esakal | Vidhan Sabha 2019 : जुने गेल्याने भाजपचे भावी नेते कोण? 
sakal

बोलून बातमी शोधा

bJP

पाटील - महाजन प्रबळ होणार 
भाजपच्या पक्षांतर्गत उलथापालथीनंतर, राज्याच्या पक्षाच्या राजकारणात फडणवीस यांच्यानंतर चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन हे आणखी प्रबळ होणार आहेत. मुनगंटीवाराचे स्थान कायम राहील. पंकजा मुंडे, आशिष शेलार, राम शिंदे, डॉ. परिणय फुके या चार मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात अटीतटीच्या लढतींना सामोरे जावे लागत आहे. त्यातून सुलाखून ते विधानसभेत दाखल झाल्यास, त्यांनाही चांगली खाती मिळतील. 

Vidhan Sabha 2019 : जुने गेल्याने भाजपचे भावी नेते कोण? 

sakal_logo
By
ज्ञानेश्वर बिजले

राज्यात भाजप पुन्हा सत्तेवर येणार, याबाबत निवडणूक प्रचाराच्या धामधुमीतही कोणाच्या मनात तशी फारशी शंका नव्हती. ज्येष्ठ नेते शरद पवार सोडले, तर अन्य विरोधकांनी तलवारी केव्हाच म्यान केल्या होत्या. शिवसेनेचा वाघही डरकाळी फोडण्याचे विसरत माणसाळला होता. भाजप सत्तेतील किती वाटा शिवसेनेला देणार, तेच आता पाहावयाचे शिल्लक राहिले आहे. त्यापेक्षाही यापुढील काळात महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या कोणकोणत्या नेत्यांना आता राज्यात नेतृत्वाची संधी मिळणार, याचीच उत्सुकता वाढली आहे. 

"देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र' ही घोषणा पाच वर्षांपूर्वीच विधानसभा निवडणुकीपूर्वी गाजली होती. फडणवीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर, कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर या घोषणा दिल्या होत्या. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मुंडे यांचे अचानक निधन झाल्यानंतर, फडणवीस यांच्यासह प्रदेशातील भाजपच्या पाच नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा एकत्रितरित्या सांभाळली. त्यामध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांचा समावेश होता. 

मोदी लाटेच्या जोरावर एकहाती सत्ता मिळविण्याच्या अपेक्षेने भाजपने 25 वर्षांची शिवसेनेसोबतची युती तोडली. तत्कालिन आघाडी सरकारवरील नाराजीमुळे मतदारांना भाजपला भरभरून मते दिली. मात्र, भाजप 122 जागांवर अडकला. विरोधकांचे पानिपत झाल्याने, भाजपची सत्ता आली. वानखेडे स्टेडियमवर भव्यदिव्य शपथविधी सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक, उद्योगजगत यांसह सिनेसृष्टीतील लोकांची हजेरी लागलेली होती. 

भाजपचे तत्कालिन नेतृत्व 
फडणवीस, खडसे, सुधीर मुनगंटीवार, तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर या दहा जणांचा शपथविधी झाला. राज्याचे भाजपकडून नेतृत्व या दहा जणांच्या हाती प्रथम सोपविण्यात आले. आता कोठे आहेत, त्यापैकी काही नेते? 

खडसे, तावडे, मेहता, सावरा, कांबळे या पाच जणांना पक्षाने उमेदवारीच दिली नाही. खडसे, सावरा, कांबळे यांच्या नातेवाईकांना त्यांच्याऐवजी उमेदवारी मिळाली. ठाकूर यांना मंत्रिमंडळ फेररचनेत बदलण्यात आले. 

पुढील फेरीत मंत्रिमंडळात समावेश झालेल्यामध्ये गिरीश बापट, गिरीश महाजन, राजकुमार बडोले, चंद्रशेखर बावनकुळे आदींचा समावेश होता. त्यापैकी बावनकुळे यांना उमेदवारी नाकारली. बापट खासदार झाले. बडोले यांना मंत्रिमंडळाच्या फेररचनेच्या वेळी वगळण्यात आले. 

पाटील - महाजन प्रबळ होणार 
भाजपच्या पक्षांतर्गत उलथापालथीनंतर, राज्याच्या पक्षाच्या राजकारणात फडणवीस यांच्यानंतर चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन हे आणखी प्रबळ होणार आहेत. मुनगंटीवाराचे स्थान कायम राहील. पंकजा मुंडे, आशिष शेलार, राम शिंदे, डॉ. परिणय फुके या चार मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात अटीतटीच्या लढतींना सामोरे जावे लागत आहे. त्यातून सुलाखून ते विधानसभेत दाखल झाल्यास, त्यांनाही चांगली खाती मिळतील. 

आयारामांचे काय? 
भाजपने प्रारंभीच्या काळात पक्षात आलेल्या अन्य पक्षांतील नेत्यांना व मित्र पक्षांना फारसे स्थान दिले नव्हते. त्यानंतर, रासपचे नेते महादेव जानकर, स्थाभिमानी शेतकरी संघटनेचे सदा खोत यांना मंत्रिमंडळात घेतले. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षात प्रवेश केलेले विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, तसेच रिपब्लिकन पक्षाचे अविनाश महातेकर यांना शेवटच्या तीन महिन्यांत मंत्रीपद मिळाले. 
मात्र, भाजपची आत्तापर्यंतची वाटचाल पाहिल्यास, पक्षात आयारामांना फारसे मानाचे स्थान मिळत नाही. यापुढेही तीच परंपरा कायम राहण्याची शक्‍यता आहे.

loading image