डोळ्यांनी ढाळलेली अश्रूंची सर एकदमच कोसळली होती!”, किंवा “सीते, तुला आठवतं का, आपण इथल्या गुहेत एकदा राहिलो होतो, तेव्हा विजांच्या गडगडाटाला घाबरून तू मला बिलगली होतीस! त्याच गुहेत मी तुझ्या विरहात एक रात्र कूस बदलत कशीतरी घालवली होती.” कालिदासाचा राम निवांतपणे सीतेशी गप्पा मारत आहे, त्याला अनेक उपमा, अलंकार सुचत आहेत आणि जणू काही एकांतात आहोत असा त्याचा संवाद चालला आहे!

मेघदूत : कालिदासाचं मेघदूत ही एक तरल प्रेमकथा आहे. एक विरहव्यथा आहे. त्यात शृंगार तर आहेच; पण त्या कथेला एक रामायणाची आध्यात्मिक किनारपण आहे. मेघदूतची सुरुवात होते तीच राम-सीतेच्या आठवणीनं,

कश्चितकांताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तु:।

यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ॥१॥

कोणी एक शापित यक्ष, कांतेपासून एक वर्ष दूर राहण्याची शिक्षा भोगत आहे. या काळात तो यक्ष रामगिरी पर्वतावर वास करत आहे. कधी एकेकाळी, वनवासात असताना राम आणि सीता इथं राहिले होते. हा आश्रम परिसर तरूंच्या मऊ छायेनं अच्छादलेला असून, येथील सरोवर जानकीच्या स्नानानं पावन झालं आहे.

पहिल्याच श्लोकात कालिदास कांतेचा विरह सहन करायला लागलेल्या रामाची आठवण करून देतो; आणि पुढच्याच श्लोकात – आषाढाच्या पहिल्या दिवशी, आकाशात मेघ अवतरतो!

आषाढस्‍य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्‍टसानु वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।

पत्नीच्या वियोगानं यक्ष व्याकूळ झाला आहे. सीतेच्या विरहात सैरभैर झालेल्या रामानं मूक वृक्षलतांना सीतेचा ठाव विचारला, तसा कालिदासाचा यक्ष निर्जीव मेघाशी संवाद साधतो. मेघाला आपला निरोप अलकानगरीतील पत्नीकडं घेऊन जाण्याची विनंती करतो. रामानं आकाशमार्गानं वायुपुत्र हनुमंताकरवी सीतेला निरोप पाठवला अगदी तसाच मेघदूतचा यक्ष वाऱ्याबरोबर वाहणाऱ्या मेघाच्या सोबत निरोप पाठवतो. रामानं हनुमानाला सीतेच्या खाणाखुणा सांगितल्या होत्या, तसं यक्षसुद्धा आपल्या प्रियेला कसं ओळखायचं ते मेघाला सांगतो. ''शरद ऋतू येताच मी परत येईन'' असा निरोप धाडतो. मेघदूताच्या यक्षामध्ये आपल्याला वारंवार सीतेच्या आठवणीनं व्याकूळ झालेला राम दिसतो.

यक्ष सांगतो, "मेघा! प्रियेकडं पोचल्यावर, तू अगदी आवाज न करता जा. हळूच फुंकर घालून तिला सांग, की मी तुझ्या पतीचा संदेश आणला आहे. मग ती तुझ्याकडं आनंदानं मान उंचावून पाहील. आणि सीतेनं ज्या उत्कटतेनं हनुमंताकडून रामाचा संदेश ऐकला असेल, त्याप्रमाणं ती कानात प्राण आणून तुझा संदेश ऐकेल !

संदेश पाठवायच्या आधीपासून संदेश मिळेपर्यंत कालिदासाचा यक्ष - राम, सीता आणि हनुमंताला धरून राहतो आणि हनुमंत सीतेचा निरोप घेऊन परत आला तसं, परत येताना माझ्या प्रियेचा संदेश घेऊन ये, हे सांगायलाही तो विसरत नाही !

अभिज्ञान शाकुंतलम् : कालिदासाच्या या कलाकृतीवरसुद्धा रामायणाचा प्रभाव आहे. दुष्यंत-शकुंतला हे खरंतर महाभारतातील उपाख्यान; पण व्यासांच्या कथेत अनेक बदल करत, कालिदास आपल्यासमोर एक अतिमधुर प्रेमकथा ठेवतो. कालिदासाच्या कथेत रामायणातील एक सुंदरशी पण तितकीच महत्त्वाची गोष्ट येते - अंगठी !

रामायणात, रामानं दूताकरवी सीतेला संदेश पाठवला होता. संदेश पाठवणाऱ्याला आपली ओळख पटवावी लागते, आजकाल verified account वरून संदेश पाठवावा लगतो तसं. आपली ओळख पटवण्यासाठी रामानं आपली अंगठी हनुमानाकडं दिली व सांगितलं -

मारुते, मला खात्री आहे, की तू सीतेला शोधशील! ती राजकन्या भेटल्यावर ओळख पटण्यासाठी ही माझी रामनामांकित अंगठी तिला दे.

ददौ तस्य ततः प्रीतः स्व नामांक उपशोभितम् ।

अंगुलीयम् अभिज्ञानम् राजपुत्र्याः परंतपः ।। ४-४४-१२ ।।

अगदी अशाच प्रकारे कालिदासाचा दुष्यंत शकुंतलेला आपल्या नावाची अंगठी देतो. अशोकवनात कैदेत असलेली सीता जेव्हा रामाच्या नावानं शोभणारी अंगठी पाहते, तेव्हाच तिचा हनुमानावर विश्वास बसतो. शाकुंतलमध्ये, दुष्यंताकडं जेव्हा शकुंतला अंगठीशिवाय येते, तेव्हा तो तिला ओळखत नाही. त्याचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. कालांतरानं एका कोळ्याला माश्याच्या पोटात एक अंगठी सापडते, त्यावर दुष्यंताचं नाव असल्यानं कोळी ती अंगठी घेऊन दुष्यंताकडं येतो. ती अंगठी पाहून दुष्यंताला सगळं आठवतं आणि शकुंतलेची ओळख पटते. रामायणाची अशी काही प्रतिबिंबं कालिदासाच्या काव्यात दिसतात. मात्र ही प्रतिबिंबं जरी असली, तरी ती कालिदासाच्या अत्युच्च शैलीच्या कोंदणात अधिकच उठावदार होतात.

- दीपाली पाटवदकर saptrang@esakal.com

(लेखिका स्तंभलेखिका आणि चित्रकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com