युतीतील इच्छुकांचे धाबे दणाणले

ज्ञानेश्‍वर बिजले 
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

सलग दहा वर्षे पुन्हा तेच चेहरे. मग आपले राजकीय भवितव्य काय? गेल्या वेळी अनेकजण लाटेत निवडून आले. पुन्हा तेच नेते. गेल्या वेळी अनेक नवे चेहरे आमदार झाले होते. यंदा निवडणुकीच्या रिंगणात नवे चेहरे उतरविण्याची संधी विरोधी पक्षाकडे आहे. मग विरोधी पक्षाद्वारे लढायचा काहीजणांचा विचार आहे, तर थेट अपक्ष म्हणून लढण्याची तयारीही अनेकजण बोलून दाखवत आहेत.

भाजप - शिवसेना युतीबाबत सकारात्मक अथवा नकारात्मक निर्णय होत नसल्याने, दोन्ही पक्षांतील इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्यातील काहीजणांच्या बंडखोरीच्या भितीने युतीचे नेतेही वेगवेगळ्या घोषणा करीत इच्छुकांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत. भाजप व शिवसेनेने सर्वच मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतीला प्रारंभ केल्याने, नक्की काय घडणार आहे, त्याचा आपापल्या पद्धतीने अन्वयार्थ लावण्यात इच्छुक गुंतून पडले आहेत. 

भाजप - शिवसेना युतीच्या सत्तेच्या काळात दोन्ही पक्षांत साडेचार वर्षे झालेले वाद आता पडद्याआड गेले आहेत. भाजपचे प्रदेशातील नेते शिवसेनेपेक्षा जादा जागांची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. शिवसेनेनेही ते मान्य केल्याच्या संभ्रम त्यांनी निर्माण केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच युतीची सत्ता येणार असल्याचे घोषणा केली. त्यामुळे, शिवसेनेने युतीवर शिक्कामोर्तब केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी राज्यातील सर्व मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास त्यांनी सुरवात केली. शिवसेनेचे जिल्हापातळीवरील नेतेही स्वतंत्र लढण्याच्या घोषणा करतानाच, युती होणार असल्यास, अनेक मतदारसंघावर हक्क सांगू लागले आहेत. 

भाजपच्या गोटातही जिल्हा पातळीवरील नेत्यांचा निवडणूक स्वतंत्र लढण्याबाबतचा दबाव पक्षश्रेष्ठींवर वाढू लागला आहे. विभागीय पातळीवरील मतदारसंघनिहाय राजकीय बलाबल, संभाव्य उमेदवार यांचा आढावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला. स्वतंत्र लढल्यास, भाजप 160 जागा जिंकत बहुमत मिळवतील, असे सांगतानाच युती होणार असल्याचेही भाजपचे नेते आवर्जून सांगत आहेत. एक प्रकारे शिवसेनेवरील दबाव वाढविण्याचाच हा प्रकार असल्याचे दिसून येते. 

वीस ते पंचवीस विद्यमान आमदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देणार, दोन्ही पक्ष काही जागांची अदलाबदल करणार, निवडून येणाऱ्यांना संधी मिळणार, अशा विविध स्वरुपाच्या बातम्या कार्यकर्त्यांमध्ये पसरविल्या जात आहेत. त्यामुळे, इच्छुकांनाही आशेला लावले जात आहे. गणेशोत्सवानंतर युती जाहीर होईल, असे सांगितले जात असतानाच युतीच्या जागा वाटपाच्या बैठकीतील नेत्यांच्या मतभेदाच्या बातम्याही प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. यांमुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण वाढू लागले आहे. 

युती झाल्यास, सत्ताधारी पक्षांत असलेल्या सध्याच्या दोनशेपैकी किमान दीडशे ते एकशे साठ आमदारांना निवडणूक लढण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. विरोधी पक्षात शिल्लक राहिलेले आमदार तर निवडणुकीच्या रिंगणात निश्‍चितपणे उतरणार असल्याने ते मतदारसंघाच्या बांधणीलाही लागले आहेत. म्हणजे जवळपास सव्वादोनशे मतदारसंघांत विद्यमान आमदारच पुन्हा विधानसभेत जाण्याच्या तयारीने उतरणार आहेत. 

सलग दहा वर्षे पुन्हा तेच चेहरे. मग आपले राजकीय भवितव्य काय? गेल्या वेळी अनेकजण लाटेत निवडून आले. पुन्हा तेच नेते. गेल्या वेळी अनेक नवे चेहरे आमदार झाले होते. यंदा निवडणुकीच्या रिंगणात नवे चेहरे उतरविण्याची संधी विरोधी पक्षाकडे आहे. मग विरोधी पक्षाद्वारे लढायचा काहीजणांचा विचार आहे, तर थेट अपक्ष म्हणून लढण्याची तयारीही अनेकजण बोलून दाखवत आहेत. या बंडाची भितीही युतीच्या नेत्यांना भेडसावत आहे. 

युती झाल्यास सत्ता मिळण्याची खात्री दोन्ही पक्षांतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे. दोन्ही पक्षांत ज्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे, ते युती व्हावी यासाठी आग्रही आहेत. मेगाभरतीद्वारे दोन्ही पक्षांत आलेल्या विरोधी पक्षातील नेत्यांनाही उमेदवारी मिळेल. मात्र, ज्यांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागणार आहे, ते स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरीत आहेत. त्यामुळे युतीचे जागावाटप झाल्यास काहीजण पक्षांतर करण्याचीही भिती आहे. 

या सर्व घडामोडी आणखी किती दिवस सुरू राहतील, याचा निश्‍चित अंदाज कार्यकर्त्यांना सध्यातरी बांधता येत नाही. गणेशोत्सवानंतर आठवडाभरात निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. त्यावेळी या सर्वच हालचालींना गती प्राप्त होईल. अंतीम निर्णय भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याने, त्यांच्यात नक्की काय ठरले आहे, ते जोपर्यंत जाहीर होत नाहीत, तोपर्यंत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार चिंताग्रस्तच असतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Bijale writes about probable candidates in BJP Shivsena