भाजप-शिवसेना युती टिकणार की तुटणार 

ज्ञानेश्‍वर बिजले 
Tuesday, 3 September 2019

भाजपला हव्यात जास्त जागा 
भाजपचे आमदार जास्त असल्याने, जादा जागा मिळाल्या पाहिजेत, असा मुद्दा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला. तर, भाजप- शिवसेना आमदारांच्या जागा त्या त्या पक्षाकडे ठेवून उर्वरीत शंभर जागा समसमान वाटून घेण्याचा नवा मुद्दाही भाजपच्या काही नेत्यांनी पुढे आणला. मात्र, शिवसेनेकडून थेट आक्रमक मांडणी सध्यातरी केली जात नाही. अमित शहा, फडणवीस आणि माझ्यामध्ये पूर्वी झालेल्या चर्चेनुसारच युतीचे जागावाटप होईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युती टिकणार की तुटणार, याबाबत दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. युती झाल्यास, अनेक मतदारसंघांत बंडखोरी व नाराजीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. स्वतंत्र लढल्यास, तिरंगी लढतीत विरोधी पक्षांना काही जागा आंदण दिल्यासारखे होईल. अशा पेचात अडकलेले दोन्ही पक्षांचे नेते युतीबाबतचा निर्णय गेल्या निवडणुकीसारखाच उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात जाहीर करण्याची शक्‍यता आहे. 

लोकसभा निवडणुकीत एकहाती बहुमत मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाचे नेते हातपाय गाळून बसले आहेत. अशा अनुकूल स्थितीत राज्यातही भाजपची एकहाती सत्ता मिळविण्यासाठी पक्ष नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा दबाव वाढू लागला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते "मेगा भरती' इव्हेंटमध्ये भाजपमध्ये प्रवेश करू लागल्याने पक्षकार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरू लागली आहे. 

शिवसेनेतही फारशी वेगळी स्थिती नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात युतीचे सरकार असतानाही भाजपच्या विरोधात शिवसेना आक्रमक होती. स्वतंत्र लढण्याचे प्रेशर असले, तरी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच निर्णय अंतिम असतो. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र शिवसेनेचा आवाज बसला आहे. सध्या कॉंग्रेस - राष्ट्रवादीचे अनेक आमदार शिवसेनेत प्रवेश करीत असल्याने, त्यांच्या जागा वाढण्याची, किमान टिकून राहण्याची शक्‍यता वाढली आहे. त्यामुळे, युतीसंदर्भात शिवसेनेकडून कोणतेही वक्‍तव्य केले जात नाही. 

जागा वाटपाचा पेच 
खरी मेख आहे ती जागा वाटपामध्ये. गेल्या वेळी शिवसेनेने भाजपला जागा वाढवून देण्यास नकार दिला. त्यामुळे भाजपने 25 वर्षांची युती तोडली. आता निम्म्या जागाही शिवसेनेला देण्याची भाजपची तयारी नाही. शिवसेना किती पडती भूमिका घेणार, यांवरच युती टिकणे अवलंबून राहील. शिवसेनेत आयाराम वाढले असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्यानंतरच ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तेत पुन्हा येता येईल की नाही, या बाबत भाजपचे नेते साशंक होते. त्यामुळे, त्यांनी पडती भूमिका घेत बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याशी, तसेच महाराष्ट्रात शिवसेनेशी युती केली. या दोन्ही पक्षांचे खासदार मोठ्या संख्येने आले, तरी तीनशे खासदारांचा आकडा पार करीत लोकसभेत बहुमत मिळाल्यानंतर, या पक्षांना मंत्रीमंडळात महत्त्वाची खाती देण्यास भाजप तयार झाले नाही. नितीशकुमार यांनी त्यांच्या पक्षाला मंत्रीपद घेतलेच नाही. शिवसेना मात्र एकच मंत्रीपद मिळूनही शांत राहिली. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीची घोषणा करताना, विधानसभेला युती राहील व दोन्ही पक्षांना समान जागा दिल्या जातील, हे ठाकरे यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासमोर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून वदवून घेतले. तेही पत्रकार परीषदेत. त्यामुळे मित्र पक्षांच्या 18 जागा वगळल्या तरी, भाजप व शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी 135 जागा येतात. भाजप व अपक्ष आमदारांची संख्याच त्याच्या आसपास होते. त्यातच पक्षात नव्याने भरती झालेले आमदार आहेत. त्यामुळे, उर्वरीत सर्व जागा शिवसेनेच्या वाट्याला जातात. एवढ्या जागांवर पाणी सोडण्याची भाजप नेतृत्वाची सध्यातरी तयारी नाही. त्यामुळे, युती होणार, असे नेते म्हणत असले, तरी जागा वाटप निश्‍चित होत नाही, तोपर्यंत तिढा सुटणार नाही. त्या चर्चेला अद्यापही सुरवात झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनीच नुकतेच सांगितले आहे. 

भाजपला हव्यात जास्त जागा 
भाजपचे आमदार जास्त असल्याने, जादा जागा मिळाल्या पाहिजेत, असा मुद्दा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला. तर, भाजप- शिवसेना आमदारांच्या जागा त्या त्या पक्षाकडे ठेवून उर्वरीत शंभर जागा समसमान वाटून घेण्याचा नवा मुद्दाही भाजपच्या काही नेत्यांनी पुढे आणला. मात्र, शिवसेनेकडून थेट आक्रमक मांडणी सध्यातरी केली जात नाही. अमित शहा, फडणवीस आणि माझ्यामध्ये पूर्वी झालेल्या चर्चेनुसारच युतीचे जागावाटप होईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

बंडखोरी होणार 
जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये सध्या अनौपचारीक चर्चा सुरू आहे. गणेशोत्सवात वरीष्ठ नेत्यात थेट चर्चा होईल. मात्र, युतीचे जागा वाटप हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीतच जाहीर होण्याची शक्‍यता आहे. युती झाल्यास, दोन्ही पक्षांतील इच्छुकांची नाराजी उफाळून येईल, याची जाणीव नेत्यांना आहे. आयारामांच्या विरोधात दोन्ही पक्षांतील निष्ठावंत नाराजी जाहीरपणे व्यक्त करीत आहेत. आत्ताच राज्यातील काही भागांत निष्ठावंतांना बंडखोरीचे इशारे दिले आहे. त्यातील काही इच्छुक विरोधी पक्षातूनही निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतील. काहीजणांनी बंडखोरी केली, तरी त्या मतदारसंघातील गणिते ते बिघडवू शकतात. 

दोन्ही पक्षांनी निवडणुकीनंतर युती करण्याचा निर्णय घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तरी शिवसेना यंदा सावध आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना बेसावध होती. भाजपने ज्या प्रमाणे सर्व मतदारसंघांत तयारी केली आहे, तशीच तयारी शिवसेनेनेही आता केली आहे. मात्र, दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले, तर कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी काही मतदारसंघात तिरंगी लढतीत बाजी मारण्याचीही शक्‍यता आहे. युतीचा निर्णय काय होतो आहे, याकडे विरोधी पक्षही लक्ष ठेवून आहेत. तेही नव्याने रणनिती ठरवतील. त्यामुळे, युती राहणार की तुटणार, यांवरच राज्यातील निवडणुकीचे चित्र बऱ्याच प्रमाणात अवलंबून राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Bijale writes about BJP Shivsena aliiance