Loksabha 2019 : मित्रों, तुम नहीं, तो हमभी नही...

Narendra Modi
Narendra Modi

भाजपला एकट्याला बहुमत मिळणार नाही. एनडीएला तरी मिळणार का?, हा आता चर्चेला विषय आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष कोणत्या राज्यात आहेत. तेथील राजकीय स्थिती कशी आहे, त्यांना किती जागा मिळणार, यांचे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत.

महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार, पंजाब, केरळ, आसाम, उत्तरप्रदेश येथे एनडीएतील भाजपचे मित्र पक्ष आहेत. याव्यतिरिक्त झारखंड, नागालॅंड, राजस्थान व कर्नाटकात प्रत्येकी एका जागेवर भाजपने अन्य उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. भाजपला बहुमतासाठी लागणाऱ्या जागा या मित्रपक्षांना मिळाल्या नाहीत, तर दोन्ही प्रमुख आघाडीत न जाता, स्वतंत्रपणे लढलेल्या ताकदवान प्रादेशिक पक्षाची मदत सत्ता स्थापनेसाठी घ्यावी लागेल.

मोदी जिंकले
"मित्रो', ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाच वर्षांपूर्वीची परिचित हाक. देशाच्या कानाकोपऱ्यांतून या हाकेला जोरदार प्रतिसाद मिळाला. भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांनीही सर्वस्व पणाला लावत युपीएवर विशेषतः कॉंग्रेसवर हल्ला चढवीत विजयश्री खेचून आणली. भाजपने "मिशन 272' जाहीर केले. तेवढ्या जागा न मिळाल्यास, मोदीऐवजी पंतप्रधान पदासाठी कोणते नाव पुढे येईल, अशी कुजबूजही त्यावेळी सुरू झाली होती. मात्र, उत्तर भारतात विशेषतः उत्तरप्रदेश व त्यापाठोपाठ महाराष्ट्रात मोदी लाटेची त्सुनामी आली, अन्‌ 16 मे 2014 रोजी निकाल जाहीर झाला. भाजपला एकट्याला बहुमत मिळाले.

भाजपला 282, तर मित्रपक्षांना 54 अशा एकूण 336 जागा मिळाल्या. मित्रपक्षांमध्ये शिवसेना (18), तेलगू देशम (16), अकाली दल (4), बिहारमधील लोजप (6), रालोसपा (3), उत्तर प्रदेशातील अपना दल (2) यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, तमिळनाडूतील पीएमके, नागालॅंडमधील एनपीएफ, मेघालयातील एनपीपी आणि पॉंडेचरीतील एआयएनआर कॉंग्रेस या पाच पक्षांना प्रत्येकी एक जागा यांचा समावेश आहे.

मित्र गमावले
एकहाती सत्ता येताच मोदी-शहा जोडीने सत्तेच्या पहिल्या दिवसांपासूनच मित्रपक्षांना दूर ठेवण्यास सुरवात केली. मित्रांची अवस्था विकलांग झाली. मित्रपक्षांची जागा व्यापण्यास भाजपने प्रारंभ केला. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांकडे दुर्लक्ष केले. शिवसेना तर गेली साडेचार वर्षे सत्तेत सहभागी असूनसुद्धा विरोधी पक्षासारखी वागत होती. तेलगू देशमने मोदी सरकारवर अविश्‍वास ठराव दाखल केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरून एनडीएतून बाहेर पडली. अपना दल फुटले. बिहारमध्ये उपेंद्र कुशवाह यांचा रालोसपा बाहेर पडून त्यांनी कॉंग्रेस-राजदशी हातमिळवणी केली. मेघालयातही पी. ए. संगमा यांच्या मुलाने एनपीपीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. काश्‍मीरात सत्तेसाठी आघाडी केलेला पीडीपी देखील दुरावला.

भाजप राज्यापाठोपाठ राज्ये जिंकत होती. त्यांना खरी खीळ बसली, ती राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड ही राज्य हातातून निसटल्यावर. त्यावेळी भाजप नेतृत्व खडबडून जागे झाले. ते मित्रांशी चर्चा करू लागले. त्यावेळी, मित्रपक्ष अडून बसले. भाजप विनवणी करीत होते, तर मित्रपक्षाचे नेते त्यांच्यावर हल्ला करीत अटी घालू लागले. मुख्यमंत्री नितीनकुमार यांच्या जद(यू)चे दोन खासगार आहेत. त्यांनी भाजपच्या बरोबरीने 17 जागा घेतल्या. भाजपला स्वतःच्या जिंकलेल्या पाच जागांवर पाणी सोडावे लागले, तर रालोसपा जागा देण्याबाबत गांभीर्याने न घेतल्याने, ते विरोधकांना जाऊन मिळाले. उत्तरप्रदेशातील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी त्यांच्या पक्षाला जागा मिळत नसल्याने राजीनामा दिला व त्यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने पूर्व उत्तरप्रदेशात अनेक उमेदवारांना मैदानात उतरविले.

