कल्पना एक; प्रश्‍न अनेक

family number one drama
family number one dramasakal media

चौथी विंग : महेंद्र सुके

कल्पना एक; प्रश्‍न अनेक


समाजात जे घडते त्याचे प्रतिबिंब वेगवेगळ्या कलामाध्यमांत उमटते. त्या घटनेवरील कलावंताची ती प्रतिक्रिया असते. कधीकधी ती गंभीरपणे, तर कधी हास्यविनोदाद्वारे मांडली जाते. अशाच एका कल्पनेभोवती अनेक प्रश्‍नांवर भाष्य करणारे नाटक ‘फॅमिली नंबर वन’.

सामाजिक, सांस्कृतिक रितीरिवाजासह आजच्या समाजमनाला जोडणारे अनेक धागे गुंफून प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांचे ‘फॅमिली नंबर वन’ हे नवे नाटक रंगभूमीवर आले आहे. ‘एक होती आई, तिला सासू व्हायची घाई...’ या शीर्षकगीताने सुरू होणाऱ्या नाटकाची गोष्ट हास्यविनोदाची पेरणी करत पुढे सरकते. ज्या घरात लग्नाचे वय झालेला मुलगा किंवा मुलगी असते, त्या घरात तो विषय नेहमीच चिंतेचा असतो. लग्न होत नसल्याने कधीकधी कुटुंबीयांना जिव्हारी लागणारे टोमणे ऐकावे लागतात. तेच ‘फॅमिली नंबर वन’मधील सदानंदच्या आईविषयी (नयना आपटे) घडते. त्यांनाही ज्येष्ठ नागरिक संघात जाणे नकोसे वाटते. एक दिवस त्यांना मंडळाच्या व्हाट्‌सॲप ग्रुपवर एका स्पर्धेविषयीची माहिती मिळते.

ती स्पर्धा असते ‘फॅमिली नंबर वन’ होण्याची. स्पर्धेतील विजयी कुटुंबीयांना श्रीलंकेत जाण्याची संधी मिळणार असते. सदानंदची आई मंडळातील सदस्यांसोबत विदेशात न गेल्याने त्या सारख्या ऐकवत असतात, याचेही शल्य त्यांना असतेच. त्यामुळे ही स्पर्धा त्यांना खुणावते; पण स्पर्धेच्या नियमानुसार घरात सासू-सून आवश्‍यक असते. मुलाने लग्न करावे, यासाठी ती गळ घालते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची डेडलाईन मुलाच्या लग्नालाही लागू होते आणि गोष्ट रंगत जाते.

दैनंदिन आयुष्यतल्या वेगवेगळ्या स्पर्धा आपल्यालाही खुणावत असतातच. ती स्पर्धा जिंकून आनंद मिळवावा, असेही वाटते. या नाटकातील स्पर्धा त्या अर्थाने आपल्याला सावध करते; बरेच काही शिकवते. स्पर्धेत विजयी होण्यासाठी आपण धावत राहातो, दमून जातो. काहीतरी मिळवायचे असताना अनेक तडजोडीही करतो. ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’ या म्हणीनुसार वागतो. गरज आहे म्हणून आपण सारे सहन करतो. आणि ती गरज नसेल तर...? हाच प्रश्‍न या नाटकाची गोष्ट संपल्यानंतर रसिकांच्या मनात उरतो.


कुटुंबप्रमुख म्हणून नयना आपटे यांनी सदानंदच्या आईची भूमिका त्यांच्या अभिनय सामर्थ्याने छान खुलवली आहे. रसिकांना हसवत ठेवता येईल, त्या जागा नेमकेपणाने हेरल्या आहेत. प्रसंगानुरूप संवाद आणि अवकाशाचा यथोचित वापर करून ही व्यक्तिरेखा नाटकाचा महत्त्वाचा भाग झाली आहे.सदानंदची भूमिका विनय म्हसवेकर कथानकानुरूप खूप हसत-खेळत जगले आहेत. त्यांना लीनाची भूमिका साकारणाऱ्या श्रद्धा मोहिते यांनी दमदार साथ दिली आहे. रंगमंचावरचा सहज वावर, कथानकानुरूप अल्लडपणा, तारुण्यातील गोडीगुलाबी हे सारे धागे श्रद्धा मोहिते यांनी या व्यक्तिरेखेत ठसठशीतपणे गुंफले आहेत. नाटकात चौथी भूमिका आहे ती श्रद्धाच्या वडिलांची, ती सुगत उधळे यांनी उत्तमच साकारली आहे.

जिव्हाळा या संस्थेतर्फे कांता म्हसवेकर यांची निर्मिती असलेल्या या नाटकाचे सूत्रधार गोट्या सावंत आहेत. नाटकाला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनिष-विनय यांचे नेपथ्य ‘फॅमिली नंबर वन’साठी यथोचित आहे. सुखदा भावे-दाबके यांचे संगीत शीर्षकगीतापासून ताल धरायला लावणारे आहे. शीर्षकगीत अभिषेक नलावडे यांनी गायले आहे. आनंद म्हसवेकर हे प्रयोगशील रंगकर्मी म्हणून सर्वांना परिचित आहेत. कमीत कमी खर्चिक नाटकाची निर्मिती करून, गावोगावी प्रयोग करण्याचा त्यांचा मानस असतो. त्यामुळे त्यांची संहिता प्रयोगाचा खर्च वाढवणारी नसते. ‘फॅमिली नंबर १’चा प्रयोग कुठेही सादर करता येईल, असाच आहे. कलावंतांच्या अभिनयातून आपला नाट्यविचार पोहचवण्यात ते आग्रही असतात, ही त्यांची प्रयोगशीलता आहे.

वास्तवावर भाष्य

नाटकाची कल्पना एक असली तरी या नाटकाने अनेक गोष्टींना स्पर्श केला आहे. त्यात एकत्र कुटुंब पद्धत आहे. त्यातून आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यासारखे प्रकार आहेत. ‘ऑनलाईन बायको मागव, पसंत पडली तर ठेवू, नाही तर परत पाठवून देऊ’ अशा काही संवादातून आजच्या जगण्यावर हे नाटक भाष्य करते. ‘काही अपवाद वगळता मराठी सिनेमे आपटण्यासाठीच बनवलेले असतात,’ असे स्टेटमेंटही आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वास्तवावर अध्येमध्ये चिमटे काढत ‘फॅमिली नंबर १’ रंगत जाते. हे संवाद कुठेही ठिगळं लावल्यासारखे नाहीत, ते त्या-त्या प्रसंगांचा भाग झाले आहेत.
या नाटकाचा जेमतेम शुभारंभाचा पहिला प्रयोग झाला आहे. सादरीकरण परफेक्ट होण्यासाठी काही प्रयोगानंतर ते आणखी भन्नाट होईल. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे या नाटकाच्या कथामूल्यांसह कलावंतांची अभिनयाची ताकदही पहिल्या प्रयोगात अधोरेखित झाली आहे. ती आणखी फुलत जाईल, खुलत जाईल आणि बिनधास्तपणे रसिकांना हसवत राहणार आहे.
mahendra.suke@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com