नवे मित्र मैदानात
भाजपने गेल्या निवडणुकीत 426 जागा लढविल्या व मित्र पक्षांना 117 जागा दिल्या होत्या. यंदा 437 जागांवर भाजपचे उमेदवार आहेत. एनडीएतील मित्रपक्षांना बारा राज्यांत 19 पक्षांना 106 जागा सोडल्या आहेत. महाराष्ट्रात शिवसेना 23, तमिळनाडूत मित्रपक्षांकडे 35 जागांपैकी अण्णाद्रमुक 20, पीएमके 7, डीएमडीके 4 व चार पक्षांना चार जागा आहेत. केरळमध्ये भारत धर्म जनसेना 4, केरळ कॉंग्रेस एक, पंजाबमध्ये अकाली दलाला दहा जागा, उत्तरप्रदेशात अपना दलाला दोन, बिहारमध्ये जद (यू) 16, लोजप (6), आसाममध्ये आसाम गण परिषदेला 3 आणि बोडोलॅंड पिपल्स फ्रंटला एक जागा दिली. याव्यतिरिक्त चार राज्यांत प्रत्येकी एक जागा मित्रपक्षाकडे आहे.
या 106 जागांमध्ये मित्र पक्षांना किती जागा मिळणार, ते या राज्यांत त्यांची ताकद किती, सध्याची राजकीय वातावरण काय आहे, त्यावर अवलंबून राहील.

शिवसेनेच्या जागा घटणार
शिवसेनेने गेले चार वर्षे भाजपशी वाद करण्यात घालवली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत दुरावा निर्माण झाला. गेल्या निवडणुकीइतका एकजिनसीपणा त्यांच्यात दिसला नाही. शिवसेनेला आठ-दहा जागा मिळतील. तमिळनाडूत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर भाजपने अण्णा द्रमुकच्या पक्षातंर्गत कारभारात अनावश्‍यक एवढे लक्ष घातले. त्या पक्षाच्या नेत्या शशिकला तुरुंगात गेल्या. मुख्यमंत्री बदलले. त्या पक्षातील 18 आमदारांचे सदस्यत्व गेले. त्यामुळे द्रमुकने तेथे आघाडी घेतली. आता भाजपने अण्णा द्रमुकशी आघाडी केली. मात्र, तेथे मित्रपक्षाला सात-आठ जागांवर समाधान मानावे लागेल.

बिहारमध्ये गोंधळाची स्थिती
बिहारमध्ये नितीनकुमार जरी भाजपबरोबर आले असले, तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत अद्याप मनोमिलन झाले नाही. राजद व कॉंग्रेसचे खासदार असलेल्या मतदारसंघात जद(यू) लढत आहे. बिहारमध्ये मोदी यांची सुप्त लाट दिसत असली, तर मित्रपक्षांना त्याचा किती फायदा होईल, ते सांगणे अवघड आहे. त्यामुळे नितीनकुमार व रामविलास पासवान यांच्या पक्षांना एकूण दहा-बारा जागांवर यश मिळाले, तरी खूप होईल. उत्तरप्रदेशात कुर्मी समाजाचे प्रभुत्व असलेल्या अपना दलाचे एक खासदार सोडून गेले. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल सध्या अटीतटीच्या लढतीत आहेत. त्यांचा पक्ष फुटला. त्यांची आई कृष्णा पटेल यांच्या नेतृत्वाखालील अपना दलाने कॉंग्रेसशी आघाडी करीत दोन जागा लढविल्या. त्यामुळे, अपना दलाला एखादी जागा मिळू शकेल.

आसाममध्ये पाचपैकी एखाददुसरी जागा मिळतील. केरळमध्ये फारशी आशा नाही. अन्य चार राज्यांतील चार जागांपैकी दोन जागा गृहीत धरू. त्यात कर्नाटकात मंड्या येथे मुख्यमंत्र्यांचा मुलगा निखील गौडा यांच्या प्रतिस्पर्धी अभिनेत्री सुमलता यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. तेथे भाजपला आशा आहे.

भाजपच्या मित्रपक्षांची राज्यनिहाय स्थिती लक्षात घेतल्यास, त्यांना 35 ते 40 जागा मिळू शकतील. भाजपच्या खासदारांची संख्या 2014 च्या तुलनेत कमी होत असताना, एनडीएतील त्यांच्या मित्रपक्षांनाही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 15 ते 20 जागा कमी मिळण्याची शक्‍यता आहे. भाजपचा स्वबळावर जोर असल्यामुळे, त्यांनी 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदा 11 जागा जास्त लढविल्या आहेत. त्यामध्ये काही मित्रपक्षांच्या जागाही त्यांनी स्वतःकडे घेतल्या. महाराष्ट्र, उत्तरप्रदेशात ते दिसून येते. भाजपचे नेतेही मित्रपक्षांच्या प्रचाराला गेले नाही. त्यांचे कार्यकर्ते मात्र मोदी पंतप्रधान व्हावेत, यासाठी मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचार मोहीमेत सहभागी होते.

एनडीएकडे गेल्या निवडणुकीत बहुमतापेक्षा 64 जागा जास्त होत्या. त्यामुळे, जागा किती कमी होणार व बहुमताच्या आकडेवारीपर्यंत पोहोचणार का, हा मुद्दा कळीचा ठरणार आहे. भाजपच्या विद्यमान नेतृत्वाने पक्षातील अनेक नेत्यांचे खच्चीकरण केले. मित्र पक्षांच्या नेत्यांनाही फारसा मान दिला नाही. शेवटी राजकारणात काही तडजोडी अपरिहार्य असतात. त्या प्रमाणे आघाडीत पक्ष सहभागी झाले. मात्र, सर्वत्र कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नाही. "मित्रो,' या प्रेमळ शब्दाने देश जिंकणाऱ्या मोदी यांना यावेळी "मित्रो, तुम नही, तो हमभी नही' अशी वेळ येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com